शिल्पा परांडेकर

 ‘‘गावोगावच्या ‘आज्या’ मला विस्मृतीत गेलेल्या पदार्थ आणि संस्कृतीविषयी नक्की सांगू शकतील हे कळत होतं. पण त्यांना गाठून माझ्याशी बोलायला तयार कसं करायचं? हाही प्रश्न सुटला आणि माझ्या खाद्यसंस्कृतीशोधनास कोकणापासून सुरुवात झाली.’’

नवीन वर्षांच्या आणि नवीन प्रवासासाठीसुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन प्रवास? (आयुष्य एक प्रवास, असं काही तरी का?) नाही हो! मागच्या वेळी ठरलं नाही का आपलं, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या आठवणीतील चवींच्या प्रवासातले सहप्रवासी होणार आहात ते! चला, सुरुवात करू या नवीन वर्षांत नवीन प्रवासाला.

मला वाटतं, माझ्या या प्रवासाची हळूहळू  कहाणी उलगडणं आणि टप्प्याटप्प्यानं प्रवास करणं हे अधिक रंजक होईल. मी थोडं काळाला ‘रिवाइंड’ करते आणि घेऊन जाते २०१६-१७ मध्ये. मागील लेखात मी माझ्या आज्यांच्या हातच्या पदार्थाची आठवण, त्या चवी आणि ‘काश मी ते शिकून घेतलं असतं, कुठे तरी लिहून ठेवलं असतं तर..’ याबद्दल सांगितलं होतं. ते मला जाणवलं होतं, पण आता पुढे काय?

तेव्हा मी मुंबईत वास्तव्यास होते. विस्मरणात गेलेली किंवा विस्मरणाच्या मार्गावर असणारी खाद्यसंस्कृती शोधायची असेल, तर त्याची सुरुवात मुंबईत काय  कोणत्याच शहरात आयतं बसून मिळणार नव्हती. त्या अनमोल ठेव्यापर्यंत मला स्वत:लाच वाटचाल करायची होती. यादरम्यान सतत माझा याच गोष्टींवर विचार सुरू असायचा. मी माझी अकरा वर्षांची प्रतिष्ठित वर्तमानपत्रातली नोकरी सोडून हा प्रवास करायचा आणि स्वप्न सत्यात उतरवायचं ठरवलं तर होतं, पण काही वेळा धाकधूक वाटायची. पण ‘दिल तो जिद्दी हैं’!

खेडय़ांमध्ये जुन्या लोकांकडून जुन्या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती मिळू शकेल, असा मी अंदाज बांधला. जसं माझ्या आज्यांमुळे त्यांच्याकडच्या अनमोल खजिन्याची मला जाणीव झाली होती, तशा महाराष्ट्रातच काय, जगभरात अनेक ‘आज्या’ असतील, की ज्यांच्याकडे जुन्या पदार्थाचा, संस्कृती, रीतिरिवाजांचा खजिना असेल आणि त्यांच्या कित्येक नाती असतील, ज्यांना तो जाणून घ्यायचा असेल. विचार करता-करता, धागे जोडता-जोडता मी माझ्या कल्पनांच्या, स्वप्नांच्या हळूहळू जवळ पोहोचत होते. पण असंख्य प्रश्न समोर होते. खेडय़ांमध्ये जायचं, जुन्या लोकांना भेटायचं हे बरोबर. पण कोणत्या खेडय़ात जाऊ, कुणाला भेटू? माझं तर असं कुणीच ओळखीचं नाही. विचार करता करता उत्तर मिळायला फार उशीर लागला नाही.

आता ऑफिसला जाणं वगैरे नव्हतंच. त्यामुळे रिकाम्या वेळेत मी सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव, प्रदर्शनं वगैरे बघायला जायचे. अशीच एकदा शिवाजी पार्कमध्ये ‘आंबा महोत्सवा’ला मी गेले होते. अनोळखी लोकसुद्धा माझ्याशी मोकळेपणे बोलतात, काही तरी नवीन माहिती देतात, असा माझा लहानपणापासूनचा अनुभव आहे. हाच अनुभव तिथेही आला आणि पुढे माझ्या प्रवासातही. एक गृहस्थ सांगत होते, ‘आमच्या कोकणात स्वत:च्या आंब्याच्या बागा आहेत. कुडाळजवळच आमचं छोटं गाव आहे,’ वगैरे. त्यांनी मला गावाकडच्या त्यांच्या वहिनींचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ दिलं. म्हणाले, ‘कधी तुम्हाला आमच्या कोकणात, आमच्या गावी यायचं असेल तर हा पत्ता आणि फोन नंबर घ्या. आमच्या वहिनीच सगळं काम बघतात त्याचं’. काही दिवसांपासून त्यांचं ते कार्ड टेबलावर पडून मला खुणावत होतं.

