तुझ्याच घरातल्या कुणीतरी तुझ्यावर करणी केली आहे किंवा तुझ्यावर प्रेतात्म्याची काळी छाया आहे म्हणून तुला त्रास होतोय, असं बिनदिक्कत सांगत ते एखाद्याच्या गळी उतरवलं जातं आणि अगदी जवळची माणसंही दुष्ट वाटायला लागतात. सुखदेवच्या बाबतीतही तेच झालं, मात्र वेळीच मदत मिळाल्याने दुरावणारं एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं.
सुखदेव वय वर्षं ३५, उंचपुरा, सुदृढ. आपल्या बायको, मुलं व सावत्र आई सखुबाईसह शेतातल्या वस्तीवर राहात होता. ८-१० एकर बागाईत शेती, उसासारखे नगदी पीक, गोठ्यात ७-८ जर्सी गाई, दुधाचा व्यवसाय. सर्व कसं सुखासमाधानानं सुरू होतं. मधल्या काळात सुखदेवची तब्येत अचानक बिघडली. अशक्तपणा, पाठीचं दुखणं यामुळे शेतातल्या कामावरही परिणाम होऊ लागला. गोठ्यातल्या गाईंचं संगोपन करणंही सुखदेवला जमेनासं झालं. त्यामुळे काही गाई विकणं त्याला भाग पडलं. सतत ७-८ महिने डॉक्टरांकडे जाऊन सुखदेव थकला. त्याची पाठदुखी काही थांबत नव्हती. औषधोपचार सुरूच होते.
एक दिवस कुण्या मांत्रिकाने सुखदेवला सांगितलं, ‘तुझ्या घरातल्या व्यक्तीनेच तुझ्यावर करणी केली आहे.’ झालं! सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे सुखदेवने उपचार सुरू केले. मांत्रिकाकडे सुखदेवच्या फेऱ्या सुरू झाल्या. दर अमावास्या-पौर्णिमेला तो त्याच्याकडे जात होता, तर दुसरीकडे पत्नीच्या आग्रहामुळे डॉक्टरांचे औषधही सुरू होते.
भगताकडे जाऊन आल्यापासून सुखदेवचं घरातलं वागणं बदललं. तो आईशी वाद घालू लागला, तिचा द्वेष करू लागला. भगत प्रत्येक वेळी सुखदेवला त्याच्या आईविषयी भडकवत असे. त्यामुळे सुखदेवनं हळूहळू आईला घरात राहणं मुश्कील केलं. तो परिसरातील लोकांना, नातेवाईकांना ‘माझ्या आईनं माझ्यावर करणी केली, म्हणून मला दुखणं आलं.’, असं सांगू लागला. तिला सुखदेवशिवाय जवळचं कोणीही नव्हतं. पण आता तोच तिच्या जिवावर उठला होता. आजूबाजूच्या वस्तीवरचे लोकही सीताबाईंकडे संशयाने पाहू लागले.
सुखदेवच्या गावातच राहणारा त्याचा मावसभाऊ शरद एक दिवस माझ्या कार्यालयात आला. त्याने सर्व घटना मला सांगितली. पदवीधर असलेल्या शरदचा मांत्रिक-तांत्रिक, बुवा-बाबा, भगत यांच्यावर मुळीच विश्वास नव्हता. तो मला म्हणाला, ‘‘सुखदेवला आता बरं वाटतंय. पण आईबद्दल त्याच्या मनात असलेला राग-द्वेष संपला नाही. तो बऱ्याच वेळा आईला मारायला धावून जातो. तिला जगणं मुश्कील केलं आहे. आम्हाला भीती वाटते की, त्याच्या हातून काही चुकीचं घडेल.’’ शरदबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर तो गेला. मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकरण अवघड आणि नाजूक होतं. सुखदेवच्या मनात त्याच्या सावत्र आईविषयी असलेला गैसमज दूर होणं गरजेचं होतं.
शरद भेटून गेल्यानंतर पुढे तीन दिवसांनंतरच अमावास्या होती. अमावास्येच्या दिवशी सुखदेवच्या वस्तीवर जायचं आम्ही ठरवलं. शरद पूर्णपणे सहकार्य करत होता. अमावास्येच्या दिवशी सकाळी मी आणि माझे दोन ज्येष्ठ सहकारी प्रथम सुखदेवच्या गावी गेलो. शरद आणि सुखदेवची वस्ती यांच्यात साधारणत: एक किलोमीटर अंतर होतं. आम्ही प्रथम शरदच्या वस्तीवर गेलो. तिथं प्राथमिक चर्चा करून मी, माझे एक सहकारी (प्रा. विनायक बंगाळ) व शरद मोटारसायकलवर सुखदेवच्या घरी जाऊन थांबलो.
