पुरे करा आता सल्ले बुवा! ऐकून-वाचून वीट आलाय एकेकाचा. काय खा, कधी खा, कसं खा, कशाच्या आधी खा, कशाच्या नंतर खा, कशाबरोबर खा, जीव खा, डोकं खा.. टपलेले असतात सगळे सल्ला द्यायला. दिवस सुरू झाला की सल्लाबाजी सुरूच. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, रेडिओ, टीव्ही.. एक जण एक मिनिट सोडत नाही..  जागतिक हास्य दिनानिमित्त सल्ल्यांची एैसी तैसी !
सकाळी-सकाळी आपल्या आवडीचा गोड-दाट बासुंदीवजा चहाचा मोठ्ठा कप ती तोंडाला लावणार, तोच तिचा नवरा म्हणाला, ‘‘हर्बल टीच घेतेस ना गं? उगाच रोजच्या चहानं येणारी अ‍ॅसिडिटी नको. साधी टी अ‍ॅसिडी असते यावरून तर पुढे अ‍ॅसिडिटी हा शब्द आलाय, असं नव्हतं का लिहिलं कालच्या पेपरातल्या त्या आहाराच्या सदरामध्ये?’’
 ‘‘जाऊ दे रे. रोजचं ते खरं. आपल्याला साधी टीच बरी.’’ तिनं टीचभरही न हलता उत्तर दिलं; पण नवऱ्यामध्ये कालपासून चहातलं अ‍ॅसिड भिनलेलं असावं. हर्बल टीने कसं पचन सुधारतं, कसा वजनावर काबू राहतो, कसा रक्तदाब कमी होतो, कसे डोळे तेजस्वी होतात, कसा गुडघी रोग बरा होतो, कसा जलोदर व्हायचा राहतो, अशा प्रकारची बरीच वाचीव भलावण तो करत बसला. तिनं जरा वेळ तो मारा सहन केला, मग मात्र हर्बल टी न पिताच तिचे डोळे तेजस्वी झाले आणि त्यातली आग ओकत तिनं त्याला गप्प केलं. ‘‘हे बघ, शक्य आहे की तुझा तो हर्बल की ग्रीन की मेडि-टी प्यायल्यावर मी अमर होईन. तरीही सध्या मी अमर होणं होल्डवर ठेवते आणि हाच चहा घेते. ओके? बाकी आहार आणि आरोग्य या विषयावरचे सल्ले आता पुरे करा बुवा. ऐकून-वाचून वीट आलाय एकेकाचा. काय खा, कधी खा, कसं खा, कशाच्या आधी खा, कशाच्या नंतर खा, कशाबरोबर खा, जीव खा, डोकं खा.. टपलेले असतात सगळे सल्ला द्यायला. दिवस सुरू झाला की, सल्लाबाजी सुरूच. दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं, रेडिओ, टीव्ही.. एक जण एक मिनिट सोडत नाही. म्हणजे आहे काय?’’
‘‘शूऽऽ शूऽऽ हल्ली एकदम डोक्यात राख जात्येय हं तुझ्या. शांत कसे राहावे, असं एक पुस्तक निघालंय हल्लीच. देऊ का आणून तुला?’’ नवरा बिचकत बिचकत म्हणाला. खात्रीने म्हणण्याची त्याची टाप नव्हती, कारण तिचा एकूण आविर्भाव त्याला कायमचं शांत करायला निघाल्यासारखा होता. म्हणून मग दरवाजासमोर पडलेली ताज्या वृत्तपत्रांची भेंडोळी तिच्यासमोर टाकून तो सटकला.
तिला विनोदी साहित्य वाचण्याची पहिल्यापासून आवड होती. म्हणून ती नेहमी वृत्तपत्रामधलं दैनिक भविष्य वाचायची. पहिल्यांदा उघडलेल्या वृत्तपत्रात तिच्या राशीसमोर लिहिलं होतं, महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. सकाळ अशुभ. तिलं बरं वाटलं. आता दुपापर्यंत टिवल्याबावल्या करायला हरकत नाही. त्या मूडमध्ये तिनं दुसरं वृत्तपत्र उगाच चाळायला  घेतलं, तर त्यात तिच्या राशीला बजावलं होतं, फक्त सकाळीच शुभसंकेत. त्या काळात शुभ फलप्राप्ती करून घेणे. दुपार अनिष्ट. दोन सल्ल्यांच्या दोन तऱ्हा.
