वैशाली बिनीवाले
लग्नानंतर गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीची शारीरिक आणि मानसिक पूर्वतयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उशिरा लग्न आणि त्यानंतर अपत्य जन्माचा विचार करताना जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या अनियंत्रित मधुमेह, थायरॉइडचे असंतुलन, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आदी समस्यांमुळे गर्भपाताचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. कोणती काळजी घ्यायला हवी?
ऐश्वर्या व वरुण एका नामांकित आयटी कंपनीत काम करतात. दोघेही कामात खूप व्यग्र असतात. लग्नाला दोन वर्षं झाली आहेत, परंतु सध्या तरी बाळाचा विचार करायला त्यांना वेळच नाही. रात्रीची जागरणं, बाहेरचं खाणं आणि व्यायामाला वेळ नाही. एकूणच सध्याची जीवनशैली बघता दोघांचीही पालकत्वाची जबाबदारी घेण्याची मानसिक आणि शारीरिक तयारीच नाही आणि नेमकी त्याच वेळी ऐश्वर्याची पाळी चुकली. गेल्याच आठवड्यात कार्यालयीन पार्टीमध्ये ऐश्वर्याने मद्यापान आणि धूम्रपानही केलं होतं. त्याचा बाळावर काही वाईट परिणाम होईल का? गर्भपात केल्यास त्याचा काय त्रास होईल? गरोदरपण आणि नोकरी करणं झेपेल का? यासारखे अनेक प्रश्न ऐश्वर्या व वरुणला पडले आहेत.
परीक्षा असो किंवा समारंभ, आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी आपण किती तयारी करतो. लग्नाचा जोडीदार शोधताना, घर घेताना, नोकरी बघताना आपण किती विचार करून निर्णय घेतो. मग बाळ जन्माला घालण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अनवधानाने होऊन कशी चालेल? बाळ होऊ द्यायचं का? कधी होऊ द्यायचं याचा निर्णय पूर्ण विचारांतीच घ्यायला हवा. गर्भधारणेच्या आधीपासूनच त्यासाठीचं मार्गदर्शन घ्यायला हवं. गर्भधारणेपूर्वी आईची शारीरिक व मानसिक स्थिती तपासायला हवी. योग्य, अयोग्य बाबींचा विचार करून आचरण करायला हवं. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक बाबींचाही विचार करायला हवा. थोडक्यात, प्रत्येक गर्भारपण हे सुनियोजित असायला हवं. गर्भधारणेपूर्वी स्त्रीची शारीरिक तंदुरुस्ती बघण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी तपासली जाते. भारतातील ५० टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया आढळतो. रक्तक्षयामुळे गर्भारपणात व प्रसूतीदरम्यान अनेक समस्या निर्माण होऊन माता आणि बालकाला धोका संभवतो. म्हणूनच रक्तक्षय आढळल्यास गर्भधारणेपूर्वीच त्यावर उपाय करायला हवा.
गर्भारपणात रक्ततपासणी करताना सुरभीला मधुमेह असल्याचं निदान झालं. तिच्या रक्तामधील HbA1 C ची पातळी १०पेक्षा जास्त होती. आपल्याला मधुमेह आहे याची सुरभीला कल्पनाच नव्हती. मधुमेहाचं निदान झाल्यावर लगेचच औषधोपचार सुरू करण्यात आले, मात्र अनियंत्रित मधुमेहामुळे गर्भावस्थेच्या आठव्या आठवड्यातच गर्भाची वाढ होणं थांबलं व नाईलाजाने सुरभीला गर्भपात करावा लागला. सहा महिन्यांनंतर मात्र सुरभीने आहार व औषधांच्या मदतीने आधी मधुमेह नियंत्रणाखाली आणला व नंतर गर्भधारणेचं नियोजन केलं. आज सुरभी तीन वर्षांच्या सृदृढ मुलाची आई आहे.
