माझ्या सर्व गुरुजनांपैकी एक असामान्य व्यक्तिमत्त्व कायम माझी सोबत करत आलं आहे, ते म्हणजे व्य. ह. सांगावकार सर! पांढरा शर्ट, पांढरी विजार, वर काळा, लांब, दोन्ही बाजूला खिसे असणारा कोट, पायात साधी चप्पल, चेहऱ्यावर गंभीर भाव आणि हातांत खूप पुस्तकं. झपाझप पावलं टाकत कॉरिडॉरमधून वर्गात होणारा त्यांचा प्रवेश आणि चिडीचूप झालेला वर्ग, हे दृश्य आजही डोळय़ांसमोर येतं.

टोपीवाला हायस्कूल, मालवण इथे शिक्षकी पेशा सांभाळत असताना शाळेला आपलं सर्वस्व वाहिलेली ही त्यागमूर्ती. सर मूळचे कोल्हापूरचे, पण या नोकरीनिमित्ताने मालवणमध्ये आलेले. मग ते या शहराचेच होऊन गेले. सर आम्हाला हिंदूी, मराठी आणि इंग्रजी शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत सहजसुंदर. इंग्रजी हा एरवी कठीण वाटणारा विषय, पण सरांची हातोटी अशी, की तो सहज-सोपा वाटायचा. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत हवा, असा त्यांचा आग्रह होता. आणि ते करून घेण्याकडे कटाक्ष होता.

lokmanas
लोकमानस: सहकाराखालोखाल राजकारणाचा अड्डा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

बाहेरील शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी विषयाच्या परीक्षांना बसण्याचा आग्रह ते धरत. ‘प्रायमरी’पासून ते ‘सीनिअर’पर्यंत सर्व परीक्षांचे क्लासेस सर स्वत: घ्यायचे आणि तेही विनामोबदला. सीनिअर परीक्षा- जी कॉलेजमध्ये असलेली मुलं देतात, ती त्यांनी मला आठव्या इयत्तेत असताना द्यायला लावली होती. या परीक्षा दिल्यामुळे माझं इंग्रजी व्याकरण उत्तम झालं. पाया मजबूत झाला. बँकेत नोकरी करत असताना इंग्रजीतून पत्रव्यवहार करताना त्याचा मला खूप फायदा झाला. माझ्या मुलालाही मीच इंग्रजी शिकवलं आणि त्यालाही इंग्रजीमध्ये भरघोस गुण मिळत असत. याचं श्रेय मात्र सांगावकर सरांचं.  

