१६ ऑगस्टच्या अंकातील ‘डोळस दान’ हा श्रीपाद आगाशे यांचा लेख खूप आवडला. अवयवदान करण्याचे प्रमाण आपल्या देशात फार कमी आहे. अवयव दान करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आपल्याकडील काही जुन्या रूढी, कल्पना, विचार, अंधश्रद्धा बदलण्याची गरज आहे. नातेवाईक व इतरांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मृत व्यक्ती हे जग सोडून जाते, पण त्याच्या शरीरातल्या अवयवांमुळे तो दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. म्हणून अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. – नामदेव गणपत राव, नवीन पनवेल

न्यायात्मक लढाही आवश्यक

‘९ वर्षांनंतरची जाग!’ हा २ ऑगस्टच्या अंकातील आरती कदम यांचा लेख वाचून मन स्तब्ध झालं. जगातील पुढारलेल्या देशामध्येसुद्धा अशी विकृती आहे. म्हणजे माणसे सगळीकडे सारखीच, याची प्रचीती आली. पण संघर्षाची, लढण्याची वृत्तीसुद्धा जगात सगळीकडे आहे, हेही समजले. लढाऊ वृत्ती असणे, आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायात्मक लढाई लढणेही आवश्यक आहे. असे केले तर न्याय मिळतोच. – नीलेश रामभाऊ मोरे, वाशिम

पाश्चिमात्य जग सुधारलेय हा गैरसमज

२ ऑगस्टच्या अंकातील ‘९ वर्षांनंतरची जाग!’ हा आरती कदम यांनी लिहिलेला लेख वाचून अतिशय अस्वस्थ झाले. ‘भयंकर’ हा एकच शब्द मनात प्रथम आला. का हे जग असे बनत आहे, की आधीपासून असेच आहे? पाश्चिमात्य जग खूप सुधारलेय, असा आपला गैरसमज आहे असे वाटते. त्या मानाने भारतातील सुजाण विचारवंतांनी स्त्रियांसाठी खूप सुधारक विचाराचे कायदे वेळोवेळी संमत केले. अर्थात तरीही समाज सुधारत नाहीच. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी मन उद्विग्न होते. अशा वेळेस जीझेल पेलिकॉसारख्या स्त्रीचा लढा सर्व स्त्रियांना बळ देवो. एका ‘आय ओपनर’ लेखासाठी मन:पूर्वक धन्यवाद! – कविता जोशी

अंधश्रद्धा, खोट्या रूढींपासून दूर राहा

‘नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ…’ या शीर्षकाचा (१९ जुलै) च्या अंकातील अॅड. रंजना पगार गवांदे यांचा लेख वाचला. लेखाची मांडणी अप्रतिम केली आहे. आजही समाजात अशा अनेक अंधश्रद्धा आहेत की ज्या सामान्य माणसांचे जीवन उद्ध्वस्त करून टाकत आहेत. अनेक बाबा, बुवा, भोंदू अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून घेऊन विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांना नवस फेडण्यासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी खूप खर्च करायला लावतात. म्हणजेच त्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करतात. त्यामुळे त्यामध्ये अडकलेला माणूस दिशाहीन, बुद्धीहीन होताना दिसत आहे. अंधश्रद्धतेबाबत केलेले कायदे हे केवळ कागदावरच दिसतात. अशा अंधश्रद्धेपायी लेखिकेने कुटुंब व्यवस्थेत झालेला बदल लेखात योग्य पद्धतीने मांडला आहे. आपल्याच माणसांना एकमेकांपासून कसे तोडले जाते हे अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच अशा खोट्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व भविष्य सांगणाऱ्यांपासून दूर राहिले पाहिजे. – प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर, धुळे</strong>

लढवय्यी स्त्री

शनिवार, २ ऑगस्टच्या अंकातील ‘नऊ वर्षांनंतरची जाग!’ हा जीझेल पेलिकॉ यांच्या जीवनावरचा लेख वाचला वाचून अस्वस्थ झालो. ज्याच्या विश्वासावर सर्वस्व बहाल केलं, त्यानेच एवढा मोठा विश्वासघात केल्यानंतर एखादी बाई खचून तिने जीवन संपवलं असतं, पण या लढवय्या स्त्रीने लढा देऊन इतरांना सावध करण्याचा विडा उचलला. त्यांना सलाम आहे. – संदेश जाधव

जीझेल पेलिकॉ यांचे धाडस शब्दातीत

‘नऊ वर्षांनंतरची जाग!’ हा लेख वाचून मनाला तीव्र वेदना झाल्या. आपला पती इतका खालच्या पातळीवर पोहोचू शकतो, अशी कल्पनादेखील सहन करण्याच्या पलीकडे आहे. ज्या हिमतीने जीझेल पेलिकॉ उभ्या राहिल्या, त्यांचे धाडस शब्दातीत आहे. एक कटू सत्य वाचकांसमोर मांडल्याबद्दल धन्यवाद. – नंदकिशोर गौड, नाशिक

