आयुष्यामध्ये ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही. येणाऱ्या अनपेक्षित संधींना पूर्ण तयारीनिशी सामोरं जाणं, त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे घडवणं हे मात्र आपल्या हातात असतं. माझी नक्की ओळख कोणती, याचा अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चित्रकलेची आवड असल्यामुळे मी सर जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये उपयोजित कलेचं शिक्षण घेतलं. जे. जे.च्याच आवारातल्या शासकीय मुद्रण तंत्र संस्थेत अनेक वर्षे अध्यापनाचं काम केलं. मात्र ललित साहित्याची आस्वादक समीक्षा आणि चरित्रलेखनात अधिक रमलो. अलीकडच्या काळात चित्रकलाविषयक बरंच लेखन केल्यामुळे कलासमीक्षक अशी एक नवी ओळख निर्माण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापैकी ठरवून अशा गोष्टी काही केल्या नाहीत, अथवा अमुक काही करायचं अशी महत्त्वाकांक्षाही बाळगली नाही. मात्र जे काही काम करण्याची संधी मिळाली त्या कामात मात्र सर्व क्षमतेनिशी लक्ष घातलं. त्यामुळे काही उपक्रमांमध्ये यश मिळालं. काही प्रकल्प प्रत्यक्षात आले नाहीत. आयुष्यामध्ये खूप समाधान देणाऱ्या गोष्टी घडल्या, तशाच काही अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींबद्दल खंत वाटत राहिली. थोडय़ाफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही घडतच असतं. मग तो प्रतिभावंत असो अथवा सामान्य माणूस. त्याला व्यक्तिगत सुखदु:खाची किनार असते तसाच कधी कधी त्याला सामाजिक संदर्भही असतो. माझी सारी कारकीर्द घडली ती साहित्य, कला आणि मुद्रणाच्या क्षेत्रात. म्हटलं तर या तीनही क्षेत्रांचा जवळचा संबंध आणि म्हटलं तर तीनही स्वतंत्र क्षेत्रं. काही सन्मान्य अपवाद सोडले तर या तीनही क्षेत्रांची उत्तम जाण असणारा किंवा आपल्या निर्मितीत त्याचा सर्जक उपयोग करून घेणारा कलावंत मराठीत तरी शोधावाच लागतो. मला तीनही क्षेत्रांत वावरण्याची संधी मिळाल्यामुळे या तीनही क्षेत्रांतले अनुबंध तपासता आले, अनुभवता आले.

मी लेखनाच्या प्रांतात शिरलो ते योगायोगाने. मला वाचनाची आवड असल्याने विविध विषयांवरची मराठी, इंग्रजीतील पुस्तकं मी वाचत होतो. कथा-कादंबऱ्यांबरोबरच कलानिर्मितीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी समीक्षा, सौंदर्यशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान अशा विषयांवरची पुस्तकंही आपण वाचली पाहिजेत, असं मला वाटत असे. माझे मेव्हणे कृ. वि. दातार यांनी माझं वाचन पाहिल्यावर ते एकदा मला मराठीतील एका वृत्तपत्रामध्ये दिनकर गांगलांकडे घेऊन गेले. गांगलांनी मला परीक्षणासाठी एक पुस्तक दिलं. आणि मी पुस्तक परीक्षण लिहू लागलो. गांगलांची भेट हा माझ्या आयुष्याला वळण देणारा एक निर्णायक क्षण ठरला. कारण त्यामुळे माझा ‘ग्रंथाली’ वाचक चळवळीशी संबंध आला, निर्मितीचे समाधान देणारे काही प्रसंग मी अनुभवू शकलो.

