२२ डिसेंबरच्या पुरवणीत आलेला मोहिनी निमकर यांचा ‘विवाह संस्कार की करार?’ हा लेख वाचला. मी त्यांच्याच पिढीतील एक असल्यामुळे की काय, पण वाचता क्षणी मला तो अगदी जवळचा, जिव्हाळ्याचा वाटला. मात्र पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया ओसरल्यावर, मुळाशी जाऊन पुन्हा विचार करतो, मला लेखातील काही मुद्दे, आजच्या काळाच्या संदर्भात पुन्हा नव्याने विचारात घ्यावे लागतील असे जाणवू लागले आणि त्याबद्दल थोडे लिहावेसे वाटले.
आज जे विवाह समारंभ होतात त्यातील बहुसंख्य विवाह हे प्रदर्शनीय, प्रतिष्ठा, पैसा, हौस यावर बेतलेले असतात. आजची युवा पिढी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर विवाह करू दे. आजही त्याचा साचा ठरलेला असतो, म्हणजे त्यात मेंदी (सिनेमा स्टाइल), नाच-गाणी, खाणे-पिणे, मौज-मस्ती-धमाल- सारे परप्रांतीयांचे अंधानुकरण. असे दोन दोन दिवस चाललेले असते! या साऱ्यांत संस्काराचा कोणताही भाग नसतो. तसा विचारही संभवत नसतो. फार काय, जमलेल्या ज्येष्ठ मंडळींच्याही मनात नसतो! तेव्हा आता या संकल्पनेचा बाऊ करण्यात काहीच मतलब नाही. रॅशनल विचार करणाऱ्या या पिढीने विवाहाकडे ‘करार’ याच संकल्पनेतून  पाहणे पसंत केले आहे. तेथे भावनिकता (इमोशनल) (पूर्वीइतकी) दिसत नाही.
आयुष्यात ‘लग्न’ हे व्हायलाच हवं का, इथपासून तरुणाईची सुरुवात आहे. दोन भिन्न व्यक्तींनी आयुष्यभर एकत्र राहायचे ही कल्पनाच महाकठीण. तडजोड ही तर फार पुढची पायरी, अशी त्यांची विवाहासंबंधीची धारणा. योग्य वेळी लग्न होणं योग्यच आहे, पण ते फक्त पालकांना वाटून उपयोगी नाही. आजच्या जमान्यात मुलीचे लग्न वेळेवर करून दिले तरी नंतर ती संसारात रमेल याची हमी कुणी द्यावी? त्या बिनधास्त परत घरी आल्या तर.. ती भीतीही पालकांनाच! तुमचाच अट्टहास म्हणून केलं लग्न असंही सुनावलं जातं!
मुलगी सासरी गेली की, तिला अनेक नव्या गोष्टींना सामोरे जावे लागते असे सांगत, मोहिनीताईंनी त्यांची एक भली मोठी यादीच सादर केली आहे. ती नीट वाचल्यावर लक्षात येते की, यातल्या बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य़ झालेल्या आहेत. उदा. ‘सासरचा गोतावळा’ म्हणाल, तर यापुढील राज्य सुनेचे असणार हे लक्षात घेऊनच आजच्या सावध सासवा अशी नाती सांभाळतात. असो.
‘जी जोडपी स्वतंत्र राहतात, त्यांचेही संसार फार सुखाचे होतात असे नाही’ असे लेखिकेला वाटते. मात्र माझ्या मुली, त्यांच्या मैत्रिणी, सून व तिच्या मैत्रिणी यांच्या २०-२२ वर्षांच्या अनुभवातून मी काढलेला हा निष्कर्ष आहे, नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसातील ८-१० तास घराबाहेर राहणे, देशा-परदेशातील वाऱ्या, नोकरांच्या मदतीने घर चालविणे, मुलांसाठी शाळा, अभ्यास, परीक्षा याबरोबरच पालकसभा, सहली, गॅदरिंग, निरनिराळ्या स्पर्धा या सर्वासाठी गुणवत्तापूर्ण सहभाग देण्यासाठीची धडपड यात नवी पिढी कुठेच कमी पडत नाहीत. स्वत:साठी वेळ काढीत असता, जोडीदाराला कंपनी देत त्याला त्याची स्पेस मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असतात. यात अनेक ठिकाणी जोडीदाराची साथ मिळत असते, ज्यामुळे ही कसरत त्यांच्या अंगवळणी पडते.
