फक्त ‘मी-माझं’मध्येच गुंतून न राहता स्वत:च्या जमिनीवर ऊस कामगारांच्या शेकडो मुलांचं पालकत्व घेण्यासाठी ‘सोनदरा गुरुकुला’ची स्थापना करणारे सुदामाकाका आणि सिंधुमामी. अचानक ते अपघातात गेल्यानंतर त्या दु:खातून फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेत आई-वडिलांचा व्यापक, संवेदनशील, सजग पालकत्वाचा वसा पुढे चालवणारी त्यांची मुले अश्विन आणि कल्याणी यांच्यामध्ये रुजलेल्या अनेक मूल्यांविषयी…

‘हृदयकी शिक्षाही शिक्षकका हृदय है!’ प्रत्येक वेळी गाडी पुणे-बीड रस्त्यावरून डोमरीच्या रस्त्याला वळली की माझी नजर उत्सुक बनते. बंधाऱ्याजवळच्या छोट्या पुलावरून पुढे गेलं की ती पांढरीशुभ्र शिळा… त्यावरचे केशरी रंगातले ‘हे’ शब्द ‘सोनदरा गुरुकुला’ची आणि संस्थापकांची मूल्यं आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत नि:संदिग्धपणे पोहोचवतात. या शब्दांनीच माझं गुरुकुलाशी अतूट नातं जुळलं.

सुदामदादा, सिंधुमामी, अश्विनची उत्फुल्ल सहचरी कार्तिकी, आणि सगळ्यांचं चित्त चोरणारी गोड आनंदी, ही चौघं अचानक आकाशात वीज कडाडून लुप्त व्हावी तशी एका अपघातात लुप्त झाली. अश्विन-कल्याणी या बहीण-भावावर आभाळच कोसळलं. आम्हा सर्व सुहृदांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या दोघांच्या तीव्र आक्रोशातही एक शहाणपण जाणवलं मला. गावातील लोक नेहमीच्या सवयीप्रमाणे छाती पिटून, गळे काढून आक्रोश करत देवाला बोल लावत होती. तेव्हा कल्याणी रडता रडता विचारत होती, ‘‘काका, खूप शिकायचं राहून गेलं तुमच्याकडून. आई, का गं असं सोडून गेलात?’’ दु:खाचा पहाड कोसळलेला असताना हा प्रश्न? ‘‘कोणत्या मुशीतून घडली ही मुलं?’’ या प्रश्नाला उत्तर एकच-सुदामकाका आणि सिंधुमामी याचं व्यापक, संवेदनशील, सजग पालकत्व.

मराठवाड्यातील हराळी गावात साधारण २०११च्या सुमारास मी कामाला सुरुवात केली. २०१४मध्ये येथील शाळेत नवा गट सामील झाला, तेव्हा अश्विन-कल्याणीला पहिल्यांदा भेटले. आम्ही मजेत तीन वर्षं बरोबर काम केलं. वेगळ्या विचारानं भारावलेल्या, नवी स्वप्नं बरोबर घेऊन आलेल्या या तरुणाईच्या उत्साहाची लागण मलाही झाली! इतक्या तळमळीनं कामं करणारे अश्विन आणि कल्याणी जेव्हा मला ‘सोनदरा गुरुकुला’त आग्रहानं घेऊन गेले तेव्हा त्यांच्या आईवडिलांना मी पहिल्यांदा भेटले. विचार अतिशय प्रगल्भ, वागण्यात साधेपणा, भेटणारा प्रत्येक जण ‘आपला’ असं मानून त्याचं स्वागत करणारी ही माणसं पाहून इथे एक ‘आनंदाचं बेट’ वसलंय हे जाणवलं. पुण्यात ही दोघं भेटली असती तर माझ्या शहरी मनानं ‘असेल एखादा शेतकरी आणि त्याची कारभारीण’ असं

म्हणून कदाचित लक्षही दिलं नसतं.

३८ वर्षांपूर्वी स्वत:च्या जमिनीवर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी गुरुकुल काढण्याचं स्वप्न कशाच्या बळावर पाहिलं असेल त्या दोघांनी? कसं पेललं असेल ते आव्हान? केवळ स्वप्नं पाहण्याची ताकद आणि ती सत्यात आणण्याची जिद्द! त्यासाठी आवश्यक ते शिकण्याची तयारी, आणि योग्य मार्गावरूनच चालण्याचा हट्ट! मगच ‘सोनदरा गुरुकुल’ नावाचं अद्भुत रसायन तयार झालं. आज गुरुकुलाच्या मुलांच्या शब्दात शेकडो मुलं ‘बेझिझक’ आकाशात भरारी घेत आहेत.

स्वत:च्या मुलांबरोबर इतर असंख्य मुलांचं पालकत्व या दोघांनी मनापासून स्वीकारलं. मलाही त्यांच्या कुटुंबाची सदस्य असल्याप्रमाणे भरभरून प्रेम आणि आनंद दिला. फक्त ‘मी-माझं’मध्येच गुंतून न राहणाऱ्या अशा ‘वेगळ्या’ माणसांचा सहवास खूप प्रेरणादायी असतो. दुरून बघणाऱ्याला ही माणसं तारेवरची कसरत करत आहेत असं भासलं, तरी ती पूर्णपणे सजग आणि सहज असतात. आपल्या मुलांना स्वत:वर अन्याय होतो आहे असं वाटू न देता असंख्य मुलांचं पालकत्व समर्थपणे, प्रेमानं निभावणं हे ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’!

अश्विन आणि कल्याणीबद्दल काय सांगू? हृदय लोण्याहून मऊ, पण निर्णय घेताना खंबीर, लवचीक आणि ठाम! आई-वडिलांसारखीच प्रेमळ, दुसऱ्याचं दु:खं जाणण्याची क्षमता असणारी आणि दुसऱ्याचं मन जपणारी ही भावडं! उच्च शिक्षण घेऊनही साधेपणाचा आई-वडिलांचा वसा पुढे चालवताहेत. इतर असंख्य मुलांबरोबर वाढण्याची संधी आपल्या मुलांना मिळते आहे आणि हा त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे याची जाणीव सुदामाकाका आणि सिंधुमामींना होती.

मुलांना आपण कोणीतरी ‘खास’ आहोत असं वाढीच्या वयात वाटणं धोक्याचं आहे हे त्यांना उमजलं होतं. निवासी गुरुकुलाचे पालक या नात्यानं त्यांचं प्रेम प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं तरी अश्विन-कल्याणीला ‘ते आपल्या प्रेमातले वाटेकरी’ असा मत्सर वाटणार नाही याची आपल्या आचरणातून काळजी घेण्याची सजगता आणि संवेदनशीलता दोघांजवळ होती.

कल्याणी आठवणी सांगण्यात रंगली. सगळी मुलं वडिलांना ‘काका’ म्हणायची म्हणून ही दोघंही ‘काका’च म्हणायची. सकाळी झोपेतून उठवताना काकांची हाक यायची, ‘‘कल्याणराव, उठा की आता. सकाळ झाली.’’ आई म्हणायची, ‘‘कले ऊठ की आता! किती वेळ झोपशील?’’ ही दोघांची उठवण्याची पद्धत जशी वेगळी होती, तसेच त्यांचे स्वभाव आणि काम करण्याची पद्धतही अगदी भिन्न होती. पण त्यांनी कधीही सूचना किंवा उपदेश केल्याचं आठवत नाही. त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती एकमेकांसाठी, गुरुकुलासाठी आणि अश्विन-कल्याणीच्या वाढीसाठी पूरक होत्या. ती सांगत होती, ‘‘आता कुठे लक्षात येतं की त्यांच्या आचरणातून असंख्य मूल्यं आमच्यामध्ये सहज रुजत गेली. गुरुकुलात शिकताना ‘त्यांची’ मुलगी म्हणून एखाद्या गोष्टीत मुभा किंवा इतर मुलांपेक्षा वेगळी वागणूक मला कधीही मिळाली नाही.’’ या दोघा भावंडांमधील समतेच्या तत्त्वाचा पाया लहानपणीच पक्का झाला. अश्विन मुलगा आणि ती मुलगी असा भेदभाव चुकूनही झाला नाही. (समता म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार न्याय्य वागणूक मिळणं आणि समानता म्हणजे व्यक्तींमधील भिन्नता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भिन्न गरजा लक्षात न घेता सगळ्यांना एकसारखी वागणूक देणं.)

मुलगी म्हणून कल्याणीला ‘‘मुलांबरोबर खेळू नकोस, व्यायाम करू नकोस’’ अशा सूचना कधीही आई-वडिलांनी दिल्या नाहीत. मुलांबरोबर खेळायला, बागडायला, डोंगरदऱ्यांत करवंदं खात भटकायला तिला मोकळं रान होतं. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पहिल्यांदा गावातून शहरात एकटी निघाली तेव्हा ती म्हणाली, ‘‘कोणीतरी माझ्यासोबत चला ना. मला एकटीला भीती वाटते.’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘कल्पना चावलाच्या सोबतीला तिची आई अंतराळात गेली होती का?’’ आई म्हणाली, ‘‘अगं, बसमध्ये एवढी माणसं असतात की! एकटी कुठे असणार तू?’’ अशा प्रतिसादांमुळे कल्याणी सक्षम, आत्मनिर्भर होत गेली. इंजिनीअर झाली. स्वत:चा जीवनसाथी अनिरुद्ध, स्वत: निवडला. दोघं मिळून अमळनेरमध्ये ‘मिलके चलो’ या त्यांच्या संस्थेमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनाची ओळख छोट्या गावातील वंचित मुलांना करून देतात. ‘फिरती प्रयोगशाळा’ घेऊन गावागावांत जाऊन मुलांशी गप्पा मारत विज्ञान किती मजेदार आहे हा विचार कृतीद्वारे पोहोचवतात. कल्याणी जशी तिच्या आईवडिलांचं निरीक्षण करत मोठी झाली तसाच त्यांचा छोटा अभंग आईवडिलांची कामाविषयी असलेली निष्ठा, त्यांची धडपड अनुभवत मोठा होतो आहे; उपक्रमात सहभागी होतो आहे. मुलं शंभर बौद्धिकं ऐकून जे शिकत नाहीत ते सहभागातून आणि निरीक्षणातून शिकतात हे त्यांना ठाऊक आहे.

अश्विन कल्याणीपेक्षा मोठा. त्याचीही आईवडिलांशी छान दोस्ती होती. आईवडील गुरुकुलाचे पालक झाल्यावर साहजिकच अश्विन आणि कल्याणीसाठी वेगळा वेळ काढणं कठीण व्हायचं. जबाबदाऱ्याच डोंगराएवढ्या असायच्या. पण जेव्हा ‘क्वालिटी टाइम’ हा शब्दही कानावर आला नव्हता, त्या काळात असा वेळ अश्विन कल्याणीसाठी शाळेला सुट्टी लागली की ते जाणिवपूर्वक काढत.

अश्विन म्हणाला, ‘‘आपलं आणि आपल्या आई-वडिलांचं नातं हा ‘फक्त आपला’ स्वतंत्र अनुभव असतो. आपले आई-वडील ध्येयानं भारलेल्या एका मोठ्या परिवाराचे सदस्य, खरं तर नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहेत, याची जाण खूप उशिरा आली. पण लहानपणीही ते वेगळेपण जाणवत असे.’’ अश्विननं गुरुकुलातच दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. वडिलांबद्दल बोलताना तो गहिवरून सांगत होता, ‘‘काका स्वत: त्या परिवाराचे फक्त एक सदस्य म्हणून वावरत असत. गुरू, समुपदेशक, साधक, सेवक, श्रमिक, मित्र, अखंड शिकणारा शिष्य, प्रयोगशील संशोधक, सर्जनाची आस असलेला कलाकार आणि दुसऱ्याची प्रगती पाहून आनंदानं हसणारा ‘माणूस’- अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका आपण निभावतो आहोत याची जाण त्यांना होती. नेतृत्वाचा कोणताही आव न आणता सहविचाराला सगळ्यात जास्त महत्त्व देणारं हे नेतृत्व निसर्गासमोर सदैव नतमस्तक असायचं. आपल्याला खूप कमी कळतं हे त्यांना सदैव मान्य असायचं.

पालकांशी संवाद साधताना, ‘‘अहो, तुम्ही नारळाचं झाड लावलं आहे ना? मग त्याला आंबेच यावेत असा आग्रह धरून कसं चालेल? तुमच्या मुलांच्या सुप्त क्षमता त्याला समजू तर देत. त्या एकदा समजल्या की त्या क्षेत्रात तो नक्की यश मिळवेल.’’ असं ते सहजपणे सांगत. बारावीनंतर काय करावं असा सल्ला अश्विननं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘काळ खूप वेगानं बदलला आहे. मला त्यातलं काही कळत नाही. तू स्वत:च शोध घे आणि ठरव.’’ अश्विनच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांच्याकडे होतं हे त्याला मोठेपणी लक्षात आलं. अनेक घरांमध्ये ऐकलेल्या ‘‘तुमच्या हिताचंच सांगतोय! चार पावसाळे जास्ती पाहिलेत मी! शिंग फुटलीत तुम्हाला. शेंबूड पुसायची अक्कल नाही अजून आणि माझ्याशी हुज्जत?’’ आधीच्या पिढ्यांमधल्या अशा संवादापेक्षा वरचा संवाद किती हृद्या, प्रांजळ आणि मुलाचा आत्मविश्वास दृढ करणारा आहे!

दोघांनी मुलांचे फाजील लाड बिलकूल केले नाहीत. अश्विनचं वय वाढत गेलं तसं काकांनी बोलण्यातील विषयाचं वैविध्य, खोली आणि व्याप्ती वाढवत नेली. आठवीत असताना सुट्टीत सकाळी दोघं फिरायला गेले. काकांनी विचारलं, ‘‘आपली वडिलोपार्जित थोडीशी जमीन आहे. आपल्याच्यानं आता ती कसणं होत नाही. आपण वर्षभर ती ठेक्यानं द्यायची का?’’ तेव्हा फारसं कळलं नाही. दोघांनी चर्चा केली, पण आपल्याला वडिलांनी निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतलं, हे मोठेपणी अश्विनच्या लक्षात आलं. आठवी-नववीत असताना मुलींबद्दल आकर्षण वाटू लागणं स्वाभाविक आहे हाही मामी-काकांच्या बोलण्याचा विषय असायचा. आपल्याला सध्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे केवळ अश्विनलाच नव्हे, तर गुरुकुलातील इतर मुलांच्याही दोघं सहजपणे लक्षात आणून द्यायची.

सानेगुरुजी, गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, ‘समरहिल’चा ए. एस. नील आणि जगभरातील अशाच असंख्य ‘मुलांच्या बाजूनं’ असणाऱ्या सगळ्या ‘वेगळ्या’ शिक्षकांची मूल्यं कोणताही अभिनिवेश न बाळगता जगलेली ही दोघं आणि त्यांच्या जिद्दीचे साक्षी कल्याणी आणि अश्विन, आता राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे भरारी घेत आहेत. आता त्या चौघांनी भरभरून दिलेल्या प्रेमाची आणि मूल्यांची शिदोरी गाठीला आणि साथीला पत्नी सुवर्णा आणि तिची छोटी शिवन्याचे हात हाती घेऊन अश्विन पुढे चालतो आहे

hemahonwad@gmail.com