डॉ. रश्मी पारसकर सोवनी

विनयभंग ते बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचाराच्या अनेक कहाण्या आपण रोजच्या रोज ऐकत असतो. हे अत्याचार कमी तर होत नाहीतच, उलट दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. फक्त माध्यमं बदलली. इंटरनेटच्या माध्यमातून विनयभंग सुरु झाला. पुरुषांनी संवेदनशील होणं हा यावरचा हमखास उपाय असला तरी तो प्रत्यक्षात कधी येईल, किती प्रमाणात परिणाम करेल हा प्रश्नच आहे. अशा वेळी फ़ैज़् अहमद
फ़ैज़् यांच्या ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल ज़्बाँ अब तक तेरी हैं’ चा जागर करत स्त्रीनं स्वत:कडेच असलेलं प्रभावी अस्त्र हाती घेतलं पाहिजे. कोणतं, ते भारतभरातील मुली आणि स्त्रियांच्या एका सर्वेक्षणात पुढे आलं. स्त्रियांचे प्रश्न आणि काही धक्कादायक निष्कर्ष सांगणारा, या सर्वेक्षणावर आधारित हा लेख.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..


‘इज्ज़्त की बहुत सी क़िस्मेंहैं
घूँघट थप्पडम् गंदुम (गहू)
इज्ज़्ात के ताबूत में
कैद की मेख़ें (खिळे) ठोंकी गई हैं
घरसे लेकर फुटपाथ तक हमारा नहीं ’

ब्लॅकमेलिंग, नकोसे स्पर्श, अंगावर हात टाकणे, अश्लील मेसेज पाठवणे, छेडखानी, विनयभंग, सामूहिक बलात्कार असे स्त्रियांवर होणारे अत्याचार आपल्या समाजाला नवीन नाहीत. जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा सुप्रसिद्ध उर्दू शायरा सारा शगुफ्ताच्या वरील ओळी आठवतात.
प्रत्येक वेळी स्त्री-अत्याचाराच्या बातम्या वाचल्यावर ती पीडिता हृदयात घर करते आणि मनातल्या मनात तिच्याशी संवाद सुरू होतो. हैदराबाद बलात्कार प्रकरण वाचनात आले त्या वेळीही अशीच एक प्रश्नांची शृंखला निर्माण झाली. हैदराबादमधील ही डॉक्टर पीडिता २८ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री नऊ वाजता स्कूटरच्या स्टँडवर पार्क केलेली मोपेड घ्यायला गेली. मोपेड पंक्चर होती म्हणून तिला मदत करण्याच्या बहाण्याने चार-पाच माणसे तिच्याकडे आली. काही काळेबेरे आहे अशी शंका या डॉक्टर तरुणीला आली आणि तिने आपल्या बहिणीला कॉल केला. त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला. बहिणीला कॉल करतानाच तिने जर ११२ या पोलिसांच्या क्रमांकावरही फोन केला असता तर?.. तिच्याजवळ स्वसंरक्षणार्थ ‘पेपर स्प्रे’ असता तर तिला पळून जायला अवधी मिळाला नसता का?.. गाडी तिथेच सोडून टॅक्सी करून जाता आले नसते का?.. असे अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागले.

२०१८ मध्ये # DesiMeToo या युक्रांद, नागपूर संघटनेने घेतलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुली, स्त्रिया आठवल्या. धर्म, जात, वयाच्या मर्यादा ओलांडून एक स्त्री म्हणून लैंगिक अत्याचारांचा सामना त्यांना कसा करावा लागला याचे अनुभव त्या मांडत होत्या. ज्या प्रसंगाबद्दल त्या बोलत होत्या त्या प्रसंगाचे वर्णन, त्या वेळी त्यांनी घातलेला ड्रेस आणि त्यांचा नावासकट फोटो असे प्रदर्शन भरवण्यात आले होते.एक शालेय मुलगी सांगत होती, ‘‘माझा जीजा (बहिणीचा नवरा) चारचौघांत माझ्याशी अश्लील चाळे करतो. त्याला काही बोलण्याऐवजी कुटुंबीय बचावात्मक पवित्रा घेतात आणि जीजा घरी आला की मला जवळच राहणाऱ्या आत्याकडे पाठवतात.’’ ‘नजर खराब तुमची आणि घुंघट आम्ही ओढायचा, असं का?’ असा जळजळीत प्रश्न तिनं विचारला आणि फैज़्अहमद फैज़् यांच्या ओळींद्वारे आपली वेदना मांडली-

