आभासी स्वातंत्र्य-प्रत्यक्ष स्वातंत्र्य असे काहीतरी वेगळे शब्द वापरून लिहिलेला मुक्ता चतन्य यांचा १ जूनच्या चतुरंग पुरवणीतला लेख म्हणजे नव्या डब्यात जुनं (वास येणारं) धान्य असा प्रकार झाला आहे. कोणताही नवा विचार – पालकांसाठी किंवा मुलांसाठी – त्यांनी दिलेला नाही. पालक हे कोणीतरी अमानवी वृत्तीचे प्राणी आहेत आणि मुलांच्या स्वातंत्र्याची किंमत देऊन स्वत:च्या हुकमत गाजवण्याच्या तहानेची तृप्ती करण्याचा पाशवीपणा ते करत आहेत असा छुपा सूर जो अशा प्रकारच्या सर्व लेखांमध्ये असतो, तो याही लेखात आहेच.
मुलांना एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य दिलं पाहिजे हे पालकांना समजत नाही, समजून घेण्याची त्यांची वृत्ती-बौद्धिक कुवत नाही, असं गृहीत धरून लिहिलेले असे लेख घरोघरच्या पालकांबरोबर त्यांची कच्च्या वयातली मुलंही वाचतात आणि पालकांसमोर किती अडचणीची व अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा लिहिणाऱ्यांना अंदाज नसावा. मुलांची मनं समजून घेण्याबरोबर पालकांना इतर किती तरी तणावांना तोंड द्यायचं असतं, त्याबद्दल कुणी काही लिहित नाही. पालकांच्या मानसिकतेबद्दल तरुण पिढीला दोन शब्द समजून सांगणारे लेख कधी कुणी लिहिलेले वाचनात आलेले नाहीत. तरुण झालेल्या आणि तरुण होऊ घातलेल्या समस्त पिढीचं भलं आपल्याशिवाय कुण्णी कुण्णी करू शकणार नाही, अशा गाढ विश्वासाने लिहिलेले हे लेख वाचून किती पालकांच्या विचारात फरक पडतो त्याची पाहणी एकदा व्हायला हवीच.
तरुण पिढीचे स्वघोषित हितचिंतक, सिनेमा नट, निर्माते, दिग्दर्शक- कुणीही उठावं आणि पालकांना शहाणपणाचे डोस पाजावे हे हल्ली फारच वाढत चाललंय. त्यात आता काही वेगळं वाटत नाही. लिहिता हात बदलला की शैली थोडी बदलते, इतकाच फरक. पालकांची बाजू पुढे आणणारे, त्यांनी समजून घ्या म्हणणारे लेख छापायचं धाडस कुणी दाखवलं तर दोन्ही बाजूंच्या व्यथा समोर येतील आणि त्यातून या समस्येवर काही वेगळा उपाय कदाचित सापडू शकेल, निदानपक्षी एका वेगळ्या दिशेने विचार मंथन तरी सुरू  होईल.
-राधा मराठे, ई-मेलवरून
 
तृतीय पंथीयांना कामाला लावा
‘एक टाळी..’ हा ८ जूनच्या चतुरंगमधील लेख वाचून मी हा विषय येथे मांडीत आहे. हा विषय थोडय़ा गांभीर्याने अभ्यासण्याची व हाताळण्याची गरज आहे. शासनस्तरावरील अनास्था सोडाच, परंतु समाज म्हणूनही आपण याकडे गंभीरतेने पाहात नाही. त्यांच्याविषयीच्या तिटकाऱ्याच्या भावनेपलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला रेल्वेमध्ये टाळ्या वाजवीत पसे वसूल करण्यासाठी अंगलट करणारे हिजडे अनेक वेळा दिसतात. रस्त्यावर दुकानासमोर उभे राहून पशासाठी हुज्जत घालणारे हिजडे आपण पाहतो. हिजडा समोरून येत आहे असे दिसले की आपण दुसरीकडे तोंड करून पळ काढण्याची तयारी करतो, याच्यापलीकडे आपण काहीच विचार करीत नाही.
