डॉ. अभय बंग

खेडय़ाचं आरोग्य सुधारायच्या प्रयत्नात आपले विचार व कल्पना मांडायला मी विज्ञानासोबत शब्दांचा आधार घेतला. त्यासाठी वेळोवेळी नवे शब्द रचले. त्याद्वारे लेखक बनण्याचं प्रेयस मी मिळवत राहिलो. ‘आरोग्य-स्वराज्य’, ‘शोधग्राम’, ‘आरोग्य-दूत’ ,‘कोवळी पानगळ’ , ‘दारूमुक्ती’, ‘मद्यराष्ट्र’, ‘अणुविसर्जन’, ‘क्षणस्थ’ हे आठ शब्द म्हणजे माझ्या श्रेयस व प्रेयसची कथा!

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

वस्तुत: मला लेखक व्हायचं होतं. वयाच्या तेरा वर्षांपर्यंत ‘तुला जीवनात काय व्हायचंय?’ या प्रश्नाला माझं उत्तर, ‘मला लेखक व्हायचंय’ असं होतं. कारण लेखक हा इसम कायम आरामखुर्चीत पडून असतो, अवतीभवती पुस्तकांचा ढिगारा असतो आणि मिठाई खाल्ल्यासारखा तो चोवीस तास पुस्तकं वाचत असतो अशी माझी कल्पना होती. स्वर्गसुखाची माझी समजूत तशीच असल्याने मला लेखक व्हायचं होतं. ते माझं प्रेयस होतं.

पण जे प्रिय वाटत होतं ते कदाचित हितकारी ठरलं नसतं. लिहिण्यासाठी तुमच्याकडे सांगण्यायोग्य अनुभव असावा लागतो. अन्यथा सांगणार काय? तो अनुभव मला श्रेयसने दिला. ते माझं श्रेयस मला तेरा वर्षांचा असताना सापडलं. त्या वेळी महात्मा गांधींनी स्वत: सुरू केलेल्या सेवाग्रामच्या ‘नयी तालीम’ शाळेत मी शिकत होतो. एकदा मे महिन्यात भर दुपारी माझा मोठा भाऊ अशोक आणि मी सायकलने जात होतो. चढाव होता. दम घ्यायला मधे थांबलो. अशोक वय वर्षे सोळा, मला (वय वर्षे तेरा) म्हणाला, ‘‘आपण जीवनात काय व्हायचं हे ठरवून टाकू.’’ मी म्हणालो, ‘‘ठरवून टाकू या.’’

जवळच पिपरी नावाचं एक खेडं होतं. आजूबाजूला उजाड शेती होती. ते वर्ष १९६४ चं होतं. भारतात अन्न-धान्याचं दुर्भिक्ष होतं. खेडय़ातली माणसं, मुलं अर्धपोटी व आजारी दिसत होती. भूदान पदयात्रेत आम्ही खेडोपाडी पायी भरपूर भटकलेलो असल्याने खेडय़ांचे हाल आम्ही अनुभवले होते. या पाश्र्वभूमीवर आम्ही दोन्ही मुलांनी असं ठरवलं की अशोकने भारतातील खेडय़ांची शेती सुधारायची आणि मी खेडय़ांचे आरोग्य सुधारायचे! आमचा जणू नियतीशी करार झाला. या संकल्पाचा नेमका अर्थ व गांभीर्य तेव्हा समजत नसतानाही आयुष्याचं श्रेयस मला तेव्हा सापडलं. मी त्याचाच शोध घेतला. लेखक बनण्याचं गोड स्वप्न मागे पडलं. पुढे तर खेडय़ांचं आरोग्य सुधारण्यामध्ये माझं श्रेयस व प्रेयस दोन्ही एकरूप झाले. पुढची पंचावन्न वर्षे, आजपर्यंत, तेच करतो आहे.

