scorecardresearch

Premium

आरोग्यम् धनसंपदा : ऋणानुबंध आहारतत्त्वाशी

आपला पारंपरिक महाराष्ट्रीय आहार, एवढंच काय भारतीय आहार, चौरस आणि अतिशय आरोग्यदायी समजला जातो.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

सुकेशा सातवळेकर

आरोग्याकडे जाणारा मार्ग, औषधांच्या दुकानांतून न जाता स्वयंपाकघरातून जातो, हे ‘आरोग्यम् धनसंपदा’ या सदरातून विस्ताराने समजावता आलं. जगताना आवश्यक आहारतत्त्वाशी जुळलेले ऋणानुबंध वाचकांपर्यंत पोहोचवता आले. पहिल्याच लेखामुळे वाचकांशी थेट सुसंवाद सुरू झाला. अनेक जणांनी ईमेलद्वारे प्रतिसाद नोंदवला. काहींनी आवर्जून फोन करून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून साध्या-सोप्या मांडणीतील महत्त्वपूर्ण माहितीबद्दल समाधान व्यक्त केलं. तुम्हा सर्वाना आरोग्याच्या शुभेच्छा.

loksatta district index road construction in ratnagiri district achievements in banking sector
बँका, रस्त्यांच्या जाळ्यामुळे रत्नागिरी विकासाच्या वाटेवर
आरोग्य, बँकिंग सुविधांमुळे सिंधुदुर्गची आश्वासक वाटचाल
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal
“ओबीसी समाज थोडा अशिक्षित आणि अल्पसंख्यांक असल्याने…”, जितेंद्र आव्हाडांची भुजबळांवर टीका
Employees applying for enhanced pension under the Employees Retirement Scheme are waiting
ईपीएस वाढीव पेन्शनसाठी महाराष्ट्रात प्रतीक्षाच, निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप ‘डिमांड’ नाही

नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे, मजेत ना? आपलं आरोग्य सांभाळताय ना? आणि खाणंपिणं?, त्याकडे लक्ष आहे ना? झकास. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या सदराच्या माध्यमातून आपले अगदी घट्ट ऋणानुबंध जमले, हो ना? जानेवारीपासून सुरू झालेला हा लेखनप्रवास, बघता बघता वर्षपूर्तीपर्यंत आला.

या सदराच्या माध्यमातून दर पंधरवडय़ाने तुमच्याशी संवाद साधता आला, आहारविषयक चर्चा घडली, याचं समाधान, आनंद तर आहेच पण यापलीकडे एक प्रकारची हुरहुरही आहे. आहारशास्त्र हे इतकं सखोल, व्यापक शास्त्र आहे, की अजून बरंच काही मांडायचं राहून गेलं की काय, असं वाटतंय. आरोग्यम् धनसंपदा! उत्तम आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि त्यासाठी आपला आहार, व्यायाम आणि मन:शांती म्हणजेच; थोडक्यात, आपली जीवनशैली सांभाळायला हवी. नियमित सुयोग्य आहार हा आरोग्याचा गुरुमंत्र आहे; खरं ना? म्हणूनच या सदरातून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आहारशैलीविषयी लिहायचं ठरवलं. अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी, रोजच्या आहारात काय काय बदल करायला हवेत; ते मांडण्याचा प्रयत्न केला.

सदराची सुरुवात ही सर्वसाधारणपणे काय खावं? कसं खावं? केव्हा खावं? काय खाऊ नये? याविषयीची चर्चा आणि त्याबरोबरच जीवनशैलीतील छोटय़ा छोटय़ा, सोप्या, सकारात्मक बदलांविषयी भाष्य करत झाली. पहिल्याच लेखामुळे वाचकांशी थेट सुसंवाद सुरू झाला. अनेक जणांनी ईमेलद्वारे प्रतिसाद नोंदवला. काहींनी आवर्जून फोन करून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून; साध्या-सोप्या मांडणीतील महत्त्वपूर्ण माहितीबद्दल समाधान व्यक्त केलं. एकदोघांनी बारीक त्रुटीही दाखवल्या. ‘चतुरंग’च्या दर्दी आणि जागरूक वाचकांशी ओळख झाल्यानंतर जबाबदारीची जाणीव झाली.

हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे निसर्गचक्रातील प्रमुख ऋतू. या प्रत्येक ऋतूनुसार आपल्या शरीराची कार्यपद्धती बदलते आणि त्यानुसार काही आहारतत्त्वंही बदलतात. बदलत्या हवामानानुसार आपल्या खाण्यापिण्यात महत्त्वपूर्ण बदल आवश्यक असतात. त्या त्या ऋतूत खाणंपिणं कसं असावं ते स्वतंत्रपणे तीन लेखांद्वारे मांडलं. हे लेख आवडल्याचंही अनेकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कळवलं. तेव्हा ‘लोकसत्ता’चा विस्तृत आवाका लक्षात आला. संतुलित आहाराचं महत्त्व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असतं. स्वास्थ्यपूर्ण, निरामय जगण्यासाठी आणि जीवनशैलीजन्य विकार होऊ नयेत म्हणून, तसंच विकार असतीलच तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी; संतुलित आहार अत्यावश्यक असल्याचं जगन्मान्य संशोधनाने सिद्ध झालंय.