‘ग्रंथाली’ १९७० च्या दशकात ऐन भरात होती. अनेक उपक्रम राबवले जात होते. वेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित होत होती. या काळात ‘ग्रंथाली’तर्फे माझी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी एक होतं चिं. त्र्यं. खानोलकरांचं ललित चरित्र आणि दुसरं होतं विजय तेंडुलकरांच्या नाटकावरचं ‘घाशीराम : एक वादळ.’ दोन्ही पुस्तकांचे विषय गांगलांनीच सुचवलेले होते. या पुस्तकांच्या लेखनासाठी मी अनेकांना भेटलो, माहिती मिळवली, त्यातून बरंच काही हाती लागलं, मानवी स्वभावाचे नमुने अनुभवायला मिळाले आणि त्यातून नकळतपणे मीही घडत गेलो. या दोन पुस्तकांच्या निमित्ताने एक नवी वाट चोखाळता आली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आपल्याकडे चरित्रलेखन विविध प्रकारांनी झालेलं आहे. चरित्र, आत्मचरित्र, वाङ्मयीन चरित्र, चरित्रात्मक समीक्षा, चरित्रात्मक कादंबरी अशा अनेक प्रकारांचा त्यात समावेश होतो. मला चरित्रातली सत्यता आणि ललित साहित्यातील उत्कटता दोन्हींचा मेळ साधायचा होता म्हणून जो प्रतिसाद मिळाला त्यावरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचं मनाला समाधान मिळालं. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावरील पुस्तकाबाबतही असंच घडलं. ‘घाशीराम’मुळे जे काही वादळ निर्माण झालं, त्या संघर्षांतून ज्या काही सामाजिक धारणा आणि अस्मिता व्यक्त झाल्या त्यांचा शोध या पुस्तकात घेतलेला होता. या पुस्तकाची दखल इंग्रजी वृत्तपत्रांनी आणि पुढच्या काळात इंग्रजी नाटय़समीक्षेनेही घेतली हे विशेष.

चिं. त्र्यं. खानोलकर, घाशीराम किंवा लिओनादरे दा विंचीचं मी लिहिलेलं चरित्र हे सारं लेखन करताना सांस्कृतिक इतिहास हे सूत्र मी कायम ठेवलं होतं. कोणतीही साहित्यकृती, नाटय़ाविष्कार अथवा चित्रनिर्मिती यांचा आस्वाद घेताना अथवा समीक्षा करताना त्या त्या कलानिर्मितीचा विचार सामाजिक सांस्कृतिक परिसर लक्षात घेऊन करावा लागतो. कलाकृतीला मिळणारा बरावाईट प्रतिसाद त्या कलाकृतीबद्दल सांगतो तसंच त्यावरच्या प्रतिक्रिया समाजाबद्दलही काही सांगत असतात. त्यामुळे सांस्कृतिक इतिहास हादेखील राजकीय इतिहासाइतकाच महत्त्वाचा असतो. आपल्याकडे असा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची फारशी परंपरा नाही आणि तसा तो कुणी लिहिलाच तर त्या अंगाने त्याची दखलही घेतली जात नाही. माझ्या पुस्तकांकडे या अंगाने बघितलं गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे.