आता जनगणनेचे काम शासनाने पूर्ण केले आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात लाखो हिजडे असल्याचे आकडे प्रसिद्ध होतील. त्यावरून हिजडय़ांची संख्या नगण्य मानून सोडून देण्याइतकी कमी गृहीत धरता कामा नये, म्हणून या हिजडय़ांना असेच भीक मागत ठेवणे, त्यांना फुकट पोसणे योग्य होणार नाही.
त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करायचे असल्यास त्यांना कामे मिळवून दिली पाहिजेत. त्याना करता येतील अशी असंख्य कामे आहेत. कष्टाची-हमालीची कामे ते सहज करू शकतील. शिपायाची नोकरी, धुणी- भांडी घासण्याची, बालकांची व वृद्धांची सेवा करण्याची कामे ते करू शकतील. एवढेच नाही तर रहदारीच्या रस्त्यावर सिग्नलच्या जवळ बेशिस्तीने वागणाऱ्याकडून दंड वसूल करण्याची कामेही ते करू शकतील. मला वाटते कोणतेही क्षेत्र त्यांना निषिद्ध नसावे. पूर्वी राजे रजवाडय़ांच्या आणि सुलतानांच्या जमान्यात राण्यांची सेवाचाकरी करण्यासाठी एक विश्वासू म्हणून त्यांची नेमणूक केली जात असे. हे उदाहरण पुरेसे आहे.
तृतीयपंथीयांना स्वीकारण्यास प्रतिष्ठित समाज सुरुवातीच्या काळात घाबरेल किंवा नाके मुरडेल, पण तेही समाजात मिसळून काम करू शकतात हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्यासाठीही कोणतेही क्षेत्र वज्र्य असणार नाही.
-मोहन ठेकेदार, पुणे

घरोघरी हिरकणीच
११ मेचा जागतिक मातृदिनाचा चतुरंग विशेष आवडला. विषयच जिव्हाळ्याचा होता. सर्वसामान्य आणि आíथकदृष्टय़ा मागास वर्गातील तसेच आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील कुटुंबांमधील स्रियांच्या जगण्यातील वास्तव या छोटेखानी मुलाखतीतून समोर आलेच, पण त्याचबरोबर या वर्गातील स्त्रियांमधील मातृत्वसुद्धा श्रेष्ठ आहे, हे समोर आले. घरोघरी आजही हिरकणीच्या वंशज आपल्या लेकरांसाठी धडपडतात व त्याची जाणीव त्यांच्या मुलींनाही तितकीच आहे, हे पाहून समाधान वाटले. आईचा आदर्श त्या मुली नक्की घेतीलच, पण ‘चतुरंग’ने त्यांना प्रसिद्धी दिली हा वेगळेपणा जास्त भावला. या निबंधांमुळे भूतकाळातील मध्यमवर्ग पुन्हा आठवला.
जलिदडीचा प्रयोग व त्यामागील तळमळ याचे सादरीकरण -लेखन सगळ्यांनाच नवी दिशा देणारे ठरेल. ‘वचनात शांतवले मातृत्व’ हे मनाला आपली संस्कृती शिकवून गेले. संताची शिकवण आजही आचरणात आणणाऱ्या ज्योती शहाणे यांना धन्यवाद.
 -शामल वेचलेकर, वसई

उंचावलेल्या अपेक्षांना
उद्धटपणाचा स्पर्श नसावा!
‘डस्टबिन’ हा ‘चतुरंग’ (८ जून ) पुरवणीमधील लेख वाचला. ‘वरपक्ष काकणभर सरसच’ किंवा ‘अखेरचा शब्द हा वरपक्षाचाच असावा’ ही मानसिकता कमी होताना दिसत असली तरी पूर्णपणे हद्दपार व्हायला बराच कालावधी जावा लागेल असे दिसते. नियोजित वधूने वा तिच्या मत्रिणीने वृद्धांचा उल्लेख ‘डस्टबिन’ असा करणे निषेधार्हच आहे, किंबहुना ते कदापि क्षम्य नाही. अशा वेळी आईवडिलांचे संस्कार कमी पडले की, वर्षांनुवष्रे वधुपक्षाने सोसलेल्या अगतिकतेचा तो नकळत घडलेला स्फोट असावा? अर्थात असे ‘डस्टबिन’चे विचार मनात येणे व ते व्यक्त होणे हे उद्धटपणाचे व असंस्कारित मनाचेच चिन्ह आहे.
