‘‘या संघटनेत काम करायला सुरुवात केल्यापासूनच्या मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक कहाण्या, आजही मनात घर करून बसल्या आहेत. वेश्या व्यवसायात अडकलेली एक १७ वर्षांची मुलगी आम्ही सोडवली, पण पुन्हा विकली गेल्याचे तिच्याच तोंडून ऐकले तेव्हा आलेली हतबलतेची भावना आजही ताजी आहे. आमच्याच एका सदस्य महिलेच्या सहा महिन्यांच्या तान्ह्य़ा मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. मी स्वत: धावपळ करून तिला रुग्णालयात नेत असताना माझ्या हातातच तिने सोडलेले प्राण मी मरेपर्यंत विसरू शकेन का? आईने स्वत: ‘धंदा’ करून पसा जमवून ‘चांगल्या घरात’ लग्न करून दिलेली मुलगी तिच्याच नवऱ्याने विकल्याचा आघात सहन न होऊन हृदयविकाराने प्राण सोडणारी आई मी पाहिलेली आहे. अशा अनेक प्रसंगांना मी नेहमीच सामोरी गेले आहे. हे सगळं होत असूनही चांगलं घडण्यावर विश्वास आजही शाबूत आहे.. चांगलं घडतं आहे.’’ सांगताहेत १९९५ पासून वेश्या व्यवसायातील महिलांसह सुरू केलेल्या, ‘सहेली, एचआयव्ही/ एडस् कार्यकर्ता संघा’लाच आपली कर्मभूमी मानणाऱ्या तेजस्विनी सेवेकरी.
‘सहेली, एचआयव्ही/एड्स कार्यकर्ता संघ’ ही पुण्यातील वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणारी संघटना! अनेक कारणांमुळे आणि विविध मार्गानी वेश्या व्यवसायात आलेल्या आणि समाजाने अव्हेरल्या गेल्याने सगळ्या नात्यांवरचा विश्वास गमावलेल्या या शरीरविक्रय करणाऱ्या महिला या संघटनेत आल्या आणि आता एकमेकींना संभाळणाऱ्या अन्य मुलींनी या व्यवसायात येऊ नये म्हणून धडपडणाऱ्या झाल्या आहेत. त्यांच्या एकमेकींमधल्या नात्यांची ही संघटना झाली आहे.
 या संघटनेच्या स्थापनेची सुरुवात अनपेक्षित होती, अगदी मलाही. ‘पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन’ ही संस्था १९९१ सालापासून पुण्याच्या वेश्या वस्तीत एच.आय.व्ही. नियंत्रण व प्रतिबंध प्रकल्पाचे काम करत होती. १९९५च्या सुमारास या प्रकल्पाला मिळणारे अनुदान मुदत संपल्याने बंद होणार असल्याचे समजले. पिअर एज्युकेटर म्हणून या प्रकल्पात काम करणाऱ्या काही महिला आणि वेश्या व्यवसायातल्या महिला, ज्यांना प्रकल्पांतर्गत आरोग्य प्रशिक्षण दिले गेले होते, सगळ्याच जणी सुरुवातीपासून हे कार्य अतिशय उत्साहाने आणि मनोभावे करत होत्या. अत्यंत महत्त्वाचे ठरलेले हे काम असे अचानक बंद होऊ नये यासाठी सर्वच जणी प्रयत्नशील होत्या. त्याच दरम्यान मी माझ्या एम.एस.डब्ल्यू.च्या ब्लॉक प्लेसमेंटच्या निमित्ताने फिल्डवर्कची विद्यार्थिनी म्हणून काम सुरू केले होते. हे शिक्षण घेत असताना भविष्यात महिलांबरोबर काम करायचे एवढे नक्की ठरवले होते, पण वेश्या व्यवसायातील महिला हेच आपले कार्यक्षेत्र बनेल याची मला किंचितही कल्पना नव्हती. महिन्याभराच्या फिल्डवर्कच्या निमित्ताने सगळ्या पिअर एज्युकेटर ग्रुपबरोबर गट्टी जमली. अतिशय विपरीत घटनाक्रमाने वेश्या बनलेल्या व कायमच प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या पण ‘जे माझं झालं ते दुसऱ्या बाईचं होऊ नये’ ही कमालीची इच्छाशक्ती असणाऱ्या या महिला बघितल्या आणि या अनपेक्षितपणे अनुभवायला मिळालेल्या ‘स्त्री शक्तीला’ मी मनोभावे सलाम केला. अंतर्मनाने कौल दिला की हेच तुझे कार्यक्षेत्र आहे! त्यानंतर ‘सहेली’ माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली ती कायमसाठी!
