मराठी भाषा खूप लवचीक आहे. वळवावी तशी वाकते. एकच शब्द, पण त्याच्या वेगळ्या उच्चाराने अर्थाचा विपर्यासही होऊ शकतो. तर कधी ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, अनुस्वार यांच्या चुकीमुळे अनेक घोटाळे, गमती होऊ शकतात. तर अगदी ‘ध’ चा ‘मा’ही होऊ शकतो. पण थोडं लक्ष देऊन केलं की मात्र मराठी भाषेचा गोडवा काय वर्णावा ..
मराठीचं व्याकरण आणि शुद्धलेखन हा मोठा गंभीर चच्रेचा विषय होत चालला आहे. विषय गंभीर, त्यात चर्चाही गंभीर आणि चच्रेतून जे काही निष्पन्न व्हायचं असेल ते तर आणखीनच गंभीर! अचूक ऱ्हस्व, दीर्घ आणि जोडाक्षरांसह अचूक शब्दांचे प्रयोग केलेली उत्तरं आजकाल एनडेंजर्ड – स्पिसीज (!) सारखी दुर्मीळ व्हायला लागली आहेत. मुद्दाम जड ‘अंग्रेजी’ शब्द वापरला बरं का! म्हणजे ज्यांच्यासाठी हा लेखनपसारा, त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं थोडं तरी लक्षं जाईल. नुसतं आणि नुसतंच मराठी लिहिलं की मुलांना ते जड जातं म्हणतात. तसंही, ‘‘मराठी वर्डस् रीिडगला आणि रायटिंगला डिफिकल्टच जातात’’ असं आमची महाविद्यालयीन मुलं कौतुकाने (?) म्हणतातच.
तर या मुलांना बहुधा शालेय स्तरावर मराठी व्याकरण फारसं भेटलंच नसावं (रस्त्यात जाता जाता कोणीतरी अचानक भेटतं ना, तसंच आणि तेवढंच आजकाल अभ्यासक्रमात व्याकरण भेटतं म्हणतात!)  शिवाय ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, अनुस्वार आणि एखाद्याच वर्णाच्या अंतरामुळे (किंवा चुकीमुळे) शब्दांचा अर्थ कितीतरी बदलतो हे खूपशा मुलांना माहितीच नाही असं मला जाणवलं. ‘‘अंऽऽ! तेवढय़ाने काय होतं मॅडम?’’ असा एकूण सूर असतो. या चुकांसाठी गुण कापले जावेत असा विद्यापीठाचाही आग्रह नाही (पदवी आणि पदव्युत्तर सर्व शाखांचा विचार करता.) नाहीतर एका चुकीसाठी एक अष्टमांश जरी गुण कापला तरी प्रत्येक विद्यार्थी दहा गुणांनी मागे येईल याची खात्री आहे. सध्या ‘‘भावनाओं को समझो!’’ चा जमाना असल्यामुळे मुलांनी अपेक्षित सारांश लिहिला आहे का, पाहायचे आणि पुढे चालायचे, असा उत्तरपत्रिका तपासण्याचा क्रम आहे. ‘‘कालाय तस्मं नम:’’ असे म्हणू या. न का कापेनात गुण कोणी? पण निदान ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा यात बदल केल्याने शब्दांचा अर्थ बदलू शकतो हा तर विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा? म्हणून म्हटलं उचलावा पेन आणि घ्यावेत थोडे ‘पेन्स’! काय गफलती होत असतील विद्यार्थ्यांच्या प्रमाण मराठीबाबत?
सगळ्यात मोठी गफलत मला जाणवली ‘न’ आणि ‘ण’ ची. यात बोलीभाषांचाही परिणाम आहे आणि बोलण्यावर आक्षेप मी घेत नाही. पण लिहिताना किंवा छापलेले वाचताना ही गफलत विद्यार्थी सर्रास का करत असावेत? त्यांना त्यामुळे काही फरक पडतोय हेच मान्य नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खालील काही ओव्यांची रचना मला करून पाहावीशी वाटली.
१)    ‘‘खुण-निजभेटीची, खुन – हत्या कोणाची ।
    किमया ‘ण’ ‘न’ ची, जाणून घ्यावी॥
२)    घण – घाली घाव, घन – श्याममेघ जाण ।
     घन आणि घण, एकची कैसी?॥
३)    तण – गवत वाळले, तन – शरीर आपुले ।
     त्यात अंतर चांगले, नाही का रे?॥
४)    मन आणि मण, उच्चाराचे अंतर ।
     एक असे अंतरंग, दुजे वजनाचे माप॥
     केवळ ‘ण’ आणि ‘न’ च्या फरकाने अर्थात किती फरक पडतो ते फक्त समजून घेण्यासाठी हा एक प्रयत्न. त्या ओव्यांचे अर्थ सांगत बसण्यात अर्थ नाही आणि गरजही नाही. पण अशी गफलत करणाऱ्या मुलाच्या मित्राचे नाव ‘नमन’ असेल तर तो हाका कशा मारत असेल हा प्रश्न मला पडतोच पडतो. म्हणून हा उपद्व्याप ‘मणातल्या मणात वाचू णको बरं!’ हे वाक्य ऐकायला कसं वाटतं सांगा बरं! ते तर जाऊच द्या. ही मुलं ‘जन गण मन’ कसं म्हणत असतील हा मोठा राष्ट्रीय प्रश्नही मला भेडसावतो ! असो.
ऱ्हस्व आणि दीर्घ यातील फरकांमुळे खूपदा अर्थ बदलत नाही असंच मुलं म्हणतात. कारण ‘मंदिर’ लिहिले काय आणि ‘मंदीर’ लिहिले काय, काय फरक पडतो? असा सूर असतो. सगळ्याच नाही, पण काही  शब्दांना फरक पडतो हे सांगण्याचा प्रयत्न आपण आणखी काही ओव्यांमधून करू या.
१)    दिन तो दिवस, दीन तो गरीब
    दीनांसाठीच सजग, दिनभरी राम॥
२)    शंका म्हणजे ‘किंतू’ पण परंतु        ते ‘किंतु’
    दीर्घ तू ऱ्हस्व तू ॥ भेद जाणा ॥
३)    सूत-माझ्या पोरा । सूत्र म्हणजे दोरा  
    कशासाठी करा । एकत्रित ? ॥
 एका ऱ्हस्व, दीर्घ, वेलांटी किंवा उकाराने अर्थ बदलणारे असे अनेक शब्द सापडतील. त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यास कोणीही आपले नाव ‘सुशिला’ सांगणार नाही. कारण हा शब्दही मुळात ‘सुशीला’ असा आहे आणि त्याचा अर्थ उत्तम शील म्हणजे चारित्र्य असणारी असा आहे. तर शिला म्हणजे दगड आणि सुशिला म्हणजे चांगला दगड असा अर्थ ध्वनित होणार आहे.                                          
     आता अनुस्वाराची गंमत पाहू या.
१)     ‘मंद’ करी वेग कमी, ‘मद’ आणी नशा भारी,
    दोहोत भेद कितीतरी, अनुस्वाराने॥
२)    ‘रंग’ सुखाविती नेत्र, ‘रग’ ताण दे विचित्र
    अनुस्वाराने हे चित्र, पालटे किती?॥
३)     ‘खत’ वाढवी झाडाला, ‘खंत’ पोखरी मनाला
    काय अनुस्वाराला या, अर्थ नसे?॥
४)    ‘चिता’ जाळीते देहाला, ‘चिंता’ पोळवी मनाला
    काय अनुस्वार येथे, व्यर्थ झाला?
जशी उलटापालट या अनुस्वारांमुळे होते तशीच उलटापालट आणखी एका चुकीमुळे होते. अक्षराला काना देताना जागा बदलली (आणि बरेचदा बदलली जाते) की, अर्थ बदलतो. त्याच्या गमतीदार उदाहरणांच्या रचना अशा –
१)    ‘‘गाय’ तीर्थक्षेत्र ऐसे, जे की चालते बोलते ।
    ‘गया’ तीर्थक्षेत्र ऐसे जे की स्थिरच रहाते ॥
    गाय आणि गया, दोन्ही कैसे रे समान ।
    शुद्ध लिहा रे लिहा रे, दोन्ही पुण्याचे साधन ॥
२)     ‘मरा’ आणि ‘मार’
    किती दोन्हीत अंतर
    एक कातर कातर
    दुजा ठोकण्या तयार
हा जो अर्थामध्ये पडलेला फरक आहे, हा केवळ काना बदलल्याने होतो आहे आणि असाच फरक ‘भरा आणि भार’ ‘भला आणि भाल’ किंवा ‘धरा आणि धार’ या शब्दांतही आढळतो. असे आणखीनही कितीतरी शब्द आढळतील. तसेच मात्रा बदलल्याने अर्थ बदलणारे शब्दही आढळतील. सांगायचे एवढेच की, काना आणि मात्रा यांच्याकडे नीट लक्ष न दिल्याने ‘गौरवपर’ शब्दांचा ‘गरवापर’ होऊ शकतो।
आता हाच सूक्ष्मसा भेद, सूक्ष्म अशा रेषेने कसा होतो ते बघा.
एक शब्द ‘वळ’
जो पाठीवरी उठे
एक शब्द ‘बळ’
ज्याने मरगळ हटे
‘वळ, बळ’ शब्द दोन
एका रेषेचे अंतर
दुसऱ्याच्या प्रयोगाने
पहिला ये पाठीवर॥
एक रेघ विसरल्याने किंवा वाढवल्याने हे असं होतं. हा परिणाम घाईचा असतो, दुर्लक्षाचा असतो, की अज्ञानाचा, हा भाग वेगळा. पण परिणाम होतो हे मात्रे खरे. मग ‘‘आषाढस्य प्रथम दिवसे’’ मध्ये ‘आपाढ’ शब्द कसा वाटेल? किंवा पोषण शब्दाच्या ‘प’मध्ये एक रेघ जास्ती पडल्याने षोषण
(हा शब्द शोषण असा लिहितात पण..) हा चक्क विरुद्धार्थीच शब्द तयार होईल. अर्थाच्या छटा बदलवणाऱ्या या चुका टाळायच्या असतील तर, मुळात अर्थाना छटा असतात आणि किंचितशा चुकीमुळेही त्या बदलतात हे विद्यार्थीमित्रांना माहिती हवं एवढंच! ‘अनावृत’ आणि ‘अनावृत्त’ या शब्दांमध्ये केवळ ‘त्’ (हलन्त त) चा फरक आहे. पण अनावृत म्हणजे जाहीर किंवा आवरण नसलेले असा अर्थ आहे तर अनावृत्त म्हणजे ‘पुन्हा न येणारे’ किंवा पुन्हा ‘आवृत्त’ न होणारे असा अर्थ आहे. किंचित अशा फरकाने, अर्थामध्ये जेव्हा जमीन-अस्मानाचा फरक पडलेला दिसतो, तेव्हा प्रमाण भाषा लेखनाचे महत्त्व अधोरेखित होते.
आता आणखी एक गमतीचा प्रकार म्हणजे एकाच प्रकारे लिहिलेल्या एकाच शब्दाचे अर्थ भिन्नत्व. यात अनुस्वार, काना-मात्रेच्या चुकांचाही प्रश्न नाही पण जो अपेक्षित अर्थ आहे, तो न घेता दुसराच घेतला तर गडबड होऊ शकते. जसे.
१)     ‘अर्थ’ शोधावा जाणावा ।
    शब्द शब्द ज्याचे घर॥
    ‘अर्थ’प्राप्तीच्याचसाठी ।
    नको जीवा लावू घोर ॥
इथे ‘अर्थ’ शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक ‘आशय’ आणि दुसरा ‘पसा’
२) दुष्ट दर्जनाचा शब्द। नको घेऊस ‘कोरडा’ ॥
    त्याच्या परीस ‘कोरडा’। ओढी त्यावरी ॥
    इथे कोरडा म्हणजे शुष्क, वाळलेला असा अर्थ पहिल्या ओळीत तर दुसऱ्या ओळीत कोरडा म्हणजे चाबूक असा अर्थ आहे.
३) जेथे नाही ताजेपण ।
    तेथे स्वाद, गंध ‘शिळा’ ॥
    दुजा शब्द जाण ‘शिळा’ ।
    म्हणती दगडा ॥
इथे शिळा म्हणजे जे ताजे नाही ते आणि शिळा म्हणजे दगड, पाषाण असे दोन अर्थ आले आहेत. उपमा शब्दाचेही दोन अर्थ आहेत. एक म्हणजे रवा भाजून केलेला खाण्याचा पदार्थ आणि दुसरा मराठीतील अलंकार जसे ‘प्रेमाला उपमा नाही.’
 आता ऱ्हस्व, दीर्घादी फरक किंवा अनुस्वारांच्या
गडबडी माहितीच नाहीत असा एक वर्ग असू शकतो आणि गडबडी होतात हे माहिती आहे, ‘पण लक्षात कोण घेतो?’
असा दुसरा वर्ग असू शकतो. हे दोन्ही वर्ग शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संबंधात आपण करीत आहात. कारण त्यांच्याकडून चुका होताना धडधडीत दिसत
आहेत आणि (इतरांकडून होत असतीलही तरी..) त्यांच्याच चुकांशी, मला प्राध्यापक असल्यामुळे देणं-घेणं आहे.
मनोरंजन वाटेल अशा वेगवेगळ्या प्रयोगांमधून जर या चुकांची जाणीव करून दिली गेली, त्यामुळे होणारे घोटाळे लक्षात आणून दिले गेले, तर मनं न दुखावता, बोलीचा संबंध न तोडता, लेखन वाचनातल्या चुका कमी होतील अशी आशा वाटते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल प्रमाण मराठी लेखनाकडे वाढेल अशीही आशा वाटते.
chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shudh lihi re shudh blog
First published on: 28-09-2013 at 01:01 IST