कामावर असताना फोन करून घरातल्यांची काळजी ती घेत असतेच, पण कामावरून घरी परतल्यावर तर ती स्त्री तत्क्षणी १०० टक्के गृहिणी होते, तसं पुरुषाला व्हावं लागत नाही. नोकरीव्यवसाय करणारी असो वा नसो, तिचा झपताल चौफेर घुमतोच आहे. कारण ‘हाऊस’चं ‘होम’ करणं, घराला ‘घरपण’ देणं या जबाबदाऱ्या आजही बाईच्याच मानल्या जातात. हे ‘होम’ करताना अनेकदा त्यांनी व्यक्तिगत इच्छाआकांक्षांचा ‘होम’ केलेला असतो, हे बहुसंख्य पुरुषांना जाणवतही नाही, त्यांना येत्या ३ नोव्हेंबर या ‘गृहिणी दिनी’ तरी विचार करायला संधी आहे…

तू घरभर भिरभिरत असतेस

लहानमोठ्या वस्तूंमध्ये,

तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात

स्वागतासाठी ‘सुहासिनी’ असतेस

वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस

भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस

साठवतांना ‘संहिता’ असतेस

भविष्याकरता ‘स्वप्नसती’ असतेस

…संसाराच्या दहा फुटी खोलीत

दिवसाच्या चोवीस मात्रा

चपखल बसवणारी तुझी किमया

मला अजूनही समजली नाही।।

कविवर्य विंदा करंदीकर यांनी आपल्या ‘झपताल’ या कवितेचा शेवट वरच्या ओळींनी केला आहे. पहाटे उठल्यापासून घरातल्या बाईचं घरभर झपझप फिरणं, बाळाचं करणं, पोतेऱ्यानं चूल सारवणं यासारख्या गृहकृत्यांचा संदर्भ कवितेत अगोदर दिलेला आहे. केव्हाही, कुठेही ‘बिचाऱ्या’ गृहिणींबद्दल काही बोलणी सुरू झाली की मला हमखास या ओळी आठवतात. विंदांची थोरवी कितव्यांदा तरी जाणवते. ही ‘किमया’ आपल्याला कळली नाही आणि हे एक पुरुष असून ते कबूल करताहेत. अशा किती सुहासिनी, यक्षिणी, पक्षिणी, संहितांना एवढी दाद मिळत असेल बरं? की बरीचशी ‘किमया’ त्यांच्या आसपासचे ‘वाया’ घालवत असतील? असे प्रश्न पडतात.

आता तर ते जरा जास्तच पडताहेत. कारण येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘हाऊस वाइफ डे’ म्हणजे ‘गृहिणी दिन’ साजरा होणार आहे. त्यानिमित्त काही माहिती प्रसृत होत आहे. १९९९च्या मोजणीत देशातल्या २३ टक्के स्त्रिया पूर्णवेळ घरी राहून घरसंसार करत होत्या. २०१४ मध्ये २९ टक्क्यांपर्यंत त्यांचं प्रमाण वाढलं. या ‘घरी बसलेल्या’ बायकांपैकी २५ टक्के बायकांनी किमान एक तरी शैक्षणिक पदवी संपादन केली होती. म्हणजे त्यांना अर्थार्जनासाठी घराबाहेर पडून काम मिळवता, करता येणं शक्य होतं. पण त्यांनी कौटुंबिक जबाबदारीसाठी घरी थांबणं पत्करलं. किंवा कदाचित बाहेरच्या कोणा घटकाकडून त्यांच्यावर हा निर्णय लादला गेला. त्या ‘सक्तीच्या गृहिणी’ झाल्या.

