‘विश्वास’ हा वाय-फायसारखा असतो. दृष्टीस पडत नाही, दिसत नाही, पण तो तुम्हाला जे पाहिजे आहे, त्याच्याशी जोडून देतो. विश्वास म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपल्याला कधीही फसविणार नाही, आपले वाईट चिंतणार नाही, करणार नाही, आपल्याशी नेहमी प्रामाणिक असेलही त्या व्यक्तीविषयीची भावना म्हणजे ‘विश्वास’. ती व्यक्ती आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रीण, नातेवाईक कोणीही असू शकते. अगदी नोकरसुद्धा. आपल्याला असलेली एक वाईट सवय म्हणजे, घरातील एखादी अगदी क्षुल्लक वस्तू जरी सापडत नसेल तर ती नोकराने उचलली असेल, हा संशय मनात प्रथम येऊन जातो. ते बरेचदा खोटे ठरते. एका अतिश्रीमंत कुटुंबात सरूमावशी अठरा एकोणीस वर्षे काम करत होती. आपल्या चार वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन काम शोधणाऱ्या सरूला या कुटुंबाने काम दिले, थारा दिला. सुरुवातीला तिच्यावर प्रत्येक जण लक्ष ठेवून असायचा. अनोळखी बाई काय करेल याचा नेम नाही, हाच विचार असायचा. सरूची सरूमावशी झाली ती, इतके प्रेम तिने सर्वाना दिले. अंग मोडून काम केले. घर सर्व दृष्टीने सांभाळले. मालकांनी पण तिच्या मुलाला शिकवले. हळूहळू व्यवसाय शिकवला. सगळं काही छान सुरू असताना कपाटातील काही दागिने नाहीसे झाल्याचे घरातील सुनेच्या लक्षात आले. सरूमावशीची चौकशी झाली, पण तिने दागिन्यांना हात लावला नाही याची सर्वाना खात्री होती. कोणीही तिच्यावर अविश्वास दाखविला नाही. दागिने कोणी नेले असतील हे तिनेच घरच्यांना सांगितले. सगळे अवाक्झाले. तरी चोर सापडायलाच हवा होता म्हणून अचानक संशयित व्यक्तीची झडती घेतली. तिने खूप आकांडतांडव केले. ‘माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमचा सरूवर आहे’ वगैरे बोलून रडारड केली. दागिने तिच्याकडे सापडले. ‘तुम्ही माझ्याबरोबर मुलाचे आयुष्य घडविले, तुमचा विश्वासघात मी जिवावर बेतले तरी करणार नाही,’ असे बोलून सरुमावशींनी सर्वाची मने परत एकदा जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका रोग्याचा डॉक्टरांवरचा विश्वास वेगळाच असतो. एका रुग्णाची शस्त्रक्रिया होती. महिनाभर उपचार झाल्यानंतर शस्त्रक्रियेकरिता फिट असलेला तो रोगी आयत्या वेळी ढेपाळला. त्याला नैराश्य आले. ‘ऑपरेशन करताना मी मरून जाईन’ असे म्हणू लागला. शल्यचिकित्सकाने त्याचा हात धरला. डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, ‘मी आहे. मनातील वाईट विचार काढून फेक.’ या एका वाक्याने जादू केली. रुग्ण म्हणाला, ‘मला या स्टेजपर्यंत यशस्वीपणे आणलंत, पुढे नक्कीच न्याल.’ रोगी ठणठणीत बरा झाला हे सांगायला नकोच!

स्टेशनवरील गर्दीत आईचा हात सुटलेला मंगेश थेट एका पोलिसाकडे गेला. म्हणाला, ‘‘काका, माझी आई येईपर्यंत मी इथे तुमच्याबरोबर थांबतो.’’ ‘‘अरे, पण आई नेमकी इथेच कशी येईल?’’  ‘‘आई नेहमी सांगते, मोठय़ा माणसांची चुकामूक झाली की, पोलीसकाकांजवळ थांबायचं. मला शोधत ती नक्की इथेच येईल.’’ गाडी गेल्यावर पाचच मिनिटात मंगेशची आई आली. ‘‘मला शंभर टक्के विश्वास होता, तू पोलीसकाकांजवळ असशील.’’ तू मला पोलीसकाकांजवळ शोधशील हे मला पक्कं माहीत होते.’’ हे दोन्ही उद्गार आई व मुलगा यांचा परस्परांवरील विश्वासच अधोरेखित करतात ना?

विश्वास संपादन करायला खूप वेळ लागतो, गमवायला एक मिनिट पुरेसा असतो. म्हणून तो टिकविण्याकरिता हातून चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

geetagramopadhye@yahoo.com

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trust
First published on: 15-10-2016 at 01:04 IST