माझ्या संत साहित्याच्या अभ्यासाला सामाजिक परिमाण पहिल्यापासूनच होते. हायस्कूलात असताना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक विचारांवर लिहिलेला लेख आचार्य अत्र्यांनी ‘दैनिक मराठा’त छापला. पुढे डॉ. य. दि. फडके यांच्या परिचयातून आधुनिक इतिहासातील बऱ्याच गोष्टी समजल्या. ग. वि. केतकर यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी वर्तुळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला. विद्यापीठात प्राध्यापक आर. सुंदरराजन यांच्यामुळे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अद्ययावत प्रवाह विशेषत: मार्क्‍सवाद यांचे आकलन वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम लेखनावर होऊन वेगळ्या धाटणीचा नवा लेखक संशोधक अशी प्रतिमा निर्माण होत गेली आणि संत साहित्याच्या क्षेत्रात खूप काही करता आले.

श्रेयप्रेयविवेक हे माणसाचे एक वैशिष्टय़ मानावे लागते. व्युत्पत्तिज्ञानाचा कीस न काढता असे म्हणता येते की, प्रेय म्हणजे आपणास प्रिय वाटणारे, आवडणारे, तर श्रेय म्हणजे हितकारक, श्रेष्ठ, कदाचित ते प्रथमदर्शनी आवडणारे नसेलही! प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात श्रेयाचा आणि प्रेयाचा पाठपुरवठा करीत असते. त्यातील काही तिला मिळतात, काही मिळत नाहीत. जे मिळाले त्याचा आनंद वाटणे साहजिकच आहे. जे मिळाले नाही त्याची खंत वाटणेही तितकेच साहजिक आहे.

आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडायला बसणे म्हणजे आपण काय कमावले, काय गमावले, काय मिळवलेच नाही याचा विचार करावा लागतो. आपल्या भाषेत आयुष्याच्या वा जगण्याच्या संदर्भात ‘कृतार्थ’, ‘कृतकृत्य’, ‘सफल’, ‘सार्थक’ असे शब्द वापरण्यात येतात. त्यांचा संबंध श्रेयप्रेयाशीच आहे. आता कोणाला काय हवे असणे किंवा कोणी कशाच्या मागे लागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे ते हवे असण्याचे वा त्याचा पाठलाग करण्याचे त्याला स्वातंत्र्य आहे असे एखाद्याला वाटेल, पण ते बरोबर नाही. आपल्याला आपल्या श्रेयप्रेयाची सिद्धी विशिष्ट सामाजिक चौकटीत, विशिष्ट नियमांच्या अधीन राहूनच करावी लागते. सार्वजनिक ठिकाणी अर्जुनाशी स्पर्धा करून त्याला हरवणे, स्वयंवरातील पण जिंकून द्रौपदीची प्राप्ती करणे हे कर्णाने बाळगलेले उद्दिष्ट होते; परंतु दोन्ही वेळा कर्णाचे सूतपुत्र असणे आडवे आले आणि त्याला माघार घ्यावी लागली. वस्तुत: हे घडण्यात स्वत: अर्जुनाचाही वैयक्तिक असा दोष नव्हताच. हे घडणे त्या वेळच्या व्यवस्थेची निष्पत्ती होती. नेमकी हीच गोष्ट विसरून कर्णाने अर्जुनाशी कायमचा वाकडेपणा पत्करला आणि त्यातून त्याची शोकांतिका साकारली.

श्रेयाप्रेयाच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या व्यवस्थेलाच आव्हान देऊन ती उलथून टाकायचा प्रयत्न करण्यात केवढा तरी पुरुषार्थ आहे. तो प्रयत्न निष्फळ ठरला तरी आपण अशा व्यक्तीची प्रशंसा करतो. तिचे आयुष्य सफल झाले नसले तरी सार्थक झाले, असे म्हणतो. तिच्या शोकांतिकेलाही आपण दाद देतो. श्रेयाप्रेयाच्या आड येणाऱ्या व्यवस्थेलाच आव्हान देऊन ती बदलण्याचा प्रयत्न करणारा अलीकडच्या काळातील नायक म्हणजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी परिवर्तनाचा लाभ स्वत:पुरता मर्यादित न ठेवता आपल्यासारख्या सर्वाचाच अडथळा दूर केला. शिवराय, टिळक, गांधी, आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या आयुष्याचा विचार श्रेयाप्रेयाच्या अनुषंगाने करणे निश्चितच उद्बोधक ठरेल.

