‘चेंज इज द ओन्ली कॉन्सन्ट’ जग जसे बदलत आहे तसे आपण बदलावे लागते, तरच आपले आयुष्य सोपे होईल तरच पुढील पिढी सुखेनैव जीवन जगेल. म्हणूनच सर्वच बाबतीतील बदल अत्यावश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटोग्राफी फिल्ममधून डिजिटलमध्ये तर दूरसंचार टेलेग्राफ म्हणजे तारमधून टेलिफोनमध्ये बदलला गेला आहे. औषधे, शस्त्रक्रिया यात झालेल्या बदलांमुळे माणसाचे आयुष्य दुपटीने वाढले आहे. अनेकानेक गोष्टींतील बदल जनसामान्यांनी स्वीकारले आहेत. त्याचे फायदे अनुभवताहेत. पूर्वी सायकल वापरली जाई. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी आल्या. नंतर कार आली. त्याच्यातच किती बदल झालेले आपण पाहतोय. जास्त जास्त तांत्रिक बदल होऊन आता चालकाविना कार रस्त्यावर धावणार आहे. यामुळे माणसाची उत्पादनक्षमता वाढेल. या कारच्या सुरक्षिततेविषयी कोणाच्या मनात शंका नाहीत कारण आतापर्यंत वाहनांमध्ये झालेले बदल सर्वाना फायदेशीर ठरले आहेत. संगणकाचे जग असेच भराभर बदल होत पसरत जाताना आपण पाहिलेच आहे. यात ज्येष्ठ नागरिकसुद्धा मागे नाहीत, कारण दूर राहणाऱ्या मुलांशी संपर्क साधण्याकरिता हा बदल आवश्यक आहे हे त्यांनी मान्य केले. बँकांचे व्यवहार, पत्रव्यवहार अशा अनेक गोष्टी हा एक बदल स्वीकारल्याने सोप्या झाल्या आहेत.

आपल्याकडे म्हण आहे, ‘जुने ते सोने.’ पण या जुन्याला नव्याची जोड देत गेलो तर सोन्याहून पिवळे होईल. सगळ्याच जुन्या गोष्टींना आपण चिकटून राहिलो तर जगात आपला टिकाव लागणे कठीण होईल. मोठी माणसे नेहमी सांगतात, ‘मोठय़ांचा आदर करा, रोज व्यायाम करा, आपल्याच जगात जगू नका, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना जरूर तेव्हा मदत करा’, या सगळ्या नक्कीच चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या संस्कृतीचा भागच आहे तो! पण, नुसते तसेच जगा, हा हट्ट नसावा. जग जसे बदलत आहे तसे आपण बदलावे लागते.

मुलांसाठी शिक्षणाची असंख्य दालने उघडी आहेत. त्यांचा फायदा ती घेतातसुद्धा. परदेशी गेलेली किंवा देशात राहतात ती मुले घरे घेतात. साठवलेल्या पैशातून ते शक्य नसते. ऑफिसकडून, बँकांकडून कर्ज घेतात. महागडय़ा कार घेतात. कमावलेला पैसा चांगल्या ठिकाणी म्हणजे जास्त व्याजदर मिळत असेल तेथे गुंतवला जातो आणि जेथून कमी व्याज दर देऊन कर्ज मिळते तेथून कर्ज घेतले जाते. आपण कमावलेल्या पैशातूनच मोठे घर, कार घेऊ, परदेशी मुलाबाळांना फिरायला नेऊ  असा विचार केला तर एकही गोष्ट करता येणार नाही. सगळ्या गोष्टी एक कर्ज काढून होत असतील तर हा बदल होतोय तो झालाच पाहिजे.

आज स्त्रीने स्वत:चे आयुष्य आमूलाग्र बदलले आहे, म्हणूनच ती तग धरून राहिली आहे, एवढेच नव्हे तर चांगले, प्रगतिशील आयुष्य जगते आहे. फक्त चूल-मूल करणाऱ्या स्त्रीने शिक्षण घेतले. हळूहळू घराबाहेर पडली, नोकरी करू लागली. आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ  लागली. तिने स्वत:मध्ये केलेल्या बदलामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळू लागले. कारण आईसारखा गुरू कोणी नसतो. प्रत्येकच क्षेत्रात केलेला बदल तो बदल करणाऱ्यांना फायदेशीर ठरलेला आहे. म्हणून बदल फार जरुरीचा ठरतो.

geetagramopadhye@yahoo.com

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in life
First published on: 03-12-2016 at 00:50 IST