मुद्रणाच्या क्षेत्रातसुद्धा माझा प्रवेश झाला तो अनपेक्षितपणे. जे. जे.मधील कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात असताना ‘लिंटास’ जाहिरात संस्थेत काम करणारे मुद्राक्षरतज्ज्ञ व्ही. एन. रानडे यांच्या सांगण्यावरून मी जे. जे.च्याच आवारातल्या शासकीय मुद्रण तंत्र संस्थेत रुजू झालो. मुद्रण कलेच्या विद्यार्थ्यांना डिझाइन विषय शिकवण्याचं काम मी पस्तीसएक वर्षे केलं. चित्रकलेपेक्षा इथे तंत्रज्ञानाला अधिक प्राधान्य होतं. या वेगळ्या क्षेत्राचा आवाका जसा लक्षात येऊ लागला तसा मी त्यात अधिक रमत गेलो. १९७० ते २००० पर्यंतचा कालखंड तंत्रज्ञानातील वेगवान बदलाचा कालखंड होता. लेटरप्रेस जाऊन ऑफसेट मुद्रणपद्धती आली. संगणकामुळे मुद्राक्षरकला, रंगीत चित्रण आणि मुद्रण यात फार मोठे बदल घडून आले. डिजिटल प्रिंटिंग आलं. टीव्ही, इंटरनेटमुळे दृश्यमाध्यमांचा प्रभाव वाढला. मुद्रणक्षेत्रातील  अनेक तज्ज्ञांशी संबंध आला. या नोकरीमुळे जे.जे.च्या वातावरणात राहण्याची संधी मिळाली, निवांतपणा मिळाला आणि हवं ते करण्याची मुभादेखील. त्यामुळे अनेक उपक्रम करता आले. संस्थेतील सहकारी, विद्यार्थी आणि किरण प्रयागी, रंजन जोशी यांच्यासारख्या तज्ज्ञ मित्रांमुळे मुद्रणाशी संबंधित अनेक प्रयोग करता आले. यामुळे मुद्रण म्हणजे केवळ एक तंत्रज्ञान अथवा व्यवसाय नाही. तर जीवनाला आकार देणारा तो एक व्यापक दृष्टिकोन आहे याची जाणीव झाली. पुढच्या काळात लेखन हे माझं सर्वस्व बनलं. पण साहित्याकडे बघताना केवळ साहित्याच्या अंगाने न बघता दृश्यकलेच्या, विज्ञान तंत्रज्ञानाच्या, सौंदर्यशास्त्राच्या अंगाने कसं बघावं, वास्तवाला अनेक अंगांनी कसं भिडावं याचा वस्तुपाठ मुद्रण, इतर कला आणि सर्व ज्ञानशाखा यांच्या अनुबंधनातून मला मिळाला. मुद्रणसंस्थेतील कालखंड म्हणूनच मला सर्जनात्मक काम केल्याचा आनंद देणारा कालखंड वाटतो. भारतीय भाषा, त्यांच्या लिप्या, संगणकीय मुद्राक्षररचना अशा विविध पैलूंसह भाषेकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन लाभला तोही लिपीकार ल. श्री. वाकणकर, मुकुंद गोखले, र. कृ. जोशी यांच्या सहवासात आल्यामुळे. आयुष्यात मुद्रणसंचित म्हणून जे काही हाती लागलं ते ‘मुद्रणपर्व’ या माझ्या पुस्तकात मी लेखरूपाने एकत्रितपणे मांडलेलं आहे. सांस्कृतिक इतिहासलेखनाचं माझं सूत्र वेगळ्या पद्धतीने इथे आलेलं आहे! मुद्रण तंत्रज्ञानाकडे सांस्कृतिक अंगाने पाहण्याचा आणि ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याचा मराठीत तरी हा बहुधा पहिलाच प्रयत्न असेल. माझी मुद्रणाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटिश मुद्रणपंडिता बेट्रिस वॉर्ड यांनी जे भित्तिपत्रक किंवा जाहीरनामा तयार केला होता त्यातील काही ओळी उद्धृत करतो. त्यात त्यांनी म्हटलं होतं,

‘या ठिकाणाहून शब्द परदेशात मार्गस्थ होतील ध्वनिलहरींवर विरून जाणार नाहीत लेखकाच्या हस्ताक्षरानुसार बदलणार नाहीत तर पुराव्यानिशी तावूनसुलाखून कालौघात अढळ राहतील मित्रा, तू एका पवित्र भूमीवर उभा आहेस हे एक मुद्रणस्थळ आहे.’   – बेट्रिस वॉर्ड

मी साहित्यसमीक्षेकडून दृश्यकलेकडे पुन्हा वळलो ते दोन आगळ्यावेगळ्या प्रकल्पांमुळे. चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी २००८ मध्ये ‘विस्तारणारी क्षितिजे’ नावाचं प्रदर्शन बोधी आर्ट गॅलरीच्या साहाय्याने आयोजित केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये साप्ताहिक विवेकतर्फे चरित्रकोशाचा एक भाग म्हणून ‘दृश्यकला’ खंड प्रकाशित झाला. या दोन्हीच्या निर्मितीत माझा सहभाग होता. मी अनेक वर्षे चित्रकारांची प्रदर्शने, त्यावरची कलासमीक्षा सातत्याने पाहात आणि वाचत आलो असलो तरी दृश्यकलेविषयी फारसं कधी लिहिलेलं नव्हतं. चित्रकलेशी संबंधित पुस्तकांची काही परीक्षणं लिहिली असतील तेवढीच.

