गर्भावस्थेनंतर नवव्या महिन्यात बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू होते. यानंतर येणारा नैसर्गिक टप्पा म्हणजे प्रसूती. याविषयी अनेक जणींच्या मनात भीती, प्रश्न असतात. प्रसूतीचे प्रकार, त्यांची लक्षणे आणि सुखरूप बाळंतपणासाठी त्या आईने काय पूर्वनियोजन करावे, याविषयी…
गर्भवतीचा नववा महिना सुरू झाला की प्रतीक्षा सुरू होते ती बाळाच्या आगमनाची. प्रसूती कधी होईल? कशी होईल? तिला कळा सहन होतील ना? फार त्रास तर होणार नाही ना? मुलगा असेल की मुलगी? बाळ ठीक असेल ना? यासारखे अनेक प्रश्न, थोडी भीती आणि खूप उत्सुकता यामध्ये नववा महिना चालू राहतो.
गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात स्त्रीच्या शरीराला जडत्व येतं. व्यायाम करणं, दररोजच्या हालचाली करणं त्रासदायक होऊ लागतं. आहाराचे नियम पाळायचा कंटाळा येतो आणि कधी एकदा मोकळी होते असं वाटायला लागतं. हा काळ बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने गर्भवतीनं स्वत:ची विशेष काळजी घ्यायला हवी. संतुलित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती आई व बाळाच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते.
नयनाचा नववा महिना चालू होता. सकाळपासून ती थोडी अस्वस्थ होती. दररोज भरपूर होणारी बाळाची हालचाल आज तिला फारशी जाणवत नव्हती. आराम केला, नाश्ताही करून झाला तरी हालचाल जाणवेना. त्यामुळे काळजी वाटून ती दवाखान्यात गेली. तपासणीदरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्याने लगेचच प्रसूती करून बाळाला सुखरूप ठेवता आलं. म्हणूनच नवव्या महिन्यात गर्भातल्या बाळाच्या हालचालींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. बारा तासांत किमान दहा वेळा बाळाची हालचाल जाणवायला हवी. बाळ झोपलेलं असल्यास हालचाल कमी जाणवते, परंतु बाळाला गर्भावस्थेत काही त्रास होत असेल तरीसुद्धा हालचाल मंदावते, म्हणूनच हालचाल कमी जाणवल्यास वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा.
नवव्या महिन्यात बाळाचं डोकं गर्भाशयातून हळूहळू खाली सरकायला लागतं, त्यामुळे गर्भवतीच्या ओटीपोटात व योनीमार्गावर ताण पडतो. प्रसूतीचा मार्ग निर्माण होण्यासाठी गर्भाशयाची आकुंचने वाढू लागतात. यामुळे ओटीपोटात अधून-मधून दुखतं. बाळंतपणाची वेळ जशी जशी जवळ येते तशी ही आकुंचने तीव्र होतात. या आकुंचनांबरोबरच गर्भाशय कडक होत असल्याचं जाणवू लागतं. पाठीत व पोटात कळा येऊ लागतात, परंतु जेव्हा या कळा नियमितपणे दर १० ते १५ मिनिटांनी येऊ लागतात तेव्हा प्रसूतीची वेळ आली हे समजून दवाखान्यात जायला हवं. योनीमार्गातून पाण्यासारखा स्राव जाणं, रक्तस्राव होणं आणि कळा येणं ही प्रसूतीची लक्षणं असतात.
चित्रपटांमध्ये अनेकदा हे दृश्य एका विशिष्ट पद्धतीनेच रंगवलं जातं. गर्भवती नायिकेच्या पोटात दुखायला लागतं. नायक बहुतेकदा अंधारात, धो-धो पावसात भरधाव वेगानं गाडी चालवत कसाबसा तिला घेऊन दवाखान्यात पोहोचतो. नायिकेला स्ट्रेचरवरून प्रसूती कक्षात नेलं जातं. कक्षाचा लाल दिवा पेटतो. आतून फक्त किंकाळ्यांचे आवाज. बाहेर सगळे चिंताक्रांत. डॉक्टर गंभीरपणे बाहेर येऊन सगळ्यांना गर्भगळीत करणारं वाक्य म्हणतात, ‘‘बहोत सीरियस केस है. हम माँ या बच्चा, किसी एक को बचा सकते हैं।’’ हा प्रसंग जनमानसात प्रसूतीविषयी नक्कीच भय निर्माण करतो. पण तो चित्रपट असतो त्यामुळे त्यातलं टोकाचं चित्रण गृहीत असतं.