या महान व्यक्तित्वांपुढे आपल्यासारख्या सामान्यांचा काय पाड? आपल्या श्रेयाप्रेयाच्या कल्पनाही आपल्यासारख्याच मर्यादित असणार हे उघड आहे. तथापि ‘लोकसत्ता-चतुरंग’ करांच्या आग्रहामुळे हे साहस करावे लागत आहे. मी जन्माने वाढलो ते देहू गावातील वारकरी कुळात. योगायोगाने हे कूळ संत तुकाराम महाराजांचेच असल्याने तो सारा वारसा विनासायास माझ्या पदरात पडला; परंतु त्याचबरोबर जबाबदारीसुद्धा वाढली. सुदैवाने मला या वारशाची आणि जबाबदारीची जाणीव खूपच लवकर झाली. त्याचे कारण म्हणजे माझे वडील श्रीधरअण्णा. अण्णांचा स्वत:चा चौफेर म्हणजे सांप्रदायिक आणि संप्रदायाबाहेरचा अभ्यास, त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांशी त्यांच्या चाललेल्या चर्चा या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्यावर झाला. घरी येणाऱ्यांमध्ये एक होते प्राचार्य शं. बा. तथा मामासाहेब दांडेकर. मामा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तरीही कीर्तन-प्रवचने करून समाजात वारकरी विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते. आमच्याकडे सांप्रदायिक महाराज मंडळींचा, कीर्तनकारांचा राबता होताच, पण त्यांच्यामध्ये उच्चशिक्षित म्हणता येईल असे कोणी नव्हते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या श्रोतृवृंदालाच एक मर्यादा पडे. मामांचे तसे नव्हते. मी मामांचा कित्ता गिरवायचे ठरवले. म्हणजे काय, तर तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. करायचे आणि भागवत धर्माची मांडणी व्यापक संदर्भात आणि तौलनिक दृष्टीने कीतर्न-प्रवचनांमधून करायची.

हा निर्णय मी प्राथमिक शाळेत असतानाच घेतला आणि त्याच अनुषंगाने वाचन-चर्चा करायला लागलो. मला आठवते, पहिले प्रवचन केले तेव्हा मी इयत्ता पाचवीत होतो आणि प्रवचन करताना कोणाच्या तरी टिपणावरून किंवा छापील पुस्तकावरून केले नाही. अण्णांचीही मदत घेतली नाही. माझ्या स्वत:च्या अभ्यासाच्या आणि विचारांच्या जोरावर मी हे धाडस केले. विशेष म्हणजे प्रवचनासाठी ज्ञानेश्वरीतील जी ओवी निवडली ती आध्यात्मिक आशयाची असण्यापेक्षा भाषिक स्वरूपाची अधिक होती. ‘इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी’ ही ती ओवी होती.

येथेच माझे भाषेतील स्वारस्य स्पष्ट झाले. सध्या माझ्याकडे असलेले भाषा सल्लागार समितीचे अध्यक्षपद हा योगायोग निश्चितच नाही. दरम्यान, आम्ही वारकऱ्यांच्या पालखी महासंघ या संस्थेमार्फत ‘ज्ञानेश्वरी’चा सप्तशताब्दीच्या निमित्ताने पैठण ते आळंदी अशी एक यात्रा काढली होती. मधला सर्वात महत्त्वाचा मुक्काम अर्थातच नेवासे हा होता. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली ती नेवाशात. या मुक्कामी ज्ञानेश्वर मंदिरात मी प्रवचन केले. ओवी घेतली ‘इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी’. त्या दिवशी मोठे श्रेय गवसल्याचे समाधान मला मिळाले हे वेगळे सांगायची गरज नाही. जसे प्रवचनाचे तसेच कीर्तनाचे! प्री डिग्रीच्या वर्गात असताना अधिक महिन्यातील सप्ताहात विठ्ठल मंदिरात कीर्तन करण्याचा मी हट्ट केला आणि पुरवून घेतला. ते माझे पहिले कीर्तन. अभंग माझा मीच निवडला. ‘कासयासी व्हावे आम्ही जीवनमुक्त’. त्यानंतर सात-आठ वर्षे मी अनेक ठिकाणी कीर्तन-प्रवचने केली. वारीत पालख्यांच्या शेवटचा टप्पा पंढरीच्या अलीकडील वाखरी गाव असतं. तेथे माऊलींच्या पालखीपुढे कीर्तन करायची संधी मिळणे म्हणजे मोठाच सन्मान असतो. मला ही संधी दोनदा मिळाली.

