रेणुका खोत
भीती ही व्यक्तिसापेक्षअसते, एकांताची भीती वाटतेच अनेकांना, पण काहींना घरांचीही भीती वाटू शकते. याचं कारण म्हणजे काही वास्तूंना अनोळखी व्यक्तींचे गंध, आठवणी, स्पर्श लागलेले असतात. अशा वास्तूंमध्ये राहण्याची सवय नसल्याने भुताखेतांवर विश्वास नसतानाही तिथले अपरिचित आवाजच नाही, तर वाऱ्याने वाजणारं दारही ‘कुणी तरी तिथं आहे’, या विचाराने दचकवतं. एकच नाही, तर तीन घरांचा तोच अनुभव? या भीतीवर मात करायलाच हवी होती… पण कशी?

निदान एक वर्ष स्वत:साठी द्यायचं आणि वेगळं शहर अनुभवायचं या विचाराने मी पुण्यात आले, पण एकटं राहण्याची सवय नसेल तर तो एकांत एकदम पचत नाही. हे वास्तव मला वेगळाच अनुभव देऊन गेलं.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी

घर. १

एका पंजाबी बाईच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून खोली मिळाली. त्यात भिंतीलगत जमिनीपासून छतापर्यंत जाणारं लांबलचक कपाट होतं. भरपूर उजेड देणारी खिडकी होती. शेजारी मोठा पलंग. त्यावरच बसून आम्ही दोघी बोलत होतो. माझ्याबद्दल चौकशी करताना बाई आस्थेने बोलत राहिल्या आणि मध्येच गप्प झाल्या. एकदम सूम. चेहरा बदलला. डोळ्यात पाणी आलं होतं. ‘‘आंटी, क्या हुवा?’’ मी विचारलं. त्या उठल्या आणि कपाटापाशी जाऊन अंगातलं त्राण गेल्यासारख्या उभ्या राहिल्या. कपाट उघडलं. आतमध्ये हँगरला अनेक शर्ट, सूट, पॅण्ट टांगून ठेवलेले होते. शून्य नजरेने त्या कपड्यांकडे पाहत राहिल्या…

‘‘बच्चे बहोत छोटे थे. आदमी हट्टाकट्टा. अचानक हमे छोड के चल बसे. यही इसी पलंगपर हम दोनों सोते थे…’’ चटका बसल्यासारखी मी त्या पलंगावरून उठले. त्यांनी कपाटातला एक हँगर बाहेर काढला आणि त्यावर टांगलेल्या शर्टाला मिठी मारून रडायला लागल्या. मला काही सुचेचना. थोड्या वेळाने शांत होऊन त्या निघून गेल्या. कपाट भरलेलं आहे म्हणजे तुला बॅग जमिनीवर ठेवायला लागेल, माझ्या मनाने नोंद घेतली. मन म्हणजे शरीरात पाळलेला कटकटा प्राणी! एक उंच भरभक्कम बाई माझ्यापुढे रडत होती आणि माझं मन बॅग कुठं ठेवावी या चिंतेत. चांगलीच खजील झाले.

पुण्यात घर शोधताना कंबर मोडली होती. घर ऑनलाइन शोधून देणाऱ्या साइट्स तेव्हा नव्हत्या. फारसे एजंटही माहीत नव्हते. जीव दमलेला. तात्पुरता का होईना त्या जागी तंबू टाकण्यावाचून पर्याय नव्हता. त्या बाईंच्या दु:खाला पार नव्हता, पण मलाही माझे ताण होते. जागा शोधणं आणि त्यापुढे स्वत:साठी काढलेलं एक वर्ष कसं जगायचं हेही मला पाहायचं होतं. पहिल्या भेटीत एखाद्याने भावनिक निचरा माझ्यापुढे करावा व पूर्ण रितं व्हावं इतकी मानसिक जागा माझ्या आत नव्हती. रात्री झोपण्यासाठी कपडे बदलताना पंचाईत झाली. मनाचे खेळ सुरू. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या, बायकोसोबत सहजीवनातील लहान-मोठ्या ध्येयपूर्तीचा आनंद घ्यावा, जोडीनं आव्हानं पेलावीत अशा विचारानं जगणारा पुरुष एके दिवशी अचानक मरून जातो. त्याचं मन अतृप्तच राहिलं असेल ना?