यामध्ये फारसं काही अन्यायकारक आहे, असं आधुनिक मानसशास्त्राच्या जनकाला म्हणजे फ्रॉईडला वाटत नाही. अर्थात तो हे त्याच्या काळाच्या आणि अनुभवाच्या संदर्भात बोलला असावा. कारण त्याच्या मते, अनेकदा अनेक बायकांची कुवतच इतपत असते. (असं ‘गूगल मावशी’ म्हणते आहे. ‘बायकांची सगळी अक्कल चुलीपुरती’ असं म्हणणारे त्यांच्या मुलांचे जनक कुठे कुठे दुजोरा द्यायला उभे आहेतच!) याउलट घरातल्या बाईने अर्थार्जनासाठी घराबाहेर पडावं आणि पुरुषाने घरी थांबून प्रपंच चालवावा, अशी वाटणी काही ठिकाणी सुरू झाली आहे. पण अशा अर्थाने गृहिणींऐवजी ‘गृहस्थांनी’ चालवलेली घरं अजून तरी अत्यल्पच आहेत. पती-पत्नी दोघांनी घराबाहेर जाऊन यथाशक्ती कामं करून पैसे मिळवण्याची उदाहरणं बहुसंख्य असली, तरी कामावरून घरी परतल्यावर त्यांच्यापैकी नोकरदार स्त्री तत्क्षणी १०० टक्के गृहिणी होते, तसं संबंधित पुरुषाला व्हावं लागत नाही. ‘हाऊस’चं ‘होम’ करणं, घराला ‘घरपण’ देणं या जबाबदाऱ्या आजही बाईच्याच मानल्या जातात. आणि त्या पेलणाऱ्या गृहिणींना मानवंदना देण्यासाठी ३ नोव्हेंबर हा दिवस मुक्रर करण्यात आला आहे.

कोणाचाही ‘डे’ घालायचा झाला तर भेटवस्तू हव्यात, गदगदलेले संदेश हवेत. त्यांचीही योजना काही साइट्सवर केलेली आहे. गरजूंनी या माहितीचा लाभ घ्यावा व आपापल्या संबंधित स्त्रियांचाही लाभ घडवावा. एवढं काही करायचं नसेल त्यांच्यासाठी भाषिक गोडवा उपलब्ध आहेच. ‘गृहिणी’ शब्दाने ‘केविलवाणी’ प्रतिमा उभी राहते असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी होममेकर्स, हाऊस मॅनेजर्स, डोमेस्टिक इंजिनीअर्स वगैरे पर्यायी शब्द घडवलेले आहेत. एके काळी ज्या बाईने ओशाळवाणेपणाने, ‘मी काही विशेष करत नाही हो, मी घरीच असते’ असं म्हटलं असतं, तिला आज ऐटीत मी होममेकर आहे, मी हाऊस मॅनेजर आहे असं म्हणणं शक्य आहे. बाकी गृहकृत्यं, घरची कामं नेहमीचीच आहेत आणि ती कार्यं दुर्लक्षित करण्यास घराघरातले ‘श्री’ ‘समर्थ’आहेत!

कविवर्यांनी म्हटलेली चूलपोतेऱ्याची, बाळाच्या मुतेऱ्याची कामं आताच्या पुष्कळ बायकांना नसू शकतील हे तर खरंच. तरी पण झपताल चौफेर घुमतोच आहे. आपल्या दोन मुलांना दिवसभर वेगवेगळ्या क्लासेसना सोडण्या- आणण्याची ड्रायव्हरगिरी करण्याने गांजलेल्या ‘क्लासिकल मम्म्या’ ठिकठिकाणी दिसताहेत. तीच मुलं एकदाची कॅलिफोर्नियाला पोचली की त्यांच्या ‘थ्री विक्स इंडिया टुर’मध्ये त्यांची ‘प्रकृती ते संस्कृती’ सांभाळण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या मातामाउल्यांची कमतरता नाही. (वैद्यांकडून कुठली कुठली चूर्ण-भस्मं वगैरे आणून ठेवण्यापासून आगामी गणपतीसाठी चांदीच्या दुर्वा पॅक करून देण्यापर्यंत सगळी व्यवधानं त्या एकहाती सांभाळतात.) घरच्या पुरुषाची जगाच्या पाठीवर कुठेही पोस्टिंग झाली तरी महिन्यामागून महिने घराची इकडची आघाडी सांभाळणाऱ्या खूप जणी असतात. तशाच मुलांच्या परीक्षा, लग्नकार्यं, ज्येष्ठांची आजारपणं, पाहुण्यांचं येणंजाणं, सणवार, आपत्ती अपघात अशा कशालाही समर्थपणे सामोरे जाणाऱ्या अनेक जणी असतात. आता येईल त्या वेळवखताला तोंड देणं तर भाग असतंच. पण हे बाईचंच काम आहे, केलं तर विशेष काय झालं? घरीच आहेस तर टाक की एवढं करून, असं मानणारे-उघडपणे बोलणारे किंवा तुच्छतेने वागवणारे ‘भिडू’ आजही निपजतात तेव्हा समस्येची तीव्रता जाणवते.

