जसजसा घडय़ाळाचा काटा पुढे सरकत अकरावर गेला तससशी आईची अस्वस्थता फारच वाढली. आणि सनईवालेदेखील तिची धांदल पाहून स्वत:च इतके अस्वस्थ झाले की अकरापासूनच सनई तोंडात धरून बसले. न जाणो टांगा दारात येऊन उभा राहायचा आणि पहिला सूर क्षणभर उशिरा वाजायचा.. इतक्यात सनई वाजायला लागली आणि लगेच थांबली. असं का झालं, बघायला मी बाहेर गेलो आणि लक्षात आलं की टांगा आमच्या दारासमोर न थांबता पुढे निघून गेला..
आम्हा लुकतुके मंडळींना बारीकसारीक गोष्टींचा उत्साह जरा जास्तच आहे. हा ‘उत्साह’ आमच्या फॅमिलीला माझ्या माहितीप्रमाणे- गेल्या तीन पिढय़ा चिकटून आहे. माझे पणजोबा, माझे आजोबा आणि माझे वडील हे सर्व या ‘उत्साहाच्या’ बाबतीत ‘मागच्यापेक्षा पुढचा सरस’ असेच आहेत आणि नवलाची गोष्ट म्हणजे या तिघांना बायकाही अशा काही मिळाल्या की प्रत्यक्ष ‘उत्साहानं’ लाजेनं खाली मान घालावी!
त्यातल्या त्यात आमची आई म्हणजे कहरच आहे, आता आमच्या आईची थट्टा करण्याचा माझा हेतू नाही. परंतु लहानपणापासून या जन्मवेगळ्या उत्साहानं माझ्या आयुष्याचा एवढा मोठा भाग व्यापला आहे की कुणाला तरी त्याबाबत सांगितल्याखेरीज माझ्या मनाला हलकं वाटणार नाही.
पुण्याला बाजीराव रोडवर नुकत्याच बांधलेल्या एका मुंबई-फॅशन इमारतीत आमचा चार खोल्यांचा ब्लॉक आहे. आमचा तळमजला असला तरी बिल्डिंग थोडी आतल्या बाजूला असल्यामुळे रस्त्यावरच्या वर्दळीचा आणि उडणाऱ्या धुरळ्याचा त्रास होत नाही. आजूबाजूचा परिसर स्वच्छ-शांत आहे. भरपूर झाडी आहे. त्यामुळे गारवाही आहे. वाणी-धोबी-बँक-मंडई आणि मुख्य म्हणजे तुळशीबाग जवळ असल्यामुळे अनेक दृष्टीनं जागा सोयीची आहे. आम्हीही खाऊन-पिऊन सुखी आहोत.. आमच्या घरातली एक खोली आई-वडिलांची, एक आम्हा मुलांची, एक बैठकीची आणि एक स्वयंपाकघर! एकंदरीत पाहता आमचा ब्लॉक तसा ऐसपैस आणि टुमटुमीत आहे.
माझे वडील म्हणजे रामचंद्र लुकतुके. आई- विमलाबाई लुकतुके. आम्ही भावंडं तीन! मी मोठा गजानन, मधला विन्या म्हणजे विनायक आणि धाकटी सुली म्हणजे सुलभा! गेल्या वर्षी सुलीचं- एका बँकेत मानाच्या जागेवर काम करणाऱ्या अजय सातपुते यांच्याशी लग्न झालं. आणि त्यानंतर आमच्याकडे मोठय़ा धूमधडाक्यात जो दिवाळसण साजरा झाला, त्याचीच हकिकत सांगण्याचा माझा मानस आहे.
