प्रत्येक छोट्या-मोठ्या समारंभात मैदा, साखर आणि क्रीमने ठासून भरलेल्या, कोणतेही पोषण न देणाऱ्या केक, समोशांची खरेच गरज असते का? समजा, हवेच तर आपण तुलनेने पौष्टिक पदार्थांची निवड करायला काय हरकत आहे? भारतातील लोकांमधल्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी योग्य आहार निवडणे आपल्याच हातात आहे. अन्यथा २०५०पर्यंत एकतृतीयांश भारतीय लठ्ठ असतील. ‘ऐकलेस का काय बोलताहेत आपल्याबद्दल?’’ सामोशाने वड्याला आपल्या त्रिकोणातील एका टोकदार कोनाने घासत विचारले. ‘वडा’ आपल्याच तंद्रीत होता. ‘‘कुछ तो लोग कहेंगे… आज काय मस्त पाऊस आहे बघ, आपण एकदम ‘डिमांड’मध्ये असणारे रे. पण काय झाले? तू इतका निराश का आहेस?’’
‘‘अरे, काही महिन्यांपूर्वी ‘मन की बात’मध्ये खाण्यात १० टक्के तेलाचा वापर कमी करा, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. इतकेच नाही तर आता तर म्हणे प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या उपाहारगृहांमध्ये तुझ्या-माझ्यात किती कॅलरीज, किती फॅट्स, अशी माहिती असलेला बोर्ड लावणार. आपली तुलना थेट त्या जळक्या सिगारेटशी केलीय, आरोग्यासाठी आपणही हानीकारक, असे म्हणे बिंबवणार लोकांच्या मनावर. आपली काय इज्जत राहिली रे, इतक्या करोडो लोकांच्या आनंदासाठी आपण झटतो. कार्यालयांमध्ये कुठेही, पार्ट्या असल्या की तुझी किंवा माझी हजेरी निश्चित. लोकांचे किती किती आवडते आहोत आपण… पण आता मात्र असे नामफलक लावून आपल्याला हिणवणार, लोकांनी खाऊ नये म्हणून आवाहन करत राहणार…’’

तेवढ्यात तिथे धापा टाकत गोल गोल कोलांटउड्या मारत लाडू आला. ‘‘अरे, माझेही दिवस सरणार का रे? तुम्ही तसे नवीनच पण मी तर कित्येक पिढ्या सण, परंपरा पाळत सर्वांच्या आयुष्यात गोडवा आणतो, लग्नकार्य असो वा तेरावे, मी हवाच. आणि आता म्हणे माझ्यातली साखर, कॅलरीज दाखवून माझी माहिती उघड करणार. लाडू रागाने फुटायलाच आला होता.

तितक्यात तिथे आपला रस गाळत थकलेली ‘जिलेबी’ही आली, अगदी रडकुंडीला आली होती. ‘‘पक्वान्न म्हणून मिरवलंय मी आणि आता मला हे अति गोड ठरवताहेत, पण मला एक समजत नाहीये, आपण तसे भारतात जन्मलेलो, वाढलेलो स्वकीयच, पण ते बाहेरून आलेले पिझ्झा, फ्रँकी, केक्स, ज्युसेस, बर्गर, चिप्स, डोनट्स हे तर आपल्याहून कदाचित जास्तच कॅलरीवाले, शिवाय ते काय म्हणतात ना, अधिक प्रक्रिया केलेले, प्रोसेस्ड फूड. त्यांचे नाव का रे चर्चेत नाही? आणि सगळीकडे आपलीच बदनामी.’’ जिलेबीच्या या परखड मुद्द्याने वडा, समोसा, लाडू एकदम सावरले आणि सरसावलेही, ‘‘अगदी बरोबर बोललीस गं तू जिलेबे.’’

‘‘थांबा थांबा, तसे काही नाहीये.’’ सर्वांनी चमकून पाहिले ‘बर्गर’ आपल्या पोटातील पॅटिस, लेट्युसचा पसारा कसाबसा सांभाळत आला, ‘‘हे बघा, इथे स्वकीय-परकीय काही नाही रे बाबा, तो गैरसमज होता. पिझ्झा, पेस्ट्री सर्वांचे नाव असतील फलकांवर…आता आपण सारे समदु:खी… आतापर्यंत लोकांनी आपल्याकडे या नजरेने पाहिलेच नव्हते, चव, स्वाद यावर भुलले सारे. जिभेचे चोचले आपण पुरवतो, पण यापुढे ते त्यांच्या आरोग्याचा हिशोब करून खाणार रे आपल्याला.’’ हम्म्म… साऱ्यांनी एकदम उसासा सोडला.

शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये शाळा, संस्था, विशेषत: उपाहारगृहे, कार्यालयीन सभागृहे, कॅफेटेरियामध्ये तसेच पत्रव्यवहाराचे लिफाफे, डायऱ्या, नोटपॅड अशा दैनंदिन वस्तूंवरही निरोगी सवयींचे संदेश छापले जातील, असा निर्णय केंद्र शासनाने नुकताच जाहीर केला. लोकप्रिय पदार्थांमध्ये किती कॅलरीज, साखर व तेल/फॅट असते हे सांगणारे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (एफएसएसएआय) यांनी तयार केलेले नामफलक जागोजागी लावले जाणार आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक पदार्थांमधून अदृश्य रूपात किती चरबीयुक्त पदार्थ, साखर पोटात जाते याची जाणीव लोकांना होईल.

हे का केले जातेय?

‘इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर)आणि‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन’ (एनआयएन) या दोन्ही संस्थाच्या अहवालानुसार देशातील वाढत्या लठ्ठपणासोबत येणारे आजार, हृदयविकार, मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच आरोग्यविषयक जागरूकता वाढवायला हवी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने दिवसाला दृश्य-अदृश्य २७ ते ३० ग्रॅम इतके चरबीयुक्त वा स्निग्ध पदार्थ आणि २५ ग्रॅमपर्यंत साखर यापेक्षा जास्त खाऊ नये. ‘आयसीएमआर’च्या अभ्यासानुसार, भारतात २००८ पासून २०२०पर्यंत लठ्ठ व्यक्तींचे प्रमाण शहरी भागात तब्बल ४० टक्क्यांनी वाढले आणि ग्रामीण भागात २३ टक्क्यांनी वाढले. तसेच २०५०पर्यंत एकतृतीयांश भारतीय लठ्ठ असतील. त्यांनी समोर ठेवलेले हे चित्र नक्कीच भयावह आहे.

लठ्ठपणा आणि त्यावरील औषधे यासाठी भारत हा एक ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. लठ्ठपणा एक आजार आहे. (सरसकट सर्वांच्या नव्हे. पण काहींच्या बाबतीत लठ्ठपणा हा आजार असतो.) आणि त्यासाठी औषधे असा ‘मार्केटिंग’चा फंडा एकीकडे असेलही, पण आहारविहार, जीवनशैली सुधारून लठ्ठपणा रोखा, कमी करा अशी जनजागृती सुरू झालेली आहे. आणि ही एक चळवळच होणे गरजेचे आहे.

विकसित भारताचे स्वप्न पाहताना निरोगी नागरिक हा त्याचा पाया आहे. भारतीयांना त्यांच्या पर्यायांची आणि त्या पर्यायांमधल्या पोषक किंवा अनारोग्यकारक घटकांची माहिती उपलब्ध करून देणे हे एक आरोग्यदायी पाऊल आहे. आपण ‘आर्थिक बजेट’ जसे ठरवतो तसे ‘खाण्याचे बजेट’ ठरवण्याची वेळ आली आहे. जे मुळातच जागरूक आहेत आणि ज्यांचे आहारावर नियंत्रण आहे त्यांना हे अर्थातच लागू नाही. अलीकडे असे म्हटले जाते की, ‘फूड इंडस्ट्री’ ही ‘फार्मा इंडस्ट्री’साठी ग्राहक तयार करत असते आणि सध्या आपण जे अन्न खात आहोत, त्यातील कमी भाग स्वत:साठी आणि जास्त भाग डॉक्टरांची फी आणि औषधांची बिले भरण्यासाठी खाल्ला जातो, इतके आपले खाणे निकृष्ट होत चालले आहे.

गेल्या काही वर्षांत प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात पाकीटबंद अतिप्रक्रियायुक्त पदार्थांनी दुकाने भरली आहेत, ‘फूड जॉइंट्स’, हॉटेल्स शेकड्याने वाढली आहेत. पिझ्झा, फ्रँकी, चायनीज पदार्थांपासून ते केक्स, डोनट्स, आइस्क्रीम्स, ज्युसेस, कॅफेज् पावलोपावली दिसू लागली आहेत. त्यातच बैठी, सुस्त जीवनशैली वाढत गेली. आपण काय खातो आणि त्यापेक्षा किती खातो हे नक्कीच महत्त्वाचे आहे. ‘कुणाचे खाणे काढू नये, मोजमाप करू नये, मोजूनमापून खाऊ नये’ असे आपल्याकडे म्हटले जाते. हे पूर्वी ठीक होते, पण आता बोलावे लागेल अशी परिस्थिती दिसते. पूर्वी लोक वाट्टेल ते खाऊन पचवायचे, सक्रिय जीवनशैली होती, मेहनतीचे अंग होते, माणसे ‘बशी’ झाली नव्हती, लहान मुले ‘कौच पोटॅटो’ झाली नव्हती, पण आता तसे नाहीये ना. सुटलेली पोटे, कमरेचा झालेला कमरा, बेढब शरीर घेऊन जाणारी आणि तरीही बिनदिक्कत कोणताही विचारच न करता वाटेल तेवढे कितीही खायचे, ना वेळेचे बंधन, ना तब्येतीचा विचार. ‘माइंडफुल इटिंग’ वगैरे तर अनेकांसाठी कित्येक पट दूरच.