‘जीवन सुखी, समाधानी होण्यासाठी दोघांजवळ सामंजस्य, सामोपचार, संयम, सहनशीलता, सुवर्णमध्य हे ‘स’सुद्धा असायला हवेत’ या लेखिकेच्या विधानाशी कोणीही सहमत होईल. बदललेली परिस्थिती नवरा-बायको दोघांनीही सामोपचाराने घेतली तर संसार उत्तम होतात, हे विधानही पटण्याजोगेच आहे.
प्रभा हर्डीकर, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीही प्रश्न सुटतील का?
चतुरंग (१२ जाने.)च्या पुरवणीमध्ये मंगला सामंत यांचा ‘लैंगिकतेचे शमन हवेच’ हा लेख वाचला. त्यातील काही मुद्दे पटले तर काहींबद्दल मनात असंख्य प्रश्न उभे राहिले.
लेखिकेने पुरुषप्रधान संस्कृती, पुरुषी अहंकार, बालपणीचे संस्कार यांबद्दल व्यक्त केलेले मतही पटण्याजोगेच आहे. प्रश्न हा आहे की, हा पुरुषी अहंकार, जोपासण्याचं, फुलवण्याचं त्याला खतपाणी घालून त्याचा विषवृक्ष बनवण्याचं काम प्रामुख्याने कुटुंबातला कोणता घटक करतो? या प्रश्नाचं उत्तर ‘स्त्रीवर्ग’ हेच होय. लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री-पुरुष मुक्त शरीरसंबंधांना मान्यता देणाऱ्या समाजात बलात्कार होत नाही. पण प्रश्न असा पडतो की, अशा ‘फ्री सेक्स’ला मान्यता देणाऱ्या समाजात एखाद्या पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण वाटले आणि त्याने या मुक्त शरीरसंबंध मान्यतेचा लाभ उठवून त्या स्त्रीकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु त्या स्त्रीला त्या पुरुषाविषयी तसे आकर्षण वाटत नसल्याने तिने त्याच्या मागणीला नकार दिला. अशा वेळी हा फ्रीसेक्सवाल्या समाजातील पुरुष काय करेल? तो कसा वागेल? त्या स्त्रीच्या भावनांचा आदर करून तो तिची क्षमा मागेल की, ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने तो तिच्यावर बळजबरी करू पाहील? माझ्या मते तरी तेच होईल जे सध्या होते आहे. जोपर्यंत स्त्रियांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या लैंगिक इच्छेला मान दिला जात नाही तोपर्यंत स्त्रीवर अत्याचार होतच राहणार. मग तो समाज विवाहसंस्था मानणारा असो वा मुक्त शरीरसंबंधांना मान्यता देणारा असो. कारण दोन्ही ठिकाणी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘उपभोगाची वस्तू’ असाच आहे.
बलात्काराचे प्रमाण ताबडतोब घटावे असे वाटत असेल तर अतिकठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा अस्तित्वात यायला हवा. (‘मानवी हक्क’वाले त्याला क्रूर समजून विरोध करणार हे नक्की!) तसेच दाखल झालेल्या संबंधित केसेसची लवकरात लवकर सुनावणी होणे आवश्यक आहे. जेणेकरून पीडित मुलीला व इतर साक्षीदारांना फितवणे, घाबरवणे व दबाव टाकून साक्ष बदलवायला भाग पाडणे इ. गोष्टी टाळता येतील ज्या सुनावणी लांबल्यामुळे होऊ शकतात.
– संगीता पाटकर, डोंबिवली.

नव्या वर्षांत नव्या स्वरूपात,नव्या विषयांसह ‘चतुरंग’ तुम्हाला भेटतो आहे. प्रत्येक लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. तुमची मते, तुमचे विचार आम्हाला लिहून कळवा. निवडक प्रतिक्रिया नक्कीच प्रसिद्ध करू. ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letters to editor in todays days marriage is an agreement
First published on: 26-01-2013 at 01:01 IST