‘सर्व काही समसमान’ अशी जाण निर्माण झालेले वरपक्ष समाजात हळूहळू का होईना उदयाला येत आहेत ही समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे. ‘सून गरिबाघरची करावी व लेक श्रीमंताकडे द्यावी’ अशी एक विचारसरणी मागच्या पिढीत होती. त्यात वरपक्षाचाच वरचढपणा अभिप्रेत असावा. त्यामुळेच की काय ‘सोय जाणतो तो सोयरा’ हे पालुपद वधुपक्षाकडून आळवलं जायचं! वधुपक्ष वरचढ दिसला किंवा भासला तर अशा चर्चाचा, लेखांचा जन्म होतो की काय, असाही संशय येतो. लेखात उल्लेख केलेली स्विफ्ट गाडी वरपक्षाची असती तर वरपक्षाचा वरचढपणा म्हणून त्याचा उल्लेख झाला असता? एक दुखरी नस व्यक्त करण्यासाठीच स्विफ्ट गाडी अधोरेखित झालेली वाटते. ‘‘जागा प्रशस्त नाही’’, ‘‘केवढं उकडतंय’’, ‘‘संडास कॉमन वाटतं?’’, ‘‘ग्रॅज्यएट तरी हवी होती, पण ठीक आहे आपल्याला कुठे नोकरी करायचीयं?’’ अशी बोचक वाक्ये वधुपक्षाने आजवर ऐकलीच ना?
आधुनिक काळात मुलीच्या अपेक्षा उंचावणं साहजिकच आहे. प्रत्येक वर्षीच्या बहुतांश सर्व शैक्षणिक क्षेत्रात मुलीच आघाडीवर असलेल्या बातम्या वृत्तपत्रात आपण वाचतोच. त्या अपेक्षांना उद्धटपणाचा वा असंस्कृतपणाचा दर्प असता कामा नये. पण उंचावलेल्या अपेक्षा हा काही टोमण्यांचा वा टीकेचा विषय असू नये. ‘डस्टबिन’चा उल्लेख झाल्यावर वराची प्रतिक्रिया नसíगक होती, त्यात आक्षेपार्ह काहीही नाही, हेही तेवढेच खरे!
-दिलीप रा. जोशी , उरण (रायगड)

..पण स्थर्याचे काय?
गौरी कानिटकर यांच्या ‘त्याचं, तिचं लाइफ’ या सदरातील सगळेच लेख चांगले असतात. याबाबत माझा एक अनुभव सांगावासा वाटतो. माझा स्वत:चा कृषीआधारित व्यवसाय आहे. गेल्या सात वर्षांपासून मी या व्यवसायात असल्याने आता काहीसा स्थिरावलो आहे. तरीही मला मुलगी मिळणे कठीण झाले आहे. निव्वळ डोक्यावरील केसांची संख्या कमी असल्याने की काय माहीत नाही. पण विवाह ठरविताना जे सामाजिक निकष लावले जातात, त्याचे स्वरूप कमालीचे बदलले आहे, असे जाणवते.
मुलींची पसंतीदेखील कौटुंबिक वा आर्थिक स्थर्यापेक्षा मुलाच्या बाहय़रूपाकडे अधिक असते, मग तो देखणा मुलगा व्यसनी का असेना. अनेक मुली पालकांचेही ऐकत नसल्याचे जाणवते, कारण एके ठिकाणी मुलीच्या वडिलांनी पसंती दर्शवूनही नंतर मुलीच्या इच्छेमुळे नापसंती कळवली. एकूणच श्रीमंत व सुंदर दिसण्याकडे कल आहे पण स्थर्याकडे नाही हे मात्र खरे.
-रामेश्वर टाकलखेडे , नागपूर</strong>