बाकी दिवाळसणच कशाला, आमच्याकडे काय वाट्टेल ते असू दे, प्रत्येक गोष्ट अगदी धूमधडाक्यातच होते आणि सारखं मुळी काहीतरी सुरूच असतं. कुणाला केळवण, कुणाला डोहाळजेवण, एकदा दादांच्या मित्रांना पार्टी, तर कधी आईच्या समाजातल्या बायकांचं गेट-टु-गेदर! कधी कुणी इंग्लंडला निघाला तर निरोपसमारंभ, तर परत आला की, स्वागताप्रीत्यर्थ समारंभ. घरातल्या सर्वाचे वाढदिवस दणक्यात साजरे होतात ते वेगळेच! त्याशिवाय वर्षांतले सर्व सण, आईचे नेमधर्म हेही त्यात धरले म्हणजे मग वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस आमचे धामधुमीतच जातात. गेल्या वर्षी दादांचा एकसष्टी समारंभ झाला, तोसुद्धा एखाद्या लग्नासारखा गाजला. आमच्या आईनं एखादी गोष्ट ‘करायची’ म्हटलं की घरातल्या ठरावीक गोष्टी वायुवेगानं फिरायला लागतात. कुणाला म्हणून जराही उसंत मिळत नाही.
सर्वात पाहिली गोष्ट म्हणजे बैठकीच्या खोलीतील पुस्तकाची दोन अवाढव्य कपाटं हलवून आमच्या मुलांच्या खोलीत न्यायची आणि बाहेरच्या खोलीत जागा मोकळी करायची! ही अवजड कपाटं मी आणि विन्यानं आमच्या आजवरच्या आयुष्यात किती वेळा हलवली असतील आणि तशी ती हलवताना आमच्या कंबरेत किती वेळा लचक भरली असेल, ते फक्त त्याला आणि मलाच माहीत! बरं ‘ती कपाटं आमच्या खोलीत कायमची ठेवू’ म्हणायची सोय नाही. कारण अलीकडे कुणाच्याच घरात पाहायला न मिळणाऱ्या अस्सल ‘बर्मा टीक’ची ती बनवलेली आहेत. तेव्हा अन्य दिवशी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती बैठकीच्या खोलीत दिसलीच पाहिजेत, असा आईचा आग्रह असतो.
ही हलवाहलव करून झाली की खिडक्यांचे पडके, दिवाण व सोफा यांची कव्हरे, आईचे क्रोशाने भरलेले जाळीचे टेबलक्लॉथ, बेडरूममधील चादरी, उशांचे अभ्रे, नॅपकिन वगैरेसारख्या सर्व गोष्टी गाठोडय़ावारी धोब्याकडे जातात. स्वयंपाकघरातील पितळी डबे चिंचेने घासून लख्ख केले जातात. सकाळ, दुपार, संध्याकाळ- ज्याला जसा वेळ मिळेल तसा इतर लाकडी वस्तूंना वॉर्निश लावून चकचकीत करायचं, हा आणखी एक कार्यक्रम पार पडतो. जेव्हा पाहावं तेव्हा नोकर लोकांच्या हातात- पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांच्या हातात जसे भगवे झेंडे फडकतात- तसे लांब काठीचे झाडू दिसतात आणि मग अशा सर्व आयुधांनी घर असं काही साफ केलं जातं की जळमटांची काय बिशाद ते दिसतील. सांदीकोपऱ्यांत एखादा क्षुद्र कीटक घर करून राहिलेला असेल तर त्या निरुपद्रवी प्राण्यालाही आम्ही क्षणार्धात निर्वासित करून टाकतो. थोडक्यात म्हणजे आईच्या तोंडून आज्ञा व्हायचा अवकाश घरातला प्रत्येकजण पाय लावून पळत सुटलो. आणि दोन दिवसांच्या आत घराचा आरसे महाल करून टाकतो. ..तशी आम्ही तिन्ही भावंडं रंगानं सावळीच आहोत. परंतु आईच आम्हाला ‘उजळ’ म्हणत असल्यामुळे आम्हाला तेवढा ब्रासो वगैरे लावला जात नाही.
एवढं सगळं झालं की आणखी एक मुलखावेगळी गोष्ट आमच्याकडे केली जाते. ती म्हणजे मी किंवा विन्यानं जाऊन सनईवाल्यांना सांगून यायचं. या सनईवाल्यांचे आणि आमचे गेल्या कित्येक जन्मींचे काय ऋणानुबंध आहेत, माहीत नाही. परंतु घरातल्या प्रत्येक मंगलप्रसंगी दारात सनई ही वाजलीच पाहिजे ही आमच्या आईची एक आवड आहे. शिवाय त्याने कोणते कोणते राग वाजवायचे ते प्रसंगानुरूप- वेळेनुरूप ठरलेलं आहे. लग्नापूर्वी आईच्या गाण्याच्या तीन परीक्षा झाल्या आहेत. तेव्हा संगीताच्या बाबतीत तिच्याशी मतभेद दाखवायला कुणी धजत नाही. आजुबाजूच्या लोकांना आताशा या सनईचे काही वाटेनासं झालं आहे. आमच्या दारात सनई सुरू झाली की ‘असेल काही लुकतुक्यांकडे.’ म्हणत प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होतो.