प्रतिष्ठेला बळी पडू नका

‘भावनांच्या उद्रेकाचे आणि हिंसेचे मूळ?’ हा डॉ. मोहन देस यांचा लेख (१९ जुलै)च्या अंकातला लेख वाचला. सध्या खून, आत्महत्या यात बातम्या बघून मन उद्विग्न होते. त्यामुळे टीव्ही बंद करतो. मुलांवर शिक्षणक्रम निवडण्याची सक्ती करू नका, त्यांना हवं ते शिकू द्या-करू द्या, हा तर आता महामंत्र झाला आहे. पालकांच्या सल्ल्यामुळे भरकटलेली मुलं आणि मुलांच्या अट्टहासामुळे हताश झालेले पालक दोघांच्या समस्या सारख्याच तीव्र आणि गंभीर होत आहेत. त्यात भर म्हणून आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक फुकटचे सल्ले देतात. हल्लीचे पालक प्रतिष्ठेला बळी पडून टोकाची भूमिका घेताना दिसतात. – श्रीनिवास स. डोंगरे

अवयवदान करायलाच हवे

डॉ.अन्वय मुळे यांचा अवयव दानावरील ‘रहे ना रहे हम’ हा लेख (१६ ऑगस्ट) वाचला. त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांच्या अनुभवातून आलेले अवयवदानावरचे बोल आम्हा सर्वसामान्य माणसांनी बोध घ्यावे असे आहेत. एका अल्पशिक्षित पित्याने मुलीच्या मृत्यूनंतर घेतलेला तिच्या अवयवदानाचा निर्णय हा उच्चशिक्षित व्यक्तीलाही सहज जमणारा नाही इतका मोठा आहे. पण त्याचवेळी दोन भावांपैकी एका भावाचा जीव अवयवदानामुळे वाचूनसुद्धा त्याचा दुसरा भाऊ ब्रेनडेड झाला तेव्हा धार्मिक कारण देऊन त्याने अवयवदान नाकारले तेव्हा त्या वृत्तीचे वाईट वाटले. आपल्या देशात एक लाखात एक माणूस अवयवदान करण्यास मान्यता देतो. अवयव दानात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत हे विशेष आणि आपले राज्य याबाबतीत पिछाडीवर आहे हे वाचून दु:ख झाले. नाशिकमधून वाहतूक पोलीस आणि विमान कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबईत आणलेले हृदय आणि प्रत्यारोपणाबद्दल वर्तमानपत्रातून वाचले होते पण तो अनुभव परत वाचताना आनंद मिळाला. या लेखांतून अवयवदानाचे महत्व समजू या आणि आजच अवयव दानाचा अर्ज भरू या. आपण आपल्या वस्तू आपल्या हयातीत देण्यास कचरतो, पण मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा मनाचा मोठेपणा नक्कीच दाखवू शकतो.

याशिवाय दुसरा लेख ‘डोळस दान’ हा ही महत्त्वाचा आहे. नेत्रदान हे नेत्रहीन लोकांसाठी खूप महत्त्वाचे. या लेखातून लेखक श्रीपाद आगाशे यांनी काही समज आणि गैरसमज दूर केले आहेत. या लेखामुळे माझे व्यक्तिगत ज्ञान वाढले आहे. अंध व्यक्तींसुद्धा नेत्रदान करू शकते आणि दुसरे म्हणजे नेत्रदानासाठी आधीच अर्ज भरून ठेवण्याची गरज नाही आणि त्याला वयाचेही बंधन नाही, ही माहिती महत्त्वाची. लेखक, लेखकाची दिवंगत पत्नी आणि आता त्यांची मुलेही या नेत्रदान चळवळीत, लोकांना त्याचे महत्त्व समजावण्यात खूप मोठे उदात्त काम करीत होते आणि आहेत. मी स्वत: हा फॉर्म भरला आहे. इतरांनीसुद्धा लेखातून स्फूर्ती घ्यावी आणि नेत्रदान करण्यासाठी फॉर्म भरावा आणि नसेल भरला तर आयत्या वेळीही आपले नातेवाईक नेत्रदान करू शकतील फक्त तुम्ही तशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त करायला हवी.- नीता शेरे, दहिसर (पूर्व)

रस्त्यावरील पदार्थांचेही महत्त्व

‘स्थलांतरातली खाद्यासंस्कृती’ या सदरातील ‘गरजेतून गरजेसाठी!’ डॉ. मंजूषा देशपांडे यांच्या लेखात (१६ ऑगस्ट) अनेक गावात, शहरात मिळणाऱ्या खाद्यापदार्थांची माहिती होती. घरगुती पद्धतीने खाद्यापदार्थ बनवून नंतर ते विक्री करून मोठी प्रगती करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या भागातील,राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यापदार्थ उपलब्ध करून दिले. पूर्वी रस्त्यांवर ठरावीक पदार्थच मिळत असत आता मात्र मोठ्या शहरात देशातील जवळपास सगळेच पदार्थ मिळतात. यामुळे विविध चवीच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. इकडे कोचीनलाही आपल्या महाराष्ट्रातील काही पदार्थ मिळतात.-उमा हाडके कोचीन. (केरळ)