सहेलीच्या पालक संस्थेचे, पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे संस्थापक डॉ. ईश्वर गिल्डा, त्यांचे सहकारी आणि मित्र डॉ. रमण गंगाखेडकर तसेच डॉ. विजय ठाकूर यांच्या तज्ज्ञ, अनुभवी आणि सातत्याच्या मार्गदर्शनाखाली १९९५ साली सुरू झालेल्या ‘सहेली’ची वाटचाल अनेक अडचणी आणि समस्यांवर मात करून अव्याहतपणे चालू आहे आणि तशीच राहील याबाबत मला खात्री आहे.
१९९५ साली स्थापना होऊनही आमच्या कामाला दिशा मिळाली ती १९९६ सालच्या डिसेंबरमध्ये. कोलकात्याच्या ‘दुरबार महिला समन्वय समिती’ या वेश्या व्यवसायातील महिलांच्या संघटनेने पहिले ‘राष्ट्रीय यौनकर्मी अधिवेशन’ आयोजित केले होते. पुण्यातून आम्ही दहा जणी या अधिवेशनाला गेलो होतो. देशाच्या विविध भागांतून आलेल्या या संस्थांना प्रोत्साहन देणे म्हणजे वेश्या व्यवसायाच्या वाढीला मदत करण्यासारखे आहे, असे काहींचे मत होते, तर काही घरमालकिणींना ही ब्याद वाटली. कारण जर या महिला अशा पद्धतीने एकत्र येऊ लागल्या तर त्यांच्या अर्निबध नियंत्रणावरच गदा येऊ शकते, हे त्यांना उमगले. म्हणूनच त्यांनी विरोध सुरू केला. या विरोधावर अप्रतिम उत्तर आमच्याच महिलांनी शोधले. अतिशय धोरणीपणे सुरू असलेल्या आमच्या संस्थेच्या नावात अर्थात ‘सहेली संघ’ या नावात बदल करून एच.आय.व्ही.-एड्स कार्यकर्ता हे शब्द टाकले. म्हणजे आम्ही सुरुवातीपासून जे एच.आय.व्ही एड्स नियंत्रणाचे काम करतोय तेच चालू ठेवणार आहोत, असे लोकांना वाटेल आणि विरोध होणार नाही’ आणि हे आजतागायत तंतोतंत खरे ठरले आहे!
संस्था घडतानाच काही अलिखित, पण महत्त्वाचे नियम ठरले. उदा. ही संस्था वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या संपूर्ण हितासाठी कटिबद्ध राहील. कोणत्याही राजकीय पक्ष/गट तसेच धार्मिक गटाशी तिचा दुरान्वयेही संबंध राहणार नाही. घरमालकिणींचा योग्य तो मानसन्मान केला जाईल, पण त्या संघटनेच्या सदस्य बनू शकणार नाहीत इत्यादी. या सगळ्यामुळे धोरणीपणाने योजना अभ्यासणे, कधी संपूर्ण विरोधात उभे राहायचे, कधी लढायचे आणि कधी पुढच्या साध्याचा विचार करून तडजोड करायची हे आम्ही शिकत गेलो. एच.आय.व्ही.च्या व्यतिरिक्तसुद्धा या महिलांच्या अनेकविध समस्या आहेत आणि त्या सोडविणे, त्यासाठी पर्याय उभे करणे गरजेचे आहे, हे सुरुवातीपासूनच लक्षात आलं होतं. आणि त्यामुळेच समुदायाची गरज लक्षात घेऊन सर्वानी एकत्रितपणे विचार करून आणि सहभाग घेऊन प्रकल्प राबवायचे ही अविभाज्य प्रक्रिया बनली. त्यामुळेच संस्थेकडे अनुदान असो वा नसो, प्रशिक्षित कर्मचारी असोत किंवा नसोत एकदा चालू केलेले काम सदैव चालू राहतं हीच संघटनेची खरी ताकद आहे. या सर्व प्रवासाला जोड लागते ती आत्मविश्वास आणि सातत्याची.
