आजूबाजूची परिस्थिती बदलली असली तरी बदललेला नाही तो म्हणजे माणूस व त्याचे स्वाभाविक गुणदोष!  प्रेम, आपुलकी, स्नेह याबरोबरच सत्तेची व द्रव्याची हाव, द्वेष, सूडभावना आणि त्याचबरोबर माणसाचा शाश्वत सुखाचा शोध, ज्ञानाची लालसा, विश्वाचा कारभार चालवणाऱ्या जगन्नियंत्याविषयी वाटणारी ओढ व कुतूहल या गोष्टीही आहेतच. म्हणूनच साडेतीन हजार वर्षांपूर्वी सांगितलेली गीता आजही तितकीच महत्त्वाची ठरते.या गीतेवरचं, वेगळ्या नजरेतून पाहिलेलं  ‘गीताभ्यास’ हे सदर महिन्याच्या चौथ्या शनिवारी.
श्रीमद्भगवद्गीता
जवळजवळ साडेतीन हजार वर्षांपूर्वी गीता सांगितली गेली. तेव्हापासून शंकराचार्य, ज्ञानेश्वर वामनपंडितांपासून लोकमान्य टिळक, डॉ. राधाकृष्णन, पू. विनोबाजी यांसारख्या ज्ञानी तत्त्वचिंतकांनी गीतेवरील आपले विचार ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. सध्याही अनेक जण गीतेच्या माध्यमातून डॉक्टरेट मिळविताना दिसतात. त्यात काहीतरी अनाकलनीय तत्त्वज्ञान असेल असं वाटून सर्वसामान्य जनता मात्र गीतेपासून जरा लांबच राहते. साधारणपणे काही खास प्रसिद्ध श्लोकांपुरतीच मर्यादितपणे गीता लोकांमध्ये परिचित आहे. साध्या-सोप्या भाषेत रंजकतेने गीतेचा अभ्यास कसा करता येईल याचा विचार करणं गरजेचं झालंय.
ज्या काळात गीता सांगितली गेली तो काळ व आजचा संगणकीय, जेट वेगाने पळणारा काळ. यात खरं तर भाषिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा कुठल्याच अंगाने साम्य नाही. संपूर्णत: बदललेल्या व अधिकच संघर्षमय बनलेल्या सद्य:परिस्थितीने गीता काही मार्गदर्शन करू शकेल का?
   इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे आजूबाजूची सर्वागीण परिस्थिती बदलली असली तरी बदललेला नाही तो म्हणजे माणूस व त्याचे स्वाभाविक गुणदोष! माया-ममता, प्रेम, वात्सल्य आपुलकी, स्नेह याबरोबरच सत्तेची व द्रव्याची हाव, द्वेष सूडभावना इत्यादी मनाच्या भावभावना जशा कौरव-पांडवांच्या वेळी होत्या त्या आजही तशाच आहेत. त्याचबरोबर माणसाचा शाश्वत सुखाचा शोध, ज्ञानाची लालसा, विश्वाचा कारभार चालवणाऱ्या जगन्नियंत्याविषयी वाटणारी ओढ व कुतूहल या गोष्टीही आहेतच.
जीवन संपूर्ण बदललं, विज्ञानाने असंख्य चमत्कार केले. अवकाशातील ग्रह-ताऱ्यांची ओळख घडावी या दृष्टीने मानवाने झेप घेतली, त्याचबरोबर मानवी देहातील हृदय रूपाने धडधडणाऱ्या चेतनेची ओळख करून घ्यावी असंही वाटून मानवाची आध्यात्मिक ओढही वाढू लागली त्यामुळे विचारवंत व इतरही अशा ग्रंथांचा अभ्यास करू लागले. मानवाचा अभ्यास व शोध हे जीवनात सुख, शांती, आनंद मिळावा यासाठीच विशेषत: चालू असतो. याचं कारण मानवी जीवनात संघर्ष, दु:ख अशांनी अतृप्तता यांचाच धुमाकूळ चालू आहे. यापासून दूर पळण्याच्याच प्रयत्नात माणूस जगतो आहे.
या सर्व जीवनसंघर्षांचं मूळ आहे माणसाचं मन! वासना, आकांक्षा, इच्छा या मनात जन्म घेतात व इंद्रियांद्वारा पुऱ्या केल्या जातात.
सध्याचं जीवन तर अधिकच समस्याप्रधान झालं आहे. भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, सूडबुद्धी, महागाई या गोष्टींमुळे माणूस बेजार झाला आहे. यातून सुटायचा मार्ग शोधतो आहे. या परिस्थितीवर गीता कशी व काय मार्गदर्शन करील हे पाहायला हवं.            पू. विनोबाजी तर म्हणतात की,
 गीताई माउली माझी- मी तिचा बाळ नेणता
  पडता झडता घेई उचलून कडेवरी।।
या ओळी वाचल्यावर कुतूहल अजूनच वाढतंय. सर्व समस्यांवरचं उत्तर त्यांना गीतेत सापडतं. कारण गीता या सर्व दु:खांचं, अमंगलाचं मूळ असणाऱ्या मनावरच नेम धरते. प्रत्येक बाबतीत हपापलेल्या माणसाला विचारपूर्वक मनातील भाव-भावनांचा कल्लोळ कमी करीत मनात परिवर्तन घडवून आणायचा प्रयत्न करायला लावते. इंद्रियसुखाचं क्षणिकत्व पटवून त्याचं शमन करायला सांगते. अर्थात याचा अर्थ असा घ्यायचा नाही की, रूप-रंग रस-गंध स्पर्श या ज्ञानेंद्रियांचा उपभोग घ्यायचाच नाही- जरूर घ्या, पण त्यांची आसक्ती कमी ठेवा. असा मनावर आवर ठेवला की, गरजा कमी होतील, गरजा कमी झाल्या की, दु:ख कमी होईल. द्रव्य-संचय होईल व मनात उचंबळणाऱ्या वृत्ती थोडय़ा शांत होतील हे नक्की!
  गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या ओळी फारच प्रसिद्ध आहेत. या ओळींचा खरा व योग्य अर्थ कळला तर नैराश्यग्रस्त लोकांच्या आत्महत्या कमी व्हायला मदत होईल. सर्वसाधारणपणे ‘फळाची आशा न धरता कर्म कर’ असा या ओळींचा अर्थ घेतला जातो, पण इथे भगवंत सांगत आहेत की, तू तुझं कर्म म्हणजे जे कर्तव्य आहे ते, मनापासून जीव लावून, प्रयत्नपूर्वक उत्कृष्टपणे पार पाड. कारण तुझ्या हातात तेवढंच आहे. तुझ्या कर्माचं फळ तुला कधी-कसं मिळणार यावर तुझा काहीच अधिकार नाही. फक्त फळाकडे लक्ष ठेवून कर्म केलंस तर इच्छित फळ न मिळाल्याने नैराश्य येऊ शकतं. फळासाठी कर्म करू नकोस- कर्तव्य समजून कर. शाळेत याचं शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांच्या कोवळ्या वयातल्या आत्महत्या टळू शकतात.
माणसाचा आणखी एक मोठा शत्रू म्हणजे अहंकार. अर्जुनाला तू मारलं नाहीस तर हे कौरव मरणारच नाहीत का? तू मारणारा कोण व ते मरणारे कोण? असा खडा सवाल करून भगवंत त्याचा अहंकारही पूर्णपणे घालवायचा प्रयत्न करताहेत. अर्जुन गीतेच्या सुरुवातीलाच शत्रूंमध्ये आपल्या गुरू, आजोबा, आप्तवर्ग या सर्वाना बघून मोहग्रस्त होतो, तेव्हा तू क्षत्रिय धनुर्धर आहेस, रणांगणावर लढण्यासाठी जन्माला आला आहेस. तेव्हा लढणं हाच तुझा धर्म आहे, तेव्हा हा शोक सोडून देऊन तू तुझा क्षत्रिय धर्म पाळ. लढ. असं स्वधर्म व स्वकर्म याचं तत्त्वज्ञान भगवंत या वेळी अर्जुनाला सांगतात.
गीतेतले ‘स्वकर्म’ व ‘स्वधर्म’ हे शब्दही फार चपखल आहेत. स्वकर्म म्हणजे एखाद्या कार्यात किंवा परिस्थितीत एखाद्या माणसाने, माणूस म्हणून, त्याला जे करणं शक्य असेल ते करून योग्य दिशेने, विवेकाने मदत करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणं. तसंच ‘स्वधर्म’ म्हणजे स्वत:चं धर्मवत असणारं कर्तव्य. जीवनात माणसाला अनेक भूमिका पार पाडायच्या असतात. यात हिंदू-ख्रिश्चन असा धर्माचा अर्थ नाही. आपल्या भूमिकांनुसार आपला धर्म बदलतो. ‘पतीधर्म’, ‘पत्नीधर्म’ ‘शेजारधर्म’ अशा शब्दांनी वेगवेगळी कर्तव्ये पार पाडली जातात असा ‘धर्म’ या ठिकाणी अभिप्रेत आहे.
अशा तऱ्हेने मोह, अहंकार, वासना, दु:ख या मानवी भावनांपासून निर्माण होणारे संघर्ष कसे टाळावे? गोंधळलेल्या मनाचं कर्तव्य कसं ओळखावं इत्यादी मार्गदर्शन सर्वसामान्यांसाठी गीतेकडून मिळतं. समाजात संसार काळज्यांनी बद्ध, अशी माणसं जास्त असली तरी काही श्रद्धावान, विचारवंत, संन्यासी अशा वेगवेगळ्या स्तरांची माणसं असतात. ‘मी’ सोडून इतर सर्व जगाचं ज्ञान बहुजनांना असतं तर केवळ ‘मी’चं ज्ञान हवं असणारे लोकही असतात. या ज्ञानाला अध्यात्म ज्ञान म्हणतात. गीतेत आत्मस्वरूपाचा अनुभव हा पायाभूत विचार आहे. त्यामुळे वृद्धांपासून सिद्धांपर्यंत सर्व स्तरावर गीता कार्य करते. परमेश्वर प्राप्ती हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे व ते प्राप्त करण्याचे कर्ममार्ग, भक्तीमार्ग व ज्ञानमार्ग हे तीन मार्ग प्रामुख्याने गीतेत दिसतात.
या विवेचनावरून हे लक्षात येईल की, गीता ही मानव कल्याणासाठी सांगितली गेल्यामुळे गीता हे जीवनविषयक शास्त्र असून, त्याला वैश्विक मूल्य आहे. याचा अभ्यास त्यामुळेच अखंड चालू राहणार हे खरे!