बारमाहीया सदरातील ‘सावधान’ हा मुग्धा गोडबोले यांचा लेख (१४ जून) विचार करायला लावणारा आहे. लग्नाचा उद्देश काय आहे, याची व्याख्या होणे आवश्यक आहे. ‘मेसोपोटेमिया’मध्ये (२३५० ईसा पूर्व) लग्नाचा पहिला दाखला आढळला, असे म्हणतात. यावरून लग्न संस्था हजारो वर्षांपासून आहे हे दिसून येते.

या लेखात लिहिल्याप्रमाणे आजच्या ‘लग्न संस्था’ स्वार्थ आणि स्त्रियांना गृहीत धरून चालत आहेत. याने संबंध चांगले होत नसून स्त्रियांवर सत्ता गाजवली जात आहे आणि तिला ‘बाहेरची’ असे मानूनच वागणूक दिली जाते. हुंडा आणि त्यानंतर मुलगी जन्माला आली तर तिचाही भारही सुनेवर टाकला जातो. अत्यंत सुशिक्षित घरातदेखील हे पाहावयास मिळते. जरी वैद्याकशास्त्राने हे सिद्ध केले आहे की, पुरुषाचे शुक्राणू व त्याचे गुणसूत्र (क्रोमोझोम्स) हे ठरवतात की, जन्माला येणारे बाळ मुलगा की मुलगी असेल. तरीही बायकांनाच मानसिक त्रास होतो.

काही लग्नांमध्ये पुरुषाला त्रास होतो, हे खरे आहे पण, याचे प्रमाण त्यामानाने कमी आहे. वैद्याकशास्त्राप्रमाणे, शारीरिक संबंध हे आरोग्यासाठी काही प्रमाणात लाभदायक असतात हे खरे आहे. त्याशिवाय वारसदार असावा हा हेतू असतोच. त्यामुळे आजही लग्न महत्त्वपूर्ण मानले जाते.

आजची पिढी लग्नाकडे आणि त्यानंतरच्या परिणामांकडे डोळसपणे आणि विचारपूर्वकपणे पाहते आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच कदाचित आजच्या तरुण पिढीने नात्याबद्दल वेगळी वाट धरली आहे व याचा आपण अभ्यास करायला हवा अशी ती आहे. आपण लग्न नाही केलं तर खरंच जग इकडचे तिकडे होईल का? लग्न नाही केलं तर आपण जास्त आनंदी राहू का? हे प्रश्न त्यांना पडतात.

पुण्यातील ‘अथश्री’ उपक्रमासारख्या परांजपे यांच्या यशस्वी कल्पनेने म्हातारपणाची खरंच सोय झाली आहे का? ‘सिंगल पेरेंट’ ही संकल्पना लग्नाचा पर्याय आहे का? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. याने त्यांना आनंदी सहजीवन मिळू शकेल का आणि आपणही आपल्या नात्यांना मोकळे केले पाहिजे का, असे वाटते. अशा प्रकारे, लग्नाच्या बंधनात न अडकता, आणि कुणाचा स्वैराचार न चालवून घेता, ही वाट सकारात्मक सहजीवन आणि आत्मसन्मानाकडे जाणारी कशी होईल यासाठी प्रयत्न सर्वांनीच केले पाहिजेत, असे विचार हा लेख वाचून पुन्हा पुन्हा येतात. हा विषय मांडला याबद्दल लेखिकेचे मनापासून आभार.

डॉ. श्वेता जोग

स्त्री सशक्तीकरणासाठी नवी दिशा

स्त्री चळवळीतील स्त्री’ या सदरातील प्रा. संजयकुमार कांबळे यांचा ‘दलित स्त्रीमुक्तीच्या दिशेने’ हा लेख वाचला. शांताबाई दाणी यांचे आयुष्य म्हणजे भारतातील दलित स्त्रीवादाचा मूर्तिमंत इतिहास होय. त्यांच्या जीवनकथेतून फक्त वैयक्तिक संघर्षच नव्हे, तर सामाजिक जागृती, शैक्षणिक क्रांती आणि राजकीय समावेशाची तीनही परिमाणं एकत्रितपणे उलगडतात. मुख्य प्रवाहातील स्त्रीवाद हा प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय स्त्रियांच्या अनुभवांवर आधारलेला होता. अशा परिस्थितीत शांताबाईंनी दलित स्त्रियांचे वास्तव, त्यांच्या गरजा, आकांक्षा आणि संघर्षांना एक स्वतंत्र आवाज दिला.

शांताबाईंनी दलित चळवळीतील ‘स्त्रीचा’ सहभाग दृढ केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा ठेवत त्यांनी शिक्षणाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी केला. निधीअभावीही त्यांनी वसतिगृहे, शाळा सुरू केल्या. त्यांनी केवळ स्त्रियांचे नेतृत्व ओळखले नाही, तर ते घडवले. त्यांच्या कृतीतून ‘स्त्री शिक्षित झाली तर समाज उन्नत होतो,’ हा विचार सत्य ठरतो. त्यांची राजकीय कृतीही तितकीच महत्त्वाची ठरते. सत्याग्रह, कारावास, विधान परिषदेमध्ये स्पष्ट मुद्देसूद भाषणं – या सर्व कृती दलित स्त्रीच्या सक्षमीकरणाचा ठोस पुरावा आहेत. विशेषत: त्यांनी ‘दलित मित्र’ पुरस्कार नाकारून जो निधी वस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला, तो त्यांच्या मूल्यनिष्ठतेचे उत्तम उदाहरण आहे.