वेश्या वस्तीतील महिलांचे पुनर्वसन ही एक खरंच गुंतागुंतीची गोष्ट आहे. पोलिसांची धाड पडल्यानंतर सोडवलेल्या बायांना संस्थेच्या आधारगृहात डांबणे म्हणजे पुनर्वसन नव्हे. काही संस्था पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत पापड, लोणची, मेणबत्या बनवणे किंवा ब्युटी पार्लर, शिवणकाम या कोर्सला त्यांना दाखल करणे असे प्रयोग करतात पण त्यातून मिळणारे पसे नक्कीच पुरेसे नसतात, हे सत्य आहे. त्यामुळे एक एक महिला निवडून किंवा अगदी छोटे गट निवडून योग्य प्रकारचे पुनर्वसनाचे माध्यम निवडणे आवश्यक ठरते. असे काही यशस्वी प्रयोग ‘सहेली’ने केले आहेत.
‘जबरदस्तीने सुटका करणे’ याबाबत वस्तीतल्या महिलांचे स्पष्ट मत आहे. सहेलीची सदस्य असणाऱ्या एका महिलेने एका पत्रकार सभेत थेट प्रश्न विचारला होता, ‘मला माझ्या आईबापांनी घरवालीला जेव्हा विकले त्यावेळेस मी १५ वर्षांची होते. तेव्हा हा समाज आणि या सोडवणाऱ्या संस्था आणि पोलीस कुठे होते? आज मी २४ वर्षांची आहे. विपरीत परिस्थितीला सामोरे जाऊन मी ते स्वीकारले आहे. तेव्हा तुम्ही माझ्यावरच दोष ठेवून, आरोपीच्या पिंजऱ्यात मला बसवून जबरदस्तीने माझी सोडवणूक करताय! हा कुठला न्याय?’ अनेकींनी आपण या व्यवसायात आहोत हे सुरुवातीला कटू असणारं सत्य आता पचवलं आहे. यातून बाहेर पडता न येणं त्यांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे यापुढे काय, हाच प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
 भारतात वेश्या व्यवसाय कायदेशीर नाही. वेश्या व्यवसायातील महिलांनी सार्वजनिक ठिकाणी उभं राहाणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना अटक होणे हे नित्याचे झाले आहे. पोलीस कारवाईत मुलींची, महिलांची सुटका करून त्यांना आधारगृहात ठेवले जाते. पण हा व्यवसाय ज्यांच्या हातात आहे त्या घरमालकीण, दलाल यांना क्वचितच अटक होते आणि झालीच तर दंड भरून ते तुरुंगातून लगेचच बाहेर वावरतात आणि त्यांचे वकील केस कोर्टात लढत राहतात. हेही अतिशय सामान्यपणे होताना दिसते. या पाश्र्वभूमीवर या व्यवसायातल्या महिलांना गुन्हेगार समजणे किती रास्त आहे, पुनर्वसनाचे कोणतेही ठोस उपाय नसणाऱ्या या वेश्यांना समाजाचा कलंक समजणे किती योग्य आहे? १६-१७ वर्षांच्या मुलींपासून ते साठीच्या स्त्रीपर्यंत गिऱ्हाइकासाठी रस्त्यावर थांबलेल्या या महिला पाहाणे ही तशी सवयीची झालेली गोष्ट मला व्यक्तिश: अजूनही स्वीकारायला जड जाते. पण वेश्या व्यवसाय असावा का नसावा या वादात न पडता ती वस्तुस्थिती म्हणून स्वीकारणे हे जास्त व्यवहार्य आहे, असे मला वाटते. कारण त्याच मुळे मला त्यांच्यासाठी काम करण्याचे बळ मिळते.
हे काम करताना अनेक प्रसंग आले, चांगले-वाईट, आनंदाचे, अतीव दु:खाचे, समाधानाचे तसेच हतबल होण्याचे अनेक क्षण अनुभवले, पण खऱ्या अर्थी हे ‘जीवनशिक्षण’ आहे असे मला वाटते. समाज म्हणून विकासाचे नवनवे टप्पे गाठणाऱ्या समुदायाबरोबर दुर्लक्षित, पीडित असाही एक गट इथे नांदतो, हे भयाण सत्य म्हणजेच वास्तव आहे असे वाटते.
