‘‘.. पण करतो मॅनेज. आपल्याला जे शक्य नाही आणि आपल्या आयुष्यासाठी जे महत्त्वाचं नाही ते बाजूला ठेवायचं. नाहीच जमलं तर सोडून द्यायचं. भौतिक सुखं हाताशी आली म्हणजे माणूस सुखी होतोच असं नाही. महत्त्वाचं काय तर आनंदानं, समाधानानं जगणं!
‘‘म म्मी, मला जॉब मिळाला,’’ घरात पाऊल टाकल्या टाकल्या आपल्या आईच्या जान्हवीच्या गळ्यात पडून पूजा म्हणाली.
‘‘बरं झालं, एकदाचं टेन्शन संपलं. तुझ्या पप्पांना सांगितलं का?’’ जान्हवी.
‘‘संध्याकाळी येतील तेव्हा सरप्राईज देऊ या,’’ असं म्हणून पूजा आपल्या मत्रिणीला फोन लावण्यात गुंतली. गेल्या महिन्या दीड महिन्यापासून नोकरीसाठी तिचे प्रयत्न चालू होते. आज कसं सगळं जुळून आलं होतं. त्यामुळे खूप खूष होती ती.
‘‘हॅलो रेश्मा, अगं, झाले मी सिलेक्ट!’’
‘‘व्वॉव! काँग्रॅट्स.. सॅलरी किती गं?’’
‘‘साडेआठ देतो म्हणाले. ठीक आहे नं, जवळच असल्यानं येण्या-जाण्याचा फारसा खर्च नाही.’’
‘‘आणि त्रासही कमीच! छान झालं,’’ रेश्मा.
‘‘कधीपासून चाललं होतं, इकडे इंटरव्ह्य़ूला जा, तिकडे इंटरव्ह्य़ूला जा. आता एकदम रिलॅक्स वाटतंय. बरं एक सांग, त्या दिवशी तू तो लाईट-ग्रीन कलरचा ड्रेस घातला होतास, तो फॅशन-स्ट्रीटवरून घेतला की आणखी कुठून?’’
‘‘तोऽ, तो माझ्या मावशीने बंगळुरूहून पाठवलाय. एवढा आवडला तुला?’’ रेश्मा.
‘‘मऽस्तच आहे! मलाही दोन-तीन ड्रेस घ्यायचेत. पहिला पगार झाला की मस्तपकी शॉपिंगला जाईन म्हणते! तू येशील नं?’’ मोठय़ा उत्साहानं पूजानं तिला विचारलं.
‘‘जाऊ या नं!’’ रेश्मा उत्तरली.
‘‘पूजा , ए पूजाऽ.. दिवसभर फोनवर गप्पा! पसे लागतात की नाही?’’ किचनमधून जान्हवी ओरडली.
‘‘आई ओरडतेय, मी नंतर करते तुला फोन,’’ असं म्हणून पूजा किचनमध्ये आली.  
‘‘काय गं, जेव्हा पाहा तेव्हा ओरडतंच असतेस,’’ पूजा जान्हवीवर खेकसली.
‘‘दळण ठेवून येतेस का जरा, तोपर्यंत मी स्वयंपाकाचं आवरते.. आणि हो, कोपऱ्यावरल्या भाजीवाल्याकडून येताना एखादी भाजी आण,’’ जान्हवीनं नेहमीप्रमाणे राग गिळला. आपली तगमग आपल्या लेकीलाही कळू नये याचं तिला वाईट वाटलं.
‘‘तू गायनाचा क्लास लावणार होतीस नं, त्याचं काय झालं?’’ उगाचंच आपण आईवर चिडलो असं वाटून थोडय़ा वेळानं पूजानंच जान्हवीला विचारलं.
‘‘तुझे पप्पा म्हणाले आणखी दोन-तीन महिन्यांनी लाव. हा महिनाही ओव्हर बजेटच झालाय.’’ दळणाचं काढता काढता जान्हवी बोलत होती, ‘‘हे बघ, थांबून लगेच घेऊन ये. पीठ संपलंय.’’
‘‘मी नाही थांबत इतका वेळ, तुला आधीच द्यायला काय झालं होतं?’’ पूजाचा पारा पुन्हा वर गेला.
‘‘दुपारीच देणार होते, पण विसरले कामाच्या गडबडीत!’’ जान्हवी.
‘‘अंबरकडून वडापाव घेऊन येऊ का? नाही तर सरळ जेवायला बाहेरच जाऊ या.’’
‘‘नको. उगाच खर्च कशाला! असंही पुढच्या आठवडय़ात जाणं होईलच की आपलं,’’ जान्हवी.  
‘‘मी आता जॉब जॉईन करतेचंय ना, माझा पगार येईलच की!’’
‘‘येईल तेव्हा पाहू, त्याआधीच..’’
‘‘जा गं मम्मी, कंटाळा आलाय रोज रोज घरचं खाऊन.’’
‘‘कंटाळा आम्हालाही येतो गं! पण काय करणार.. लोकांना घरचं मिळत नाही म्हणून बाहेरचं हादडतात काही तरी! अन् नेहमी नेहमी बाहेरचं खाणं नाही आपल्या बजेटमध्ये शक्य.’’
‘‘बजेट-बिजेट जाऊ दे खड्डय़ात!’’  
‘‘वेडीयेस का तू! तुझे पप्पा तर या वर्षी गणपतीही अगदी साधेपणानं बसवायचं म्हणत होते. गरजा सीमित ठेवल्या की..’’
