सुषमा देशपांडे
सावित्रीबाई फुले यांच्यावर तुला नाटक करावंसं का वाटलं?’ या प्रश्नाचं उत्तर लेकाच्या, अंजोरच्या जन्माची चाहूल लागली तेव्हापासून सुरू होतं. १९८४ मधला सप्टेंबर महिना होता तो. मी गर्भवती असल्याचं लक्षात आलं. आता खायची, प्यायची, स्वत:ची काळजी घ्यायची असं ठरवून सर्व उद्याोग बंद करून मी व माझं होणारं बाळ या जगात मी मग्न झाले. सगळं वेळच्या वेळी करूनही हाती वेळ असायचा तेव्हा काहीतरी ठरवून वाचू या, असं मनात आलं. एक दिवस मित्र वसंता (पोतदार) नेहमीप्रमाणे अचानक घरी टपकला. बोलताना मी माझ्या वाचनाबद्दल बोलले. वसंता म्हणे, ‘‘तू सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल का नाही वाचत?’’ मला त्या क्षणी अगदी मनापासून ते पटलं. सावित्रीबाई भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका इतकंच आपण ऐकतो. त्यापलीकडे सावित्रीबाईंना मध्यभागी ठेवून वाचायला हवं हे जाणवलं. मी लगेचच पुणे विद्यापीठात राम बापट सरांकडे गेले. सरांना सांगितलं, ‘‘सर, मी सावित्रीबाईंचा अभ्यास करू इच्छिते. तुम्ही सांगाल तेच मी वाचणार.’’ सर अशा गोष्टी गंभीरपणे घेत. सरांनी लगेच एक कोरा कागद घेतला आणि पुस्तकांची यादी तयार केली. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या जोतिराव फुले यांच्या पुस्तकाने वाचनास प्रारंभ करायचं ठरलं. ‘‘सावित्री-जोतिबा यांना आधी माणूस म्हणून समजून घे आणि त्यासाठी त्या काळातलं पुणंही समजून घ्यायला हवं. जोतिबांना महात्मा बनवून समाजापासून दूर न्यायचं नाही, याचं भान ठेव.’’ हे महत्त्वाचे मुद्दे सरांनी सांगितले. सर नेमके मुद्दे आतवर पोचवत असत, सहजपणे. एक पुस्तक वाचल्यानंतर दुसरं पुस्तक घ्यायच्या आधी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करायची असं आम्ही ठरवलं.

कधी पुरोगामी ‘सत्यशोधक’चे अंक, पंढरीनाथ पाटलांच्या पुस्तकाची पहिली प्रत, ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्री पुरुष तुलना’ वाचायला मिळे. तर कधी १९व्या शतकातील पुण्यातलं त्या काळातलं वातावरण समजावं म्हणून ना. वि. जोशींचं ‘पुणे वर्णन’ हे पुस्तक. कधी सावित्रीबाईंवर लिहिलेलं अनावश्यक ठिकाणी गौरवीकरण केलेलं पुस्तक तर कधी त्यावरची स. गं. मालशे यांनी ‘तारतम्य’ पुस्तकात केलेली टीका,असं सारं वाचायला मिळे. या पुस्तकातून सत्यापर्यंत कसं पोचायचं तेही सर शिकवत होते. ‘‘तुझ्या लेखनात चुकीचा मजकूर जाता कामा नये,’’ सर पुन्हा पुन्हा सांगत. मी सावित्री-जोतिबा ‘माणूस’ म्हणून समजून घेत होते. ‘सत्यशोधक’ समाजाची चळवळ व तेव्हाची माणसं समजून घेण्याची प्रक्रिया चालू होती.