आणि तरी, शब्दांवरचं माझं प्रेम कमी झालं नाही, त्यांची जादू ओसरली नाही. आरोग्य सुधारायच्या प्रयत्नात आपले विचार व कल्पना मांडायला मी विज्ञानासोबत शब्दांचा आधार घेतला. त्यासाठी वेळोवेळी नवे शब्द रचले. त्याद्वारे लेखक बनण्याचं प्रेयस मी मिळवत राहिलो. अशा आठ नव्या शब्दांच्या द्वारे माझ्या श्रेयस-प्रेयसची कथा सांगता येईल.

१९८४ मध्ये राणी आणि मी अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य शिकून भारतात परतलो होतो. खेडय़ांचे आरोग्य सुधारायचं ध्येय आता दोघांचं झालं होतं. डोक्यात अनेक वैज्ञानिक अभ्यासाच्या कल्पना होत्या. त्या वेळी अचानक दिल्लीच्या ‘गांधी शांति प्रतिष्ठान’मध्ये एक म्हातारे गृहस्थ भेटले. ते काहीसे महात्मा गांधींसारखे दिसत होते. त्यांनी मला प्रश्न केला, ‘‘आरोग्याचा भारतीय अर्थ काय?’’ आरोग्याचा वेगळा भारतीय अर्थ? तोपर्यंत मी असा विचारच केला नव्हता. ते म्हणाले, ‘‘आरोग्यासाठी भारतीय शब्द आहे- स्वस्थ. जो स्व मध्ये स्थित आहे तो स्व-स्थ!’’ माझ्या डोक्यात जणू वीज चमकली. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अ-स्व-स्थ, म्हणजे आजारी! स्वास्थ्य म्हणजे स्वावलंबन. स्वास्थ्य म्हणजे आत्मनिर्भरता!

जाता जाता सांगायला हरकत नाही, की ते म्हातारे गृहस्थ हे प्रो. राम गांधी निघाले. महात्मा गांधींचे प्रत्यक्ष नातू. (हा महात्मा गांधी विविध रूपांत मला भेटतच राहतो.)

मी पुढे विचार करू लागलो. गांधींनी ‘ग्राम-स्वराज्य’ हे स्वप्न मांडलं. खेडी समृद्ध व आत्मनिर्भर व्हायला हवीत असा याचा अर्थ. स्वास्थ्याचा शोध म्हणजे निव्वळ उपचारांचा शोध नाही, तर लोकांना आरोग्यासाठी सक्षम करण्याचा शोध झाला पाहिजे. मग आपल्या आरोग्याच्या कामाची दिशा काय असायला हवी? अचानक एक शब्द सुचला आरोग्य-स्वराज्य! खेडय़ांमधे ‘आरोग्य-स्वराज्य’ व्हायला हवं. जोपर्यंत खेडय़ातले लोक स्वत:चं आरोग्य सांभाळायला शहरांवर, रुग्णालयांवर, डॉक्टरांवर अवलंबून आहेत तोपर्यंत ते ‘स्व-स्थ’ नाहीत, आजारीच आहेत. तिथे आरोग्य-स्वराज्य व्हायला हवं. ‘आरोग्य-स्वराज्य’ या शब्दामध्ये आरोग्याचा लोकांना स्वतंत्र करणारा नैतिक व राजकीय अर्थ प्रकट झाला. राणी आणि मी गडचिरोलीत स्थापन केलेल्या संस्थेचं ध्येय आम्ही ठरवलं आरोग्य-स्वराज्य!