आता घरगुती कामांसाठी अद्यायावत यंत्रं घरी आणून टाकण्याचा पर्याय आलेला आहे. पाणी भरणं, कपडे धुणं, भांडी घासणं, वाटणं- कुटणं- किसणं- मळणं या कामांच्या शारीरिक कष्टांमधून आजच्या बाईची एका बटणनिशी सुटका होऊ शकते. पण ते बटण बहुतांश वेळा तिलाच दाबावं लागतं. यावर कडी करेल अशी बाहेरची असंख्य व्यवधानं मागे लागली आहेत. घरातल्या माणसांची संख्या कमी झाली असली तरी व्यक्तिगत स्तोम प्रचंड वाढलंय. घर किंवा कुटुंब चालवायचं तर जगण्याच्या सामायिक अटी असायला हव्यात. आज घरातल्या प्रत्येकाला स्वत:च्या खास स्वतंत्र अटींवर जगायचंय. एखाद्या घरात तीनचार मुलांना वाढवायला जेवढे कष्ट-खर्च पडला असेल तेवढं आज एकेका अपत्यावर वेचावं लागतंय. एकूण जगण्याचे आयाम खूप वाढले असल्याने एकाच वेळी असंख्य आणि कदाचित थेट संबंधित नसलेले किंवा दूरान्वयाने संबंधित असलेले संदर्भ हाताळावे लागण्याचा ताण मोठा आहे. पैसे मिळवणं महत्त्वाचं खरंच, पण अनेकदा मिळवलेला पैसा हुशारीने वापरणं- वाढवणं- गुंतवणं- पुरवणं ही आव्हानंही येताहेत. घरगुती कामांपासून ते वरील प्रकारच्या व्यवस्थात्मक कामांपर्यंत कशातही भाडोत्री मदतनीस मिळवणं दिवसेंदिवस अवघड, अशक्य, महागडं आणि बेभरवशी व्हायला लागलंय. आकस्मिक स्थलांतरं, भौगोलिक बदल, बाह्य बदलांचे कुटुंबावर होणारे परिणाम, भन्नाट वेगाशी जुळवून घेण्यातली दमछाक यांसारख्या खूप गोष्टी कळत-नकळत गृहिणीच्या पायाशी येऊन थांबताहेत. पण ती त्या थांबवू शकत नाही. शिक्षण-नोकरी-उद्याोग-व्यवसाय यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की मी बाहेर एवढे तीर मारून आलोय, तर हिला घरबसल्या एवढं(सं) करायला काय जातंय? आपल्या अनुपस्थितीत दिवसभरात या माउलीने अशी किती ‘एवढ्ढीशी कामं’ निपटली असावीत, याचा अंदाज तरी येईल त्यांना? घरातल्या कामाचं आणि वळवाच्या पावसाचं मोजमाप करता येत नाही हे उगाच का म्हटलं गेलंय?

हे सगळं निष्ठुरपणे नजरेआड करून नोकरी करणं किंवा न करणं, दोन्हीही सारखंच अवघड आहे. नोकरी केल्यास घराकडे दुर्लक्ष केल्याचा अपराधगंड बाळगायचा, न केल्यास आपले गुण, ज्ञानकौशल्य वाया घालवण्याची खंत करायची, यापैकी काय पत्करावं? एवढीच निवड अनेक स्त्रियांजवळ उरते. मग यावर उत्तर म्हणून लग्नानंतरची पंधरावीस वर्षं, म्हणजे घराची-मुलांची- नात्यागोत्यांची नीट घडी बसेपर्यंत आपण घरी थांबावं आणि वयाच्या पंचेचाळीस-पन्नाशीत आपल्या आवडीच्या कुवतीच्या कामकाजासाठी घराबाहेर पडावं असा पर्याय काही जणी निवडतात, पण तो यशस्वी झालेला अपवादाने दिसतो. एक तर त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात त्यांच्या आवडीचं व्यवसाय क्षेत्र खूप बदललेलं, पुढे गेलेलं असू शकतं. त्यात, या प्रौढ वयात, होतकरूच्या नवशिकेपणाने कामात शिरायला, चुकतमाकत शिकायला मोठं मनोधैर्य लागतं. शिवाय त्यांना त्या टप्प्यावर व्यवसाय क्षेत्रात स्वीकारणाऱ्यांच्या मनाचं मोठेपणही लागतं. कदाचित काहींना शारीरिक मर्यादाही जाणवू शकतात.