कीर्तन-प्रवचने करताना एकीकडे (अहमदनगर येथील) महाविद्यालयातील नोकरीच्या मर्यादा जाणवत होत्या. दुसरीकडे संत साहित्याचे संशोधन वृत्तपत्रे, नियतकालिकांच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमांतून मांडणे जास्त सोयीचे जात होते. त्यामुळे हळूहळू कीर्तन-प्रवचनांचे प्रमाण कमी झाले आणि विद्वत्वर्तुळातील वावर वाढला. दरम्यान, भगवद्गीतेवर संशोधन करून मी पीएच.डी मिळवली. नंतर नगरचे कॉलेज सोडून पुणे विद्यापीठात नोकरी पत्करली. विद्यापीठात तुमच्या अभ्यासाचा कस लागतो. वेगवेगळी व्यासपीठे उपलब्ध होतात. त्यांचा पुरेसा फायदा मी घेतला. कृष्णाच्या चरित्रावर मी पोस्ट डॉक्टरेल संशोधनही केले.

माझ्या संत साहित्याच्या अभ्यासाला सामाजिक परिमाण पहिल्यापासूनच होते. हायस्कूलात असताना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक विचारांवर लेख लिहून आचार्य अत्र्यांकडे पाठवून दिला. तो त्यांनी ‘दैनिक मराठा’त छापला आणि शाबासकीही दिली. पत्रकार आणि वक्ते या नात्याने अत्रे माझे ‘हिरो’ होते. त्यांची शाबासकीची थाप माझ्यासाठी त्या वयात मोठीच गोष्ट होती.

दैनिक ‘विशाल सह्य़ाद्री’चे संपादक अनंतराव पाटील यांचा माझ्यावर जीव होता. ते देहूचे आणि अण्णांचे मित्रही. त्यांनी मला ‘विशाल सह्य़ाद्री’तून लिहिते केले. त्यानंतर डाव्या कामगार चळवळीतील नेते

कॉ. भास्करराव जाधव यांचा नगरला असताना परिचय झाला. भास्कररावांमुळे लाल निशाण पक्षाच्या ‘दैनिक श्रमिक विचार’मधून नियमितपणे लेखन केले. विषयाची मर्यादा नव्हती. दरम्यान डॉ. य. दि. फडके यांचा परिचय झाला होता. त्यांच्याकडून आधुनिक इतिहासातील बऱ्याच गोष्टी समजल्या. ग. वि. केतकर यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी वर्तुळातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला. विद्यापीठात प्राध्यापक आर. सुंदरराजन यांच्यामुळे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अद्ययावत प्रवाह विशेषत: मार्क्‍सवाद यांचे आकलन वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम लेखनावर होत होता. वेगळ्या धाटणीचा नवा लेखक संशोधक अशी प्रतिमा निर्माण होत होती. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा माझा अभ्यास स्वत: अण्णा आणि चुलते भागवत महाराज यांच्यामुळे लहानपणी झाला होता. तो फडके, बाबा आढाव यांच्यामुळे अधिक पक्का झाला.

माझ्या लेखनातील वैविध्य हेरून सदा डुंबरे यांनी मला ‘साप्ताहिक सकाळ’मधून तुकोबांविषयी वेगळ्या स्वरूपाचे सदर लिहिण्याविषयी विचारले. त्यातून ‘तुकाराम दर्शन’ची निर्मिती झाली. संत साहित्याच्या क्षेत्रात ही एका नव्या ‘पॅरेडाइम’ची निर्मिती होती असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. ‘तुकाराम दर्शन’नंतर मी मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही. या ग्रंथाला ‘साहित्य अकादमी’सह अनेक पुरस्कार मिळाले. तसाच प्रकार त्यानंतरच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथाबाबत ठरला. या ग्रंथाबाबत मला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट सांगायलाच हवी. गांधीयुगात वावरलेले ठाकूरदास बंग, डॉ. अभय बंग आणि अमृत बंग या तीन पिढय़ांना हा ग्रंथ आवडला. डॉ. बंग यांनी तर मालेगाव येथे या ग्रंथावर कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांचे शिबिर घेतले. वक्ता मी एकटाच. हा एक मोठा पुरस्कारच म्हणायला हवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीला ५० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आढावा घेणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र’ची निर्मिती झाली. या ग्रंथाची नीट दखल घेतली गेली नाही, याचे शल्य नव्हे, पण खंत आहे.