खेडय़ांची सेवा करावी या हेतूने गांधीजींनी आपल्या आश्रमाचं नाव निवडलं ‘सेवाग्राम’. सेवेचं गाव, सेवा करणारं गाव. पण वर्ष १९९० पर्यंत आमचे प्रत्यक्ष खेडय़ात काम करण्याचे अनुभव आम्हाला सांगत होते की खेडय़ांची सेवा आवश्यक असली तरी निव्वळ सेवेने खेडी सक्षम होत नाहीत. सेवेला शोधाची जोड द्यावी लागेल. आरोग्य-स्वराज्याचा मार्ग काय याचा शोधच घ्यावा लागेल. गडचिरोलीच्या जंगलात जिथे राहून हा शोध घ्यायचा त्या आमच्या नव्याने वसवलेल्या वस्तीला काय नाव द्यावं? नवा शब्द सुचला ‘शोधग्राम’! आरोग्याच्या शोधात वेडय़ा लोकांची वस्ती. इथे संस्कृती हवी सेवेतून शोधाची. स्वत:ला सतत आठवण राहावी तू केवळ पथिक आहेस, पोचला नाहीस, म्हणून संस्थेचं नाव ‘सर्च’ व वस्तीचं नाव ‘शोधग्राम’. असा माझा प्रवास, ‘सेवाग्राम ते शोधग्राम’.

महाराष्ट्रातल्या समाजकार्यात मोठमोठी माणसं होऊन गेलीत. त्यांनी परिवर्तनासाठी सेवा, समाज-शिक्षण, संघटन किंवा संघर्ष अशा पद्धती प्रभावीरीत्या अंगीकारल्या. पण गांधीजींच्या मनातला आदर्श कार्यकर्ता कसा होता? त्यांनीच वापरलेला शब्द आहे ‘सत्याग्रही-सायन्टिस्ट’! आश्चर्य! बरेच लोक गांधींना विज्ञानविरोधी समजतात. पण गांधींचा आदर्श कार्यकर्ता ‘सत्याग्रही-वैज्ञानिक’ आहे. हे विस्मरणात गेलेलं किंवा अप्रकाशात राहिलेलं गांधींचं चिंतनच जणू आम्ही पुन्हा प्रत्यक्षात आणू बघत होतो. म्हणून समाज परिवर्तनासाठी सेवेसोबत वैज्ञानिक शोधाचं महत्त्व. आम्ही गडचिरोली जिल्हा ही आपली प्रयोगशाळा केली व लोकांसोबत आरोग्याचा शोध घेतला, रोज घेतो.

००००

‘आमची मुलं मरून जातात’, लोक म्हणाले. बालमृत्यूचा प्रश्न सोडवायला प्रथम तो प्रश्न किती आहे, का आहे हे शोधण्यासाठी १९८८ मध्ये आम्ही १०२ गावांची निवड केली. ही आमची प्रयोगशाळा. वर्षभर नेमकं मोजमाप केल्यावर आढळलं की अर्भक मृत्युदर होता १२१. (म्हणजे एक हजार जन्मांपैकी १२१ मुलं वर्षभरात मरायची). या मृत्यूंची मुख्य कारणं नवजात बाळांचे मृत्यू व लहान मुलांचा न्युमोनिया. यासाठी आवश्यक आरोग्यसेवा गावात उपलब्ध नव्हती. खेडी दूर दूर होती. रस्ते नव्हते. त्या काळी फार वाहनं नव्हती. मोबाइल फोन नव्हते. आईला सक्षम करणं, गावाला सक्षम करणं हाच योग्य उपाय आहे असं आम्ही ठरवलं. कसं करणार? कोण करणार? गावातलीच एक स्त्री, एक युवक हेच ‘आरोग्य स्वराज्या’चे आधार करायचे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, उपकरणं व औषधं त्यांना द्यायची. प्रतिजैविकांचा शोध पन्नास वर्षांपूर्वी लागूनही ती या आजारी मुलांना मिळत नव्हती. हा मोठा अन्यायच होता. तो दूर करणारे हे आपले गावा-गावातले आरोग्य कार्यकत्रे यांना काय म्हणायचं? हे निव्वळ सेवक कर्मचारी बनू नयेत. गावाला आरोग्य-सक्षम करणारे वाटाडे व्हावेत. त्यांच्यासाठी नाव सुचलं ‘आरोग्यदूत’!