स्त्रियांमध्ये मधुमेह किंवा थायरॉइडच्या असंतुलनासारखे आजार असल्यास गर्भधारणा होण्यास विलंब होऊ शकतो, गर्भपात होण्याची शक्यता असते, बाळाच्या हृदयात किंवा मेंदूमध्ये दोष उदभवू शकतात. म्हणूनच गर्भधारणेपूर्वी रक्तातील साखरेची व थायरॉइडची पातळी तपासायला हवी. यावेळी रक्तगट व थॅलेसेमियाची चाचणी करणे संयुक्तिक ठरतं. याविषयीची माहिती आपण मागील लेखात घेतली आहे.
धनश्रीचं वजन आहे १०२ किलो. लहानपणापासून गुटगुटीतच, पण लग्नानंतर गेल्या दोन वर्षांत आणखी २०-२५ किलो वजन वाढलंय. लग्नाला दोन वर्षं झाल्याने आता बाळाचा विचारही सुरू झालाय. धनश्रीने बाळाचा विचार आधी करावा की आधी वजन कमी करावं? हल्ली स्त्रियांच्यात लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलंय. लठ्ठ स्त्रियांमध्ये गर्भारपणात मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांचा धोका अधिक असतो. लठ्ठपणा स्त्रीसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच लठ्ठ स्त्रियांनी बाळाच्या जन्माच्या विचाराआधीच आहारतज्ञांचा सल्ला घेऊन आधी वजन कमी करायला हवं.
काही प्रकारच्या गंभीर आजारांमध्ये बाळ जन्माला घालायचा विचार काही काळासाठी स्थगित करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अनियंत्रित उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे व मूत्रपिंडाचे गंभीर आजार, काही प्रकारचे कर्करोग व गंभीर मानसिक आजार ही त्याची काही कारणं आहेत. गर्भावस्थेत हे आजार तीव्र स्वरूपाचे झाल्यास आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात.
सविताला लहानपणापासूनच हृदयाच्या झडपेचा गंभीर आजार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सविता व तिचा नवरा राजेशला, गर्भधारणा होऊ न देण्याचा सल्ला दिला आहे. सविता आणि राजेशने स्वत:चं मूल होऊ न देण्याचा व बाळ दत्तक घेण्याचा पर्याय विचारपूर्वक निवडला आहे. शारीरिक किंवा मानसिक आजार असलेल्या जोडप्यांनी गर्भधारणेपूर्वीच वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. आजार नियंत्रणाखाली आणायला हवा. आजारासाठी घेत असलेल्या औषधांनी गर्भाला इजा पोहोचणार नाही ना? याची खात्री करून घ्यायला हवी.
प्रकृतीच्या समस्यांचा गर्भधारणेवर होणारा परिणाम आपण पाहिला. गर्भधारणा व आईचं वय याचाही विचार करायला हवा. आभा आणि आशिष लग्नाच्या वेळी मार्गदर्शन घ्यायला आले. दोघांनीही वयाची तिशी पार केली आहे. लग्नानंतर किमान ४-५ वर्षं तरी मूल नको असा त्यांचा विचार आहे. आधी करियरकडे लक्ष केंद्रित करायचं, पैसे जमवायचे, घर घ्यायचं. परदेशवारी करायची अशी त्यांची स्वप्नं आहेत. यामध्ये बाळाची जबाबदारी त्यांना नको आहे. वयाच्या पस्तिशीनंतर गर्भधारणेचा विचार केला तर काही समस्या येतील का? याची माहिती त्यांना हवी आहे. वैद्याकीयदृष्टया बघितलं तर स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रजनन क्षमतेचं वय आहे, २५ ते ३० वर्षं. वयाच्या तिशीनंतर स्त्रियांमधील प्रजननक्षमता कमी होऊ लागते म्हणूनच पहिले मूल तिशीच्या आत व दुसरे ३५ वर्षांआधी होऊ देण्याचा सल्ला आम्ही स्त्रीआरोग्यतज्ज्ञ देतो. हल्लीच्या काळात शिक्षण व करियरमुळे अनेक मुलींची लग्नं तिशीनंतर होतात. यानंतर किमान काही वर्षं त्यांना गर्भधारणा व बाळाची जबाबदारी नको असते. अशा वेळी आपली प्रजननक्षमता किती आहे? बाळ होऊ देण्यास काही वर्षं विलंब केल्यास काय धोका निर्माण होईल? याविषयीचा वैद्याकीय सल्ला जोडप्याने घ्यायला हवा.
