‘आजी निघाली अमेरिकेला…’ हा ३मेच्या अंकातील शोभा पिंगळे यांचा लेख वाचला आणि मन २६-२७ वर्षं मागे गेलं. माझ्या भाचीला, दिपूला एमबीबीएसला प्रवरानगरच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली आणि ही मुलगी प्रथमच घर सोडून इतकं लांब राहायला गेली. नव्या वातावरणाशी जुळवून घेता घेता पहिल्या वर्षाची परीक्षा समोर येऊन ठेपली आणि दिपू घरच्या आठवणीने (म्हणजे परीक्षेच्या वेळी मिळणारा मानसिक आधार, घेतली जाणारी खाण्यापिण्याची काळजी इ.) हळवी झाली. हे कळल्यावर इकडे आजीचा जीव कासावीस झाला. नातीकडे जाण्यासाठी तिने लगेच आपली पिशवी भरलीदेखील!
खरं तर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घरच्या कोणाला राहण्याची परवानगी नव्हती. तरीही काही मुलींचा आई वर्ग परीक्षेच्या वेळी लपूनछपून राहातो. त्यापाठची भावना समजून हॉस्टेलचे रेक्टरही त्याकडे थोडं दुर्लक्ष करीत. आजीला पाहताच दिपूची कळी खुलली. मग मेसचं जेवण आवडत नाही म्हणून रूममधील हॉट प्लेटवर कधी ब्रेड आम्लेट तर कधी मॅगी बनव आणि लाडक्या नातीला अभ्यास करता करता भरव, सकाळी गजर लावून उठव, रात्री झोपताना डोकं चेपून दे, तिचा पसारा आवर अशा सरबराईने नात सुखावली आणि आजीच्या छत्रछायेखाली अभ्यासात बुडून गेली. कोणाला कळायला नको म्हणून त्या आठ-दहा दिवसांत आजी खोलीच्या बाहेरही पडली नाही. कपडे वाळत घालायला बाहेर जागा होती. पण ही आपलं पातळ आत पंख्याखालीच वाळवायची. नात परीक्षेहून येईपर्यंत दार लावून आत एकटीच बसून राहायची. आजीने दिलेल्या मानसिक आधारामुळे नातीने त्या परीक्षेत अव्वल गुण मिळवले.
एकदा हीच नात सुट्टीत आजीकडे तळेगावला आली असताना, आपला टेपरेकॉर्डर तिथेच विसरली आणि पुण्याला निघाली. घरी आजीच्या हे लक्षात येताच, ती पाठोपाठ दुसरी रिक्षा करून स्टेशनवर धावली. तोपर्यंत पुण्याला जाणारी तळेगाव लोकल सुटली होती. तेव्हा ७० वर्षांच्या आजीने प्लॅटफॉर्मवरून गाडीबरोबर धावत तो टेपरेकॉर्डर नातीच्या हातात दिला. हे दृश्य नात विसरूच शकत नाही.ही नात पुढे एमबीबीएस, एमडी झाली. तिच्याच रुग्णालयामध्ये आजीने शेवटचा श्वास घेतला. आजी आणि तिची नातवंडे या प्रेमाला उपमा नाही हेच खरं – संपदा वागळे
पालकांच्या जिद्दीला सलाम
‘आणि आम्ही जिंकलो…!’ उर्मिला आगरकर यांच्या लेखात (१० मे) कर्णबधिर मुलीला जिद्दीने मेहनतीने शिकवून तिचे लग्न लावून देण्यापर्यंतचा प्रवास प्रेरक ठरेल असाच आहे. जन्मत: कर्णबधिर किंवा इतर काही व्यंग असणाऱ्या मुला-मुलींना आयुष्य कठीण असते अशी समजूत असते. पण जिद्दी पालक यावर अनेक प्रकारचे प्रयत्न करून मुलांना आयुष्याच्या वाटेवर प्रवास करण्यास सक्षम करतात. त्यांच्या व मुला-मुलींच्या जिद्दीला सलाम! – अर्चना काळे
संघटनात्मक यशाचा दृष्टिकोन
‘ऊब आणि उमेद’ या सदरातील डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ‘संस्थेमधले उजवे-डावे’ हा लेख (१० मे) वाचला, हा लेख व्यवस्थापन व मानवी स्वभाव यांचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करणारा आहे. लेखामध्ये संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन प्रमुख प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांची चर्चा होते. उजवे (रूल फॉलोअर, शिस्तप्रिय, नियमांवर ठाम विश्वास ठेवणारे) आणि डावे (नवीन कल्पना सुचवणारे, सर्जनशील, परंपरेला प्रश्न विचारणारे). हा दृष्टिकोन मला अत्यंत समतोल आणि वास्तवाशी नातं सांगणारा वाटतो.