बोल कि लब आज़ाद हैं तेरे
बोल ज़्बाँ अब तक तेरी हैं
तेरा सुत्वाँ जिस्म हैं तेरा
बोल कि जाँ अब तक तेरी हैं’

(सगळय़ांना सांग, की तुझे शब्द मुक्त आहेत, तुझी वाणी फक्त तुझ्या मालकीची आहे, तुझे पवित्र शरीर तुझे आहे, तुझा जीव फक्त तुझा आहे.)
वय वर्षे ५ ते ४५ पर्यंतच्या या मुली आणि स्त्रियांना आपण काय सल्ला देऊ शकतो? निर्भया असो की ‘डब्ल्यूसीएल’च्या खाणीत (उमरेड, नागपूरजवळील कोळसा खाण) वजनकाटय़ावर काम करणारी सुशिक्षित २५ वर्षांची तरुणी असो, सावज हेरून शिकार करावी तशा या मुली बलात्काराला बळी पडल्या. अशा परिस्थितीत काय करावे याचा कोणताच विचार, प्रशिक्षण या मुलींजवळ नव्हते, नसतेच.मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्युदो-कराटे शिका, असे सांगितले जाते. 112 india, sheroes, my safetipin, bSafe, himmat, smart24x7, shake2safe इत्यादी अॅप्सचा वापर करा, १०९१, ११२ या हेल्पलाइन नंबर वापरा ,असा सल्ला दिला जातो. पण किती जणींना त्याचा फायदा होतो? मी संस्थापक असलेल्या नागपूरच्या we 4 change या संस्थेने नुकताच महाराष्ट्रातील स्त्रियांना जो लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो त्यावर एक सर्वेक्षण केले.

त्या सर्वेक्षणानुसार वय वर्षे ११ ते १६ या वयोगटातील मुलींवर सगळय़ांत जास्त लैंगिक अत्याचार होताना दिसतात, असे आढळून आले. त्याचा सामना त्यांनी कसा करायचा हा प्रश्नच आहे. या वयोगटातल्या मुलींना ज्युदो-कराटे शिकवणार का? आणि हे शिकायला लागणारा वेळ, तेवढी ताकद मिळण्यासाठीचा कालावधी काही वर्षांचा असतो. एका पुरुषाला चार माणसांनी घेरून मारले तर तो पुरुष काही करू शकत नाही. मग या नाजूक वयाच्या मुली चार-पाच पुरुषांबरोबर दोन हात करू शकतील का? याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे. म्हणूनच त्यांना इतर गोष्टीही शिकवायला हव्यात. मुलींना स्वत:साठी सेफ स्पेस- सुरक्षित अवकाश निर्माण करणे जमायला हवे. कोणाच्याही मदतीशिवाय, सल्ल्याशिवाय कोणत्या प्रसंगात काय करायला हवे याची मूलभूत माहिती मुलींना असायलाच हवी- म्हणजेच, ठामपणे आपले म्हणणे मांडता यायला हवे, स्पष्ट नकार देणे जमायला हवे, आपल्यावर अतिप्रसंग होऊ शकतो याची जाणीव होताच प्रसंगावधान हवे, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा इतर कोणाकडून त्रास होत असल्यास परिस्थिती चिघळण्याआधी सुरुवातीलाच उपाययोजना करता यायला हवी. कायद्याचे ज्ञान तर अत्यावश्यकच.

याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी एक वर्कशॉप घेणे आवश्यक वाटले. ‘#देसी मी टू’चा अनुभव हा काही ठरावीक मुलींचा अनुभव होता. तो मर्यादित ठरला असता, त्यामुळे अधिक मुलींशी, स्त्रियांशी बोलणे गरजेचे होते. शिवाय एका बंद खोलीत चर्चा करून कोणत्याही निष्कर्षांवर येणे अयोग्य वाटले. म्हणून एका डाटाबेसवर आधारित कार्यशाळा घ्यावी असे ठरले. त्यासाठी ‘सहसंवेदना सर्वेक्षण’ करण्याचे ठरले. ‘सहसंवेदना सर्वेक्षणा’त वय वर्षे १८ पासून ६० वर्षांच्या वयोगटातील ६०९ स्त्रियांनी फॉर्म भरले. हे सर्वेक्षण दोन गटांत करण्यात आले- १८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलींचा एक गट आणि वय वर्षे २५ ते ६० वयातील स्त्रियांचा दुसरा गट. या सर्वेक्षणात प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या मुली व स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म भरले गेले. याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, अंदमान अशा विविध राज्यांतून, एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, स्वीडन अशा देशांतूनही अनेकींनी भाग घेतला.