१९८८मध्ये पहिले आरोग्यदूत निवडले. आरोग्यदूतांमार्फत न्युमोनियाचं ज्ञान, निदान व उपचार गावोगावी उपलब्ध झाले. प्रयोगाच्या गावांतील न्युमोनियाचे मृत्यू ७६ टक्क्यांनी कमी झाले. त्याही पुढे जाऊन ‘घरोघरी नवजात बाळसेवा’ ही पद्धत विकसित करून स्त्री आरोग्यदूतांच्या हाती दिली. हादेखील जगातला पहिला यशस्वी प्रयोग ठरला. अर्भक मृत्यदर १२१ वरून ३० वर आला. ‘लॅन्सेट’ने १९९९मध्ये प्रकाशित केलाच, पण पुढे आपल्या १८० वर्षांतील मलाचे दगड अशा ‘िव्हटेज लॅन्सेट’ शोधांमध्ये याची गणना केली.

अनेक जागी, वारंवार प्रात्यक्षिक व प्रयोग केल्यावर ही पद्धत आता जागतिक पातळीवर मान्य झाली आहे. भारत सरकारने ‘आशा’ या कार्यकर्तीचा कार्यक्रम ठरवण्यात या पद्धतीचा आधार घेतला. आठ लाख ‘आशां’ना ही पद्धत शिकवण्यासाठी ‘सर्च’ने शिक्षण प्रणाली विकसित केली. गेल्या वर्षी अशा आठ लाख ‘आशा’नी एक कोटी नवजात बालकांना आणि त्यांच्या आयांना ही सेवा व ज्ञान घरोघरी पोचवलं.आरोग्य-स्वराज्याच्या दिशेने एक छोटंसं पाऊल. देशव्यापी, आता तर ऐंशी देशांत म्हणजे जगव्यापी झालं. वामनाची पावले! आरोग्य-स्वराज्याच्या शोधाची ही शक्ती.

हा ‘आरोग्यदूत’ शब्द इतरांनाही आवडलेला दिसतो. त्या धर्तीवर आता ‘मुक्तिदूत’, ‘वीजदूत’, ‘न्यायदूत’ अशी सेवा पोचविणारी अनेक नावे देण्यात आली आहेत.

००००

महाराष्ट्र शासन म्हणते त्यापेक्षा खूप अधिक बालमृत्यू महाराष्ट्रात होत असावेत असा मला संशय होता. समाजातील प्रश्नांची नोंदच केली नाही की प्रश्न छोटा भासतो व आपोआप सुटतो. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वास्तविक बालमृत्यू किती याचं एक ‘सोशल ऑडिट’ करावं अशी निकड मला १९९९ मध्ये वाटली. पुण्याची ‘ग्रीनअर्थ’ व ‘क्राय’ यांना ती कल्पना आवडली. आम्ही ‘बालमृत्यू अभ्यास संघटना, महाराष्ट्र’ बनवली. तेरा स्वयंसेवी संस्था सहकारी म्हणून यात सामील झाल्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून एकूण २३१ गावं व सहा झोपडपट्टय़ांत दोन वर्षे घरोघरी भेटी देऊन सर्व जन्म व बालमृत्यू नोंदवले. प्रत्येक बालमृत्यूची शहानिशा करून पंचनामा केला. या संपूर्ण आकडेवारीचे विश्लेषण करून आम्ही असा अंदाज काढला की महाराष्ट्र शासन अर्भक मृत्युदर १७ आहे असं जाहीर करत असताना तो वास्तवात ६८ होता व राज्यात दरवर्षी जवळपास दोन लाख बालमृत्यू होत असावेत.