हा सर्व थाट मंगळागौर, डोहाळजेवण अशा एकेक दिवसाच्या समारंभाच्या वेळीसुद्धा होतो. मग यंदा तर ‘सुलीचा दिवाळसण’! ‘जावईबापू’ घरी येणार. मग तो थाट काय विचारता, ‘आपला जावई घरी येणार’ म्हणजे आईला जणू वाटत होतं की- स्वर्गातून प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरणार!
अगदी प्रथम या दिवाळसणाची चर्चा झाली तो दिवस मला चांगला आठवतो. नुकताच घरातला नवरात्रीचा गोंधळ संपला होता. घरातल्या हलवलेल्या वस्तू जागच्या जागेवर जाऊन विसावल्या होत्या आणि घरातला प्रत्येकजण ‘हुश्श’ करत सकाळचा चहा पीत होता. पण दोन घोट सरळपणे घशाखाली गेले नाहीत, तोच आईनं सहज एक वाक्य उच्चारलं, ‘‘म्हटलं, वीस दिवसांवर सुलीचा दिवाळसण आला!’’ तिचे शब्द हवेत विरघळले नाहीत तोच माझ्या हातातला कप हिंदकळला. विन्याला ठसका लागला आणि एकमेकांकडे सूचक नजरेनं पाहून आम्ही हातातले कप टाकून कपाटं हलवायला धूम ठोकली. नाहीतरी उद्या हलवायचीच, मग आत्ताच हलवली तर कुठे बिघडलं? पण आमचा तो बेत काही सफल झाला नाही. कारण पाठोपाठ आई ओरडली, ‘‘गजा गाढवा, लगेच कपाटं काय हलवता? आज का दिवाळसण आहे? चांगले २० दिवस आहेत. पंचवीस वर्षांचा झालास पण अजून पोरकटपणा काही जात नाही. आणि हा विन्याही तसलाच. चहा घ्या आधी!’’
आम्ही परत फिरलो. वीस दिवस म्हणजे वीस युगं असल्यासारखी वाटली आणि अगदी खुशीत आम्ही उरलेला चहा संपवला. तो दिवस बरा गेला. पण दुसरा जो उगवला तेव्हा एकेका गोष्टीला वेग येऊ लागला. चक्रं फिरू लागली.
प्रथम चर्चा सुरू झाली ती ही की, ‘‘जावयाला दिवाळसणाचं म्हणून काय द्यायचं? टाय पिन, टी-सेटपासून फिअॅट गाडीपर्यंत जगातल्या सर्व वस्तूंची चिरफाड झाल्यावर ‘टी.व्ही.’ देण्याच्या मुद्दय़ावर सर्वाचं एकमत झालं आणि मग नेहमीप्रमाणे फर्मान सुटलं. मी आणि विन्यानं नंतरच्या दोन दिवसांत पर्वतीच्या पायथ्यापासून ते थेट कँपपर्यंत सर्व दुकानं पालथी घातली. आणि ‘आखूडशिंगी बहुदुधी गाई’ प्रमाणे- सगळे चॅनल्स पाहता येणार- पण त्यातल्या त्यांत स्वस्त असा एक देखणा टी.व्ही. घेऊन आलो. त्या दिवशी आमची आई येता-जाता टीव्हीपाशी उभी राहून त्याला उगाचच गोंजारत होती. दुसरा दिवस मंगळवार होता. चांगला दिवस म्हणून आईनं टी.व्ही.ला हळद-कुंकवाचं बोट टेकवलं. आणि मग त्याची रवानगी खोक्यासकट पुन्हा झोपायच्या खोलीत झाली.