बाहेर वारा सुटला होता. झाडांच्या पानांची सळसळ वाढली. घर मालकीण, तिची मुलं, सगळं पुणं झोपलं होतं, पण मी एकटी टक्क जागी होते. जागा मिळाल्याचा आनंदही उपभोगता येत नव्हता. इतकं मन अस्वस्थ झालेलं. नवऱ्याच्या शर्टाला मिठी मारून रडणारी ती बाई सारखी दिसू लागली. दोन्ही हात एकमेकांवर जोरजोरात चोळले, गालावर ठेवले पण ऊब येईना. खांद्यापर्यंतचं शरीर थंडगारझालं होतं. भीतीच्या काट्याने बारीक सुया टोचल्यासारखी त्वचा दुखून येत होती. मणक्यापासून डोक्यापर्यंत भीतीची लहर चमकून गेली. नको ते विचार यायला लागले. तिच्या नवऱ्याचा आत्मा कपाटात असेल का? मला बघत असेल? कपडे बदलतानाही माझी वाट लागली होती. चमत्कारिक विचारांनी डोक्याचं भजं व्हायला लागलं…

मुंबईचं घर अतोनात आठवू लागलं. तिथं घर माणसांनी तुडुंब भरलेलं नसलं तरी हालचाल असते. हाक मारली तर कुणी तरी ‘ओ’ देणारं असतं. इथं मी हाक मारली तर कपाटातून ते अंकल ‘हॅलो’ म्हणतील आणि मी अॅटॅक येऊन तिथंच मरेन असं काहीही सुचायला लागलं. गुडूप अंधारात बिनधास्त झोपणारी मी. मांजरासारखी गुडघे पोटात दुमडून झोपायचा प्रयत्न करत होते, पण छे! या कुशीवरून त्या कुशीवर व्हायला अंग वळत नव्हतं. कपाटाकडे पाठ करून झोपले तर मागे त्या अंकलचा आत्मा येऊन बसेल. कपाटाकडे तोंड करून झोपले तर कपाटाच्या आत बसलेले अंकल माझा डोळा लागल्यावर बाहेर येतील… वसंत ऋतूच्या पहिल्या बहरात आसुसून फुटणाऱ्या कोवळ्या पालवीसारखे माझ्या भयकल्पनांना धुमारे फुटत होते. पांढऱ्या डोळ्यांच्या काळ्या सावल्यांनी माझ्या डोक्यात गर्दी केली होती.

काय वाटत असेल त्या बाईंना? आधी जिथं नवऱ्यासोबत झोपत होत्या ती खोली आर्थिक गरजेपोटी दुसऱ्या व्यक्तीला देणं, त्या खोलीवरचं स्वामित्व तात्पुरतं का होईना गमावणं, हे सोपं नसेल. ‘‘ओ अंकल, तुम्ही कपाटात शांतपणे झोपा बघू आणि मलाही झोपू द्या बरं, असं म्हणून मी डोळे आवळून बंद केले. इथं झोप येत नाही असं सांगून सकाळी बॅग उचलून थेट बाहेर पडले.

‘पेइंग गेस्टसमोर तुम्ही असं रडू नका हो, कारण नसताना, मनात काहीबाही येत राहतं,’ असं सांगायचं होतं त्यांना, पण नाही जमलं. बाईंचे डोळे सुजलेले. त्यांनाही झोप आली नसावी. माफक हसून म्हणाल्या, ‘‘कभी मिलने जरूर आना.’

