‘परीक्षेनंतरचा अभ्यास.’!

परीक्षेत मिळालेले पन्नास गुण, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात.

परीक्षेत मिळालेले पन्नास गुण, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात. तसंच तो विषय आपल्याला पन्नास टक्के येत नसल्याचंही दर्शवतात. याकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. म्हणूनच ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ हा नुसता विचार नाही, तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक ‘परिपक्व दृष्टिकोन’ आहे! काम कोणतंही असो, ते अधिकाधिक परिपूर्ण असावं, आदर्श असावं, चांगलं असावं हा दृष्टिकोन सर्वत्र विधायक आहे आणि त्याचाच प्रत्यय इतर अनेक क्षेत्रांतही येतो.

एखादी परीक्षा संपली की, तिचा अभ्यास करून थकलेला विद्यार्थी स्वाभाविकपणे जरा निश्चिंत होतो. त्यानं परीक्षेसाठी ताण घेतला असेल, तर तो कमी व्हावा म्हणून साधी राहिलेली झोप घेण्यापासून ते विश्रांतीसाठी गावी जाण्यापर्यंत अनेक विचार तो करीत असतो. त्याच-त्या परीक्षेच्या वातावरणामुळं घरात कंटाळलेली, अवघडलेली मंडळीसुद्धा सुटकेचा नि:श्वास टाकतात. अशा वेळी एक थोडा अनपेक्षित आणि विचित्र वाटणाराही प्रश्न विचारण्यासारखा असतो किंवा स्वत: विचार करण्यासारखा असतो. तो प्रश्न सामान्यत: रूढ नसला तरी हिताचा आहे, गरजेचा आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकेल.

परीक्षा देऊन आलेल्या अशा अगदी पहिलीपासून उच्च पदवी किंवा स्पर्धा परीक्षेपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे, ‘काय परीक्षा संपली ना आता? मग उद्यापासून अभ्यास सुरू का?’ असं विचारलं तर त्याला प्रथम काय विचारलं, हे चटकन लक्षात येण्याची शक्यता कमी आहे. कारण आपल्यावर इतक्या लहानपणापासूनचा एक संस्कार आहे की, जो म्हणून काही अभ्यास करायचा तो परीक्षेपूर्वी करायचा असतो. हे अर्थात सार्वत्रिक सत्य आहे. अभ्यास किती झाला, कसा झाला हे बघण्यासाठी तर परीक्षा आहे. त्या अभ्यासात मिळणाऱ्या गुणांवर पुढच्या वर्गातला प्रवेश किंवा एरवीच्या क्षेत्रांत पुढची प्रगती अवलंबून असते. त्यामुळं परीक्षेपूर्वी जेवढा जास्तीत जास्त अभ्यास होईल, तेवढं पुढचं हे सारं यश-जीवन अवलंबून असतं. हे जर आपण मनानं, जबाबदारी म्हणून, वेळी इतरांच्या सक्तीनं म्हणून – लहानपणापासून करीत आलेले आहोत आणि त्याच अपेक्षा आपण त्या त्या वेळी इतरांकडूनही करतो. यात विचार करण्यासारखं काही नाही, असं वाटण्याची दाट शक्यता आहे. पण आपलाच काय, इतरांचाही अनुभव आपण तपासून पाहावा.

साधा पाचवीतला किंवा आठवीतला गणिताचा पेपर देऊन आपण बाहेर येतो. हळूहळू आपल्या बरोबरचे मित्रमत्रिणीही बाहेर येतात. गेटवर किंवा इतर ठिकाणी घोळके एकत्र होतात. आलेल्या प्रश्नांची आणि दिलेल्या उत्तरांची चर्चा होते. लक्षात येतं की, हे चुकलं, ते चुकलं. हे आपण नंतर सोडवू असं ठरवलं, ते राहिलंच. यात आपल्याला शंका होती, ती आपण कुणाला तरी विचारायची ठरवली होती, ती राहिली. एखाद्या उपप्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं गडबडीत विसरलो. हे सारं तिथं होतं खरं. पण सगळ्या मित्रमंडळींचं एकदा कॉफीपान झालं की, तो विषय विसरला जातो. कारण जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीतच असं काहीतरी झालेलं असतं. त्यात पुन्हा घरी काही सांगता येण्यासारखं नसल्यामुळं मनही ते सोयीस्करपणे विसरून जातं.