आता आली का पंचाईत? साधारणपणे जेव्हाही मान मोडून, पदर बांधून काही काम करावं लागेल, तेव्हा ती वेळ अनिष्ट वाटायची तिला; पण आता सकाळही अनिष्ट आणि दुपारही अनिष्ट, तेव्हा कधीच, काहीच फारशा गांभीर्यानं न करणं बेस्ट असा समज तिने करून घेतला आणि नेहमी अशाच समजुतीत जगणाऱ्या कोणत्या एखाद्या मैत्रिणीला धरावं या विचाराने स्वत:चं आवरायला घेतलं.
ती केस विंचरायला टेबलाजवळ गेली तर टेबलावर दोन तेलाच्या बाटल्या होत्या. एक तेल केस वाढविण्याचं, दुसरं केस कापण्याचं. तसे गेल्या कित्येक वर्षांमध्ये तिचे केस वाढले नव्हते आणि तिनं केस कापलेही नव्हते; पण तिची महाविद्यालयीन कन्या केस या विषयातली तज्ज्ञ होती. सारखी त्याबाबतची माहिती गोळा करे आणि असंख्य तेलं गोळा करी. मग आईवर त्यांचा माहितीसह मारा ठरलेलाच. जे इंच इंच लढवून वाढवायचे ते कापायचे कशाला आणि जे तासन्तास खर्चून आणि शेकडो रुपये खर्चून कापलेत ते वाढवायचे कशाला हे तिला समजत नसे; पण केस वाढले नाहीत तरी ज्ञान-खर्च-पसारा-व्याप वाढला पाहिजे हे तिनं स्वीकारलं होतं. त्यानुसार तिनं अध्र्या केसांना केशवर्धक तेल लावलं, अध्र्या केसांना कपात तेल लावलं आणि उरलेल्या अध्र्याना काहीच न लावून त्यांची चांगलीच फजिती केली.
आंघोळीला गेली तर आपल्या फळीवर पाच-सात साबण, लोशन, बॉडी मिल्क वगैरे रचून ठेवलेले. घरी येणाऱ्या एका वृत्तपत्राची तर आठवडय़ातून एकदा स्किन सप्लीमेंट निघायची- कातडी पुरवणी! अर्थातच प्रायोजित. सोबत तज्ज्ञांचे अमूल्य सल्ले. कातडी नितळ- गोरी असणं हा जसा काही जगातला अंतिम प्रश्न. एक कातडी गोरी नितळ असू द्या, मग तुम्ही अणुयुद्धसुद्धा टाळू शकाल! खरं म्हणजे संसारी बाईला गोऱ्या कातडीपेक्षा गेंडय़ाच्या कातडीची जास्त गरज असते. कोणीही- केव्हाही- काहीही म्हटलं तरी ते आपल्या अंगाला लावून न घेण्याचं कसब हवं. या दृष्टीने (बाई) माणसाच्या साध्या कातडीचं लवकर आणि खात्रीने गेंडय़ाच्या कातडीत रूपांतर करणारी क्रीम- साबण- लोशन्स बनवायला हवीत, विकायला हवीत, पण तूर्तास ती सोय नसल्याने तिनं कोरडय़ा त्वचेसाठीचं बॉडीबटर की काय ते निम्म्या अंगाला फासलं. तेलकट त्वचेसाठीचा साबण निम्म्या अंगावर घासला आणि उरलेल्या निम्म्या अंगाला साबणाबाबत टुकटुक केलं.
सुदैवाने सगळे प्रयोग करण्याएवढं अंग विपुल लाभलेलं होतं.
आंघोळीनंतर तयार होताना बाजूबाजूने ‘उगाच आपला असावा’ म्हणून तिनं खोलीतला टीव्ही सुरू केला, तर एका वाहिनीवर उन्हाळ्यामध्ये कसे, कोणते कपडे घातल्याने कूल वाटेल याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुरू होतं; पण तोवर तिचे कपडे चढवून झाले असल्याने तिने चॅनेल बदलला. दुसऱ्या चॅनेलवर आर्थिक गुंतवणुकीबद्दल फोन-इन कार्यक्रम होता, पण गुंतवायला पैसेच नसल्याने तिने पुढचं बटन दाबलं. तो मुख्यत्वे पर्यटनाला वाहिलेला चॅनेल होता. आज ते लोक आफ्रिकन सफारीत होते. अजून दिवसाला आकार आला नाही तोवर थेट आफ्रिकन सफारीला कसं जा आणि तिथल्या जंगली प्राण्यांना काय खायला घाला, याचे सल्ले कसले देताय? ती वैतागली. इथे अजून घरच्या माणसांना दिवसभरात काय काय खायला ऊर्फ गिळायला घालावं हे ठरत नव्हतं.
अरे, हे काय झालंय आपलं? निम्मं आयुष्य वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे घालवलं, आताचं निम्मं फुकटच्या किंवा विकतच्या सल्लागारांना तोंड देण्यात जाणार. मग उरलेल्या निम्म्या आयुष्यात आपण काय करणार आहोत तरी काय? झटपट श्रीमंत कसं व्हावं? नखांना आकार कसा द्यावा? घरातली रोपं कशी जपावीत? कपाटातल्या साडय़ांची निगा कशी राखावी? पाण्यामुळे होणारे आजार कसे टाळावेत? प्रेशर कूकरचं बूड स्वच्छ कसं ठेवावं? आंब्याच्या रसाचं कॅनिंग कसं करावं? चांदीची भांडी चकचकीत कशी राखावीत? लोळून पुस्तक कसं वाचावं किंवा खरं तर वाचू नये?  मुलं कशी वाढवावीत? म्हाताऱ्यांना कसं वाचवावं? त्यांच्यापासून आपण कसं वाचावं? पाय पुसणं कसं झटकावं? बँकेचे व्यवहार कसे करावेत? किती विषयावर किती लोकांनी आपल्याला किती  शिकवावं, सुचवावं याला काही सीमा.? हे सल्ले नव्हते तेव्हा काय माणसं जगत नव्हती? आणि हे आहेत म्हणून काय सगळे आदर्श झाल्येत? तिनं या चक्रातून सुटण्यासाठी आपल्या एका फुल्ल टाइमपास मैत्रिणीला फोन लावला. बहुतेकांची मुलं मोठी झाल्यापासून तिच्या बऱ्याच मैत्रिणी या गटात आलेल्या होत्या. शिवाय १५-२० वर्षांपूर्वी यांची मुलं लहान असताना मुलं कशी वाढवावीत यावर इतकं मार्गदर्शन नसल्याने ती बरीही वाढली होती; पण नेहमी निवांत असणारी मैत्रीण आज नेमकी घाईत होती. गडबडीत म्हणाली,
‘‘बोल गं पटकन. निघतेच आहे मी.’’
‘‘आज सकाळी सकाळी?’’
‘‘तेवढंच इन्टरेस्टिंग वाटलं म्हणून तर जात्येय. दिवसाचं नियोजन कसं करावं, यावर एक दिवसाची कार्यशाळा घेताहेत ते अमुक वृत्तपत्र समूहवाले. तिकडे मी नाव नोंदवलंय माझं!’’
‘‘परमेश्वरा.. ही कुठली अवदसा आठवली तुला? आधीच इथे सल्ल्यांचा हल्ला काय कमी आह़े  हल्ला-बोलच तो!’’
‘‘असू दे की, मग आपण मस्त जायचं.. ५० रुपये फीवर ५०० रुपयांच्या फ्री गिफ्ट्स मिळतात. त्या घ्यायच्या. फुकटचा चहा-नाश्ता-जेवण जे काही मिळणार असेल ते घ्यायचं, घरी यायचं. पेपरामधलं येतं ते तर फुकटच मिळतं वाचायला.’’
‘‘ही सल्लेबाजी अंगावर येत नाही तुझ्या?.. कौन्सिलिंग म्हण हवं तर.. मोठ्ठा शब्द हवा तर..’’
‘‘तेच ‘सेलिंग’ असणार म्हणून देत असणार. समजा आपण ते घेतलं म्हणून लगेच मनावर घेतलंच पाहिजे असं थोडंच आहे?’’
‘‘असं कसं? उगाच नाही ती टोचणी तर लागतेच ना एकेकदा? अरे, आमचं आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या ना थोडं तरी. असं कोकलावंसं तर वाटतं एकदा?’’
‘‘मग ओरडावं हळूच! पण आज तू जरा जास्तच त्रासलेली दिसतेय. एक पुस्तक पाठवू का तुला वाचायला? सध्याचं बेस्ट सेलर आहे ते- ‘सल्ले कसे टाळावेत?’ या नावाचं आहे. इतकं मस्त आहे ना. म्हणे १०१ मार्ग दिलेत सल्ले टाळण्याचे. देऊ पाठवून?’’ मैत्रीण गडबडीतच, पण खुबीने म्हणाली.
पाठवून देण्याऐवजी ‘ठेवून’ देण्याची तिडीक क्षणभर तिच्यात उठली; पण नंतर लगेच तिनं दीर्घ श्वास घेऊन फोनचा रिसिव्हर हलकेच खाली ठेवला. ‘शांत कसे राहावे?’ या पुस्तकात असंच सांगितलेलं होतं..    
मंगला गोडबोले -mangalagodbole@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No suggestions on world laughter day
First published on: 02-05-2015 at 01:59 IST