गर्भावस्थेनंतर येणारा नैसर्गिक टप्पा म्हणजे प्रसूती. प्रसूती प्रामुख्याने दोन प्रकारची असते. एक ‘सुक्षम’ प्रसूती म्हणजेच ‘नॉर्मल डिलिव्हरी’ व दुसरी शस्त्रक्रियेच्या साहाय्याने करण्यात येणारी प्रसूती. ‘सुक्षम’ प्रसूती गर्भावस्थेच्या ३७ ते ४० आठवड्यांत होते. प्रसूतीची लक्षणं नैसर्गिकरीत्या सुरू होतात व थोड्याशा वैद्याकीय मदतीनं बाळाची आईच्या योनीमार्गातून प्रसूती होते. प्रसूतीदरम्यान सर्वप्रथम बाळाचं डोकं बाहेर येतं. ‘सुक्षम’ प्रसूती तीन टप्प्यांत होते. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाची आकुंचने सुरू होतात. गर्भाशयमुख पूर्णपणे उघडून प्रसूतीचा मार्ग तयार होतो. प्रसूतीच्या पहिल्या टप्प्याला साधारणत: ६ ते १२ तासांचा अवधी लागतो. प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यात गर्भाशयाच्या आकुंचनांमुळे बाळ खाली सरकतं. आईने जोर करून खाली ढकलण्यामुळे बाळ बाहेर येतं. दुसऱ्या टप्प्याचा अवधी साधारणपणे ४५ मिनिटे ते दोन तासांचा असतो. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वार प्रसूत होते. यासाठी साधारणत: १० मिनिटे लागतात.
प्रसूतीच्या कळा आपल्याला सहन होतील का? अशी भीती अनेक जणींना वाटते. प्रसूतीवेदना बऱ्यापैकी तीव्र असल्याने त्या कमी जाणवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. श्वसनाचे व्यायाम व औषधांच्या साहाय्याने कळा काही प्रमाणात सुसह्य होतात. ‘ Epidural Analgesia’ मध्ये पाठीच्या मणक्यांमधील जागेतून मज्जारज्जूच्या आवरणांमधील पोकळीत वेदनाशामक औषधांचं इंजेक्शन दिलं जातं. यामुळे प्रसूतीवेदनांची तीव्रता जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी जाणवते. निष्णात भूलरोगतज्ज्ञ हे इंजेक्शन देतात. यामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचं प्रमाण अत्यल्प असून प्रसूतीवेदना सुसह्य होतात. प्रसूतीची तारीख उलटून गेल्यास किंवा लवकर प्रसूती करण्याची गरज भासल्यास ‘Induction of Delivery’ केली जाते. यामध्ये गर्भाशयमुख उघडण्यासाठी व कळा येण्यासाठी औषधं दिली जातात. प्रसूतीदरम्यान कळा वाढवण्यासाठी व प्रसूती जलद होण्यासाठी औषधं देता येतात. प्रसूती होताना काही वेळेस योनीमार्गाच्या तोंडाशी एक छोटा छेद द्यावा लागतो. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील मोना सिंगने अभिनित केलेला प्रसूतीचा प्रसंग सगळ्यांच्या लक्षात असेल. मोना दमलीय, बाळ खाली सरकत नाही आहे, रुग्णालयामध्ये पोहोचणं शक्य नाही आहे. अशा वेळी बाळाची प्रसूती करण्यासाठी रँचोने देसी जुगाड करून तयार केलेला ‘व्हॅक्युम’ आठवतो आहे ना? प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यात योनीमार्गातून शस्त्रक्रियेच्या साहाय्याने बाळ प्रसूत करण्यासाठी ‘व्हॅक्युम’ व ‘फोरसेप’ वापरले जातात. (अर्थात ते वेगळे असतात) यासाठी गर्भाशयमुख पूर्णपणे उघडणं व बाळ प्रसूतीच्या मार्गात खाली सरकणं गरजेचं असतं.
जेव्हा पोट व गर्भाशयाला छेद देऊन शस्त्रक्रियेनं प्रसूती केली जाते त्याला ‘सिझेरीयन’ सेक्शन म्हणतात. सिझेरीयनचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. ‘सिझेरीयन’ हा शब्द लॅटीन भाषेतील ‘Caesus’ या शब्दावरून आला असावा. ज्याचा अर्थ आहे ‘कापणे’. ‘सुश्रुत संहिता’ या प्राचीन ग्रंथात पोटाला छेद देऊन प्रसूती करण्याचा उल्लेख आला आहे. पूर्वीच्या काळी मृत्यू पावलेल्या आईच्या पोटातील बाळ प्रसूत करण्यासाठी ‘सिझेरीयन’ केलं जात असे. १७९४ मध्ये जेस बेनेट या अमेरिकी डॉक्टरने केलेल्या सिझेरीयन शस्त्रक्रियेमध्ये आई व बाळ दोघेही वाचल्याची पहिली नोंद आढळते. त्या काळी गर्भाशयाला दिलेला छेद परत न शिवल्याने खूप रक्तस्राव होत असे. १८८२ मध्ये मॅक्स सँगर या जर्मन डॉक्टरने गर्भाशयावरील छेद शिवण्यास सुरुवात केली. त्यामुळे रक्तस्रावावर नियंत्रण मिळवता येऊन मातेचा जीव वाचू लागला. १९२० मध्ये केरळमध्ये भारतातील पहिलं सिझेरीयन केल्याची नोंद आहे. ज्या वेळी योनीमार्गातून बाळाची प्रसूती होऊ शकत नाही किंवा प्रसूतीदरम्यान आई किंवा बाळाला धोका उद्भवू शकतो अशा वेळी सिझेरीयन शस्त्रक्रिया केली जाते.