सदर लेखनाचा ‘फॉर्म’ निवडण्याने माझ्या लेखनात खंड म्हणून पडलाच नाही. ‘दैनिक लोकसत्ता’मधील ‘समाजगत’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे सदर संपते न संपते तोच माझी पंजाबातील घुमान येथील ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यासाठी निवडणूक लढवताना लोकांच्या प्रेमाचा, आदराचा आणि आपुलकीचा अविस्मरणीय असा अनुभव आला. मराठी लेखकांसाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे एक प्रेयच असते. नगरच्या कारकीर्दीत आमच्या कविमित्रांचा एक चांगला ग्रुप जमला होता. अरुण शेवते, चंद्रकांत, पालवे, श्रीधर अंबोरे इत्यादी. या काळात रसरसून कविता लिहिल्या. नंतर ‘उजळल्या दिशा’ हे दलित चळवळीवरील नाटक लिहिले तेव्हा अतुल पेठेच्या मैत्रीच्या उपलब्धी झाली.

मात्र संशोधन आणि अभ्यास या प्रांतात खोलवर शिरले की लागते लेखनासाठी लागणारी फुरसत – (वेळ या अर्थाने नव्हे, तरल ‘मूड’ या अर्थाने) मिळत नाही. त्यामुळे कविता थांबलीच. ‘शिवचरित्र’ नाटक लिहिले. काही प्रयोगांनंतर ते थांबले. खरे तर आजच्या परिस्थितीने त्याच्या प्रयोगांची फारच आवश्यकता आहे. बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्या संबंधावरील नाटक लिहून तयार आहे, पण त्या विषयाला हात घालायला कोणी पुढे येत नाही ही आणखी एक खंत.

वारकरी संप्रदायासाठी अधिक काम करता यावी म्हणून विठ्ठल पाटील यांच्याबरोबर वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली. परिषदेमार्फत भरलेल्या पहिल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळताना मला कृतार्थतेचा एक वेगळाच अनुभव आला. ‘पेरले म्हणजे उगवते’ या म्हणीचा प्रत्ययही आला. खरे तर या गोष्टी म्हणजे आपण केलेल्या कर्माच्या पावत्याच म्हणाव्या लागतात. अशी आणखी एक पावती नुकतीच मिळाली. पुणे विद्यापीठाने संत नामदेव अभ्यासनाच्या प्रमुखपदी माझी निमंत्रण देऊन निवड केली.

पदाची अभिलाषा मला कधीच नव्हती. आपले काम करीत राहणे. बाकीच्या गोष्टी आपोआप होतात अशी माझी धारणा आहे. त्यानुसार मला पुणे विद्यापीठात जबाबदारीची अनेक पदे मिळाली. व्यवस्थापन परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. चांगला प्राध्यापक म्हणून महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला, पण कुलगुरू मात्र होऊ शकलो

नाही. तेथे राजकारणे आडवी आली. शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र संबंध नसणारी मंडळी अवकाशातून उतरल्यासारखी टपकतात हे अनुभवले. मात्र त्याचे वाईट वाटायचे कारण नव्हते. कारण करण्यासारखी खूप कामे हातात होती आणि ती केलीसुद्धा.

अशीच एक गोष्ट राजकारणाचीही आहे. राजकारणाविषयीही मला लहानपणापासूनच कमालीचे आकर्षण. घरात येणारी वृत्तपत्रे, पुस्तके गावातील राजकीय वातावरण, वडिलांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग आणि कॉ. विष्णुदेव चितळे यांच्याशी संबंध, भागवत महाराजांच्या राजकीय वर्तुळातील वावर एवढी पाश्र्वभूमी त्यासाठी पुरेशी होती. १९६२ मध्ये दहा वर्षांचा असतानाच संयुक्त महाराष्ट्र समितीचे रिपब्लिकन पक्षाने पुरस्कृत केलेल्या माझ्या तेव्हाच्या हिरोचा म्हणजे आचार्य अत्र्यांचा प्रचार मी पुणे मतदारसंघात केला. पुढे १९७८ मध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत माझा सहभाग होता. तेव्हा मला हवेली मतदारसंघातून तिकीट मिळाले होते असे म्हणण्यापेक्षा तिकीट वाटप करणाऱ्यांमध्येच मी होतो असे म्हणणे अधिक उचित होईल. पक्षाला दलित पँथरशी युती करायची असल्यामुळे मला मिळालेले तिकीट मी पांडुरंग जगताप यांना दिले. १९८० च्या निवडणुकीत मात्र मला मिळालेले तिकीट प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिल्लीच्या श्रेष्ठींकडून बदलून घेतले.

पण हे बरेच झाले असे मला आता वाटते. राजकारणी म्हणून माझी जागा घ्यायला अनेक मंडळी तयार होती. लेखक, संशोधक म्हणून मात्र ती घेणे तसे अवघडच म्हणता येईल. येथे आपले ‘एकमेवत्व’ हे नुसते प्रेय नाही तर श्रेयही आहे.

सदानंद मोरे  sadanand.more@rediff.com

chaturang@expressindia.com