आजच्या गतिमान जगात कोणतीही संस्था केवळ एकाच प्रकारच्या लोकांमुळे चालू शकत नाही. उजव्या विचारांचे लोक संस्था स्थिर ठेवतात, प्रक्रिया पाळतात आणि सहकार्य टिकवून ठेवतात. दुसरीकडे डावे विचारांचे लोक नवीन कल्पना आणतात, बदल घडवतात, आणि संस्था वेळेनुसार नवीन परिस्थितीशी वेळेनुसार जुळवून घेण्यास मदत करतात. लेखकाने खूप सोप्या शब्दांत हे स्पष्ट केलं आहे की दोन्ही विचारसरणींचं अस्तित्व आवश्यक आहे, आणि त्यांचं संतुलनच संस्था यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.लेखात दिलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेतृत्वाची भूमिका. एक चांगला नेता उजवे आणि डावे दोघांनाही समजून घेतो, त्यांच्यातील सामंजस्य वाढवतो आणि योग्य वेळी योग्य लोकांकडून काम करवून घेतो. संस्था हे केवळ उद्दिष्ट साध्य करण्याचं माध्यम नसून, ती माणसांची व्यवस्था आहे, ही भूमिका लेखकाने ठामपणे मांडली आहे.
माझ्या मते, लेखाचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे ‘आत्मचिंतन’ या शब्दावर दिलेला भर. आपण स्वत: कोण आहोत, उजवे की डावे, हे ओळखून त्याचा योग्य वापर संस्था किंवा समाजासाठी करणे, हीच खरी जबाबदारी आहे. आज अनेक संस्था फक्त परफॉर्मन्स किंवा नियमांवर भर देतात, तर काही संस्थांमध्ये फक्त कल्पनाशक्तीवर विसंबून निर्णय घेतले जातात. दोन्ही टोकं अपयशाचे कारण ठरू शकतात.एकूणच, हा लेख व्यवस्थापन, मानवी मनोवृत्ती, आणि संघटनात्मक यश यावर एक समतोल, अनुभवाधिष्ठित आणि विचारप्रवर्तक दृष्टिकोन देतो.- सतीश घुले
लेखातील अनुभव विलक्षण
‘प्रेतात्म्याची काळी छाया’ हा लेख (१०मे) वाचला. खरोखरच समाज वास्तवाला भिडणारा लेख आहे. अड. रंजना पगार-गवांदे छानच लिहितात. गोष्टी रूपात, साध्या, सोप्या, सरळ भाषेत एखादा प्रसंग सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण अनुभव देऊन जाते. मी स्वत: या असल्या अनुभवातून गेलेलो असल्याने आपले हे सदर आवर्जून वाचत असतो.- विलास पाठक
आई होण्यासाठीची नवी प्रेरणा
‘मातृत्वाचा असीम परीघ’ हा माधुरी ताम्हाणे यांनी लिहिलेला (१० मे)च्या अंकातील लेख वाचला. विविध रूपांतून मातृत्व निभावण्याबरोबरच ज्यांची मातृत्वाची ज्यांची नैसर्गिक ओढ पूर्ण झालेली नाही अशांना तर त्यांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. त्यांची सहज सोपी, तरीही ओघवती शैली मला नेहमीच आवडते. मातृदिनाचे औचित्य साधून आई होण्यासाठी एक नवीन प्रेरणा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !- बिपिन देशमुख
सेवावृत्ती कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ
‘मातृत्वाचा असीम परीघ’ हा माधुरी ताम्हाणे यांचा लेख (१० मे) सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींची विवेकबुद्धी नक्कीच जागी करेल. या लेखामुळे सेवा करणाऱ्या सामाजिक संस्था व सेवावृत्ती कार्यकर्ते यांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. उसवलेलं आयुष्य अन् ते शिवणाऱ्या टाक्यांना या लेखामुळे मिळालेली प्रसिद्धी कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरेल. वंचित विश्वाच्या कार्यकर्त्यांशी जोडणारी नाळ कायमची राहील.- मधुकर वैद्या
‘आनंद’ मरते नही।
‘नको वारसा थॅलेसेमिया’चा हा (३ मे)च्या अंकातील उत्तम लेख वाचून आमच्या एका नातेवाईक मुलीची, श्वेता शिंदेची आठवण झाली. ती थॅलेसेमियाग्रस्त होती, अल्पायुष्य जगली, परंतु आमच्या सगळ्यांच्या मनात ती आजही जिवंत आहे. तिच्याविषयी…’’
‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही।’ राजेश खन्नाच्या उत्कृष्ट अभिनयातला ‘आनंद’ चित्रपटातला हा संवाद. स्वत:ला कर्करोग झालेला असताना आणि आता काही महिन्यांचेच आयुष्य बाकी आहे याची पूर्ण कल्पना असूनही निराश न होता स्वत: आनंदी राहून आपल्या सहवासातील प्रत्येकाला खळाळून हसवणारा आनंद. आयुष्य किती जगला यापेक्षा कसं जगला याविषयी सर्वांना प्रेरणा देणारा असा हा चित्रपट. पाहिला नसेल अशी व्यक्ती विरळाच. अर्थात हा चित्रपट होता, परंतु वास्तवात याची पुनरावृत्ती घडली ती श्वेता शिंदेच्या रूपाने.
श्वेता अतिशय दुर्धर अशा थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त. ज्या आजारामध्ये ठरावीक कालावधीनंतर म्हणजे साधारणपणे दर २० ते २५ दिवसांनंतर शरीरात रक्त भरावं लागतं. कारण शरीरात होणारे हिमोग्लोबिनचे अपुरे उत्पादन. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील एक प्रथिन आहे, जे ऑक्सिजनची वाहतूक करते. थॅलेसेमियामुळे या प्रथिनाचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे लाल रक्तपेशींची संख्या घटते आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि इतर गंभीर समस्या येतात. तिच्या बालपणीच डॉक्टरांनी तिच्या माता-पित्यांना याची जाणीव करून दिली होती आणि अशा व्याधिग्रस्त मुलांचे आयुष्य अल्प असतं. श्वेताच्या बाबतीतही हेच सांगितलं होतं.
लहान असेपर्यंत श्वेता या आजारापासून अनभिज्ञ होती, मात्र जेव्हापासून तिला कळायला लागलं, जगण्याचं भान आलं तेव्हा तिला तिच्या आजाराची पूर्ण कल्पना आली आणि आपलं आयुष्य फार काळ नाही हेसुद्धा. पण ती निराश झाली नाही उलट त्या आजाराला सामोरी गेली. तिची कहाणी खरोखरच मार्गदर्शक आणि प्रेरणादायक आहे.