जोतिबा कमालीचे हुशार,अभ्यासू आणि बोलण्यात आक्रमक असणार हे जाणवत होतं. त्यांची त्या काळात प्रश्नांना थेट भिडण्याची क्षमता अवाक् करायची. सावित्रीबाई मात्र मला पाहिल्यापासून खूप आपली वाटली. तिच्याबद्दल अहो-जाहो येणंच शक्य नाही. मला ती ग्रामीण स्त्रीचं प्रतीक वाटायची. तिच्यात ग्रामीण भागात पाहायला मिळणारा मोकळेपणा असणार म्हणून ती शिक्षणाचे संस्कार घेऊ शकली असेल, तिनं हसत हसत पण अतोनात कष्ट उपसले कारण तिची मुळं ग्रामीण भागातली आहेत, असं बोलणं होत होतं. त्यांच्या आयुष्यातल्या घटना आणि त्यातलं कमालीचं नाट्य अवाक् करायचं. फुले हे आधी कृती करून नंतर ठामपणे विचार मांडणारे असावेत… तर सावित्री सुरुवातीला तो विचार पेलून, तो अंगीकृत करू शकण्याची ताकद असलेली आणि पुढच्या टप्प्यात आपला विचार मांडणारी हसरी, शांत अन् आत्मविश्वासू स्त्री असणार, असं वाटायचं. सावित्री आणि जोतिबा विचार जगणारी माणसं म्हणून मनात आकार घेत होती. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि समाजासह असलेली नाती मनात उभी राहात होती.

या साऱ्या गप्पा विद्यापीठाच्या कँटीनमध्ये चालायच्या. ‘‘सर, यशवंताला शाळेत त्रास झाला असणार ना?’’ पासून ‘‘आजच्या स्त्री मुक्ती चळवळीत सावित्री कशी सहभागी झाली असती?’’असे अनेक प्रश्न मी विचारी. सर मलाच त्यावर बोलायला भाग पाडत. माझी उत्तरं आकार घेत असत. सावित्री आणि जोतिबा जणू रोज भेटणारी माणसं होत गेली. आयुष्यातले हे सारे क्षण गोठवलेले मला पुन्हा पुन्हा पाहायला, जगायला आवडतील असे.

दरम्यान, अंजोरचा जन्म झाला. अंजोर ३ वर्षांचा होईपर्यंत काहीच करायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. एके दिवशी मी सरांना भेटायला विद्यापीठाच्या कँटीनमध्ये पोचले. त्या दिवशी मी वृत्तपत्रामध्ये कोथरूड परिसरात झालेली बलात्काराची घटना वाचली होती. मी सरांना सहज विचारलं, ‘‘सर, आज सावित्री असती तर तिनं या घटनेबाबत काय केलं असतं?’’ ‘काय केलं असतं सावित्रीनं?’ या विचारात मला नाटकाचा ढाचा दिसला. म्हणून मीच म्हणाले, ‘‘सर हा नाटकाचा फॉर्म आहे. सावित्री स्वत:च्या आयुष्याबाबत सांगत असताना आजच्या परिस्थितीवर भाष्य करेल, लोकांना विचारेल, तुम्ही काय करताय?’’ माझ्या मनात जिवंत सावित्री बोलू लागली! सरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ‘‘ही खूपच चांगली कल्पना सुचली आहे तुला.’’ म्हणत सर छोटे छोटे प्रश्न विचारू लागले. मी उत्तरं देत होते. सर मुळात उत्तम श्रोते होते. नेमके प्रश्न विचारून विद्यार्थ्याला बोलतं करणं हे तर त्यांचं कसबच. मी बोलते आहे, बोलते आहे, हे आठवतं. सरांनी तो माझा माझ्याशी संवाद घडवला होता. त्याच गप्पांमध्ये हे नाटक कसं असेल याचं चित्र जवळ जवळ पूर्णत: उभं राहिलं. तोवर मी अभ्यास करून कदाचित लेख किंवा पुस्तक लिहीन इतकंच मनात होतं. आज अचानक त्या विषयावरचं नाटक मनात आकार घेऊ लागलं. आता अंजोर माझ्या पुढ्यात वाढत होता आणि मी सावित्रीच्या पुढ्यात जणू तिच्या अस्तित्वाच्या आधारानं वाढत होते. जिवंत माणसं, जिवंत जगणं, एका जिवंत कालसूत्रात आकार घेत होतं.

त्याच वेळी दिल्लीत ‘दीनबंधू’चे अंक उपलब्ध आहेत असं कळलं. मी पोचले दिल्लीत. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या मंडळींनी लिहिलेल्या काही वह्या आहेत, हे कळल्यावर मी पोचले कोल्हापुरात.

सर्वात महत्त्वाचं, जोतिरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीनं टिटवं उचललं आणि ‘जय सत्य आदी सत्य’ म्हणत सावित्री पुढे निघाली. हे वाचताना सरकन् अंगावर काटा आला होता. सावित्रीची जबरदस्त मानसिक ताकद, तिची उंची शरीरभर जाणवत राहिली होती, डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.

१८९० मध्ये जोतिबा गेले आणि सावित्री १८९७ मध्ये. मधल्या काळात सावित्रीनं केलेल्या कामाचा तपशील मिळत नव्हता. सावित्री १८९७ मध्ये ‘सत्यशोधक समाजा’ची अध्यक्ष होती आणि प्लेगच्या साथीत काम करत असताना तिचा मृत्यू झाला. हे लक्षात घेता ती सातत्याने काम करत होती हे नक्की पण या तपशिलाच्या नोंदी

मिळत नव्हत्या. मी दिल्लीला गेले तेव्हा पत्रकार अशोक जैन यांच्या मदतीने तेव्हाचे खासदार मधु लिमये यांना भेटले होते. मी सावित्रीबाईंवर नाटक लिहिणार आहे हे त्यांच्या कानापर्यंत गेलं होतं. त्यांनी विचारलं, ‘‘तू सावित्रीबाईंवर नाटक लिहीत आहेस असं समजलं ते बरोबर आहे का?’’ मी होकार देताच त्यांचा प्रश्न आला,‘‘का थांबली आहेस लिहायची?’’ ‘‘संशोधन पूर्ण व्हायला हवं.’’ असं मी म्हणताच, ते म्हणे, ‘‘संशोधन होत राहील. तू काय पीएच.डी. करत आहेस का? पुढे काही मिळालं तर बदल कर.’’ त्यांच्या या बोलण्यानं मला हुरूप आला लिहिण्याचा. वसंता पोतदारला मधु लिमये यांच्याशी झालेलं बोलणं सांगितलं तर त्यानं माझं इंदोरला सावित्री आणि जोतिबा यांच्या आयुष्यावर भाषण ठरवलं हिंदीत. घरात नवऱ्याला, विश्वासला (कणेकर) मी हिंदीत बोलणार याचा ताण होता. पण प्रश्नोत्तरे चांगली झाली. नाटक लिहायला बसायला हरकत नाही हे पक्कं झालं.

विषय खूप खोलवर आणि सतत सर्वार्थानं बरोबर होता. लिहायला बसले की जे भसभस बाहेर यायचं ते मी लिहीत जायची. महिनाभरात नाटक लिहून पूर्ण झालं. बापट सर संहिता ऐकायला घरी आले. मी मुरलीधर जाधव या दलित चळवळीतल्या मित्राला ‘सावित्री’ वाचून दाखवली होती. विजय आणि सरोजा परुळकर यांना वाचून दाखवली होती. एकदा विजया चौहान या मैत्रिणीने विद्याताई बाळ, गीताली वि.म., आशाताई देशपांडे यांच्यासह वाचन जमवून आणलं होतं. ‘‘ऐकताना थोडाही कंटाळा येत नाही.’’ हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. मग मी लिहिलेलं बाजूला ठेवलं. काही दिवसांनी संहितेकडे तटस्थ नजरेनं पाहता येईल. मग नाटक बसवायला सुरुवात करता येईल, असं मनात योजलं. काही दिवसांनी संहिता हातात घेतली तरी नाटक बसवणं सुचेना, जमेना. अस्वस्थ काळ होता तो…

आजच्या टप्प्यावर, वसंता पोतदार, सावित्री-जोतिबा फुले आणि माझं नातं निर्माण करणारे आणि रुजवणारे बापट सर खोलवर आठवत राहतात. आयुष्यात कोणती माणसं कधी भेटतात, हे महत्त्वाचंच!

-सुषमा देशपांडे

sushama.deshpande@gmail.com