असुरक्षित अन्न खाण्याने सर्वसाधारण जुलाबसारख्या आजारापासून ते कर्करोगापर्यंतचे अनेक प्रकारचे तब्बल २०० आजार उद्भवू शकतात. एवढेच नव्हे तर या समस्येमुळे दरवर्षी जगभरात साधारणत दोन लाख लोक मृत्यू पावतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त खास लेख.
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली. दोन वर्षांनंतर म्हणजे ७ एप्रिल १९५० पासून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. गेल्या ६५ वर्षांपासून या संघटनेतर्फे जागतिक स्तरावर आरोग्य समस्येच्या प्राथमिकतेबाबत विचार करून दरवर्षी जगाला एक संदेश दिला जातो. अपेक्षा अशी की, आरोग्यसेवेशी संबंधित जगभरातील सर्वानी हा संदेश विविध पद्धतीने सामान्य माणसापर्यंत पोहोचवावा. संदेशात सूचित केल्याप्रमाणे सामान्य माणसाची ती आरोग्यविषयक समस्या नेमकेपणाने कशी सोडवता येईल यासाठी संबंधितांनी प्रयत्नशील राहावं.
या वर्षीचा संदेश आहे ‘फूड सेफ्टी’ म्हणजेच अन्नाची सुरक्षितता. आपल्या खाण्यात जे काही अन्न पदार्थ येतात ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे. अगदी अन्न पदार्थाच्या उत्पादनापासून ते आपल्या ताटात वाढेपर्यंतचा प्रवास सुरक्षित आहे किंवा नाही याची खात्री करा आणि मगच ते अन्न ग्रहण करा, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. असुरक्षित अन्न खाण्याने सर्वसाधारण जुलाबसारख्या आजारापासून ते कर्करोगापर्यंतचे अनेक प्रकारचे तब्बल २००  आजार उद्भवू शकतात. एवढेच नव्हे तर या समस्येमुळे दरवर्षी जगभरात साधारणत दोन लाख लोक मृत्यू पावतात, अशी भयावह आकडेवारी समोर आली आहे.
शाकाहारी जेवणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अन्न पदार्थ सुरुवातीला शेतात, धान्याच्या किंवा पिकांच्या अवस्थेत असतात. भाज्या, फळेदेखील शेतात किंवा बागेत तयार होतात. या स्थितीपासून योग्य ती काळजी न घेतल्यास अन्नाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. या सर्वाचं उत्पादन भरघोस व्हावं, या प्रयत्नात अनेक रासायनिक पदार्थाचा वापर आजकाल केला जातो. ते रासायनिक पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असू शकतात. रासायनिक पदार्थाची गुणवत्ता आणि त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. जास्तीचं आणि आकर्षक उत्पादन व्हावं, त्यातून खूप पसा कमवता यावा या हव्यासापोटी संबंधित लोक नियमांचं उल्लंघन करून केमिकल्सचा उपयोग करतात. असे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. हे जागतिक आरोग्य संघटनेला सामान्य लोकांना सांगायचं आहे. अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी म्हणून रसायनांचा वापर करत असतानादेखील फॅक्टरीत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यास लोकांच्या जीवावर बेतू शकतं. याशिवाय विषाणू, जिवाणू, परोपजीवी प्राणी यांच्यापासून अन्न पदार्थातून अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मांसाहार ही देखील जगात मान्यताप्राप्त अशी आहारशैली आहे.
त्यात डबाबंद पद्धतीने अन्न पुरविले जाते. असे करतानादेखील आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी न घेतल्यास अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 अनेक गजबजलेल्या देवस्थानांच्या ठिकाणी हजारो भाविकांना एकत्र जेवण दिलं जातं. भाविक त्याचा महाप्रसाद म्हणून स्वीकार करतात. तेव्हाही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटय़ा-मोठय़ा शहरातून आजकाल ‘वीकेण्ड’च्या नावाखाली घरी जेवण न करता बाहेर हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, आईस्क्रीम, वगरे पदार्थाचा आस्वाद घेण्याची प्रथा प्रतिष्ठेची (!) मानली जात आहे. अशा पदार्थाची दुकाने चालविणाऱ्यांनी स्वच्छतेचे किमान नियम पाळणे आवश्यक आहे. त्याचे पालन होते किंवा कसे, याची पाहणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेनेदेखील तितकेच दक्ष राहणे जरुरी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेतला तर असे दिसून येते, की २०१० साली ‘शहरीकरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम’, २०११ साली ‘प्रतिजैविकांचा विवेकनिष्ठ वापर’, २०१२ साली ‘म्हातारपण आणि आरोग्य’, २०१३ साली ‘उच्च रक्तदाब आणि आरोग्य’ आणि २०१४ साली ‘छोटा दंश – मोठा धोका’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणेमुळे मानवी जीवनात जागतिक आरोग्य संघटनेला अपेक्षित अशी सुधारणा झाली असं म्हणता येणार नाही. आहे तीच परिस्थिती कायम आहे, असंच म्हणावं लागेल. असं का व्हावं? याबाबत विचार केला तर असं दिसतं, की अशा कार्यक्रमांवर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही म्हणावं तसं यश मिळत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता सर्व राजकीय नेते, उच्च अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, शासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर्स यांच्या मनात आणि म्हणून कृतीत एक उदासीनता आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या संदेशाचं पुढे काय झालं, याचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि संदर्भातील बेजबाबदार लोकांविरुद्ध कडक कार्यवाही केली पाहिजे. असं करणं एक उपाय आहे. अर्थातच तो एकमेव नाही.   
डॉ. किशोर अतनूरकर -atnurkarkishore@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safe food
First published on: 04-04-2015 at 01:59 IST