तथाकथित सुशिक्षित, संपन्न, अतिशय सुरक्षित वातावरणात वाढलेल्या; पण आयुष्यातल्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी, प्रसंग आणि अडचणींबाबत रडत कुढत आणि तक्रारीचा सूर लावणाऱ्या माझ्या असंख्य परिचितांना, नातेवाइकांना आणि मित्र परिवाराला मी नेहमी सांगते, ‘‘वेश्या व्यवसायातल्या एका तरी स्त्रीला समजून घ्या. तिच्या कहाणीत ताकद असेल तर जरूर ऐका. अतक्र्य, कधी कधी अक्षम्य अशा परिस्थितीत या मुली इथे येतात, पण कशाच्या ताकदीवर जीवनाला सामोरे जातात तेही चेहऱ्यावर हसू कायम ठेवून, हे पाहिल्यावर तुमची सर्व दु:खं, वेदना किती निर्थक व खुजी आहेत हे उमजेल’’ इथे येणाऱ्या मुली-महिलांची परिस्थिती साधारण सारखीच, पण कहाणी मात्र वेगळी. सख्ख्या आईवडिलांनी, नवऱ्याने, भावांनी, नातेवाईकांनी विकलेल्या मुली इथे आहेत. बलात्काराला बळी पडलेल्या, समाजाने वाळीत टाकलेल्या आणि कुटुंबाने नाकारलेल्या मुली/महिला इथे आहेत. सकाळी कामावर जाताना बायकोला वेश्या वस्तीत धंदा करायला सोडून संध्याकाळी कामावरून परत घरी घेऊन जाणारे किती तरी महाभाग मला माहीत आहेत. परिस्थितीने गांजलेल्या, दारुडा नवरा आणि पोटची पोरं संभाळण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून येणाऱ्याही अनेक जणी इथे येताहेत. त्यांना दुसरा कुठलाच मार्ग समाजाने ठेवलेला नाही.
मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक कहाण्या, अनेक प्रसंग आजही मनात घर करून बसलेल्या आहेत. वेश्या वस्तीत काम करायला सुरुवात केली त्यावेळी आम्ही १७ वर्षांची एक मुलगी सोडवली. त्या समाधानात गर्क असतानाच या घटनेच्या तिसऱ्याच महिन्यात तीच मुलगी एका गल्लीत पुन्हा दिसली आणि ती पुन्हा विकली गेल्याचे तिच्याच तोंडून ऐकले तेव्हा नातेसंबंध, समाज आणि कायद्यातील पळवाटा यातून आलेली पूर्ण निराशा, हतबल असण्याची भावना आजही ताजी आहे. आमच्याच एका सदस्य महिलेची केवळ सहा महिन्यांची तान्ही मुलगी. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. मी स्वत: धावपळ करून तिला रुग्णालयात नेत असताना माझ्या हातातच तिने सोडलेले प्राण मी मरेपर्यंत विसरू शकेन का? स्वत: धंदा करून पसा जमवून ‘चांगल्या घरात’ लग्न करून दिलेली मुलगी तिच्याच नवऱ्याने विकली हा आघात सहन न झाल्यामुळे हृदयविकाराने प्राण सोडणारी आई मी पाहिलेली आहे. अशा अनेक प्रसंगांना इथे नेहमीच सामोरी गेले आहे. कधी कधी हे सगळं होत असूनही आपला चांगलं घडण्यावर विश्वास आजही कसा काय शाबूत आहे याचं आश्चर्य वाटतं, पण माझ्या सहकारी महिलांकडे पाहिलं की खात्री पटते की, हे काम आपण निवडलं नसून या कार्यासाठी आपण निवडले गेलो आहोत आणि जर त्या हिम्मत हरत नाहीत, सदैव एकजुटीने उभ्या आहेत तर आपण डगमगून जायचं काहीच कारण नाही. इथलं आयुष्य फक्त नकारात्मक, निराश, दु:खाने भरलेलंच आहे असं नाही, तर चांगल्या, सकारात्मक घटनाही अनुभवायला मिळतात आणि त्यातून पुढे जायची ताकद मिळते!
आमच्या महिलांच्या काही उच्चशिक्षित मुली, स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली पाहून, स्वत: कमाई करू लागल्यावर आईला धंद्यातून बाहेर काढणारे मुलगे पाहून खरंच समाधान वाटते. मध्यंतरी चार तरुण मुलांनी इथल्या चार मुलींशी लग्न केले आणि स्वत:चे कौटुंबिक जीवन समाधानाने सुरू केले. तसेच यातून बाहेर पडलेली एक तरुणी आपल्या मुलांना ‘सहेली’त भेटायला घेऊन आली होती, अशा घटनांचे समाधान अवर्णनीय आहे. आपल्या पोटच्या पोरी काहीही झाले तरी धंद्यात येऊ नयेत यासाठी ‘सहेली’ आणि समाजातील काही सजग आणि सुजाण व्यक्तींबरोबर झटणाऱ्या या महिला यशस्वी होताना पाहिल्या की खरोखर ‘जीव वाचविण्याचे’ समाधान वाटते.