पण आपण विचार करावा, की परीक्षा जसं आपला कोणता अभ्यास झाला, हे दाखवून देते, तसा कोणता अभ्यास झाला नाही, हेही दाखवीत असते. पुढे परीक्षेतल्या गुणांनी ते कळणारच असतं. पण त्यात त्या परीक्षेपुरता तरी बदल करता येण्यासारखा नसतो. तरीही परीक्षेत कच्चं आहे, राहिलं आहे, अभ्यासलं गेलं नाही असं जे दाखवलेलं असतं, ते कधीच सोडून देण्यासारखं नसतं. खरं तर किमान गुण मिळाले की, यंत्रणा विद्यार्थ्यांला पास करते, पुढच्या वर्गात घालते. कुणाला पन्नास टक्के गुण मिळून सुटल्याचं कौतुक वाटतं, तर कुणाला साठ टक्के मिळून पहिला वर्ग मिळाल्याचं, तर कुणाला सत्तर-पंचाहत्तर गुण मिळून विशेष गुणवत्ता मिळाल्याचं कौतुक वाटतं. यातली प्रत्येक गोष्ट कौतुकास्पद आहे, यात शंकाच नाही.

पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की परीक्षेचा, पास होण्याचा, वरच्या वर्गात जाण्याचा प्रश्न तर सुटला, पण मिळालेले पन्नास गुण, जसं त्या परीक्षेपुरता तरी, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात. तसंच तो विषय आपल्याला पन्नास टक्के येत नसल्याचंही दर्शवतात. तीच गोष्ट साठ किंवा पंचाहत्तर मिळवलेल्यांना क्रमानं चाळीस किंवा पंचवीस टक्के विषय न येत असल्याचंही दर्शवतात. याकडं फार कमी लोकांचं लक्ष जातं, असं लक्षात येईल. तेही एक वेळ चाललं असतं. पण पुढे काही प्रश्न असं लक्ष न गेल्यानं निर्माण होतात, असं आढळेल.

या वर्षीच्या गणितातला पन्नास टक्के भाग कळलेला नसेल, तर त्यावर आधारलेला पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमातला भाग समजून घेताना, ही पन्नास टक्क्यांची अडचण उभी राहाते, नव्हे ती दरवर्षी वाढत जाते. गुण दरवर्षी कमी होत जातात. विषय नावडता होतो. अभ्यास टाळायचा प्रयत्न होतो. आपलं गणित कच्चं आहे, पाया पक्का नाही, आता ते जुळवून घेणं शक्य नाही- अशा अनेक वस्तुस्थिती पुढच्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यांत येत जातात. फार काही उपाय नसल्यानं, मुलंच काय पालकांनाही नराश्य येतं. काहींच्या बाबतीत अशा काही विषयांवर काही महत्त्वाच्या क्षेत्रांतल्या चांगल्या चांगल्या संधीही हुकतात.

मग या परीक्षेनंतरच्या अभ्यासाचं महत्त्व का असतं, ते कळतं. पहिल्याच वर्षी परीक्षेनंतर किंवा गुण कळल्यानंतर येत नसलेला पन्नास टक्के भाग सुट्टीत समजून घेतला, अभ्यासला तर एकवेळ झालेल्या परीक्षेतलं नुकसान टाळता येणार नाही, पण पुढच्या वर्षांचं नक्की टाळता येतं. हा विषय अर्थातच केवळ शाळा, अभ्यास, परीक्षा, प्रवेशपरीक्षा- एवढय़ा क्षेत्रांपुरता मर्यादित नाही, असं आपल्या लक्षात येईल. परीक्षेपूर्वी अभ्यास करावा, हा आदर्श दृष्टिकोन आहे! याबद्दल दुमतच नाही. पण ‘परीक्षेनंतरचा अभ्यास’ हा नुसता विचार नाही, तर आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारा एक ‘परिपक्व दृष्टिकोन’ आहे! कारण काम कोणतंही असो, ते अधिकाधिक परिपूर्ण असावं, आदर्श असावं, चांगलं असावं हा दृष्टिकोन सर्वत्र विधायक आहे. इतर अनेक क्षेत्रांत आपल्याला याचा प्रत्यय येईल.