ज्योतीची गोष्ट थोडी वेगळी आहे. ज्योतीचं तिच्या नवऱ्याशी बिलकूलच पटत नाही. शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. पण घटस्फोट कधी मिळेल याचा ज्योतीला काहीच अंदाज नाही. पस्तिशीच्या ज्योतीला घटस्फोटानंतर दुसरं लग्न करायचंय. एखाद्या तरी बाळाची आई होण्याची तिची इच्छा आहे, पण वाढत्या वयानुसार प्रजननक्षमता कमी झाल्यास ज्योतीला मातृत्वाला मुकावं लागेल का? यावर काही उपाय आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो आहे. अशा वेळी egg freezing वा बिजांडे गोठवणे हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये प्रजननक्षम वयात स्त्रीच्या बीजांडकोशातून चांगल्या प्रतीची अंडी काढून जी अतिशीत वातावरणात सुरक्षित ठेवली जातात. काही काळानंतर गर्भधारणा हवी असेल त्यावेळी कृत्रिम पद्धतीने यापासून गर्भधारणा करता येते.
अपत्य प्राप्तीआधी जोडप्यामध्ये शारीरिक पूरकतेबरोबरच मानसिक-भावनिक सुसंवादही हवा. जाई व स्वप्निलचं लग्न होऊन बरीच वर्षं झाली आहेत. दोघांचं बिलकूलच पटत नाही. सारखी भांडणं होतात. दोघांनाही एकमेकांप्रति प्रेम-आपुलकी नाही. घरची मोठी माणसं मात्र सल्ला देतात की मुलं होऊ द्या म्हणजे सगळं काही नीट होईल. खरं तर बाळ झाल्यावर सगळं सुरळीत होईल का? दोघांमधील मतभेद, भांडणं संपतील का? उलट एका छोट्या जीवाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे दोघांमधील ताण आणखी वाढणार नाही का? अशा वेळी गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी जाई व स्वप्निलने वैवाहिक समुपदेशन करून घेणं जास्त संयुक्तिक ठरेल. गर्भधारणेपूर्वी स्त्रीने वैद्याकीय सल्ल्याने फोलिक अॅसिड या जीवनसत्त्वाची गोळी किमान दोन महिने आधीपासून दररोज घ्यायला हवी. फोलिक अॅसिड हे आवश्यक जीवनसत्त्व गर्भावस्थेच्या पहिल्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाचं आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भाच्या मेंदूच्या आवरणात दोष निर्माण होऊ शकतो व गर्भपाताचा धोका वाढतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्याने चांगली जीवनशैली अंगीकारायला हवी. चौरस, संतुलित आहार घ्यायला हवा. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळे यांचा समावेश हवा. नियमित व्यायाम करायला हवा. धूम्रपान, तंबाखू व मद्यापान टाळायला हवे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी अथवा क्ष-किरण तपासणीपूर्वी आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहोत याची कल्पना डॉक्टरांना द्यायला हवी. गर्भावस्था व प्रसूतीमध्ये येणाऱ्या खर्चाचा साधारण अंदाज घेऊन आर्थिक नियोजनही करायला हवं. बाळ मनाजोगतं वाढवणं ही एक खर्चिक बाब आहे. पालकत्वाचा आनंद मनसोक्त अनुभवण्यासाठी व बाळाची नीट काळजी घेण्यासाठी, वेळेचं चांगलं नियोजन करायला हवं. गर्भधारणा होण्यापूर्वीच त्याची पूर्वतयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्रत्येक गर्भारपण हे सुनियोजित हवं. ‘ Every Pregnancy should be a Planned Pregnancy.’