या सर्वावर तोडगा म्हणून दोन पर्यायांच्या किंवा विचारांच्या लाटा अधूनमधून येताना दिसतात. एक, स्त्रियांसाठी अर्धवेळ नोकऱ्यांची तरतूद करा. आणि दुसरी, स्त्रियांना घरकामाचा मोबदला द्या. या दोन्ही पर्यायांवर, त्यांच्या व्यावहारिक शक्यतांवर आणि फायदा-तोट्यांवर वेळोवेळी खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. त्याची पुनरावृत्ती नको. पण सारांशाने सांगायचं तर आपल्या देशात मुळात नोकऱ्यांचा प्रश्नच इतका गंभीर आहे की केवळ काही बायकांना दिवसाचे बारा-चौदा तास घराबाहेर राहणं शक्य नाही म्हणून त्यांच्यासाठी इंडस्ट्रीने कामांची पुनर्रचना करावी, त्यांना सामावून घेण्याजोगे कामाचे रोजचे सहाआठ तासांचे तुकडे पाडावेत व त्यांची साखळी बनवण्याचं नवं काम ओढवून घ्यावं ही अपेक्षा फार वाटते. त्यातील व्यावहारिक गुंतागुंत नजरेआड करता येत नाही. अत्यंत अपवादाने हे ज्यांना जमलं त्यांचं स्वागत आहे. पण त्यामागे औद्याोगिक दृष्टीपेक्षा सामाजिक दृष्टीच जास्त आहे हे विसरता येत नाही. त्या मानाने, दुसरा पर्याय जो येतो त्यात म्हणजे बायकांना घरकामाचा मोबदला देण्यामागे भावनिक गुंतागुंत जास्त आहे. घरकामाचं मोल मुळात ठरवायचं कसं? कोणी? कशाच्या आधारावर? मोजायचं कधी? कसं? कोणत्या रूपामध्ये? प्रचंड घासाघीस करून वट्ट वाजवून घेतलं तर गृहिणी मोलकरणीच्या पातळीवर येईल का? तसं येणं तिला स्वत:ला तरी आवडेल का? आणि या सगळ्यामागच्या नाजूक भावबंधांना झळ लागली तर ते केवढ्याला पडेल? असे अनेक प्रश्न उभे राहतात ज्यांना निर्णायक उत्तरं नाहीत.

मध्यंतरी काही काळ ‘पूर्णवेळ गृहिणी’ असा एक शब्दप्रयोग वापरला गेला. (अजूनही कुठे कुठे असेल) मला तरी हा पसंत नाही. घराशी बांधली गेलेली प्रत्येक बाई ही मनाने तरी पूर्णवेळ गृहिणीच असलेली मला तरी दिसते. त्याबद्दल तिची चेष्टा होते, तिच्यावर टीका होते, तिच्यावर व्यावसायिक कर्तबगारीबाबत शंका व्यक्त केली जाते. पण हे माहीत असूनही ती त्यातून मनाने पूर्ण मुक्त होऊ शकत नाही असं दिसतं. टीव्ही मालिकांच्या चित्रीकरण स्थळी दहा-बारा तास शब्दश: घाम गाळून घरी जाणारी एखादी अभिनेत्री आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून मेथीची भाजी किंवा मटारच्या शेंगा घाईने सोलताना मला दिसते किंवा कॉन्फरन्समधलं आपलं ‘मेजर प्रेझेंटेशन’ संपताच अलगद सभागृहाबाहेर येऊन घरी फोन करून ‘पिंट्याची स्कूल व्हॅन वेळेवर आली ना गं?’ अशी दबक्या आवाजात चौकशी करणारी अधिकारी स्त्रीही मी पाहते. तेव्हा दिसता दिसता ही दृश्यं अंधूक होतात, कारण डोळ्यांच्या कडांना दहिवर जमतं.