आपल्याकडे एखादं लग्नकार्य, समारंभ निघतो. त्याची सर्व बाजूंनी आठवणीनं तयारी होते. सर्व आमंत्रित, नातेवाईक, स्नेहीमंडळी येतात. कार्यक्रम आनंदात पार पडतो. सर्व मंडळी गेल्यानंतर हे सर्व आयोजित करणाऱ्या घरच्या मंडळींच्या अनौपचारिक गप्पा सुरू होतात. त्यात कुणाला तरी आठवण होते की, आपल्या जवळच्या अमुक माणसाचं आमंत्रण राहिलं. एकदा ते आठवल्यावर इतरांनाही अशा अगदी जिव्हाळ्याच्या चार माणसांना आमंत्रण राहिल्याची आठवण होते. आता आधी पाहिलं तसं, हा विषय तसाच सोडून देण्याचा नसतो. परीक्षेनंतरच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाचा परिचय आणि महत्त्व असेल तर, आपल्या आमंत्रणाच्या यादीत अशी राहिलेली महत्त्वाची नावं आत्ताच लिहून ठेवणं, हा असा परीक्षेनंतरचा अभ्यास आहे. यावेळचा कार्यक्रम होऊन गेला असला, त्यात झालेल्या संबंधांचं काही नुकसान भरून काढता येण्यासारखं नसलं, तरी अशा मंडळींना नंतर ‘क्षमस्व’ म्हणून, पुन्हा आम्ही जरूर लक्षात ठेवू, असंही करता येणं शक्य असतं!

अनेकदा आपल्यापरीनं सारा स्वयंपाक पूर्ण होतो. माणसं जेवून, उठून जातातही, पण आलेल्या माणसांच्या आवडीचा एखादा पदार्थ करायचा ठरवलेला असूनही, आयत्या वेळी स्वयंपाकाच्या नादात, तो विषय विसरतो. अनेक बाबतीत अशी परीक्षा संपलेली असते, पण अभ्यास करता येण्यासारखा असतो. पुढच्या वेळी ते आठवणीत कसं राहील, त्याचा अभ्यास करीत असावं. अभ्यासानं उणिवा कमी होतील. अधिक यशस्वी होणारी माणसं, परीक्षेनंतरचा असा अभ्यास करीत आलेली आहेत. हेही स्पष्ट आहे, की अशा तऱ्हेचा अभ्यास करणाऱ्यांच्या नंतरच्या अभ्यासाच्या गरजा कमी होतात. मनुष्याचं मूळ कामच अधिक पूर्णत्वाकडं जातं!

ऑफिसचं काम असो, एखादी कौटुंबिक, सामाजिक कामाची जबाबदारी असो, यात्रा सहलीत जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळं बघणं असो, व्याख्यानात मांडायचा एखादा विषय असो, एकमेकांना सांगायचे काही निरोप असोत – अशा असंख्य प्रसंगांत परीक्षेचा अभ्यास तर उपयोगी पडेलच, पण असा नंतरचा अभ्यासही भावी नुकसान टाळेल. स्वत:ला एक चांगली सवय नकळत लावून जाईल.

त्यामुळे आनंदाचा असा एक दिवससुद्धा उजाडेल की, ज्या दिवशी आयुष्यातल्या परीक्षेपूर्वीच्या अभ्यासाच्या पत्राला नंतरच्या अभ्यासाचा ताजा कलम नसेल, प्रत्येक कर्माचं पत्रच पूर्ण असेल!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi articles on how to study smart