‘‘जा गं, मी येतेच काही तरी घेऊन,’’ असं म्हणून पिशवी घेऊन पूजा बाहेर पडलीसुद्धा! हातात दळणाची ती पिशवी घेणंही नेहमी तिला कसं तरी वाटायचं. पण खुशीत असल्यानं त्या गोष्टीकडे आज तिचं लक्ष गेलं नाही.
‘‘घ्या हे कापा जरा,’’ आईस्क्रीमचा पॅक आपल्या नवऱ्यासमोर मिलिंदसमोर सरकवत जान्हवी म्हणाली.
त्यांची रात्रीची जेवणं नुकतीच आटोपली होती.
‘‘अरे वा, माझ्या आवडीचा फ्लेवर आहे,’’ मिलिंद.  
‘‘पप्पा, मला नोकरी मिळाली,’’ पूजा.
‘‘व्हेऽरी गुड.. अभिनंदन बेटा. केव्हापासून जॉईन करतेयस?’’
‘‘उद्यापासूनच!’’ पूजा
‘‘एकदम सरप्राईज!’’ मिलिंद.
‘‘सुरुवातीला साडेआठ देणारेय,’’ पूजा.
‘‘ठीक आहे नं.. जॉब सुरू होणं महत्त्वाचंय,’’ मिलिंद.
‘‘माझंच काम वाढतंय. दुपारी आराम करायलाही वेळ मिळत नाही हल्ली. कधीपासून गायनाचा क्लास लावायचं डोक्यात आहे, पण.. उद्यापासून आणखी पंधरा मिनिटं आधी उठावं लागेल,’’ जान्हवी.
‘‘का?’’ मिलिंद.
‘‘हिचं टायिमगही नऊ ते सहा आहे,’’ जान्हवी.
‘‘आणखी एक महिना गं मम्मी,’’ पूजानं जान्हवीची समजूत काढायचा प्रयत्न केला.
‘‘महिन्यानंतर काय फरक पडणारेय?’’ कसंनुसं तोंड करत जान्हवीनं विचारलं.
‘‘स्वयंपाकालाही बाई लावून आपण. तू तुझा गाण्याचा क्लास या महिन्यापासून लावलास तरी हरकत नाही. पप्पा, तुम्ही गणपतीचं बुकिंगही करून टाका. दोनच महिने आहेत गणपतीला. नंतर शाडूच्या मूर्तीची ऑर्डर घेणार नाहीत मग ते!’’
 पहिला पगार येण्याच्या निमित्ताने दोघा मायलेकींची बजेट-आखणी सुरू झाली.
‘‘काय गं मम्मी, गणपती आटोपले की आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊन या तुम्ही दोघं.’’
‘‘आमचं माहूरगडला जाणं राहिलं तर चालेल. त्याआधी तुझ्या पप्पांना औरंगाबादला जावं लागणारेय.’’
‘आता हे औरंगाबादचं मध्येच कुठून आलं?’’ पूजा.
‘‘तुझ्या पप्पांच्या कॉलेजमधल्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी गेट-टू-गेदर ठेवलंय. अठ्ठावीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सगळे भेटणारेयत.’’
‘‘मस्त नं! पप्पांचे जुने मित्र-मत्रिणी भेटतील. किती मज्जा असेल! पप्पा, तुम्ही नक्की जा. माहुरगडला जा, येताना गेट-टू-गेदर अटेन्ड करा, एका दगडात दोन पक्षी!’’ पूजालाही हुरूप आला.
‘‘ते आम्हालाही कळतं गं! पण खर्चाचा ताळमेळ नको का बघायला. उद्याच्या आनंदासाठी आत्ताच किती ओझं वाहायचं?’’ जान्हवी.
जान्हवीनं म्हटल्यानं आता मात्र पूजा विचार करायला लागली – ‘खरंच.. कशाला आपण इतकी ओढाताण करतो? स्वप्नं असावीत, पण ती अवास्तव नसावी. स्वप्नांमुळे वर्तमानाचं सुख हिरावलं जावू नये. जगणं कसं सहज-सुंदर असावं. स्वतशीच ती हसली, मनाशी बोलू लागली – स्वत:साठी जगता जगता सोबतीच्यांनाही बरोबर घ्यावं. नदी जशी आपल्या वाटेनं वाहता वाहता आजूबाजूच्या वस्त्या, गावं, शेतं-शिवारं समृद्ध करते. किनाऱ्यावरल्या देवळांचं सौंदर्यही वाढवते. तस्सं! आपणच आपल्याला बघावं.. स्वच्छ मनानं!..’ गप्पा मारता मारता ती आज इतक्या खोलात शिरली होती.
‘‘काय गं, कसला इतका विचार करतेयस?’’ तिला विचारात गढलेलं पाहून जान्हवीनं विचारलं.
‘‘काही नाही. दर महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ तुम्ही कसे अ‍ॅडजेस्ट करत असाल?’’
‘‘थोडसं होतं इकडे-तिकडे. पण करतो मॅनेज. आपल्याला जे शक्य नाही आणि आपल्या आयुष्यासाठी जे महत्त्वाचं नाही ते बाजूला ठेवायचं. नाहीच जमलं तर सोडून द्यायचं. भौतिक सुखं हाताशी आली म्हणजे माणूस सुखी होतोच असं नाही. महत्त्वाचं काय तर आनंदानं, समाधानानं जगणं!’’
‘‘त्यामुळेच संसाररथाची चाकं न अडखळता गती घेतात. नाही तर मग रस्सीखेच ठरलेलीच आहे!’’ म्हणत मिलिंदनं जान्हवीकडे पाहिलं.
तिच्याही दोन्ही डोळ्यांत आयुष्य जगण्याची तृप्ती होती..   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live life with satisfaction
First published on: 11-10-2014 at 01:01 IST