जावयासाठी ही खरेदी झाल्यावर ‘सुलीला काय द्यायचं’ याचा विचार सुरू झाला. दोन तास कापडाच्या दुकानांत बसून दीडएकशे साडय़ा खालीवर केल्यावर सुलीच्या रंगाला शोभेल अशा अस्मानी चंदेरी साडीची आईनं निवड केली. तिच्या सासूबाई- दोन नणंदा यांच्याही साडय़ा घेऊन झाल्या. मॅचिंग ब्लाऊजपीस घेतले, त्यानंतर सुलीच्या गळ्यातला एक दागिना आमच्याकडे होता. ‘दिवाळीच्या वेळी देता येईल’ म्हणून तो लग्नात दिला नव्हता. त्याला एकदा सोनाराकडून पॉलिश करून आणलं. आणि लेक आणि जावयाकडची माणसं यांच्यापुरता देण्याचा प्रश्न मिटला. हो एक राहिले. जावयासाठी नुसता टी.व्ही. काय द्यायचा? एक ‘वस्त्र’ हवं म्हणून शर्टपीस-पँटपीस घेऊन आलो.
देण्याघेण्याचा प्रश्न अशा तऱ्हेनं मिटल्यावर दुसरा वादविवादाचा मुद्दा चर्चेला आला, तो म्हणजे चार दिवस जावई राहणार, तेव्हा रोज जेवायला काय करायचं? या मुद्दय़ावर बराच काथ्याकूट करून झाल्यावर पहिल्या दिवशी साजूक तुपातला मोतीचूर लाडू, दुसऱ्या दिवशी जिलबी आणि तिसऱ्या दिवशी जावईबापूंच्या आवडीचं श्रीखंड करायचं असा बेत नक्की ठरला. आता प्रश्न, आला आचाऱ्याचा! ‘काँट्रॅक्ट देणं’ ही गोष्ट आईच्या मते ‘तुच्छ’ असल्यामुळे सर्व बारिकसारीक गोष्टींची जमवाजमव करून प्रत्येकाच्या कंबरेचा काटा ढिला झाला की मगच तो समारंभ उत्तम पार पडला, असं आईला वाटतं. अखेर आईच्या माहेरच्या माहितीतल्या एका खास आचाऱ्याला हाताखाली दोन माणसं घेऊन बोलवायचं ठरलं. आमच्या घरांत म्हणजे प्रत्येक गोष्ट स्पेशल पाहिजे. फडतूस गोष्टींना शिरकावच नाही.. शेवटी दिवाळसणासाठी मिरजेहून लोण्याचा डबा आला. वाण्याकडून आंबेमोहर तांदळाचं पोतं आलं. उत्तरेला असलेल्या सुमन मावशीकडून ‘कॅश्मिरी केशर’ येत असल्याचं पत्र आलं. असं सर्व झालं, तेव्हा आई भलतीच खुशीत आली.. शेजारच्या सासुरवाशिणी-आईच्या मैत्रिणी एक दिवस नाना तऱ्हेचे गव्हले करून गेल्या. काही बायका येऊन फराळाचं करून गेल्या. थोडक्यात म्हणजे आमच्याकडच्या दिवाळसणामुळे आजूबाजूच्या बायकांची झोप उडाली. त्यांनाही श्वास घ्यायला फुरसत नाही. अशी स्थिती झाली.
हो खरंच, एक राहिलंच! मध्यंतरी पाच-सहा दिवसांत घराला रंग लावून झाला. लवकर काम व्हायला पाहिजे म्हणून चार खोल्यांच्या घराला रंग लावायला आठ रंगारी आले. या सर्वाच्या जोडीला वर सांगितल्याप्रमाणे कपाट हलवण्यापासून ते जाळी-जळमटं उडवण्यापर्यंत सर्व गोष्टी करून झाल्या. आणि अशा तऱ्हेने जय्यत तयारी करून आम्हा लुकतुक्यांचा जीव दिवाळसणाची श्वास रोखून वाट पाहू लागला.
* * *
सुलीच्या सासुरवाडीला पत्र गेलंच होतं. आता फक्त त्यांच्याकडच्या उत्तराची आम्ही वाट पाहत होतो. एक दिवस त्यांचं पत्र आलंही. परंतु पत्र फोडतानाचा आनंद आणि उत्सुकता, मजकूर वाचल्यावर राहिली नाही. त्यातल्या मजकुरानं आई बरीच निराश झाली. सुलीचे सासू-सासरे ‘प्रवास झेपणार नाही’ म्हणून येणारच नव्हते. म्हणजे आपलं वैभव दाखवून त्यांचे डोळे दिपवू, असं जे आईला वाटत होतं, त्यावर पाणी पडलं. परंतु पहिल्या दिवशीपासून जावईबापूंच्या दोन बहिणी आणि दोन भाचे येणार होते. आईला मग दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार होती.
अखेर करता करता दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. आज सुली आणि इतर मंडळी यायची होती. आईनं चार वाजताचा गजर लावला होता. त्या आवाजानं आम जनता खडबडून जागी झाली. उठलेल्या क्षणापासून प्रत्येकानं एकेका खोलीचा ताबा घेऊन टाकला आणि सर्व ओ.के. झाल्यावर प्रत्येकानं सूर्योदयापूर्वी अंघोळ करून घेतली आणि फराळ केला.
बाहेरचा माळी एकसारखा बागेत फिरत होता. ‘झाडाचं पान पडतं कधी आणि मी ते उचलतो कधी’ असं त्याला झालं होतं. नऊ वाजल्यावर शेजारची मंदा नाना रंगांनी भरलेल्या वाटय़ा घेऊन आली. आणि रांगोळीनं आणि त्यांत रंग भरून तिनं दरवाजासमोर ‘सुस्वागतम्’ ही अक्षरं छापल्याप्रमाणे काढून टाकली. थोडय़ा वेळानं आईनं पाहिलं तर ‘सु’मधला उकार कुणाच्या तरी पावलानं थोडा फरपटला होता. म्हणून धावत आत जाऊन तिनं रांगोळी आणली आणि तो रिपेअर करून टाकला. साडेदहा वाजता सनईवाले आले, सुलीची गाडी खरं म्हणजे साडेअकराला येणार होती. पण या सनईवाल्यांचा काही नेम नाही, म्हणून आईने त्यांना साडेदहाची वेळ दिली होती. ‘जावईबापूंचा टांगा दारात दिसला की लगेच वाजवायचं बरं का!’- हे वाक्य आईनं त्या तासाभरांत पस्तिसाव्यांदा उच्चारलं. आणि तितक्या वेळा बैठक मारून बसलेल्या सनईवाल्यांनी होकार दिला.
जसजसा घडय़ाळाचा काटा पुढे सरकत अकरावर गेला तससशी तिची अस्वस्थता फारच वाढली. आणि सनईवालेदेखील तिची धांदल पाहून स्वत:च इतके अस्वस्थ झाले की अकरापासूनच सनई तोंडात धरून बसले. न जाणो टांगा दारांत येऊन उभा राहायचा आणि पहिला सूर क्षणभर उशिरा वाजायचा. आजूबाजूच्या घरांतून आता डोकी डोकावू लागली. मी आणि विन्या केवळ आईच्या समाधानासाठी बैठकीच्या खोलीत उगीचच फिरून ‘फिनिशिंग टचेस’ देत होतो.
इतक्यात काय झालं की सनई वाजायला लागली आणि लगेच थांबली. असं का झालं, बघायला मी बाहेर गेलो आणि लक्षात आलं की टांगा आमच्या दारासमोर न थांबता पुढे निघून गेला. पुन्हा थोडा वेळ शांतता पसरली. आईनं दारावरचं तोरण उगाचच सारखं केलं आणि तिरक्या डोळ्यात आजूबाजूच्या घरातून डोकावणाऱ्या मंडळींचा अंदाज घेतला. समाधान पावली.
११-२० ला खरोखरच सुलीचा टांगा घरासमोर थांबला. सनई सुरू झाली. आम्ही दोघं टांग्यातलं सामान काढायला बाहेर धावलो. आई ओवाळण्याचं तबक घेऊन बाहेर आली आणि सखू कामवाली भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायला पुढे सरसावली.
परंतु येवढं सगळं करून सगळंच मुसळ केरात गेलं. टांग्यात सुलीच्या दोन नणंदा, दोन भाचे आणि सुली दिसत होती. परंतु मुख्य पात्रच् कुठे दिसेना. सर्वाचा आणि त्यांतल्या त्यात आईचा फारच विरस झाला. शेवटी सुलीनं उलगडा केला की बँकेतल्या काही महत्त्वाच्या कामामुळे तिचे ‘हे’ आले नव्हते. आता ते पाडव्याच्या दिवशी सकाळी येऊन संध्याकाळी लगेच परत जाणार होते. आईचा इतका विरस झाला की विचारायला नको. शेजारणींची डोकी तोंडाला पदर लावून आत गेली. सनईवाले कपाळावर आईच्या नकळत हात मारून घेत निघून गेले, अर्थात पाडव्याच्या दिवशी ठीक साडेदहाला येतो, असं सांगून! मंडळी आत आली. दिवाळीचा एकेक दिवस उजाडला आणि मावळला. सुलीचे दोन भाचे इतके दांडगट होते की आमच्या व्यवस्थित घरातली एक वस्तू म्हणून जागेवर राहिली नाही.
शेवटी एकदाचा पाडवा उजाडला. पहिल्यासारखी जय्यत तयारी झाली. आणि सर्व काही व्यवस्थित जुळून साडेअकराला सनईच्या स्वरावर हेलावत जावईबापू घरात प्रवेश करते झाले. आईनं तिच्या एका कवयित्री मैत्रिणीकडून दोन काव्यं लिहून घेतली होती. ती शेजारच्या मंदानं गोड आवाजात म्हटली. एक- ओवाळण्याच्या प्रसंगाला आणि एक जेवताना! जेवणाचा बेत उत्तम झाला होता. एकंदर समारंभ छान पार पडला. आणि संध्याकाळी सुलीला आणि टी. व्ही.ला घेऊन जावईबापू निघून गेले. सुलीला निदान १५ दिवस तरी ठेवायची होती, हे आईचं पालुपद मधूनमधून सुरू होतं. परंतु ऑफिसमध्ये होणाऱ्या पार्टीला ती हजर असायला हवी, या सबबीखाली शेवटी तीही गेली. गेले २० दिवस परमेश्वरासारखा वाटणारा जावई आईला थोडा ‘फडतूस’ वाटला हे तिच्या चेहऱ्याकडे पाहून समजत होतं. परंतु तिला काहीच बोलता येईना. आधीचे १५ दिवस जावयाचं वर्णन करून करून तिचंही तोंड फाटायला आलं होतं. पण आता ‘सगळाच तोंड बांधून बुक्क्याचा मार’ झाला होता.
दिवाळी संपली आणि दुसऱ्या दिवशी मी आणि विन्यानं अक्षरश: ताणून दिली. आम्ही फक्त जेवणापुरते खोलीच्या बाहेर पडलो. वीस दिवस हमालासारखे राबल्यामुळे अंग नुसतं आंबून गेलं होतं. आईही काही बोलली नाही. तिचा मूडच गेला होता. तिचा पडलेला चेहरा पाहायला शेजारच्या साळकाया-म्हाळकाया डोकावून गेल्या. पण मी आणि विन्या मात्र खुशीत होतो. कारण अशा वातावरणात लगेच काही घरात घडेल, अशी आशा नव्हती.
पण वाचक हो, तो आमचा मनोरा चार दिवसांनी साफ कोसळला. एका सुप्रभाती चहाच्या वेळी आईनं ‘सुलीचा वर्ष-सण’ आल्याची घोषणा केली आणि पुन्हा एकदा उभं घरदार हादरलं! हे असं नेहमी चालतं आमच्या घरात! बाकी याचा मनाला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. मुली असतो तर निदान सासरी गेल्यावर तरी यातून सुटका झाली असती. पण तेही नाही नशिबांत! आता कुणी आम्हालाच घरजावई करून घेतलं, तर कुणास ठाऊक! त्याच आशेवर तग धरून आहोत.
chaturang@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 2nd Nov 2013 रोजी प्रकाशित
सुलीचा दिवाळसण
जसजसा घडय़ाळाचा काटा पुढे सरकत अकरावर गेला तससशी आईची अस्वस्थता फारच वाढली.
First published on: 02-11-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suli and her after marriage diwali