घर. २

झाडांवरून खाली आलेल्या वेली बाजूला सारत अरुंद बोळातून मी नवऱ्यासोबत एजंटच्या मागे मागे चालत गेले. समोर चक्क बंगला अवतरला. बंगल्याबाहेर उंच झाडं, हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट. मुंबईची तीन स्वयंपाकघरं बसतील असं भलमोठं स्वयंपाकघर. भांडीकुंडी, सोफे-गालिचे, लाकडी कोरीव फर्निचर. दिवाणखानाच म्हणता येईल इतकी अवाढव्य खोली होती. आता घरचे-दारचे, दोस्त मंडळी कुणी यावे, राहावे. मी नसलेल्या मिशांना तूप लावून ऐट मारणार. माझं ठरलं. ‘बंगल्याच्या मानाने भाडं स्वस्त वाटतंय असं का बरं?’ मी कुजबुजले. घरभर पांढराफिकुट प्रकाश आणि खोल्याच खोल्या. मुंबईत रेल्वेच्या डब्यांसारख्या एकापुढे एक असलेल्या खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहायची सवय असल्याने तो अगडबंब बंगला अंगावर आला. आधी बंगला बंगला म्हणून हरखले, मग घाबरले. आठवड्यातून एखाददोन दिवस नवरा येईल, तो रोजीरोटीसाठी पुन्हा मुंबई गाठेल. नंतर हा बंगला आणि आपण एकट्याच. ‘‘एकट्याने पकडापकडी, लपाछपी खेळ. चिकार जागा आहे’’, नवरा म्हणाला. माझा चेहरा पडला. ‘‘गंमत केली गं… सहज जमेल तुला,’’ हेही म्हणाला.

माझं लक्ष टेबलवर भिंतीला टेकवून ठेवलेल्या एका श्रीमंत बाईच्या सोनेरी फ्रेमबंद तैलचित्राकडे गेलं. तब्बल चार फूट उंचीचं तरी असेल ते. ‘‘बंगल्याच्या मालकीणबाई. आता हयात नाहीत. मुलगा परदेशात असतो’’, एजंट म्हणाले. अबोली रंगाची साडी, पाणीदार डोळे, निर्विकार चेहरा, गळ्यात मोत्याचा सर चमकत होता. सुंदर चित्र. अत्यंत जिवंत!

‘‘बाई थेट आपल्याकडे बघताहेत असं वाटतंय नं. हिच्यासोबत एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटीनं राहायचं?’’ बायकोचे पाय गठाळून हात गळायला सुरुवात झाल्याची कल्पना आल्याने नवऱ्याच्या चेहऱ्यावर मिस्कील हसू फुटलं. माझी मात्र हवा गेली होती. मग दिसला ओतीव लोखंडाचा वळसेदार जिना. जिन्याच्या वर जाणाऱ्या पायऱ्यांवर भक्कम अंधार आणि त्याची पिल्लं बसलेली होती. वरती दोन खोल्या आहेत. ‘‘बघू या?’’ एजंटनी विचारलं. चक्रासनात पायऱ्या उतरून येणारी ‘एक्झॉरसिस्ट’ सिनेमातली लहान मुलगी डोळ्यापुढे आली. मला एकटीला करायचा काय तो जिना? नकोच. ‘‘एवढी मोठी घरं का बांधतात लोक? काय वैताग आहे हा…’’ या एका वाक्याने नवरा काय ते समजला. एजंटचे आभार मानून आम्ही निघालो. बराच वेळ हसत राहिलो. भुताखेतांवर एक पैशांचा विश्वास नसताना रिकाम्या घरांनी माझी चांगलीच भंबेरी उडवून दिली होती. एकमात्र खरं त्या घरात काही तरी बिनसल्यासारखं वाटत होतं खरं. तिथली हवा उदास होती

