विनया खडपेकर
मुलगी सातवी उत्तीर्ण असणे हेच भूषण होते त्या काळात कृष्णाबाई पदवीधर झाल्या, नव्हे दूर गावी एकटीने राहून मुलांना शिकवूही लागल्या, कामगार वस्तीत काम करू लागल्या. पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला जाणे असो, त्यासाठी पोशाखात बदल करणे असो, नोकरदार स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणागृहे उभी करणे असो की शिक्षणाने, वयाने, लहान हरिभाऊंशी लग्न करणे असो, कृष्णाबाई या तत्कालीन आधुनिक स्त्रीच्या सुधारणेचं टोक होत्या.
कृष्णाबाई माहेरच्या कृष्णा खरे (२८ जुलै १९०३- १७ फेब्रुवारी १९९१). पुण्याजवळ घोडनदी (म्हणजेच शिरूर) या छोट्या गावात हे कुटुंब राहात होते. वडील मिशनरी शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. मुलींनी शिकलंच पाहिजे, ही त्यांची धारणा होती. १९१३ पर्यंत या गावातल्या मुलग्यांच्या शाळेत कृष्णाबाईंचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. पुढच्या शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना हिंगणे येथील कर्वे यांच्या संस्थेत पाठवलं. मुलींना इतकं कशाला शिकवायचं, अशी कुजबुज गावात झाली. पण वडील खमके. त्यांच्या विरुद्ध जास्त बोलण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. ‘कर्वे संस्थे’च्या वसतिगृहात राहून कृष्णाबाई मॅट्रिक झाल्या. १९२१-२२ मध्ये ‘कर्वे युनिव्हर्सिटी’च्या पदवीधर झाल्या. वडिलांनी आपल्या चारही मुलींना सांगितलं होतं, ‘तुम्ही गरिबाच्या मुली आहात. मी तुम्हाला शिक्षण देतो. बाकी काही नाही. तुमचा नवरा तुम्हीच निवडायचा.’
‘कर्वे शिक्षण संस्थे’चं वातावरण स्त्री सुधारणेच्या ध्येयानं भारावलेलं होतं. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चांत मुली सहभागी होत. मुली खूप खेळतही असत. पदवीधर झाल्यावर कृष्णाबाईंच्या डोळ्यासमोर रूढ चौकटीतला लग्न-संसार नव्हता. आर्थिक गरजेमुळे लगेचच त्या ‘कर्वे संस्थे’च्या कन्याशाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पण तिथेच थांबल्या नाहीत. गांधीवादी मैत्रिणीबरोबर हिंगण्याच्या आसपासच्या खेड्यात त्या जात. दात कसे घासायचे, इथपासून लोकांना शिकवत. वर्षभरातच त्यांना उमरावतीच्या (म्हणजेच अमरावती) हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून पाठवण्याचे ठरले. इतक्या दूर जायचं या कल्पनेने त्या चक्रावून गेल्या. पण ‘घाबरायचं काय? मुलींची शाळा आहे. राहायला वसतिगृह आहे. जायचेच,’ असे म्हणून तेथे पोहोचल्या.
उमरावतीची शाळा पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत होती. कृष्णाबाई मराठी आणि संस्कृतबरोबर लहान वर्गांना गणितही शिकवू लागल्या. मुलींमध्ये मिसळून त्यांचं खो- खो, बॅडमिंटन खेळणं जोरात असे. शाळा गावाबाहेर होती. त्यामुळे शिकणाऱ्या मुलींवर होणारी टीकाटिप्पणी मुलींपर्यंत पोहोचत नसे. या शाळेत नोकरीतले लहानसहान संघर्ष होऊ लागले. व्याकरण बारकाव्याने पाहण्यासाठी संस्कृतचे पेपर तपासायला वेळ जास्त द्यावा, या कृष्णाबाईंच्या मागणीवर वादंग झाले. यासारखे आणखी काही विषय होते. काही वरिष्ठांना ‘कर्वे संस्थे’ची पदवी मान्य नव्हती. म्हणून पगाराच्या वेळी कृष्णाबाईंची गुणवत्ता मॅट्रिक धरली जात असे. हा संघर्ष तीव्र झाला. वसतिगृह सोडून त्या ‘मोटे कंपाउंड’मध्ये राहायला आल्या. नंतर १९२५ मध्ये कृष्णाबाईंनी ती नोकरीही सोडली. आता कुटुंब किंवा संस्थेचे संरक्षक कुंपण नव्हते. मूळ गावापासून दूर २२ वर्षांची ही एकटी तरुणी अगदी स्वतंत्रपणे वावरू लागली. हे त्या काळाच्या मानाने धारिष्ट्यच होते. पण ती एक वाट बाईंनी घालून दिली.
