वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली मृणाल कुलकर्णी आता आपल्या करिअरची वेगळी इनिंग सुरू करतेय ती आहे दिग्दर्शनाची. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे मृणाल दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत असून हा चित्रपट निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्याद्वारे मृणालच्या कलादृष्टीचा नवा आयाम आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘र माबाई’, ‘अवंतिका’ आणि ‘जिजाऊ’सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या मराठी मालिकेतल्या भूमिका, तर िहदीमध्ये मीराबाई, द्रौपदीपासून ‘हसरतें’मधली खलनायकी छटा असणारी भूमिका असेल किंवा ‘सोनपरी’ असेल.. मृणालइतक्या वैविध्यपूर्ण भूमिका अभावानेच कोणा मराठी अभिनेत्रीने केल्या असतील. मालिका असोत वा चित्रपट यातल्या भूमिकांबरोबरच एका पर्यटनविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सहारा वाहिनीवर गाण्याच्या स्पध्रेच्या सेलिब्रिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग.. यांसारखे विविध अनुभव कॅमेऱ्यासमोर घेतल्यावर मृणाल आता कॅमेऱ्यामागच्या कामाचा अनुभव घेते आहे. निर्मितीचा अनुभव घेतल्यावर आता तिनं दिग्दíशत केलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. दिग्दर्शक होणं हा तिच्यासाठी फक्त नवा किंवा वेगळा अनुभव नव्हता, तर ती एक प्रक्रिया होती ज्यायोगे ती नव्याने घडली! या प्रक्रियेविषयी, आपल्या नव्यानं घडण्याविषयी मृणाल भरभरून बोलते..
अभिनेत्रीने निर्माती होण्याची बरीच उदाहरणं बघायला मिळतात, पण दिग्दíशका झालेल्या अभिनेत्री अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील. मृणालला का दिग्दर्शन करावंसं वाटलं?
‘‘खरं तर दिग्दर्शन करावं असा विचार केलाच नव्हता. आत्तापर्यंत इतक्या लोकांचं म्हणणं मी भूमिकेच्या रूपात पडद्यावर मांडल्यावर आता मला काही तरी सांगावंसं वाटू लागलं होतं. ते काय असेल हे मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करू लागले. मी आत्तापर्यंत विविध नियतकालिकांसाठी लेखन केलं आहे, त्यातून मी लिहू शकते हे मला माहिती होतं. म्हणून अनेक दिवस माझ्या डोक्यात एक विषय घोळत होता तो कागदावर उरवायला लागले.’’
दिग्दर्शकाआधी तू पटकथा लेखक झालीस!
‘‘असंही म्हणता येईल की, मी कथा लिहिली म्हणून मला त्याचं दिग्दर्शन करावंसं वाटलं! हल्ली विवाह संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू लागला आहे. घटस्फोट, सिंगल पेरेंटिंग किंवा अगदी लग्नाशिवाय एकत्र राहाणं, ही उदाहरणं आपल्याभोवती सर्रास दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला अगदी थाटामाटात, प्रचंड खर्च करून लग्नं केली जातात.  माझ्या बाबांनी सांगितलेलं एक संस्कृत सुभाषित, ‘कन्या वरयते रूपम्, माता वित्तं, पिता श्रृतिम्, बांधवा कुलमिच्छन्ति, मिष्टान्न मितरे जना:!’ म्हणजे प्रत्येक जण त्या लग्नाकडे आपापल्या दृष्टिकोनातून बघत असतो. त्यात प्रत्यक्ष नवरा-नवरीला तरी किती इंटरेस्ट असतो ही शंकाच आहे. इतके सगळे विचार एकत्र माझ्या डोक्यात घोळत होते आणि त्याला काही तरी कथेचं रूप द्यावं असं वाटू लागलं.’’
कथालेखन हाही तिच्यासाठी नवीनच अनुभव होता.
‘‘माझ्या डोक्यातल्या अनुभवांना, मला सुचले त्याप्रमाणे कथेचा आकार दिला. मग माझी प्रियदर्शनबरोबर काम करणारी मत्रीण मनीषा कोरडे हिला मी कथा वाचून दाखवली. तेव्हा तिचं म्हणणं, तो चित्रपटाचा पहिला अर्धा भाग तयार झाला होता; पण उर्वरित भाग कसा लिहायचा आणि त्याचा शेवट कसा करायचा हा प्रश्न होताच.’’
एखादी कथा पूर्ण करणं आणि त्याला चित्रपटाचं स्वरूप देणं इथपासूनच मृणालची नवीन प्रक्रियेचा अनुभव घेण्याची सुरुवात झाली.