कवितेचे रसग्रहण हा त्यांच्या आवडीचा विषय. ते करताना सर अनेक पाठय़पुस्तकबाह्य गोष्टींचा संदर्भ घ्यायचे आणि एकच कविता वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून कशी समजून घेता येईल त्याचं सुंदर विश्लेषण करायचे. त्यांचा स्वत:चा पुस्तक संग्रह होता. ते केवळ अभ्यासक्रम पूर्ण करायचा म्हणून शिकवायचे नाहीत; मुलांना जीवनविषयक मार्गदर्शन कसं देता येईल, आयुष्याचा अर्थ काय आणि ते कसं जगलं पाहिजे, याचंही ज्ञान मुलांना मिळावं हा त्यामागे त्यांचा हेतू असायचा. सरांचं एक आवडतं वाक्य होतं. ते म्हणायचे, ‘शाळा ही मुलांना आपलं घर वाटली पाहिजे.’ सर त्यांच्या वागण्यातून मुलांच्या मनात तशी भावना निर्माण करण्यासाठी कायम प्रयत्नशील असायचे. सरांच्या भोवती आम्हा विद्यार्थ्यांचं कोंडाळं नेहमी असायचं, ते त्यामुळेच. त्यांनी या पेशाकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिलं नाही. शिक्षण हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. त्यांनी विवाहदेखील केला नव्हता, पण अनेक गरीब आणि होतकरू मुलांचे ते पालक झाले. त्यांचा वह्या, पुस्तकं, शिक्षणाचा खर्च ते स्वत: उचलायचे. शाळेचे तास संपले की गरीब वस्तीत जाऊन अनेक मुलांची शिकवणी घ्यायचे. पुणे-मुंबईतल्या शाळांकडून स्पर्धा परीक्षांचे पेपर मागून घ्यायचे आणि ते गावात विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन तपासून द्यायचे, जेणेकरून आपले विद्यार्थी मोठय़ा शहरातील मुलांच्या स्पर्धेत कुठेही मागे पडू नयेत. त्यामुळेच टोपीवाला शाळेचा एक अग्रगण्य शाळा असा लौकिक आहे. अगदी सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं काम अखंड चालू होतं आणि तेही मोफत, हे महत्त्वाचं. मुलांनी केवळ शालेय अभ्यासक्रमातच प्रगती न करता सर्वागीण प्रगती साधावी म्हणून ते अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांना बसण्याचा आग्रह धरायचे, तसंच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवावं म्हणून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मालवणमधील प्रसिद्ध बोर्डिग ग्राऊंडमध्ये आता क्रिकेटच्या स्पर्धा होतात, त्याची सुरुवात होण्यामागे सांगावकर सरांचे मोलाचे प्रयत्न आहेत. कित्येकदा बाहेरून खेळासाठी येणाऱ्या गरीब मुलांची राहण्याची सोय त्यांनी स्वत:च्या घरीही केली आहे. टोपीवाला हायस्कूलची इमारत ही मालवण शहराची शान. शाळेची लॅबोरेटरीसाठी वापरली जाणारी इमारत सरांनी माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभी केली आहे.

सर शिस्तप्रिय होते, हे काही उनाड मुलांना खटकायचं. ते त्यांना त्रासही द्यायचे. पण सरांनी त्यांचा कधी राग धरला नाही. ज्याला अभ्यासात गती नाही, त्याची आवड ओळखून, कल पाहून त्यांनी यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं, याचं मार्गदर्शन सर करायचे. ‘तुला हे नक्की जमेल!’ हे त्यांचे शब्द मुलांना उभारी देत.

सरांचं विद्यार्थ्यांवर एवढं प्रेम का? त्यातही आर्थिकदृष्टय़ा गरीब विद्यार्थ्यांवर.. हा प्रश्न मी एकदा धीर करून सरांना विचारला होता. ते म्हणाले, ‘‘मी खूप हलाखीचे दिवस जगलोय. खूप लहान वयात एका दिवाणाकडे टायपिस्ट म्हणून काम करायचो. तेव्हा संस्थाने विलीन झाली होती आणि त्या दिवाणाचा अतिशय गोपनीय पत्रव्यवहार मी सांभाळत होतो. त्याच्या मोबदल्यातून माझ्या वडिलांनी घेतलेली सर्व कर्जे मी फेडली आणि माझं शिक्षणही पूर्ण केलं. त्यामुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला मदत करायची हे मी माझ्या जीवनाचे ध्येय ठरवलं.’’ 

आयुष्याच्या उत्तरार्धात सरांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. ते कायम भाडय़ाच्या घरात राहिले. १९९६ मध्ये त्यांचं निधन झालं. सरांच्या स्मृतींचं जतन व्हावं म्हणून आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी २०१२ मध्ये ‘व्य. ह. सांगावकर ज्ञानमंदिर’ या नावानं आठ खोल्यांची इमारत शाळेच्या प्रांगणात उभी केली. संगणकाचा वापर करून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास केंद्र म्हणून ती वापरली जावी असा उद्देश त्यामागे आहे. 

सरांची आठवण आजही डोळय़ांत पाणी आणते. या ऋषितुल्य शिक्षकांचे ऋण या जन्मात फिटणे अशक्यच!

madhavimasurkar@gmail.com