उमरावतीला मिस मॉर्ट या अमेरिकी समाजसेविकेबरोबर कृष्णाबाई काम करू लागल्या. ‘कर्वे संस्थे’च्या संस्कारांमुळे या क्षेत्रात त्या सहज रुळल्या. सर्दी, खोकला, खरूज या आजारांवरची औषधे घेऊन कृष्णाबाई गरीब वस्त्यांवर जात. स्त्रियांना शिवणकाम शिकवत. मुलांना खेळ शिकवत. याच काळात कृष्णाबाईंची हरिभाऊ मोटे यांच्याशी ओळख झाली. कवी अनिल,पु.य. देशपांडे यांच्याशी परिचय झाला. सगळे एकत्र येऊन एकमेकांचे अनुभव, पुस्तक वाचन यावर गप्पा मारत. हरिभाऊंवर प्रेम आणि इतरांबरोबर मैत्री वाढत गेली. हरिभाऊ विद्याप्रेमी, वाङ्मयप्रेमी होते. प्रकाशक होते. अशा मैत्रीबद्दल तेव्हा लोक काय म्हणत? या प्रश्नाला कृष्णाबाईंचे उत्तर, ‘आम्हाला प्रत्यक्ष कोणी काही बोलत नसे. माघारी काय बोलत असतील ते असतील.’
१९२८ मध्ये मिस मॉर्टनं कृष्णाबाईंना मुंबईत नायगावच्या ‘सोशल सर्व्हिस सेंटर’मध्ये नोकरी दिली. कृष्णाबाई कामगार वस्तीत काम करू लागल्या. बायकांमध्ये साक्षरता प्रसार करणं, शिवण आणि स्वच्छता शिकवणं, मुलांना एकत्र करून शिस्तीत खेळ शिकवणं, असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. याच काळात कृष्णाबाई आणि हरिभाऊ मोटे यांनी विवाह करण्याचं निश्चित केलं.
ही नोकरी करीत असताना कृष्णाबाई आणि दोन समवयस्क मुली एक खोली घेऊन राहात होत्या. त्या दोघी ख्रिास्ती होत्या. मांसाहारी होत्या. कृष्णाबाई शाकाहारी. आपापले डबे आणून जेवत असत. त्या दोघींमधली एक ब्रिटिश होती. दुसरी पंडिता रमाबाईंची भाची डोंगरे होती. कृष्णाबाईंचे इतके स्वतंत्र जीवन म्हणजे तत्कालीन आधुनिक स्त्रीच्या सुधारणेचं टोक असावं. १९३२ मध्ये समाजकार्य विषयात पदविका घेण्यासाठी कृष्णाबाई इंग्लंडला गेल्या. येथे त्या रोज नऊवारी पातळ नेसणाऱ्या होत्या. तिकडच्या हवामानाच्या दृष्टीने पाचवारी गोल साडी नेसून वर कोट घालणं सोयीचं होतं, असं कळल्यावर त्यांनी तो पोषाख स्वीकारला, हे महत्त्वाचं. १९८८मधल्या मुलाखतीत इंग्लंडचा प्रवास आणि तेथील शिक्षण याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, ‘‘मुंबई ते लंडन बोटीचा प्रवास साधारण १५ दिवसांचा होता. बोटीवर आम्ही बरेच भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनी होतो. अधिकतर शाकाहारी होते. पुढे लंडनमध्येसुद्धा आम्ही बरीच जणं शाकाहारीच जेवत होतो. बोटीवर १९३२ मध्ये