आपला पारंपरिक महाराष्ट्रीय आहार, एवढंच काय भारतीय आहार, चौरस आणि अतिशय आरोग्यदायी समजला जातो. समतोल आहारावरील लेख आवडल्याचं खूप जणांनी कळवलं. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून झटणाऱ्या एका शिक्षकाने मुलांना हा लेख आवर्जून वाचून दाखवल्याचं कळवलं. आपल्या देशाचं भविष्य असलेल्या मुलांच्या सुदृढ वाढीसाठीचा, लेखाच्या स्वरूपातील माझा छोटासा सहभाग आनंद देऊन गेला. ‘जनुकीय संरचना आणि आहार’ या लेखानंतर अक्षरश: शेकडो वाचकांनी वैयक्तिक संवाद साधला. काहींनी प्रत्यक्ष भेटून, जनुकीय संरचना तपासून घेऊन, त्यानुसार आहार मार्गदर्शनाचा लाभ घेतला. त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्याची संधी मिळाल्याचं समाधान वाटतंय. अजूनही काही जण संपर्क साधतायत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांने विज्ञान तंत्रज्ञानातील अत्याधुनिक माहिती पुरवणारे मराठी भाषेतील लेख; मार्गदर्शक ठरत असल्याचं मत नोंदवलं.

आरोग्याशी निगडित काही विशेष ‘दिन’ जगभरात साजरे केले जातात. अशा विश्वदिनांचं औचित्य साधून काही विशिष्ट विषयांवर लेखन केलं. ‘पाणी हेच जीवन’ हा रोजच्या आहारातील पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा लेख, ‘विश्वजल दिना’निमित्त प्रकाशित झाला. या लेखात आवश्यक तेवढं पाणी पिण्याचे  विविध मार्ग सुचवून, स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचं महत्त्व विशद केलं होतं. ‘विश्व स्तन्यपान सप्ताहा’चं औचित्य साधून ‘अलौकिक वरदान’ हा लेख लिहिला. स्तन्यपानाचं महत्त्व अधोरेखित करून, नवजात अर्भक आणि माता यांच्या स्वास्थ्यासाठी मातेचा आहार कसा असावा, याबद्दल विस्तृत चर्चा केली होती.

वर्तमानपत्राच्या पुरवणीमधलं सदर लिहिताना, शास्त्रोक्त माहिती संवादी स्वरूपात देऊन रंजकता कशी वाढवता येईल, याविषयी संपादकांशी झालेल्या चर्चेचा खूप उपयोग झाला. पूर्वीपासूनच माझी लिखाणाची पद्धत अनौपचारिक आणि सोपी आहे. पण ‘या सदरातील लेख वाचताना, मी समोर बसून गप्पा मारत्येय असंच वाटतं,’ अशी बोलकी प्रतिक्रिया काही वाचकांनी नोंदवली त्याचा आनंद झाला. भरडधान्य म्हणजेच ‘मिलेट्स’वरच्या लेखाने अनेकांना ‘मिलेट्स’ वापरायला प्रेरित केलं. खूप जणांनी भरडधान्य कुठे मिळतील याची चौकशी केली. तसंच ग्लुटेन म्हणजेच गव्हातील प्रथिनांबद्दल भाष्य करणाऱ्या लेखातून उपयुक्त शास्त्रीय माहिती मिळाली आणि गैरसमज दूर झाल्याचं काही वाचकांनी कळवलं.

आरोग्यदायी आहारामध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वं अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्यांचं आवश्यक प्रमाण अत्यल्प असतं, पण कार्य खूप मोठं. अर्थात, ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’. या जीवनसत्त्वांचे आहारातील स्रोत कुठले आहेत, ही जीवनसत्त्वं शरीराला मिळण्यासाठी काय करायला हवं, ते सांगायचा प्रयत्न लेखातून केला. अनेक वाचकांना लेख खूप उपयुक्त वाटला. ‘आरोग्यपूर्ण पाकसिद्धी’ या लेखातून मोड आणणे, आंबवणे या पद्धतींच्या उपयुक्ततेची उजळणी झाली. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवणे, बाब्रेक्यू, ग्रिलिंगविषयी चर्चा करून, एअर फ्राइंग या नवीन पद्धतीची शास्त्रीय माहिती दिली होती.