मग मी आधी त्या काकांना फोन केला. त्यांना सर्व कल्पना दिली. ते म्हणाले, ‘वहिनी तुम्हाला यात नक्कीच मदत करू शकतील. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. खरं तर आम्ही कोकणात वडिलांबरोबर लहानपणापासून जात आलो आहोत. त्यामुळे कोकण मला तसं नवखं नव्हतं. मात्र मी एकटीनं कधी असा कोकणात प्रवास केला नव्हता. तशी कधी आवश्यकतादेखील पडली नव्हती. पण या वेळी गोष्ट वेगळी होती.

मी कार्डावरच्या नंबरवर फोन केला. त्यांचं नाव सौ. कोदे. लवकरच त्या माझ्यासाठी कोदे मॅडमच्या ‘कोदे काकू’ झाल्या. ‘मला, आपली एक मदत हवी आहे. तुमच्या वाडीतल्या काही जुन्या स्त्रियांना भेटायचं आहे. त्यांच्याकडून जुन्या काळातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं आहे..’ त्या म्हणाल्या, ‘मी प्रयत्न करेन. एक-दोन वयस्कर बायका आहेत आमच्या वाडीत. तुम्ही या. बघू, करू काही तरी.’ आश्वासक उत्तर आलं. मी तारीख वगैरे ठरवून माझ्या स्वप्नाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं. ही चाचणी यशस्वी झाली तरच पुढे काही तरी घडणार होतं.

सर्वात आधी माझ्या मनातल्या कल्पना कागदावर उतरवायच्या होत्या. मला ‘सेल्स’मधला अनुभव असल्यामुळे कोणतीही नवीन कल्पना आधी ‘वर्ड’, ‘एक्सेल’, ‘पीपीटी’मध्ये मांडलीच पाहिजे आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष ‘फील्ड वर्क’ ही माझी कामाची पद्धत होती. खर्चाचं अंदाजपत्रक, फिरण्याचं नियोजन याबरोबर भविष्यात या मिळालेल्या माहितीचं काय करणार, हे सर्व ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’मध्ये व्यवस्थित मांडलं. ही ‘पीपीटी’ घरी दाखवून सर्वाना या कामाची माहिती आणि महती पटवून दिली! मग ठरल्याप्रमाणे एकटी आणि अगदी मुद्दाम ठरवून ‘लालपरी’नंच मालवणातल्या कांदळगावाला निघाले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर स्टँडवरून कांदळगावासाठी थेट बस नसल्यामुळे मला कोल्हापूरहून कणकवली- मालवण- परबवाडी आणि मग कांदळगाव असा मजल-दरमजल प्रवास करावा लागणार होता. थोडी वैतागले, पण अगदी गेल्या-गेल्या बस मिळाली आणि हवी तशी खिडकीच्या बाजूला जागाही मिळाल्यानं  खूश झाले! मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आजवर कोकण अनेकदा पाहिलं होतं. पण अनेकदा पाहूनदेखील तिथल्या खाद्यसंस्कृतीविषयी जी सर्वसामान्य माहिती प्रचलित होती तीच आणि तितकीच माहिती मलादेखील होती. कोकण म्हणजे भात, मासे, काजू, कोकम, मालवणी चिकन, आंबे, रानमेवा वगैरे.. मर्यादित यादी. सण किंवा लोककला म्हटलं, की गणपती, दशावतारी बस्स! हिरवीगर्द झाडी, नारळी-पोफळीच्या बागा, समुद्रकिनारा म्हणजे ‘कोकणभूमी’.. इत्यादी, इत्यादी. बसमधल्या प्रवासात माझं विचारमंथन सुरूच होतं. मनात उत्सुकता आणि जबरदस्त ‘थ्रिल’ची भावनाही.

parandekar.shilpa@gmail.com