विचारांती असं वाटतं की, या संवेदनशीलतेमुळे जरी गृहिणींकडे बघता आलं तरी तेही एका पातळीवर पुरेसं वाटेल. ती नसते म्हणून गृहिणीपणाच्या कडा जास्त बोचतात. जी नित्यकर्मं केल्याने फार काहीही साध्य होत नाही. (पण जी न केल्यास फार गैरसोय होते.) ती वर्षामागून वर्षं, त्याच शिस्तीने, त्याच निष्ठेने करत राहायला फार मोठं मनोबल लागतं. ते गृहिणींमध्ये असतं. ज्या कामांची कोणी नोंद घेत नाही, ज्या कामांना पद- पदोन्नती- मोबदला- वाखाणणी काहीच नाही, ती एकतर्फी करत राहण्याला एक आंतरिक शक्ती लागते. ती गृहिणी बाळगतात. इंग्रजी ‘हाऊस’चं इंग्रजी ‘होम’ करताना अनेकदा त्यांनी व्यक्तिगत इच्छाआकांक्षांचा ‘होम’ केलेला असतो, याची जाणीव ज्यांना होते-असते किंवा करून घ्यायची असते, त्यांच्याकडूनच थोड्या तरी समजदारीची अपेक्षा करता येते. बाकी ‘डे’चे वेडे असतील त्यांनी कमाल औदार्याने त्या दिवशी (किंवा त्या दिवसापुरती) घेतलेली नोंद आढेवेढे न घेता स्वीकारावी आणि पुढे सरकावं हेच बरं.

एका संगीततज्ज्ञ स्नेह्यांनी मला असं सांगितलंय की, झपताल हा काही झपाझपा वापरला जाणारा किंवा द्रुत लयीतला ताल नाही. तो बहुधा विलंबित अथवा मध्य लयीत असतो. पण काळाच्या छोट्या तुकड्यात, खूप छोट्या गोष्टी सफाईने कोंबण्यातली लगबग, गरजेनुसार तातडीने यक्षिणी-पक्षिणी-संहिता हा भूमिकाबदल करण्याची धडपड कवीची नजर टिपते. म्हणून ‘झपताल’सारखी कविता निपजते.

हौसेने स्वीकारलेल्या किंवा नाइलाजाने कराव्या लागलेल्या या नाना भूमिकांच्या कोलाहलात आपला आत्मस्वर हरवतोय, असं जाणवायला लागलं की गृहिणींची तारेवरची कसरत सुरू होते. ती करायला लागूच नये म्हणून गृहिणीपद नाकारणाऱ्या, स्वेच्छेने एकटीचं जगणं स्वीकारणाऱ्या स्त्रिया पूर्वीही होत्या, आता तर वाढत आहेत. पण त्यांचे प्रश्न या लेखाच्या कक्षेतले नसल्याने इथं विचारात घेत नाही.

तसंच सदैव गृहिणीपणाची सबब सांगणाऱ्यांचं, त्याच्या नावाखाली कुठलंच आव्हान पेलायला न जाणाऱ्यांचं समर्थनही करता येत नाही. अत्यंत पारंपरिक गृहिणीचं जीवन जगता जगता, साहित्य- संगीत- क्रीडा- राजकारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये मौलिक कामगिरी बजावलेल्या बायकाही कालपटावर आहेत. आत्मस्वर जपण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग निवडला? कसा संघर्ष केला? कशा प्रकारची प्रापंचिक घडी बसवली? याचा अभ्यास करता येईल, काही प्रमाणात अनुकरण करता येईल. बाहेरच्या धामधुमीत ती मुळातली इवली ज्योत त्यांनी पेटत ठेवली हे महत्त्वाचं! कदाचित तिनेच त्यांना एवढी ताकद दिली असेल. सगळी ताकद बाहेरून थोडीच येते?

आगामी गृहिणी दिनालाही आत्मस्वर जपण्याची प्रेरणा ज्या ज्या घेतील त्या स्वत:चंही भलं करतील आणि समाजाचंही दूरान्वये हितच साधतील. एरवी झपताल तर सुरू आहेच!

mangalagodbole@gmail.com