लंडनला शिकायला जाणारी मुलगी ही गोष्ट आश्चर्याची नव्हती. माझ्याआधी कैक जणी गेलेल्या होत्या. मी ‘लंडन स्कूल ऑफ सोशिऑलॉजी’मध्ये शिकत होते. विद्यार्थ्यांमध्ये बैठका होत. त्यासाठी मी साम्यवादी साहित्य, समाजवादी साहित्य वाचलं. वैचारिक कथा, कादंबऱ्या नाही वाचल्या. मला कार्ल मार्क्सच्या विचारांचं आकर्षण होतं. तिथल्या ‘कार्ल मार्क्स म्युझियम’ची मी सभासद झाले होते. लंडनमध्ये एक वर्ष राहून पुढे मी मँचेस्टरला गेले. तेथे खूप कापड गिरण्या पाहिल्या. कामगार संघटना पाहिल्या. तिकडेसुद्धा संघटनांमध्ये बायका कमीच. मँचेस्टरच्या कामगारांनी मला भेटण्यासाठी एक सभाच भरवली होती. पहिला प्रश्न होता, ‘गांधी आणि गांधींची शेळी कशी आहे?’ प्रश्नात खोचक उपहास होता. मी उत्तर दिलं, ‘‘मी गांधीजींना पाहिलं आहे. त्यांची शेळी पाहिली नाही.’’ तेव्हा हिंदुस्थानचा मँचेस्टर कापडावर बहिष्कार होता. त्याबद्दल धडाधड आक्रमक प्रश्न आले. उत्तरादाखल मी विचारलं, ‘‘तुम्ही हिंदुस्थानी कापड विकत घेता का? तुम्ही जशा तुमच्या वस्तू वापरता तशा आम्ही आमच्या वस्तू वापरायचं ठरवलं. म्हणजे आमच्या गरीब लोकांना काम मिळेल. म्हणून मँचेस्टरच्या कापडावर आमचा बहिष्कार. काय चुकलं?’’ त्यांना पटलं असेल-नसेल! पण ते गप्प बसले. हिंदुस्थानच्या बहिष्कारामुळे कामगार बेकार झालेले होते. म्हणून ते चिडले होते. आमची बाजू समजून घेण्याची त्यांना इच्छाच नव्हती.’’ हे असं काही सर्वांसमोर जाऊन बोलणं यात बाईंचा अभ्यास तर जाणवतोच पण त्या बरोबरीनं धाडसही जाणवतं.
इंग्लंडहून परत आल्यावर १९३४ मध्ये मुंबईत वयाच्या तिसाव्या वर्षी नोंदणी पद्धतीने कृष्णाबाई आणि हरिभाऊंनी विवाह केला. हरिभाऊ कृष्णाबाईंपेक्षा शिक्षणात कमी होते. वयाने तीन वर्षांनी लहान होते. त्यांनी परदेशी वारी केलेली नव्हती. १९३४ मध्ये हा विवाह ही दोन्ही बाजूंनी जबरदस्त बंडखोरी होती. ही बंडखोरी त्यांच्या संसारात तापदायक ठरली नाही, हे दोघांचेही फार मोठे श्रेय. लग्नानंतर, मुलाच्या जन्मानंतरही कृष्णाबाईंची नोकरी आणि समाजकार्य चालूच होते. त्यात ह. वि. मोटे यांनी कधी व्यत्यय आणला नाही. ह. वि. जेव्हा आर्थिक बाजूने आपत्तीत सापडले तेव्हा कृष्णाबाईंनी आपल्या अर्थाजर्नाचा तोरा मिरवला नाही. अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ ते आपल्या संसारात घालू शकले.