हा अहवाल शास्त्रीय अभ्यासावर आधारित असला तरी त्याचा हेतू निव्वळ एक कोरडा वैज्ञानिक निबंध लिहिणे हा नव्हता. महाराष्ट्राच्या जनतेला आणि शासनाला या प्रश्नाची भीषणता कळावी हा होता. त्यामुळे अहवाल आकडय़ांवर आधारित असला तरी मी लेखनशैली जनमानसाला भिडेल अशी ठेवली होती. अहवालाचे मुखपृष्ठ पुण्याच्या शाम देशपांडेंनी फार सुंदर बनवले एका गोड दिसणाऱ्या बाळाचा पानभरून चेहरा पण उलटा छापला होता. आकडय़ांच्या विसंगतीचा क्रूर खेळ! या अहवालाला नाव काय द्यावे? मी नाव दिलं ‘कोवळी पानगळ’.

हा अहवाल महाराष्ट्रात स्फोटकरीत्या गाजला. वर्तमानपत्रांनी व माध्यमांनी त्याची खूप चर्चा केली. विधानसभेत चर्चा घडल्या. अपेक्षेप्रमाणे आरोग्य विभागाने व तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी त्याचा प्रतिवाद केला. विज्ञानाचा विजय असा की, हा अहवाल पुढे स्वत: भारत सरकारने इंग्रजी पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केला. इतर राज्यातही असा अभ्यास व्हावा व बालमृत्यूंची वास्तविक संख्या कळावी असा भारत सरकारचा हेतू होता.

अनपेक्षितरीत्या, ‘कोवळी पानगळ’ हा मराठी पत्रकारितेत नवाच वाक्प्रचार म्हणून रूढ झाला. विज्ञानाची शक्ती व शब्दांची शक्ती दोन्ही यात एकरूप झालेत. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना कुपोषण, बालमृत्यू यावर लिहायचं असलं की त्यांची लेखणी शब्द वापरते ‘कोवळी पानगळ’!

००००

‘‘आमची पहिली बिमारी आहे आमचे पुरुष दारू पितात. यासाठी काही उपाय करा.’’ गडचिरोलीच्या गावा-गावातून बायांनी राणीला आणि मला हे ऐकवलं. दारूवर काय उपाय करायचा? सगळीकडे दारू मुबलक मिळत होती. कुठून येते? चौकशी केली. शासनानेच साठ दारूदुकानांना देशी दारू विकण्याचे आणि २२०० माणसांना दारू बाळगण्याचे परवाने दिलेले होते. शिवाय गावोगावी आदिवासी मोठय़ा प्रमाणात मोहफुलांपासून दारू बनवून पीत होते. दारू राजमान्य आणि लोकमान्य होती. प्रश्न कठीण होता.

हिवाळ्याच्या एका अतिशय थंड रात्री अंधारातून बराच वेळ कोलाहल ऐकू येत राहिला. सकाळी आम्ही दोघांनी जाऊन चौकशी केली. फिरस्त्या लोकांच्या काही झोपडय़ा गावाशेजारी होत्या. त्यातली एक जळून राख झालेली होती. बाजूला एक बाई व तिला बिलगून सहा भेदरलेली उघडी नागडी मुलं. नवऱ्याने दारू पिऊन रात्री तिला खूप मारलं होतं आणि नशेमध्ये झोपडी पेटवून अंथरूण-पांघरूण-कपडे सर्व राख करून तो नाहीसा झाला होता. बाईचा चेहरा भकास होता. सर्व भावना थिजलेल्या. दारू म्हणजे ती बाई, तिची उघडी पडलेली सहा मुलं! ती बाई, ती मुलं, ती राख झालेली झोपडी माझ्या डोळ्यांसमोरून आजपर्यंत गेलेली नाहीत. काही तरी केलंच पाहिजे. काय करावं? आकडे शोधले. जिल्ह्य़ात दर वर्षी वीस कोटी रुपयांची दारू विकली जात होती. विकासाचं शासकीय बजेट होतं चौदा कोटी. मी समीकरण मांडलं.