अलीकडे उत्सव फारच उत्साहात साजरे केले जातात. सेलिब्रेशन, पार्टी या गोष्टींना सर्व वयोगटांत महत्त्व आले आहे. प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्यालाही महत्त्व आले, तेही ठीक. पण मला सांगा, प्रत्येक छोट्या-मोठ्या समारंभात मैद्याचा साखर आणि क्रीमने ठासून भरलेल्या (आणि आपले हात चिकट करणाऱ्या) कोणतेही पोषण न देणाऱ्या केकची खरेच गरज असते का हो? बरं… समजा, केक हवाच तर आपण तुलनेने पौष्टिक पदार्थांची निवड करायला काय हरकत आहे? रव्याचा केक, ढोकळ्याचा केक (आमच्या ओळखीतील एका डॉक्टर दाम्पत्याकडे नेहमी असे वैविध्य असलेले पौष्टिक पदार्थ केले जातात.) किंवा तत्सम अनेक छान पर्याय असू शकतात. मैदा, मीठ, तेल आणि साखर या चौकडीला थोडे जपून वापरूनसुद्धा चविष्ट पदार्थ होऊ शकतातच. पालकांनी लहान मुलांच्या आहाराबाबत, आपण त्यांना काय खाऊ घालतो, त्यांच्यासमोर आपण काय खातो, याबाबत जागरूक राहिले पाहिजे. आंधळे प्रेम, नको ते लाड, आधुनिकतेचे फॅड यामुळे मुलांचे भविष्य आपण बिघडवत नाही ना हे डोळसपणे पाहायला हवे. ‘चाइल्ड ओबेसिटी’ अर्थात मुलांचा लठ्ठपणा शहरातच नव्हे, तर अगदी महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यातही दिसून येतोय हे धोक्याचा इशारा देणारे आहे.

सणासुदीच्या दिवसांत गोड खाण्याला पूर येतो. आपले पारंपरिक पदार्थ छानच आहेत. ऋतुमानानुसार अनुरूप आहेत पण तेही प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. गणपतीच्या दिवसांत एकेक दिवशी १०-१५ गणपतींच्या दर्शनाला जाऊन कुठे पेढा, बर्फी तसेच विकतचे पेढे, मोदक, लाडू असे काही खाल्ले तर किती साखर, किती स्निग्ध पदार्थ एकाच दिवसात पोटात जातील? आता मात्र बऱ्याच ठिकाणी सुका मेवा, सुंठवडा, फळे असा प्रसाद आवर्जून दिला जातो. हे स्वागतार्ह आहे.

अलीकडे मी एका अत्यंत नामवंत उच्चभ्रू संस्थेच्या बैठकीला गेले होते. मात्र नेहमीपेक्षा या वेळच्या नाश्ता आणि जेवणाच्या मेनूमध्ये लक्षणीय फरक जाणवला. सर्व पदार्थ कमी चरबीयुक्त होते. नाश्ता, जेवताना एकही तळलेला पदार्थ नव्हता. तरी सगळे जेवण रुचकर होते, गोड पदार्थ म्हणून चक्क केळे होते. मी आयोजकांकडे याबाबत आश्चर्य व्यक्त करून त्यांचे कौतुकही केले. त्यांनी हे सर्व बदल जाणीवपूर्वक ठेवले होते. सांगायचा मुद्दा हा की, आपण मनावर घेतले तर बदल घडवून आणू शकतो.

आपल्या पारंपरिक आहारावर भर दिला, थोडा ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार केला, लोक काय म्हणतील वगैरे कल्पना दूर ठेवल्या आणि असे छोटे छोटे बदल करत राहिलोे तर कणभर प्रयत्न आणि मणभर यश नक्की मिळेल. समाजाच्या एकंदर आरोग्याविषयीच्या दृष्टिकोनात बदल होऊ शकतो. समोसे काय, वडे किंवा वडा-पाव काय, पिझ्झा काय किंवा अन्य पदार्थ काय, वाईट कुणीच नाही, पण तारतम्याने केलेली निवड महत्त्वाची!

symghar@yahoo.com