घर. ३

अखेर सिंहगड रोडला सातव्या मजल्यावर सुंदर फ्लॅट मिळाला. मालकीचा असावा अशा हौसेने मी तो राखला, नटवला. प्रशस्त बाल्कनी, वर मोकळं आकाश होतं. माझ्या वरच्या फ्लॅटला बाल्कनी नव्हती. बहुतेक तिथं कुणी राहत नसावं. त्या घराच्या खिडकीचे पदडे कायम बंद असत. कायम अंधार. मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावरची रहदारी एकदम कमी व्हायची. अशा वेळी बाल्कनीतून रस्ता, आकाश, चंद्र सगळं सुंदर दिसायचं. इथं एकटं राहूनही मला कंटाळा यायचा नाही. कधी सतरंजी टाकून ऊन खात अंग टाक, कधी पुस्तक वाच, रोपं लाव, नाच, योगा कर. मन छान रमत होतं. रात्री रस्त्यावरच्या अंधारात दिव्यांचे खांब सौम्य पिवळा प्रकाश ओतत. त्याकडे पाहत गरम कॉफी घ्यायची. मनपसंत एकांत मिळाला होता.

एके दिवशी मध्यरात्री मी बाल्कनीत कॉफी घेऊन आले. कठड्यावर रेलून थोडा वेळ रस्ता पाहिला आणि मागे वळून सवयीनं वरच्या घराच्या बंद खिडकीकडे पाहिलं तर… हृदयाचे ठोके पडायचे थांबले. त्या खिडकीचा पडदा किलकिला करून कुणी तरी माझ्याकडे पाहत होतं. नक्कीच. माझं लक्ष गेल्याचं दिसताच तो पडदा आत असलेल्या व्यक्तीने सोडून पूर्ववत केला. इथं ट्यूबलाइटचा प्रकाश कसा…? म्हणेपर्यंत क्षणात तिथला दिवाही बंद झाला. इतके महिने मी इथं राहतेय, मला वाटतंय की मी एकटीच आहे, पण असं नाहीये का? कुणी तरी मला इथून पाहत असतं. कधीपासून… कोण असेल?

मी वेगानं बेडरूमच्या दिशेनं धावले आणि पलंगावर झेप घेतली. पोटात खड्डा पडला, तोंड सुकलं. कुत्रा मागे लागल्यावर माणसं अशी पळतात. धांदलीत बेडरूमचा दरवाजा बंद केला नव्हता, ट्यूबलाइट, पंखा लावायचं राहून गेलं. त्यांची बटणं दाराजवळ होती. तिथवर जायला पलंगावरून पाय जमिनीवर ठेवायची हिंमत होईना. धडधड धडधड. अनोळखी व्यक्तींचे गंध, आठवणी, स्पर्श लागलेल्या वास्तूंमध्ये राहण्याची सवय नसल्याने अपरिचित आवाज आणि वाऱ्याने वाजणारं दारही मला दचकवतं याची जाणीव झाली. एकटक दरवाजाकडे बघत होते. तिथून कुणी आलं तर? हातापायाला कंप सुटला. पुण्यातल्या थंडीत दरदरून घाम फुटला. कसंबसं धावत जाऊन दार लोटलं. बेडरूमच्या खिडकीतून रस्त्यावरचं एखादं वाहन जाताना दिसलं तरी आधार वाटत होता. हे विचित्र होतं. एखाद्याला माणसांची भीती वाटते, एखाद्याला भुतांची. मला तर जागांनी घाबरवलं होतं.

काही केल्या ते घर मला सोडायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मी पुन्हा निग्रहाने बाल्कनीत जाऊन उभी राहिले. ‘सीडीमॅन’वर संगीत लावलं. हळूहळू मनावरील भीतीची पकड सैल झाली. काल रात्री याच जागी भीतीने मी पार सपाट झाले होते यावर विश्वास बसत नव्हता. त्या खिडकीकडे पुन्हा पाहिलं. ‘ये म्हटलं समोर जो कुणी असशील… तुला तुडवते,’ असा जोश आला की बस्स! मला त्या भीतीला हरवायचं होतं. मी बाल्कनीत जाणं सोडलं नाही. ती माझी हक्काची जागा होती. त्या दिवसानंतर मात्र त्या खिडकीचे पडदे पुन्हा कधीही हलले नाहीत. निदान मी ते घर सोडेपर्यंत तरी…

writetorenukakhot@gmail.com

Story img Loader