१४ कोटींचा विकास + २० कोटींची दारू = गरिबी.

हे गणित लोकांना पटायला लागलं. ‘अमिर्झा’ व ‘वसा’ गावातली काही उत्साही तरुण मंडळी म्हणाली, ‘‘आम्ही काय करावं आम्हाला सांगा.’’ काय सांगू? आम्हालाच माहीत नव्हतं. त्यांची कसोटी बघायला आम्ही त्यांना सुचवलं गावात सामूहिक दारूबंदी लागू करता येते का बघा. महिन्याभराने ते परत आले. त्यांनी आपल्या गावात सामूहिक निर्णय घेऊन खरंच दारूबंदी लागू केली होती. बाया व युवक रात्रभर पहारा देत होते. दारू पिणाऱ्याला पन्नास रुपये व विकणाऱ्याला पाचशे रुपये दंड लागू केला होता. महिनाभर दोन गावांत दारूबंद होती. आश्चर्यच होतं. गावाची दारूबंदी शक्य होती. पण जिल्ह्य़ात शासनमान्य दारू दुकानं सुरू होती. त्यांचं काय?

आम्ही गावागावात जाऊन रात्री सभा घेऊन दारूचं हे गणित आणि या दोन गावांची कहाणी सांगायला लागलो. बाया चवताळल्या. पुरुषांनाही पटायला लागलं. अनेक स्वयंसेवी कार्यकत्रे, एकत्र आले. पूर्ण जिल्ह्य़ाचीच दारू बंद व्हायला हवी. शासनाकडे मागणी करण्याचं ठरलं. वर्ष १९८८.

पण ‘दारूबंदी’ हा बदनाम शब्द होता. दारूबंदी अयशस्वी होते असा समज होता. आचार्य अत्रेसदृश लेखकांनी स्वत:च्या दारूपिण्याचं सार्वजनिक समर्थन म्हणून दारूबंदीची यथेच्छ टवाळी केली होती. तसंही, शासनाने लावलेली दारूबंदी निव्वळ पोलिसांच्या भरवशावर लागू करणं कठीणच होतं. काय करावं? या आंदोलनाला काय म्हणावं? आपण आरोग्य-स्वराज्यामध्ये विश्वास ठेवतो. स्वराज्यामधे स्वत:चा संकल्प, स्वत:ची शक्ती प्रकट व्हायला हवी. शासकीय बंदी म्हणजे स्वराज्य नाही. ते मुंबईराज आहे. शासन समर्थित दारूविक्री तर बंद व्हावीच, पण सोबतच पुरुषांनी स्वत: सोडावी, गावागावाने गावातली दारू हद्दपार करावी. एक नवा शब्द अचानक मनात आला. ‘दारू-मुक्ती’! दारूबंदी नव्हे दारूमुक्ती! गडचिरोलीच्या आंदोलनाला आम्ही नाव दिलं ‘दारूमुक्ती’ आंदोलन.

हे आंदोलन १९८८ ते १९९३ असं पाच वर्ष चाललं. जिल्ह्य़ातल्या दीडशे गावांनी ‘गावाची दारूमुक्ती’ लागू केली. ‘जिल्हा दारूमुक्ती संसद’ भरवून आम्ही ‘जनतेची दारूमुक्ती’ घोषित केली. शेवटी शासनाने जिल्ह्य़ात दारूबंदी लागू केली.

कल्पना पसरली. हिंदीमध्ये म्हणतात, ‘एक शब्द चल पडा’. तसं हा दारूमुक्ती शब्द स्वत:च चालायला लागला. ही शब्दांची शक्ती. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्य़ात तशी मागणी सुरू झाली. महाराष्ट्रातल्या सात आमदारांचं समर्थन मिळवून आम्ही मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना मागणी केली. महाराष्ट्र दारूमुक्त होण्याची सुरुवात म्हणून ज्या गावातले लोक, मुख्यत: स्त्रिया, सामूहिक मागणी करतील त्या गावातली दारू दुकाने बंद करा. शरद पवारांनी राज्याच्या नव्या महिला धोरणात याचा समावेश केला.