‘‘मनात आलं आणि कथा लिहिली असं होतं नाही हे कथा लिहिताना मला समजत गेलं. कथा लिहिताना मी खूप अभ्यास केलाय. लग्न न झालेल्यांशी, उशिरा लग्नाचा निर्णय घेतलेल्यांशी, सिंगल पेरेंटिंगचा अनुभव घेणारे, विवाहाच्या वेगवेगळ्या स्टेजेस्मधून जाणाऱ्या वेगवेगळ्या वयोगटांच्या जोडप्यांशी.. अनेकांशी बोलले. त्यातून मला नवरा-बायको एकमेकांबरोबर का राहतात आणि का राहू शकत नाहीत याची अनेक कारणं मिळाली. अशीही जोडपी आहेत, जी फक्त मुलांसाठी म्हणून एकत्र राहातात. मात्र आता उगाचच तडजोड न करता आपापली वेगळी वाट शोधणारी जोडपी अधिक दिसतात. यात नात्यामध्ये जी किमान तडजोड करावी लागते तीदेखील करायला तयार नसणारी दुसऱ्या टोकाची जोडपीही मी बघितली. एकूणच लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आहे हेही माझ्या लक्षात आलं. मग समुपदेशकांना भेटले, घटस्फोटाची एकूण प्रक्रिया काय असते, त्यासाठी कोणकोणत्या बाबी ग्राह्य़ धरल्या जाऊ शकतात, या सगळ्याचा मी अभ्यास केला आणि या सगळ्या निष्कर्षांतून कथा घडत गेली.’’
कथा पूर्ण झाल्यानंतरची पायरी म्हणजे त्याला प्रत्यक्ष सिनेमाच्या रूपात उतरवणं.. बहुधा कथा लिहितानाच तिच्या मनात दिग्दर्शनाचे विचार सुरू झाले असावेत.
‘‘खरं तर आधी मी असा काहीच विचार केला नव्हता. आपले विचार कागदावर उतरवण्यासाठी कथा लिहिली, मग त्या कथेला चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शनाचा विचार केला. जेव्हा ही कथा चित्रपटाच्या रूपात आणण्याचं नक्की केलं तेव्हा सध्या जे चित्रपट येत आहेत त्यापेक्षा आपण काही तरी वेगळं देतो आहोत का? याचा विचार केला. हा विचार करताना माझ्या लक्षात आलं की, आपल्याकडे, मराठीत ‘मॅच्युअर्ड लव्ह-स्टोरी’ हा प्रकार फारसा हाताळला गेला नाहीये, अगदी िहदीमध्येसुद्धा. मग या कथेला तसं स्वरूप देण्याचं ठरवलं आणि मग परत नव्याने अभ्यास सुरू केला.’’         
आता तिचा अभ्यास होता तो लव्ह-स्टोरी पडद्यावर मांडण्याचा..
‘‘लव्ह-स्टोरी करायची हे तर ठरवलं, पण त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची याचा विचार करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी माझ्या अनेक मित्र-मत्रिणींना त्यांच्या आवडत्या इंग्रजीतील मॅच्युअर्ड लव्ह-स्टोरी असणाऱ्या चित्रपटांची नावं विचारली. त्यातले बरेचसे मी आधीच बघितले होते. तरीही त्यातले काही परत बघितले, काही न बघितलेले होते ते बघितले. यातून चित्रपटाची मांडणी कशी असावी याचा आराखडा तयार करणं माझ्यासाठी सोपं गेलं. याहीपेक्षा महत्त्वाचं होतं ते योग्य माणसं निवडणं! तो माझ्या कामाचा सगळ्यात मोठा टप्पा होता.’’
मृणाल म्हणते, सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय सूरकर तिला एकदा म्हणाले होते, ‘दिग्दर्शकाने जर योग्य कामासाठी मग योग्य माणसं निवडली.. मग ती पडद्यामागची असतील किंवा पडद्यावरची! तर त्याचं निम्मं काम सोपं होतं.’
‘‘मीही तोच प्रयत्न केला आणि माझ्या नशिबाने मला खूप चांगली माणसं मिळाली. दोन नायकांसाठी मला सचिन खेडेकर आणि सुनील बर्वेच हवे होते. त्यांनी कथा ऐकली आणि त्यांना इतकी आवडली की, दुसऱ्यांदा विचार न करता ते दोघंही हो म्हणाले. एका नायिकेसाठी आधुनिक राहणारी, बोलणारी, अमेरिकेतली आहे वाटू शकेल अशी अभिनेत्री हवी होती म्हणून पल्लवी जोशीचा विचार केला. तिनेही होकार दिला. दुसरी नायिका थोडीशी डिप्रेस्ड, लग्नाचे तीन तेरा वाजलेली अशी आहे. तिचा विचार करताना सगळ्यांनीच सुचवलं की, ही भूमिका तूच कर म्हणून मग ती म्हणजे अनुश्रीची भूमिका मीच करायचं ठरवलं. संगीत दिलंय तोही माझा मित्र मिलिंद इंगळे आणि त्याचा मुलगा सुरेलने. त्यामुळेही मला सगळं खूप सोपं गेलं. हे सगळे जरी माझे मित्र-मत्रिणी असले, त्यांचा इतक्या वर्षांचा काम करण्याचा अनुभव असला तरी त्यांच्याकडून मी मला हवं तसं काम करून घेतलं आणि मुख्य म्हणजे त्यांनीही तसं केलं.’’
