दीपाली कात्रे dkkata.katre@gmail.com
‘कटकट करणारी आई’ (२१ ऑगस्ट) या डॉ. अंजली जोशी यांच्या लेखातून मुलांना ‘वळण’ लावण्याचा आईवर असलेला दबाव आणि आईच्या सततच्या मागे लागण्यास ‘कटकट’ म्हणण्यामागे मुलांचा असलेला दृष्टिकोन प्रकट झाला; पण ‘कटकट करणाऱ्या आई’ची उपाधी आपल्याला निष्कारण चिकटू नये, यासाठी अनेक आयादेखील विचारपूर्वक त्यांच्या स्तरावर प्रयत्न करताहेत. तरुण मुलाशी खुबीनं संवाद साधणाऱ्या अशाच एका आईची ही गोष्ट. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांत घालायचे ड्रॉप शोधून मुलाच्या डोळ्यांत घातले. मला येताना पाहूनच त्याचा चेहरा त्रासिक झाला.

‘‘झालं का सुरू तुझं?’’ त्याचा वैताग.

‘‘अरे, काय रागावतोस? किती उशिरा झोपतोस तू.. ‘ओटीटी’वर काय नवीन पाहिलंस रे? सांग ना,’’ असा संवाद करत डोळ्यांत औषध घातलं.

वय वर्ष तेवीस असणारा हा मुलगा त्याच्या वयाच्या इतरांसारखाच ‘नॉर्मल’ वागत होता. ऑफिसचंच काम असल्यामुळे स्क्रीनशिवाय पर्याय नाहीच; पण जेवतानासुद्धा स्क्रीन लागतोच डोळ्यांसमोर. मग ‘विद्यापीठ’ ‘सुरू’ होतं. तसं हे ‘आईचं विद्यापीठ’ सतत चालूच असतं, असं मुलगा म्हणतो. ‘आईची कटकट’ असा शब्द न वापरता, त्यानं हे नाव दिले आहे! पण आईही काही कमी नव्हती. ती त्याच्या षट्काराला बरोबर झेलत होती. परवा त्याला म्हणाली, ‘‘अरे, आईच्या विद्यापीठात आज केर काढणारी मावशी आलीच नाही. तू भांडी घास, मी केर काढते.’’ आता करावंच लागलं ना त्याला!

हे ‘विद्यापीठ’ सकाळी लवकरच सुरू होतं; पण त्यात काय घडामोडी होतात, हे प्रवेश घेतलेल्या मुलाला समजत नाही. कारण तसा तो उशिरा उठायचा. मात्र एकदा आईनं घरातली घंटा वाजवली आणि म्हटलं, ‘‘अरे, रस्ता बोलावतो आहे तुला! जातोस की नाही? रस्त्याला वाईट वाटतं त्याचं काय?’’ असे दहा-बारा दिवस गेले. ‘विद्यापीठ’ बोलतच होतं. शेवटी एक दिवस उठणं किती महत्त्वाचं आहे हे समजलं किं वा असंही झालेलं असू शके ल, की नकोच ते ‘विद्यापीठीय’ बोलणं सारखं कानावर पडायला. काहीही असेना, पण मग मुलानं मित्राला फोन केला आणि त्यांचा सकाळचा ‘वॉक’ सुरू झाला.

आल्यावर लगेच आंघोळ करायची म्हटलं, की त्याच्या पोटात गोळा येणं साहजिक आहे; पण ‘‘मी मशीन लावतीय रे, काही कपडे असतील तर दे, नाही तर नंतर तू धुशील का रे?’’

अशी घोषणा या ‘विद्यापीठा’नं करताच, ‘‘थांब, मी आंघोळ करतो’’ म्हणत स्वारी न्हाणीघरात.

विद्यापीठात नाश्ता तयार होतो. त्या नाश्त्याच्या पदार्थात कधी गाजर घातलेलं दिसलं, की मुलाचे डोळे आणि तोंड बोलायला लागतं! नाक आपोआप मुरडलं जातं; पण ‘आईचं विद्यापीठ’ कधीच रागावून असं म्हणत नाही, की ‘‘खायचं तर खा. नकोच असेल काही पौष्टिक तुला, तर बस तसाच! गाजर, लिंबू यांचा वापर तर कशातही होणारच.’’

त्याऐवजी ती म्हणते, ‘‘अरे, काय झालं? विद्यापीठात शेती केली रे! चुकून गाजराचं पीक जास्त झालं. आता फेकून का द्यायची ती सगळी? तरी थोडीच वापरली मी. आजच्या दिवस खा. हे बघ, लिंबाच्या रसात साखर घालून ते पाणी शिंपडून देते पोह्य़ांवर. खास ‘इंदुरी टच गाजर पोहे’ होतील!’’ गुपचूप मुलाचं गाजर पोह्य़ांवर शेव घालून खाणं सुरू होतं.

आईला मध्येच आठवण होते, बारावीच्या शिकवणीत एका चाचणीत मुलाला कमी गुण मिळाले म्हणून वर्गातून बोलावणं आलं होतं. आई सरांशी बोलून आली. घरी आल्यावर ‘विद्यापीठ’ मुलाशी बोलू लागलं, नकारात्मक नाही हं, गमतीत. ‘‘अरे, आम्ही काही कधी क्लास नव्हते लावले ना. आज तुझ्यामुळे मला क्लासचं दर्शन तरी घडलं. सर काय सांगत होते, त्याकडे लक्षच नव्हतं माझं. मला काही आता बारावीचा अभ्यास करायचा नाहीये! तू अभ्यास करत नाहीस, असं ते म्हणतात, मी नाही; पण माझा अभ्यास व्यवस्थित करतेय मी. तुला दररोज तीन डबे देते, शनिवार, रविवार वेगळं रुटीन.. काही तक्रार आहे का तुझी? मग उद्यापासून तूही तुझा अभ्यास जरा वाढवलास तर?’’ विशेष म्हणजे हा विषय तिथेच संपला होता. सारखं ओरडून ओरडून आईनं मुलाचं डोकं खाल्लं नाही! आई कटकट करते, हा भाव तिथे नाहीच.

मुलांच्या भाषेत त्यांना त्यांची भूमिका समजावून देणं, त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधून जाणीव करून देणं, ही वृत्ती अचानक तयार होत नाही. मनाची मशागत होणं आवश्यक आहे. घरातलं वातावरण निकोप असेल, तर आईची ‘कटकट’ नसते. तर ती आई मुलांच्या मित्रांचीसुद्धा आईच होते. हसरं, खेळकर वातावरण आणि समजून घेणारा संवाद असा माहोल असेल, तर इतरांशी ‘शेअर’ करून तो वाढवता येईल. त्यामुळे उगीच या गोष्टींचा बाऊ करू नये. एक दिवस असंही म्हणता येईल, की कधी काळी मुलांच्या मते आई डोळे वटारून शिस्त लावत होती. मग आताची आई कटकट करते का? नाही हो, ती संवाद साधते.

 

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother son relationship story of a mother who communicate well with a young boy zws
First published on: 11-09-2021 at 01:08 IST