शांताबाईंनी लिहिलेलं आत्मचरित्र ‘रात्रंदिन आम्हा’ हे केवळ आत्मकथन नसून दलित स्त्रीचा लढा, विद्रोह आणि आत्मभान यांचं दस्तावेजीकरण आहे. त्या दलित स्त्रीवादाच्या वैचारिक व कृतिशील प्रवाहात एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांनी आजही सामाजिक समता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी नवी दिशा मिळते.

सतीश घुलेपाथर्डी

सोप्या चालीतलं ध्वनिसौंदर्य

ध्वनिसौंदर्यया सदरातील तृप्ती चावरे – तिजारे यांचा ‘मनात रुजणारं संगीताचं सौंदर्य’ (१४ जून) हा लेख वाचला. ‘कान झिंगाट किंवा पिसाट झालेले असताना दूर माळरानावरची गाण्याची अस्सल लकेर ऐकली की त्या सौंदर्याकडे मन खेचलं जातं…चालीतलं संगीताचं सौंदर्य मनात अनाहूतपणे रुजत जातं.’ हा लेखिकेचा अनुभव अनेकांना कैक वेळा आला आहे. लेखिकेने सध्याच्या टीव्ही, मोबाइल, गेमिंग, इंटरनेट, रिंगटोन्स, घोषणा, आरडाओरडा, गोंधळ, रस्त्यावरची दंगामस्ती, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न या कानठळ्या बसतील अशा नेहमीच्या आवाजाने माणसांची शांतता आणि समाधान लुप्त झालं आहे, हे वास्तव मांडलं आहे.

या लेखात ‘वासुदेवा’सारख्या लोककलावंताचं आर्जवी शब्दप्रवाहातून आलेलं संगीत किती व कसा आनंद देतं, हे कानावर जिथे जिथे चांगलं आणि दर्जेदार पडण्याची शक्यता आहे तिथे तिथे मानवी संस्कारशील मनाला आपसूकच धाव घ्यावीशी वाटते, हे अचूक शब्दांत मर्मज्ञपणे सांगितलं आहे. महाराष्ट्राला लोककला व लोककलावंत यांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. या भूमीतली प्रत्येक लोककला ही मानवी जीवनाला समृद्ध करणारी आहे.भजन, कीर्तन, भारुडे, दोहे, गवळणी, साख्या, धावा, आरत्या, कोळी गीते, भल्लरी गीते, वासुदेव, पोतराज, गोंधळ, वाघ्या मुरळी, आख्याने, जात्यावरची गाणी, उखाणे, गौरीची गाणी, मोटेवरची गाणी, नागपंचमीच्या सणाला गायिली जाणारी नागोबाची ओवाळणी गीते, जोतिबा, रंकोबा, भैरोबा या बहुजनांच्या दैवताविषयी डवरी समाजाने रचलेली कवने, कृषीप्रधान गीते, श्रावणमासनिमित्त झिम्मा फुगड्यांचा फेर धरून महिला नाचत गातात ती गीते, शाहिरांनी लिहिलेले पोवाडे, बारशाला गायिले जाणारे पाळणे, तमाशातील विविध लावण्या, नांदी, वग, सवाल जवाब, शाहिरी वाङ्मयातील आध्यात्मिक कलगीतुरा यासारख्या असंख्य लोकगीते आणि लोकसंगीताच्या रचनांमधून लोकरंजन तर केले आहेच, पण जनांचे रंजन करताना लोकशिक्षणाचा वसाही चालवला आहे. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी, भराडी, डाक घालणारे कुंभार, तुळजाभवानीचे गोंधळी, भोपे, पोतराज, वासुदेव, नंदीबैलवाले, खडी गंमत करणारे, तमासगीर, कडकलक्ष्मी, बहुरूपी, पिंगळा या लोककलावंतांनी आपल्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर मनाला रिझवणाऱ्या आणि रंजन करणाऱ्या नादमधुर संगीताच्या साथीने समाजमनात गारूड निर्माण केले आहे.

लेखिकेने वापरलेला ‘ध्वनिसौंदर्य’ हा शब्द लोककलांचा आणि लोककलावंतांचा गौरव करणारा आहे. या लोककलेतील पारंपरिक चालीतले शब्द जिवंत होतात आणि आपसूकच हृदयाशी सलगी करतात. साध्या सोप्या चालीतलं ध्वनिसौंदर्य आपल्या मनावर बराच काळ रेंगाळत राहतं. ही लोककलेची अभिजात ताकद आहे, हे खरंच…!– डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.