कृष्णाबाईंनी सरकारी खात्यात समाज कल्याण अधिकारी म्हणून नोकरी केली. तेव्हा ज्या समस्या जाणवल्या त्या तत्परतेनं सोडवण्याचे प्रयास केले. सामोऱ्या आलेल्या समस्यांचा मूलभूत विचार करून, स्वत:च्या अनुभवाची उदाहरणे देत, त्यातील यशापयश सांगत, चिंतन लेख लिहिले.
तत्कालीन मराठी साहित्य प्रामुख्याने मध्यम वर्गाच्या चित्रणाशी निगडित होतं. कृष्णाबाईंनी या मध्यम वर्गाला आपल्या लेखनातून ‘दृष्टिआडची सृष्टी’ दाखवली. झोपडपट्टीत दारिद्र्यात भरडली गेलेली आई! स्वत:चं मूल मृत्यू पावल्याचं खोटंच सांगून पैशासाठी दुसऱ्याच्या मुलाला अंगावर पाजते. स्वत:च्या मुलाला पिठाची पेज पाजते आणि ते मूल मृत पावल्यावर अगतिकपणे धाय मोकलून रडते. दुसऱ्या एका आईला पोरांचं जुगार खेळणं वावगं वाटत नाही. पोरं कृष्णाबाईंना सांगतात, ‘‘बाई, आम्ही आईला हे सांगतच नाही. ती मिळालेले पैसे मागत सुटते आणि दिले नाही तर मारते.’’ (दृष्टिआडच्या सृष्टीत १९३९)
स्त्रियांच्या अर्थार्जनाच्या मार्गातील अडचणीबद्दलच्या अहवालावर भाष्य करताना कृष्णाबाई मोटे म्हणतात, ‘फार दूरच्या खेड्यांतून लोकांना मोकळेपणाने स्त्री पाहायची सवय नसल्याने स्त्री कर्मचाऱ्यांना त्रास होतो, ही गोष्ट ‘पंचायत समित्यां’चे मूल्यांकन करताना एका सरकारी अहवालात कबूल करण्यात आली. पण त्यावर उपाय सांगताना अशा खेड्यातून स्त्री-कर्मचाऱ्यांना नेमू नये अशी सूचना करण्यात आली. चोर सोडून संन्याशाला सुळी अशा प्रकारची ही सूचना आहे.’ (काळाची पावले) यावर उपाय सांगताना कृष्णाबाईंनी म्हटले आहे की, ‘स्त्रियांसाठी सर्व गावांत वसतिगृहे असली पाहिजेत.’ १९५०-६०च्या आसपास नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी चांगली पाळणागृहे उभी करण्याचे प्रयत्न कृष्णाबाईंनी केले. पाळणाघरांचा प्रयोग गिरणी कामगार स्त्रियांमध्ये यशस्वी झाला. परंतु सरकारी नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय कारकून स्त्रियांमध्ये यशस्वी झाला नाही, असे त्यांनी नोंदवलं आहे. मध्यम वर्गात मुलांची सोय कोणातरी नातलगांकडेच केली जात असे. ज्यांच्याजवळ भरपूर जागा होती, वेळ होता, अशा सुखवस्तू स्त्रिया पाळणागृह चालवण्यास राजी नव्हत्या; असंही त्यांनी म्हटलं आहे.
कृष्णाबाई स्त्रीसुधारणेसाठी हेतुत: व्याख्याने देत फिरल्या नाहीत. पण कृष्णाबाईंनी स्वत:च्या आयुष्याला स्वयंनिर्णयाने आकार देत, आपले व्यक्तिगत जीवन, सहजीवन संपन्न करताना, सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून चिकाटीने समाजासाठी कार्य केले. त्यामुळे भोवतालच्या वर्तुळांवर त्यांचा आपोआप प्रभाव पडत होता.
vinayakhadpekar@gmail.com