फॉर्म भरणाऱ्या स्त्रिया वा मुलींचे मूळ गाव हे महाराष्ट्रात असले पाहिजे, असा भौगोलिक निर्बंध अभ्यासकांनी घातला होता. या संपूर्ण प्रक्रियेत कुठल्याही स्त्री किंवा मुलीला स्वत:चे नाव, पत्ता, ओळख सांगण्याची गरज नव्हती, त्यामुळे या स्त्रिया अधिक मोकळेपणाने फॉर्म भरू शकतील असा अंदाज होता. अनेक वयस्कर स्त्रियांनी हा फॉर्म भरण्याचे टाळले. घडून गेलेल्या नकोशा घटना आता उतरत्या वयात आठवणे आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता त्यांना पुन्हा अनुभवायची नव्हती. याउलट माझ्या अनुभवांचा फायदा किंवा त्यातून काही मार्गदर्शन पुढच्या पिढीला मिळाले तर हे उत्तमच असेल असे म्हणणाराही वर्ग होता. त्यांनी अत्यंत मोकळेपणाने हा फॉर्म भरला असल्याची खात्री आहे. सर्वेक्षणात २९ प्रश्न विचारले गेले. फॉर्म भरणाऱ्याचा भौगोलिक विभाग, आर्थिक स्तर, सामाजिक ओळख (विवाहित, अविवाहित, लिव्ह इन रिलेशनशिप, अन्य) यावर आधारित सुरूवातीचे प्रश्न होते. त्यानंतर अन्याय, अपमान, बॉडी शेमिंग, छेडखानी, नकोसा स्पर्श (बॅड टच), लैंगिक अत्याचार, बलात्कार यांवर आधारित प्रश्न होते. मुलींना अत्याचाराचा अनुभव कोणत्या वयात, कितीदा आला, अत्याचार करणाऱ्या पुरुषाचे वय, नाते, हेतू काय होते, अशा अनुभवांचा आयुष्यावर झालेला परिणाम इत्यादी प्रश्न विचारले गेले. सार्वजनिक शौचालय, पोलीस यंत्रणा यावरही प्रश्न विचारले गेले. महिला सुरक्षासंबंधित ३५४, ३७५, ३७६, ४९८ अ या कायद्यातील कलमांबद्दल स्त्रियांना किती माहिती आहे हे तपासण्यात आले.

या सर्वेक्षणात ‘अनरजिस्टर्ड क्राइम’ म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये ज्या गुन्ह्यांची नोंद नाही अशा गुन्हेगारीचे प्रमाण काय असावे याचा अंदाज सहभागी स्त्रियांकडून घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. जसे, ६५ टक्के स्त्रिया मान्य करतात, की त्यांनी कधी ना कधी लैंगिक अत्याचाराचा सामना केला आहे; पण नंतर विचारलेल्या प्रश्नांमध्ये हे प्रमाण वाढून ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. या सर्वेक्षणात लैंगिक अत्याचारासंबंधात विचारलेल्या विविध प्रश्नांमध्ये आकडेवारीत येणारी तफावत हेच सांगते, की स्त्रिया स्वत:वर झालेले लैंगिक अत्याचार आजही मोकळेपणाने कबूल करत नाहीत, किंवा मोकळेपणाने बोलायला वेळ घेतात. बहुसंख्य मुली व स्त्रिया आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात कधी ना कधी विनयभंगापासून बलात्कारापर्यंत कोणत्या ना कोणत्या लैंगिक अत्याचाराचा सामना करतातच.