दारूमुक्तीबाबत माझं समीकरण असं आहे

जनजागृती + शासकीय दारूबंदी + गावाची सामूहिक दारूबंदी + व्यक्तीची व्यसनमुक्ती = दारूमुक्ती.

गेली पंचवीस वर्षे राज्यव्यापी दारूमुक्तीसाठी प्रयत्न करतो आहोत. त्यामधे अनिल अवचट, आनंद नाडकर्णी, चंद्रशेखर धर्माधिकारी, नरेंद्र दाभोलकर, अण्णा हजारे, आर.आर. पाटील, पारोमिता गोस्वामी, हेरंब कुलकर्णी असे अनेक समविचारी मित्र, सहयोगी, मार्गदर्शक मिळाले. पण तरी महाराष्ट्रातली दारू वाढतेच आहे. शासन दर वर्षी नव्या युक्त्या शोधून दारूचा खप व त्यापासून उत्पन्न वाढवते आहे. कधी धान्यापासून दारू तर कधी मोहफुलापासून दारूचा कारखाना, कधी केळ्यापासून दारू तर कधी ‘वाइन’ हा फळांचा रस आहे, अशी भलावण. काही वर्षांपूवी मी हिशेब मांडला महाराष्ट्रात एकूण पन्नास ते साठ हजार कोटी रुपयांची दारू दर वर्षी फस्त होते.

राज्यात दारूदुकानदारांपासून राज्यशासनापर्यंत, दारूउत्पादक साखर कारखान्यांपासून विजय मल्यापर्यंत पसरलेलं हे पन्नास हजार कोटींचं साम्राज्य आहे. जणू ‘दारूचीच अर्थसत्ता’ आहे. निवडणुकीत पसा पुरवण्यापासून मतदाराला पाजण्यापर्यंत दारूचाच प्रभाव आहे. जिथे मतदार दारूच्या नशेत दारू सम्राटांनाच निवडून देतात, जिथे युवांना आयुष्यभराचे गिऱ्हाईक करण्यासाठी ‘वाइन-युवा महोत्सव’ साजरे होतात, जिथे दारू उत्पन्नाअभावी शासनाचेच हातपाय थंड पडतील अशी भीती वाटते त्या राज्याला काय म्हणावे?

एका सात्त्विक संतापाच्या क्षणी मला शब्द सुचला ‘मद्यराष्ट्र’! हा महाराष्ट्र की मद्यराष्ट्र? शब्द चल पडा. पत्रकारही वापरायला लागले ‘मद्यराष्ट्र’.

पण मद्यराष्ट्र! अजून मद्यमुक्त, महाराष्ट्र! होणे बाकी आहे.

००००

चाळिसाव्या वर्षी मला हृदयरोग झाला. अ‍ॅन्जिओप्लास्टी टेबलवर हृदयाच्या नळीचं अस्तर फाटलं. मृत्यूचं दर्शन झालं. ते भयावह होतं तसंच साक्षात्कारीही होतं. त्या क्षणभरात मनात काय नाही घडलं? हे शरीर आता मरणार. मग आपलं काय होईल? शरीर विसर्जति होऊन त्याचे अणु-रेणू विश्वामधे एकरूप होतील. मग यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? थेंब सागरात विलीन होणार. मृत्यू मृत्यू म्हणतात त्यात भयावह काही नाही. मृत्यू म्हणजे एकेकाळी काही अणू एकत्र येऊन बनलेल्या माझ्या शरीराचं विसर्जन. अ‍ॅॅन्जिओप्लास्टी टेबलवर त्या क्षणीदेखील मनात नवा शब्द प्रकटला  ‘अणु-विसर्जन’! मृत्यू म्हणजे फक्त ‘अणुविसर्जन’. अरेच्चा! छान शब्द आहे. जगलो-वाचलो तर लोकांना सांगू.