सुधीर पटवर्धनांना समकालीन चित्रकारांच्या कलाकृतींचं फिरतं प्रदर्शन महाराष्ट्रातल्या आठ शहरांमधून भरवायचं होतं. आधुनिक तसेच समकालीन कलेची सर्वसामान्यांना ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष कलाकृती बघण्याची संधी मिळावी असा त्यामागे उद्देश होता. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठी / इंग्रजीमध्ये कॅटलॉग प्रसिद्ध करायचा होता त्यासाठी मी लेखन करावं, अशी पटवर्धनांची इच्छा होती. अर्थातच मी ती लगेचच मान्य केली. यानिमित्ताने माझा दृश्यकलेच्या विश्वात प्रवेश झाला. गीव्ह पटेल, दिलीप रानडे, रणजित होस्कोट इत्यादींची उत्तम जमलेली टीम, ‘बोधी’सारख्या आर्ट गॅलरीचा भक्कम आर्थिक आधार आणि सुधीर पटवर्धन यांचं मर्मदृष्टी असलेलं संयोजनकौशल्य यामुळे अतिशय नेटका आणि दूरगामी परिणाम करणारा हा उपक्रम ठरला. या कामासाठी सात-आठ महिने ज्या भेटी, चर्चा झाल्या, तीन-चार ठिकाणी प्रवास झाला तो साराच एक संस्मरणीय अनुभव होता. प्रदर्शनाचा कॅटलॉग तर उत्तम झालाच, पण त्यातील चित्रकारांच्या काही कलाकृती आणि माझं लेखन ‘आपले वाङ्मयवृत्त’मध्ये क्रमश: आल्यामुळे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं.

याहून महत्त्वाचा आणि कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘दृश्यकला’ हा चित्रकारांवरचा चरित्रकोश ‘विवेक’ साप्ताहिक आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे चित्रकार शिल्पकारांवरचा चरित्रकोश २०१३ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्रातील गेल्या दोनशे वर्षांमधील चित्रकार, शिल्पकारांची माहिती यानिमित्ताने एकत्रितपणे प्रथमच उपलब्ध झाली. प्रकल्प संपादक होते दिलीप करंबेळकर आणि दृश्यकला खंडाचे संपादक होते सुहास बहुळकर. सुरुवातीला उपयोजित कलेसंबंधीच्या नोंदीपुरताच माझा सहभाग मर्यादित होता. पण सुहास बहुळकरांचे आणि माझे सूर जुळले आणि बहुळकरांच्या बरोबरीने संपूर्ण खंडाचंच संपादन आम्ही केलं. हा पाच-सहा वर्षांचा काळ एक झपाटलेला कालखंड होता. अनपेक्षितपणे महत्त्वाची माहिती मिळाल्याचा आनंद, अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर काहींचा थंड प्रतिसाद असे अनेक बरेवाईट अनुभव यानिमित्ताने आले. बहुळकरांची समर्पित उत्कटता आणि माझी संयत, मितभाषी वृत्ती यातून कोशरचनेत वाचनीयता आणि कोशाची वैचारिक शिस्तबद्धता यांच्यातला समतोल साधला गेला. ‘दृश्यकला’ खंडाला जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यावरून अशा कोशाची किती गरज होती हेच सिद्ध झालं. आता त्याच्या इंग्रजी आवृत्तीचंही काम चालू आहे. कधी कधी स्वनिर्मितीपेक्षा अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रकल्पांमधला सहभाग अधिक आनंदाचा असतो. समाजाचं ऋ ण काही प्रमाणात फेडता आल्याचं समाधान त्यात मिळतं.