तुम्हाला सगळय़ात जास्त असुरक्षित कोठे वाटते, या प्रश्नाचे उत्तर देताना, सर्वाधिक स्त्रियांनी ‘निर्मनुष्य रस्त्याने एकटे जाताना’
असे उत्तर दिले. तसेच सगळय़ा गर्दीच्या ठिकाणी, जसे की, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, जत्रा, थिएटर, बाजारात स्त्रियांना (सर्वेक्षणातील ३५.५ टक्के स्त्रियांना) असुरक्षित वाटते. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी (५.३ टक्के), कॉलेजमध्ये (३.३ टक्के) असुरक्षित वाटते, असे सांगितले. २५ वर्षांपर्यंतच्या ८६.८ टक्के मुलींना असुरक्षित वाटते, तर २५ वर्षांच्या पुढील दुसऱ्या वयोगटातील ७४.८ टक्के स्त्रियांना वयाच्या त्या त्या वळणावरही असुरक्षित वाटते. मोठय़ा वयोगटातील स्त्रियांपेक्षा लहान वयोगटातील मुलींमध्ये असुरक्षित वाटण्याचे प्रमाण जास्त आहे. एक समाज म्हणून आपण स्त्रियांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही हे त्यांनी इथे नमूद केले. तसेच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थी वयोगटातील २.३ टक्के मुलींनी बलात्कार झाल्याचे नमूद केले आहे. मोठय़ा वयोगटातील स्त्रियांपेक्षा (०.३ टक्के) हे प्रमाण दुप्पट आहे.

इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर करून अश्लील मेसेज पाठवणे, लैंगिक चित्रफीत, फोटो पाठवणे याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पूर्वी ज्या प्रमाणात पाठलाग होणे, अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे, नाक्यावर उभे राहून टिंगलटवाळी करणे आदी बाबी घडत, त्या नव्या पिढीत किंचित घटल्या असल्या तरी सोशल मीडिया व मोबाइलच्या माध्यमांतून अत्याचार वाढतच आहेत अशी आकडेवारी (१८ ते २५ वयोगटात १७.५ टक्के, २५ वर्षांपुढील वयोगटात ७.२ टक्के) प्रश्नांतून पुढे आली आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील ४०.३ टक्के मुलींनी अल्पवयीन असताना नकोशा स्पर्शाचा (बॅड टच) अनुभव घेतला आहे. पॉक्सो कायदा, जेजे अॅक्टच्या माध्यमातून २१ वे शतक भारतात बालस्नेही व्हावे असा प्रयत्न होत असताना स्त्रियांनी बालवयात अनुभवलेले अत्याचाराचे प्रमाण चिंता वाटण्याजोगे आहे.

‘आजही असे अत्याचार मुलींवर होताना तुम्ही पाहता का?’ असा प्रश्न २५ वर्षांपुढील स्त्रियांना विचारला असता ७९.९ टक्के स्त्रियांनी होय असे उत्तर दिले. त्यावर तुम्ही काय करता या प्रश्नावर मुलींना धीर देणे (६५.९ टक्के), पुरुषाला धाक देणे (३८.७ टक्के), मुलींच्या पालकांना कळवणे (२८.९ टक्के), पोलिसांना कळवणे (२७.५ टक्के) अशी उत्तरे मिळाली, तर ७.९ टक्के स्त्रियांनी ‘काहीच करत नाही’ असे नमूद केले. स्त्रिया अन्याया-विरोधात कृतिशील पावले कमी उचलतात हे या प्रश्नाद्वारे आढळून आले.

स्त्री म्हणून आयुष्य बंधनकारक वाटते का, या प्रश्नावर ५९ टक्के स्त्रियांनी तर ४७.७ टक्के मुलींनी असे कधी वाटत नसल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोन्ही वयोगटांच्या उत्तराच्या टक्केवारीची तुलना केल्यास नव्या पिढीतील तरुणींना स्त्री म्हणून आयुष्य बंधनकारक वाटण्याचे प्रमाण ११.३ टक्क्यांनी वाढले आहे, असे म्हणावे लागेल. तसेच ८३.२ टक्के मुलींनी व ९६.७ टक्के स्त्रियांनी, त्या स्त्री असल्यामुळे दुर्बल व असुरक्षित आहेत, असे समाज, कुटुंब, शिक्षणपद्धती यांपैकी कोणी ना कोणी सांगत असल्याचे अथवा त्यांची मानसिकता तशी झाल्याचे सांगितले. समाज म्हणून आपण बदलायला हवे आणि लैंगिक समानता अधिक रुजवायला हवी असे ही आकडेवारी सांगते.