चित्रपटातील इतर भूमिकांमध्येही सुहास जोशी, स्मिता तळवळकर, डॉ. मोहन आगाशे यांसारखी मंडळी आहेत, तर या दोन जोडप्यांची चार मुलं आहेत! या चार मुलांकडून काम करून घेण्यात मात्र तिच्यातल्या दिग्दर्शकाचा कस लागला…
‘‘एक तर ही  मुलं एकदम नवीन होती, कधीही कॅमेरा फेस न केलेली. त्यामुळे त्यांना कॅमेऱ्याची भाषा समजावून द्यावी लागत होती. शिवाय ही अडनिडय़ा वयाची मुलं, त्यांना काय दृश्य आहे किंवा काय समस्या आहे हे सांगून तसं त्यांच्याकडून काम करवून घ्यावं लागत होतं, पण छान वाटलं या मुलांबरोबर काम करताना.’’
अभिनय आणि दिग्दर्शन एकाच वेळी करणं काही सोपं नाही. त्याविषयी मृणालशी पुढे बोलायचंच होतं, पण त्याआधी तिच्याबरोबर पडद्यामागे काम करणाऱ्यांविषयी.. तिचा दिग्दर्शनाचा पहिला अनुभव, अशा वेळी आत्ता ही वस्तू संपली किंवा आत्ता अमुक एक हवंच आहे अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होऊ शकते! त्याला तोंड देण्यासाठी टेक्निकल टीमही तितकीच चांगली असणं गरजेचं आहे.
‘‘अगदी खरं आहे! दिग्दर्शकाला किती कामं असतात याचा साक्षात्कार मला कामाच्या पहिल्या दिवसापासून झाला होता, पण माझं नशीब तिथेही चांगलं होतं, की माझी टेक्निकल टीमही खूप चांगली होती. नाही तर मी काय केलं असतं कोणास ठाऊक!’’       
आपल्याच दिग्दर्शनात आपण काम करणं हा अनुभव कसा होता?
‘‘मस्त! आपण शॉट द्यायला उभे असताना अचानक आपणच कट.. कट म्हणायचं आणि आपल्याला पाहिजे तसा शॉट परत घ्यायचा किंवा दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्यामागे उभं असताना पुढे शॉट द्यायचा आहे म्हणून केस सेटिंगची वगरे तयारी करून कॅमेऱ्यामागे उभं राहायचं. आपल्या शॉटची वेळ झाली की पट्कन तयार व्हायचं आणि कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं.’’
याचा त्रास नाही होत?
‘‘नाही झाला मला. कदाचित त्यात क्रिएटिव्हिटीचं समाधान होतं म्हणून असेल! एक मात्र आहे. आपण जेव्हा फक्त अभिनयाचं काम करत असतो तेव्हा त्या भूमिकेचा विचार केला की काम संपलं; पण दिग्दर्शक हा चोवीस तास दिग्दर्शकच असतो. शूटिंग संपल्यावरही पोस्ट प्रॉडक्शनपासून रीलीजपर्यंत अनेक गोष्टी असतात. दिग्दर्शकाच्या डोक्यात कायम चित्रपटाचा विचार असतो तो या शंभर प्रकारच्या कामांमुळेच! पण निर्मितीच्या कामाचा अनुभव जसा माझ्यासाठी त्रासदायी होता ना तसा हा अजिबात नव्हता. चित्रपटाची दोन शेडय़ूल मी घरदारदेखील विसरले होते इतकी चित्रपटमय झाले होते.’’        
या दरम्यान असं कधी वाटलं की, हे काम आपलं नाही, सोडून द्यावं?
‘‘अगदी सोडून द्यावं वगरे नाही वाटलं, पण काही वेळा फ्रस्ट्रेशन आलं. विशेषत: जेव्हा सिनेमा आíथक अडचणींमुळे अडकला होता तेव्हा, पण याही अडचणी मला त्यातून मार्ग कसा काढायचा हे शिकविणाऱ्या होत्या.’’
घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती यावर?
‘‘त्यांना शंभर टक्के क्रेडिट द्यायला हवं. या महिनाभराच्या काळात तर मी कित्येकदा घरातच नव्हते, घरात असून नसल्यासारखी होते. या सगळ्या काळात त्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय.’’
दिग्दर्शनामुळे करियरमधलं नवीन पर्व तर सुरू झालंय. आता पुढे काय?
‘‘ही तर सुरुवात आहे. दिग्दर्शनाचा प्रयोग करण्यासाठी अजून खूप विषय आहेत. माझी प्रवृत्ती खरं तर साहित्यावरची कलाकृती करण्याची. अप्पांच्या (गो. नी. दांडेकर तिचे आजोबा) ११ कादंबऱ्यांचं वाचन आम्ही करत असतो. माझ्या करिअरची सुरवात ‘स्वामी’सारख्या दर्जेदार कादंबरीतील अविस्मरणीय भूमिकेपासून झाली आहे. मी जेव्हा निर्मिती केली होती तीदेखील गदिमांच्या कादंबरीवर.. असं असताना मी दिग्दíशत केलेला चित्रपटही साहित्यावर आधारित असायला हवा होता, पण तसं नाही झालं. पुढचा चित्रपट कदाचित एखाद्या गाजलेल्या साहित्यकृतीवरचा असेल.’’