हे संपूर्ण कार्य एकटी दुकटी ‘सहेली’ संस्था पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. समाजाची जोड, सहकार्याची या कार्यासाठी नितांत गरज आहे आणि याबाबतीत मी आणि आमच्या सहेलीच्या सदस्या खूपच आशावादी आहोत. मला आठवतंय, जेव्हा आम्ही ‘सहेली’च्या कार्याला सुरुवात केली होती, तेव्हा पगार देऊनही प्रशिक्षित व्यक्ती मिळणं अवघड जात असे, पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती खूप बदललेली आहे. आज अनेक क्षेत्रांतील व्यक्ती आणि विशेषत: तरुण वर्गाकडून ‘सहेली’त स्वयंसेवक म्हणून काम करता येईल का, अशी सातत्याने विचारणा होते. हे समाज बदलू लागल्याचे सकारात्मक द्योतकच आहे. अनेक व्यक्ती ‘सहेली’च्या कायमच्या हितचिंतक आणि देणगीदार  बनल्या आहेत. लोकांकडून वेश्या व्यवसायातील महिलांबाबतची स्वत:ची आणि जवळच्या एका तरी व्यक्तीची तरी मानसिकता सकारात्मक करणे हे या संपूर्ण कार्याला मदत करणारे आहे.
गेली काही र्वष भारतात वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी किंवा नाही याबाबत चर्चा आणि वादविवाद याला उधाण आले आहे. याबाबत मी काही मुद्दे आपल्यापुढे मांडते आणि त्याबाबतचे प्रश्न आणि विचार करण्याचे वाचकांना आवाहन करते. प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वेश्या व्यवसायातील महिलांबाबतची कायद्याची भूमिका नेहमीच अस्पष्ट राहिलेली आहे. वेश्या व्यवसाय कायदेशीर केला, तर समाजाबरोबरच कायदाही ‘या वेश्या’ असा शिक्का कायम लावणार का आमच्यावर? हा या महिलांचा प्रश्न आहे. वेश्या व्यवसाय कायदेशीर करा म्हणजे नेमके काय करा हे  कोणालाही स्पष्ट नाही. या महिलांच्या पुनर्वसनाचे काय? आणि याबाबतच्या नतिक-अनतिक समजुती आणि सामाजिक धारणा याच्यावर कायदा काय परिणाम करेल? असे अनेक प्रश्न आहेत. याची उत्तरे शोधावी लागतील. ते सध्यातरी काळावरच सोपवावं लागेल. आमचं काम चालू आहे, ते असच चालू राहिलच.
सहेलीचे काही प्रमुख उपक्रम- * गुप्तरोग, एच.आय.व्ही., एड्स यांचे वेश्या वस्तीतील महिलांना निरंतर शिक्षण व उपचार * पुरुषांच्या तसेच स्त्रियांच्या कंडोमविषयी प्रशिक्षण व पुरवणे. *सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा * पुनर्वसनाचे छोटे प्रयोग *वेश्या व्यवसायातील महिलांनी पुनर्वसनाचा एक यशस्वी प्रयोग म्हणून गेली सात वर्षे चालू असलेली खानावळ * वेश्या व्यवसायातील महिलांच्या लहान मुलांसाठी २४ तासांचे पाळणाघर आणि शिक्षणासाठी मदत. * महिलांना कायदेविषयक प्रशिक्षण देणे व कायदेशीर मदत उपलब्ध करणे. *नागरिक असल्याची काही आवश्यक कागदपत्रे जसे रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि बँकेत खाती उघडून देणे. *मानसिक आरोग्य कार्यक्रम महिला आणि मुलांसाठी *अनेक संस्था, विद्यार्थी महाविद्यालये इ. ठिकाणी प्रशिक्षण देणे इत्यादी.
संपर्कासाठी -सहेली, एच.आय.व्ही एड्स कार्यकर्ता संघ, १०८९ बुधवार पेठ, शिवाजी रोड, पुणे ०२.
दूरध्वनी  ०२०-६५२८७२९७
ई मेल sahelisangha@gmail.com
tejaswisevekari@gmail.com

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा