कविता सहस्रबुद्धे
खरं तर जिन्नस तेच असले तरी पदार्थाची चव मात्र कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक वेळी वेगळी असते. आईच्या हातचे पदार्थ डोळे मिटून खाल्ले तरी ते आठवत राहतात, समोर दिसू लागतात, पण बाबा जेव्हा कौतुकाने ‘मंजूळ झालेत आजचे पोहे’, असं म्हणतात तेव्हा…
स काळी नाश्त्याला अगदी रोज जरी पोहे केले तरी कंटाळा नाही येणार असा हा पदार्थ. फोडणीत मोहरी तडतडली की त्यात पडणारे हिरव्या तिखट मिरचीचे तुकडे, कडीपत्त्याची नुकतीच खुडलेली पानं आणि हिंग घातलं की येणारा खमंग फोडणीचा दरवळ… मग त्यात भरपूर कांदा घालून त्याला हळदीच्या रंगात रंगवून छान परतून घेतलं… चिमूटभर साखर भुरभुरवली की सर्व घरभर दरवळणारा तो घमघमाट.. आहाहा… मराठी घरांत बहुतेक सकाळ अशीच असते!
वाफेवर शिजणाऱ्या कांद्याची वाट बघणारे इतर जिन्नस पाहून मग कधी एकदा पोहे तयार होतील याची ओढ लागते. हलक्या हाताने प्रत्येकी मूठ मूठ अंदाज घेऊन चाळणीवर धुऊन ठेवलेले पोहे आणि त्यावर विसावलेले फोडणीच्या आधी तळून घेतलेले खमंग शेंगदाणे; पिवळ्या रसदार लिंबाच्या फोडी, हिरवीगार कोथिंबीर, ते पांढरंशुभ्र ओलं खोबरं… हलक्या हाताने कढईवरचं झाकण उघडावं आणि एकवार तो कांदा परतून त्यावर पोहे, दाणे, मीठ घालून छान परतलं की लिंबू पिळायचा. त्यानंतरची एक वाफ आली की पुढचा क्षण परमानंद टाळीचा असतो.
प्रत्येक वेळी पोहे करताना ते तितकेच रुचकर व्हावेत हा प्रामाणिक प्रयत्न असतो. खरं तर जिन्नस तेच तरी प्रत्येक वेळी चव मात्र कमी-अधिक प्रमाणात वेगळी असते. आज पोहे करताना आईने केलेले वेगवेगळे पदार्थ आठवले. तेव्हा जाणवलं आईने केलेला प्रत्येक पदार्थ कायम एकसारखा व्हायचा, तितकाच रुचकर आणि उत्कृष्ट. कितीही वेळा केला तरी त्या त्या पदार्थाची चव, त्याचं रूप, त्याचा रंग आणि त्याची पोतसुद्धा कायम एकसारखी असायची. डोळे मिटून खाल्लं तरी ओळखू येईल. हा आईने केलेला लाडू आहे किंवा आईने केलेला दुधी भोपळ्याचा हलवा आहे… ती चव तिच्यासोबतच हरवली. अजूनही डोळे मिटले की ती चव आठवते, ते पदार्थ समोर दिसू लागतात. तिने केलेल्या लाडूंनी भरलेला डबा दिसतो. दुधी हलवा केला की, तो एका ठरावीक भांड्यातच ती ठेवायची. बदामाच्या कापांनी सजवलेला तो दुधी हलवा अजूनही समोर येतो…‘व्हिज्युअल मेमरी’मध्ये आजही काही पदार्थ जपून ठेवलेत मी.
आज सकाळी मी केलेले पोहे पाहून बाबांची आठवण आली. का कोण जाणे पण आज पोह्यांचं रूप बघून वाटलं, बाबा असते तर म्हणाले असते ‘मंजूळ झालेत आजचे पोहे’… मला आठवतं, आई सारखी मागे लागायची म्हणून मी स्वयंपाकघरात नवीन नवीन पदार्थ करायला शिकत होते, तेव्हाची गोष्ट आहे. काहीही बनवलं की ते बाबांना आधी देऊन त्यांची काय प्रतिक्रिया आहे याची वाट बघायचे. एकदा, पोहे खाऊन झाल्यावर बाबा म्हणाले होते, ‘आजचे पोहे मंजूळ झालेत.’ सुरुवातीला त्या विशेषणांची मजा वाटायची कारण दुसरं कोणीच असं कौतुक करायचं नाही. मग अंदाज येत गेला… बाबांनी कोणतं विशेषण वापरलं आहे यावरून मला समजायला लागलं त्या पदार्थाची चव कशी असेल ते; सढळ हातानं खोबरं वापरलं आणि पोह्यातील मिरची अजिबात तिखट नसली की माझे पोहे ‘मंजूळ’ होतात आणि सढळ हाताने तिखट मिरची पडली की ‘चमचमीत’. बाबा गेले पण आजही पोहे केले की त्यांनी मला कौतुकाने दिलेली ही विशेषणं नव्यानं आठवत राहतात!
– कविता सहस्रबुद्धे, kavita.sahasrabudhe@gmail.com