पण अजून मला मरायचं नव्हतं. हे शरीर केव्हा तरी मरणारच हे लक्षात आल्याने शरीरानंतर काय, शरीरापलीकडे काय याचा शोध हे शरीर मरण्यापूर्वी घेण्याची तातडी निर्माण झाली होती. ईश्वर आहे का? मी म्हणजे काय? मुक्ती कशी मिळणार?

या शोधाची विस्तृत कथा ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकात सांगितली असल्याने पुनरावृत्ती करत नाही. पण आपलं सगळं जगणं हे मन आणि काळ या दोन पातळ्यांवर सुरू आहे हे माझ्या लक्षात आलं. मन शांत होत नाही. स्थिर होत नाही. सतत मागच्या घटना, स्मृती यामध्ये किंवा पुढे काय होईल यामधे, भूत आणि भविष्यकाळात धावतं. हे दोन्हीही काळ या क्षणी अस्तित्वात नाहीत. पण तेच माझं मन सतत व्याप्त, व्यस्त आणि अशांत ठेवत आहेत. मला यापासून मुक्ती हवी. पण मग मनाने कुठे जावं? त्याने वर्तमानात राहावं. पण म्हणजे कुठे?

ध्यानाच्या प्रयत्नाच्या एका क्षणी माझ्या लक्षात आलं की, वर्तमानातही राहणं कठीण कारण प्रत्येक क्षणी तो वर्तमानकाळदेखील भूतकाळ होतो आहे. मग आयुष्य, आयुष्य म्हणजे आपल्या हाती केवळ हा क्षण. त्या क्षणाच्या अथांग संभावनात आपण असतो. मनाच्या नादी लागून आपण ती सर्व संभावना, ती शांती, तो आनंद गमावून बसतो. या मनाला स्थिर करून केवळ या क्षणात असणं, केवळ असणं केवळ हा क्षण अनुभवणं त्यात शांतपणे स्थिर होणं. याला काय म्हणावं?

‘क्षणस्थ’! हा शब्द प्रकट झाला. प्रत्येक क्षणी केवळ त्या क्षणात स्थित होणे, स्थिर होणे म्हणजे ‘क्षणस्थ’! मनापासून मुक्तीची अवस्था कशी राहील? ‘क्षणस्थ’!

००००

वरील शब्दांच्या जन्मकथा सांगताना कुठे आत्मश्लाघा दिसली असेल तर वाचकांनी मीदेखील त्यांच्यासारखाच माणूस आहे हे लक्षात घेऊन क्षमा करावी. हे शब्द माझे आहेत पण तरी ते माझे नाहीत. ते कोणत्या क्षणी जन्माला आले ते मी सांगितलंय पण ते कुठून आले हे मला सांगता येणार नाही. जिथून आले तिथे मला पोचता येत नाही. कधी जणू अंतराळातून आले. एकदम चमकले. कधी मनाच्या खोल तळ्यातून बुडबुडय़ासारखे वर आले. ते येताना मी पाहिले. मी त्यांच्या निर्मितीचा साक्षी आहे. ते मी निर्माण केले म्हणणं धारिष्टय़ाचं होईल.

ज्ञानेश्वर किंवा विनोबांसारखा मी शब्दप्रभू नाही. पण त्यांचा, मराठी संस्कृतीचा, संस्कृत भाषेचा माझ्यावर संस्कार आहे. मी शब्द-भक्त आहे. नेमक्या शब्दाला भेटण्याची मला आस असते. तळमळ असते. त्यातून नवे शब्द प्रकट होतात. साक्षात्कारासारखे!

हे आठ शब्द म्हणजे माझ्या श्रेयस व प्रेयसची कथा!

chaturang@expressindia.com