‘डॉक्टर नॉर्मल होईल म्हणाले, पण शेवटी त्यांनी सिझर केलं’ ही अनेकांची कायमची तक्रार. शस्त्रक्रियेने केलेल्या प्रसूतींपैकी जवळजवळ ४० टक्के शस्त्रक्रियांचा निर्णय आयत्या वेळी घ्यावा लागतो. बाळाचे हृदयाचे ठोके अनियमित झाल्यास, बाळाने गर्भाशयात शी केल्यास बाळाला त्रास होत आहे हे लक्षात घेऊन शस्त्रक्रियेने त्वरित प्रसूती करावी लागते. गर्भाशयमुख न उघडल्यास, बाळ खाली न सरकल्यास प्रसूतीसाठी खूप जास्त विलंब होतो अशा वेळी पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी शस्त्रक्रियेचा निर्णय अचानक घ्यावा लागतो. बाळाचं वजन जास्त असल्यास, पायाळू किंवा आडवे बाळ, प्रसूतीची वाट अरुंद असल्यास, आधीची गर्भाशयावरील शस्त्रक्रिया, वार खाली असल्यास आधी ठरवून सिझेरीयन केलं जातं. ‘हल्लीच्या मुलींना काही सहन करायला नको. जरा कळा आल्या की घाबरून सिझर करा म्हणतात. डॉक्टरही उगाचच सिझर करतात.’ अशी वाक्यंही आपण अनेकदा ऐकतो. सिझेरीयनचं प्रमाण जगभरात सर्वच ठिकाणी वाढलंय हे मात्र नक्की. २०१६ मध्ये भारतात सिझेरीयनचं प्रमाण सर्व प्रसूतीपैकी १७.२ टक्के होतं ते आता २१.५ टक्के झालं आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण जवळजवळ ३० टक्क्यांवर पोहोचलं आहे.
सिझेरीयनचं प्रमाण वाढायचं कारण काय? एक तर आधुनिक वैद्याकशास्त्रात शस्त्रक्रियेची आधुनिक उपकरणं व तंत्रं, भूल देण्याची सुरक्षित औषधं, निर्जंतुकीकरण, अॅण्टीबायोटिक्स व निष्णात वैद्याकीय तज्ज्ञांमुळे सिझेरीयनमधील गुंतागुंतीचं प्रमाण एकदम कमी झालं आहे व सिझेरीयन हा प्रसूतीचा एक सुरक्षित मार्ग ठरला आहे.
स्त्रियांचं गर्भवती राहण्याचं वय वाढलंय. अनेक जणी तिशीनंतर गरोदर राहतात. वाढलेलं वय, बदललेली जीवनशैली, स्थूलपणा, आजूबाजूचा ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाब व मधुमेहासारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. अती जोखमीची गरोदरपणं वाढल्याने सिझेरीयन प्रसूतीचं प्रमाणही वाढलं आहे. सिझेरीयनचं प्रमाण जरी वाढलं तरी माता-बालक मृत्यू व प्रसूतीदरम्यान त्यांना होणाऱ्या इजांचं प्रमाण कमी झालं आहे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं. नैसर्गिक प्रसूती ही उत्तमच. सुक्षम प्रसूती होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रयत्न करायला हवा, परंतु काही झालं तरी मला ‘नॉर्मल डिलिव्हरी’च हवी किंवा ‘माझं सिझरच करा’ असा अट्टहास करणंही योग्य नाही.
आता थोडंसं प्रसूतीसाठी करायच्या तयारीबद्दल. ही तयारी आपल्याला खूप आधीपासून करायला हवी. सुखरूप प्रसूतीसाठी आईचं स्वास्थ्य चांगलं हवं. यासाठी गरोदरपणात नीट काळजी घ्यायला हवी. प्रसूतीपूर्व शिक्षण व व्यायामामुळे शारीरिक व मानसिक पूर्वतयारी व्हायला मदत होते. आपली प्रसूती ज्या दवाखान्यात होणार आहे, तिथे काय सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, किती खर्च येणार आहे याची आपल्याला पूर्वकल्पना हवी. प्रसूतीच्या काळात मदतीसाठी कोण येणार आहे याचं नियोजनही आधीच करायला हवं. या पूर्वनियोजनामुळे बाळंतपणाचा सोहळा आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल.