मुंबईच्या ‘वे फेअर्स इंडिया’ या संस्थेचे रवी माहीमकर, प्रकाश जोशी व इतर अनेक हौशी जण मुंबई ते गोवा किनाऱ्याने चालत जाणार हे कळल्यावर त्यांच्यात सामील होण्याचा संकल्प सोडला. या पदभ्रमणात अनेक फोटो काढले. ते फोटो बरे आले आणि निसर्गाचे फोटो काढण्याचे वेडच लागले. त्या वेळी फिल्मचे कॅमेरे होते. निवृत्तीनंतर डिजिटल कॅमेरा घेतला. २००७ साली निवृत्त झाल्यावर फोटोग्राफीच्या या वेडाचे ‘व्यसनात’ रूपांतर झाले.
काही जाणकारांच्या सूचना, मार्गदर्शन आणि थोडय़ाफार अनुभवाची भर पडून बऱ्यापैकी सुधारणा झाली. प्रवासाचे वेड पहिल्यापासूनच होते. काही फोटोंना बक्षिसे मिळाली होती. त्यामुळे उत्साह वाढला. पुण्यातील सुप्रसिद्ध जलरंग चित्रकार भास्कर सगर यांच्या मार्गदर्शनाने पहिलं प्रदर्शनही निवृत्तीनंतरच झाले.
गेल्या काही वर्षांत फोटोग्राफीच्या तंत्रात अनेक आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे डिजिटल कॅमेऱ्याचं तंत्र शिकून घेतलं. तसंच फोटो काढताना कॅमेरा विविध प्रोग्राम मोडमधून हाताळत, अनेक प्रयोग करत फोटोग्राफी केली. अन्य माहिती फोटोग्राफर्सकडून किंवा फोटोग्राफीच्या मासिकांमधून मिळवली. मुळात फिल्मच्या कॅमेऱ्यावर फोटो काढले असल्याने कम्पोझिशन योग्य करण्याची सवय होतीच. त्यामुळे कॉम्प्युटरवर, फोटोवर संस्कार करण्याची वेळ येत नाही तरीही फोटोग्राफी संदर्भातील कॉम्प्युटरची कामे शिकायला सुरुवात केली. कॅमेऱ्यावरील फोटो कॉम्प्युटरवर घेणे, त्यातील नको असलेला भाग काढून टाकणे, कलर करेक्शन, फोटोंचे मिक्सिंग आदी कामे शिकून घेतली. अजूनही बरेच शिकायचे आहे.
प्रवासाच्या वेडामुळे नंतर एक हॅण्डीकॅम घेतला. प्रत्येक ठिकाणी फोटोबरोबरच व्हिडीओ शूटिंगही सुरू झालं. आपली स्वत:ची निर्मिती (कशीही असली तरी) पाहण्याचा आनंद घेतो. फार चांगले नसतीलही पण मनाला आनंद देणारे फोटो काढता येऊ लागले. अरुणाचल, लडाख, काश्मीर, कन्याकुमारी ते अगदी लक्षद्वीपपर्यंत अनेक ठिकाणच्या निसर्गदृश्याचे फोटो काढले. अनुभव घेणं, प्रयोग करणं आणि शिकणं कधी संपेल असं वाटत नाही. या शिकण्याबरोबरच सुंदर निसर्गानेही मला समृद्ध आणि तरुण केलं. याच रंगांच्या मस्तीत पुढचं आयुष्य नक्कीच अफलातून जाईल याची खात्री वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2014 रोजी प्रकाशित
आनंदाची निवृत्ती : फोटोग्राफीचा छंद
मुंबईच्या 'वे फेअर्स इंडिया' या संस्थेचे रवी माहीमकर, प्रकाश जोशी व इतर अनेक हौशी जण मुंबई ते गोवा किनाऱ्याने चालत जाणार हे कळल्यावर त्यांच्यात सामील होण्याचा संकल्प सोडला. या पदभ्रमणात अनेक फोटो काढले. ते फोटो बरे आले आणि निसर्गाचे फोटो …

First published on: 13-12-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photography as a hobby