विविध आहारतत्त्वं खाण्यापिण्यात असणं जसं महत्त्वाचं आहे, तसंच ती शरीरपेशींपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्यावर शरीरांतर्गत काही क्रिया होणं खूप गरजेचं असतं. ‘अन्नपचन’ व्यवस्थित झालं तरच आहारद्रव्यांचा शरीराला फायदा होतो. ‘पचवाल तर वाचाल’ या लेखात, पचनसंस्थेच्या आरोग्याविषयी भाष्य केलं होतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भरण-पोषण खूप महत्त्वाचं असतं. वृद्धत्वामध्येही खाण्यापिण्याचं प्रमाण कमी झालं तरी संतुलित आहार घेणं आवश्यक असतं. ‘वृद्धत्वातील आहार’ या लेखातून पोषक पदार्थाचे अनेक पर्याय मिळाले, असं काहींनी आवर्जून कळवलं, तेव्हा ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मन भरून आलं.

केंद्र सरकारने, सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून जाहीर केलाय. त्याअंतर्गत जाहीर केलेल्या पंचसूत्रीतील महत्त्वाचं सूत्र ‘रक्तक्षय मुक्त भारत’ असं आहे. रक्तक्षयाची विविध लक्षणं आणि कारणांची माहिती देऊन पोषणाद्वारे रक्तक्षयावर कशी मात करता येईल याची चर्चा रक्तक्षयावरील लेखात केली होती.

समाजातील सर्व स्तरांमध्ये कर्करोगाचं प्रमाण झपाटय़ाने वाढतंय. कर्करोगावर आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असूनही, त्यावर पूर्णपणे मात करणं वैद्यकीय विश्वाला अजून साध्य झालं नाहीये. त्यामुळेच कर्करोग टाळण्यासाठी आणि धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रयत्न म्हणून, अपथ्यकारक पदार्थ टाळून पथ्यकर आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. कर्करोगावरील लेखात काही अतिशय उपयोगी, हितकारक पदार्थाची आणि त्याबरोबरच काही अयोग्य, घातक पदार्थाची शास्त्रीय माहिती दिली होती. लेख अतिशय उपयुक्त असल्याच्या अनेक उत्साहवर्धक प्रतिक्रिया मिळाल्या.

हल्लीची आपली बदलती जीवनशैली, अयोग्य आहारविहार, हालचालींची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि त्याबरोबरच मानसिक अशांती, ताणतणाव या सगळ्यांचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच लठ्ठपणाची समस्या सुरू होते. पित्तविकार, यकृताचे विकार सुरू होतात. एवढंच नाही, तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचं प्रमाणही वेगाने वाढताना दिसतंय.

शिवाय, गंमत अशी की हे सगळे विकार ‘छुपे रुस्तम’ आहेत. बरेचदा सुरुवातीला यांची लक्षणं जाणवत नाहीत. समस्या गंभीर झाल्यावरच लक्षात येतं. त्यातच भारतीयांच्या जनुकीय संरचनेमुळे, भारतीय वंशाच्या व्यक्तींमध्ये मुळातच ‘बॉडी फॅट’ची टक्केवारी जास्त असते. म्हणूनच हे जीवनशैलीजन्य विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी, आहारात काही अत्यावश्यक बदल गरजेचे असतात. शास्त्रीय पद्धतीने आहार नियोजनाचा खूप फायदा होतो. अशा रुग्णांनी प्रशिक्षित आहारतज्ज्ञांकडून व्यक्तिगत आहारविषयक मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं.

या सर्व विकारांसाठी जोखमीचे घटक कोणते आहेत, प्रतिबंधात्मक आहारोपचार कसे केले जातात, याबरोबरच दिवसभरात योग्य प्रमाणात हालचाल कशी करता येईल, याबद्दलची विस्तृत चर्चा; या प्रत्येक विकारावरील स्वतंत्र लेखात केली होती.

सोलापूरमधील मानसिक समुपदेशक असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या विस्तृत अभिप्रायामधून कळवलं, की ते शाळेतील सर्व मुलांसमोर लेखांचं वाचन नियमितपणे करतात; लेखांमधील महत्त्वाचे मुद्दे, मुलं वहीत लिहून ठेवतात आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मुलं लेखाची आतुरतेने वाट पाहत असतात. सरांच्या मते, ‘आहार या विषयावरील ही साधकबाधक चर्चा कित्येक पिढय़ांसाठी मौल्यवान ठरेल.’

खरंतर, एवढं मोठं मी काही केलेलं नाही. फक्त आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; कारण आरोग्याकडे जाणारा मार्ग, औषधांच्या दुकानांतून न जाता स्वयंपाकघरातून जातो. हे शाश्वत सत्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुमचं यापुढील आयुष्य आरोग्यदायी जावो, ही शुभेच्छा!

(सदर समाप्त)

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loan to diet theory chaturang aarogyam dhansampada abn

First published on: 21-12-2019 at 04:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×