आता जाता जाता ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्याविषयी. चांगले उपक्रम यशस्वी व्हायला तुमची इच्छाशक्ती आणि क्षमता यांबरोबरच इतर अनेक घटक जुळून यावे लागतात. तसे ते जुळले नाहीत तर ते अर्धवट राहतात. जे प्रकल्प यशस्वी झाले नाहीत याबद्दल खंत वाटते अशा दोन प्रकल्पांचा इथे उल्लेख करावासा वाटतो. २००० मध्ये नवं सहस्रक सुरू झालं त्यानिमित्ताने ‘ग्रंथाली’ने ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प योजला होता. रोज एक पुस्तक अशी एक हजार पुस्तकं प्रकाशित करायची ही योजना होती. दिनकर गांगलांनी यासाठी नव्याजुन्या लेखकांची टीमही जमवली होती. प्रत्यक्षात जेमतेम शंभर पुस्तकं निघाली. विविध ज्ञानशाखांच्या सांस्कृतिक संचिताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या प्रकल्पाच्या अव्यवहार्यतेबद्दल, त्यातल्या आशयाबद्दल भरपूर टीका आणि खासगी चर्चेत टिंगलही झाली. मी या प्रकल्पात गांगलांच्या बरोबरीने सहभागी झालो होतो आणि विषयनिवडीपासून ते संकल्पन आणि निर्मितीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतलेला होतो. यात ज्ञानेश्वर नाडकर्णीचं ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’वरचं पुस्तक, स्थानिक इतिहास सांगणारी वेगवेगळ्या गावांवरील पुस्तकं, अर्थशास्त्र, भाषाविचार यावरची चांगली पुस्तकं प्रकाशित झाली, पण टीकेच्या ओघात तीही वाहून गेली. गुणवत्तेच्या दृष्टीने असलेल्या त्रुटींबद्दलच्या टीकेबद्दल खंत वाटण्याचं कारण नाही. पण एखाद्या मूळ संकल्पनेबद्दलच इतकी नकारात्मक भूमिका घेतली जावी याची खंतही वाटते आणि नवलही वाटतं. इंग्रजीत अशी छोटी पुस्तकं अनेक निघतात, अभिजात साहित्याच्या संक्षिप्त आवृत्त्या निघतात. पण ‘ज्ञानयज्ञ’मध्ये अशा प्रयत्नांना फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही याची खंत वाटते.

दुसरा असाच एक राहून गेलेला प्रकल्प म्हणजे मुद्राक्षरांच्या ज्ञानकोशाचा, ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ टायपोग्राफी’ पुण्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ टायपोग्राफिकल रिसर्च (आय. टी. आर.)तर्फे तो प्रकाशित होणार होता. ‘आय.टी.आर.’चे वसंत भट आणि मुकुंद गोखले यांची ही मूळ कल्पना संगणकावरील भारतीय लिप्यांची अक्षरवळणं तयार करणं हे ‘आय.टी.आर.’चं मुख्य काम होतं. मी आणि रंजन जोशी या प्रकल्पात सहभागी झालो आणि वर्षभर काम करून बरंचसं काम पूर्ण केलं. पण ‘आय.टी.आर.’च्या व्यावसायिक अडचणींमुळे हा खर्चीक प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवावा लागला. भारतीय लिप्यांची अक्षरवळणं, तंत्रज्ञान, सांस्कृतिक परिणाम, मुद्राक्षर मांडणी, मुद्राक्षरांचे सोदाहरण नमुने असा तो एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला असता. आजही अशा प्रकारचा भारतीय मुद्राक्षरकलेवरचा संदर्भकोश उपलब्ध नाही. हे काम राहून गेल्याची खंत जरूर वाटते. नाही म्हणायला मुकुंद गोखले, रंजन जोशी आणि मी मिळून लिपी आणि मुद्राक्षरांचा पाश्चात्य आणि भारतीय असा तौलनिक विकास मांडणारा एक तक्ता पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित केला.

शेवटी यशापयश, त्याबद्दल वाटणारं समाधान आणि खंत या गोष्टी गौण आहेत. निर्मितीच्या क्षणांमध्ये आपण सर्वस्व ओतून जो काही आनंद उपभोगत असतो तो महत्त्वाचा. यश मिळो वा न मिळो, या घडण्याच्या प्रक्रियेतून आपण आणि समाज जाणिवेने समृद्ध होतच असतो.

दीपक घारे

gharedeepak@rediffmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व श्रेयस आणि प्रेयस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing success story of deepak ghare
First published on: 20-01-2018 at 00:05 IST