श्वेता शिंदे ही माझ्या विवाहित मुलीच्या, पौर्णिमाच्या मावस नणंदेची मुलगी. ती आपल्या आजोळी आजी-आजोबांबरोबर राहात होती. (आजोबा मोहन चव्हाण) नातीच्या प्रेमापोटी त्यांनी तिला स्वत:कडे ठेवून घेतलं होतं. ती जगली फक्त २८ वर्षं. २३ जून २०१८ रोजी ती हे जग सोडून गेली. म्हणून मी तिच्या आजी-आजोबांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. श्वेताची आई, आजी-आजोबा मला तिच्याविषयी सांगत होते. अचानक आजोबा उठले आणि आतल्या खोलीत गेले. परत आले तेव्हा त्यांच्या हातात सात-आठ मोठे अल्बम होते. ते सर्व अल्बम तिच्याच फोटोने भरलेले होते, ती सहभागी असलेल्या विविध नृत्यस्पर्धांतील सारे फोटो होते ते. जवळजवळ दीड तास हे फोटो बघण्यात वेळ कसा गेला कळलदेखील नाही. इतके ते फोटो होते आणि त्याविषयी सांगण्याचा त्यांचा उत्साह श्वेताची उणीव अधिक गडद करत गेला.
थॅलेसेमियाग्रस्त असूनही घरी बसून राहणं तिला मान्य नव्हतं म्हणूनच फक्त नृत्यच नाही तर तिने अनेक छंद जोपासले होते. ती त्यात आनंदी असायची. तिची इच्छाशक्ती जबरदस्त होती. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून, आजी- आजोबा नको म्हणत असतानादेखील त्यांचं मन वळवून तिने काही वर्षं नोकरीसुद्धा केली. तीसुद्धा तिच्या घरापासून जवळ नाही, तर जिथे धडधाकट माणसालाही सकाळी-संध्याकाळी लोकलच्या गर्दीच्या रेटारेटीतून प्रवास करताना नाकी दम येतो. अशा लोकलमधून डोंबिवली ते घाटकोपर असा प्रवास करत. तिचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे आपले आजी-आजोबा आनंदी राहावेत, आपल्या आजाराची त्यांना जाणीव होऊ नये म्हणून धडपडणारी, मित्र-मैत्रिणींमध्ये सर्वांना आवडणारी अशी ही श्वेता. मृत्यूला ‘तू कधीही ये, मी तयार आहे’, असे अतिशय खंबीर मनाने सांगणारी श्वेता. घरातल्या प्रत्येकाची आवडती होती.
माझी तिची प्रत्यक्ष भेट झाली ती माझ्या मुलीच्या लग्नात. मंगलाष्टकं पूर्ण झाल्यावर आमचे जावई कपिल स्वागत समारंभाच्या तयारीसाठी कपडे बदलायला गेले. त्यांच्या मेकअपरूममध्ये मी गेलो तेव्हा श्वेता त्यांचा मेकअप करत होती. मला पाहताच श्वेता म्हणाली, ‘‘काका, तुमचा मेकअप करायचा का?’’ मी ‘‘नाही’’ म्हटलं. पण मला आता राहून राहून असं वाटतं की, मी श्वेताकडून मेकअप करून घ्यायला हवा होता. पण त्या वेळचा तिचा उत्साह पाहून तिच्याकडून एक शिकलो, ‘स्वत: आनंदी राहा, आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवा, जेवढं काही आपलं आयुष्य असेल ते तणावमुक्त जगा.’खरं तर डॉक्टरांनी श्वेताचं आयुष्य फक्त पंधरा वर्षं सांगितलं होतं, पण श्वेताने आणखी तेरा वर्षं मृत्यूला थांबवलं होतं. २८ वर्षांचं अल्पायुष्य ती जगली, पण आनंदाने. ‘आनंद’ चित्रपटाच्या शेवटी एक अतिशय अर्थपूर्ण संवाद आहे, ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही। ’ श्वेताबद्दल मलाही तेच वाटतं. आजही ती आमच्या मनात जिवंतच आहे. – प्रमोद कुंदाजी कडू