कायद्याबद्दलचे स्त्रियांचे अज्ञान या सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. उदाहरणार्थ, ‘४९८ अ’ या कलमाचा दुरुपयोग होतो अशी समाजात नेहमीच ओरड होते. ‘४९८ अ’विरुद्ध आवाज उठवणाऱ्या ‘पुरुष अधिकार संघा’सारख्या पुरुषांसाठी काम करणाऱ्या संघटना आपल्या देशात आहेत. पण आमच्या सर्वेक्षणातून साधारण ७५ टक्के मुलींना व ६५ टक्के स्त्रियांना हा कायदा माहितीच नाही, असे आढळून आले आहे. या कलमाचा दुरुपयोग करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण अत्यल्प असावे असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघू शकतो. यावर अजून संशोधन केल्यास कलमांचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होतो या आरोपाचे खंडन होण्याची शक्यता आहे. आपल्या कायद्यातील ‘३५४’ हे कलम सरासरी ७८ टक्के स्त्रियांना माहिती नाही, बलात्काराचे ३७५ व ३७६ हे कलम ७० ते ७५ टक्के स्त्रियांना माहिती नाही, पॉक्सो या अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या कायद्याबद्दल ६५ ते ७५ टक्के स्त्रियांना माहिती नाही ही गंभीर बाब या सर्वेक्षणातून पुढे आली. कायदे बनतात, पण ज्यांना त्या कायद्याची गरज असते त्यांना ते माहिती नसतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि यावर सर्व स्तरांवर काम व्हायला हवे, हेही प्रकर्षांने समोर आले.

स्वसंरक्षणासाठी उपयोगात येणाऱ्या ‘पेपर स्प्रे’च्या वापराची माहिती ९४ टक्के मुली व ९७.७ टक्के स्त्रियांना नाही, ही या सर्वेक्षणात आढळलेली आणखी एक महत्त्वपूर्ण बाब आहे. अगदी छोटासाही ‘पेपर स्प्रे’ जवळ बाळगला तर धोक्याच्या ठिकाणाहून पळून जाण्याची संधी स्त्रियांना मिळू शकते. कारण त्याचा परिणाम वीस ते तीस मिनिटे राहतो. अन्यवेळी निदान तो बाळगल्याने धाडस, आत्मविश्वास निर्माण होतो. भीती कमी होते. मात्र त्याच्या वापराबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे.आपल्या संरक्षणासाठी मुलींजवळ तत्काळ वापरता येणारी शस्त्रे कोणती? त्या शस्त्रांचा वापर करून मुली स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतात ही मध्यवर्ती कल्पना ठेवून‘वी ४ चेंज’ संघटनेने वर्कशॉपची रचना केली होती. आपला आवाज हे सगळय़ात मोठे शस्त्र मुलींजवळ आहे. पण आवाज वापरायला लागणारी हिंमत त्यांच्यामध्ये असेलच असे नाही. त्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला ऑटो रिक्षामध्ये वा बसमध्ये एखादा पुरुष नकोसा स्पर्श करत असेल, तर ती तो सहन करते. ‘सांभाळून बसा / उभे राहा, तुमचा सारखा स्पर्श होतो आहे,’ असे तिला ठामपणे, स्पष्ट शब्दांत सांगता यायला हवे. त्यामुळे नकार देण्याचा आत्मविश्वास तिच्यात जागृत होईल. अनेकदा आजूबाजूचे लोक अशा स्त्रियांना साथ देत नाहीत, म्हणूनच अशा प्रतिकूल परिस्थितीत खंबीरतेने त्यांना आपले म्हणणे मांडता आले पाहिजे. अगदी घरातील एखादा परिचित आपल्याशी गैर वागत असेल तर चारचौघांत त्याची स्पष्ट वाच्यता करून किंवा ती व्यक्ती जवळ आली की जोरात किंचाळून त्या व्यक्तीला दूर करायला हवे. बहुतांशी अशा व्यक्ती भेकड असतात आणि भित्रे सावज गाठतात हे मुलींना, स्त्रियांना माहिती नसते. आपण आवाज चढवला तर परिस्थिती बदलू शकते.

बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. आपल्याकडे स्वसंरक्षणासाठी चढा आवाज, ठाम शब्दांतला नकार यासारखी अस्त्रे आहेत. ती वापरायची नसली तरी ती आहेत हे दाखवायची वेळ आता नक्कीच आली आहे आणि ती दाखवून आपण लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई नक्कीच जिंकू शकतो.

(लेखिका प्राध्यापक असून गडचिरोली आणि नागपूर येथे सामाजिक कार्य करतात. ‘वी ४ चेंज’ या संघटनेच्या त्या संस्थापक आहेत.)