शरदने आमची ओळख त्याचा मित्र व मित्राची बहीण अशी करून दिली. सुखदेवच्या पत्नीने चहा ठेवला. आम्ही चहा पीत असतानाच दाराशी भगवे कपडे घातलेले, हातात कमंडलू, काखेत झोळी घेतलेले, दाढी-जटा वाढलेले एक साधूमहाराज आले. त्यांनी दाराशी येताच देवाचे नाव घेत एक आरोळी ठोकली. सुखदेव पटकन उठून दारात गेला. महाराज त्याला पाहतच म्हणाले, ‘‘तू मोठ्या संकटात आहेस.’’ त्यावर सुखदेवने महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं आणि ‘‘माझ्या आईनंच करणी केली, उपचार सांगा बाबा, नाहीतर मी बरबाद होईल.’’ असं म्हणाला.
महाराज खाली बसले. २-३ मिनिटं डोळे बंद करून काही तरी मंत्र म्हणाले. त्यानंतर डोळे उघडून ते सुखदेवला म्हणाले, ‘‘नाही. तुझ्यावर कोणी करणी केली नाही. तुझ्या शेतावर प्रेतात्म्याची छाया आहे, ती छाया तुला त्रास देते आहे, तो आत्मा त्रास देतो आहे, ती प्रेतात्म्याची छाया नष्ट करावी लागेल.’’ त्यांनी सुखदेवला नारळ आणायला सांगितला. घरात नारळ नव्हता. महाराजांनी त्यांच्याच खांद्यावरच्या झोळीत असलेला नारळ काढला, त्यांच्याच झोळीतले पूजाविधीचे साहित्य काढले. हे सर्व सुरू असताना आजूबाजूच्या वस्तीवरचे १०-१२ लोक तिथे जमा झाले होते. नारळ हातात घेऊन महाराज मोठ्यामोठ्याने मंत्र म्हणत व आवाज करत सुखदेवच्या उसाच्या शेताच्या दिशेने निघाले. सुखदेवच्या हातात पाण्याने भरलेला गडू व त्यात आंब्याची पानं होती. तो चालत असताना त्याच्या मागे ते महाराजही चालत होते. सुखदेवला गडूमधील पाणी मागे शिंपडायला सांगितले होते.
महाराज सुखदेवच्या घरापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर गेले व तिथेच महाराजांच्या हातातील नारळाने पेट घेतला. महाराज तिथेच थांबले. त्यांनी मोठमोठ्याने मंत्र पुटपुटत नारळ तिथेच जमिनीत पुरला. त्या ठिकाणी फुलं, हळदीकुंकू वाहून बराच वेळ पूजा केली. महाराज सुखदेवला म्हणाले की, ‘‘प्रेतात्मा आता तुला छळणार नाही. त्याची काळी छाया मी या नारळात घेतली आणि जाळून नष्ट केली. तुझ्या कुटुंबाचं संकट नष्ट झालं.’’ आम्ही हे सर्व मुकाट्यानं पाहात होतो. सुखदेवचा चेहरा तणावविरहित झाल्यासारखा दिसत होता. त्याने महाराजांचे पाय धरले. ‘‘महाराज तुम्हाला काय देऊ?’’ असं त्याने विचारलं. ‘‘मला काही नको’’, असं म्हणत महाराज झपाझप पाऊल टाकत चालत तिथून निघून गेले. सर्व लोक महाराजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होते.
सुखदेवच्या घरावरचं, कुटुंबावरचं संकट टळलं होतं. प्रेतात्म्याची छाया नष्ट झाली होती. त्याची तब्येतही सुधारली. सावत्र आईबाबत त्याच्या मनात निर्माण झालेला संशय नष्ट झाला होता. कुटुंबात पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू झालं. सुखदेव पूर्ववत काम-धंदा, मेहनत करू लागला. त्याची आर्थिक स्थितीही सुधारली.
आम्ही शरदच्या संपर्कात होतो. मधल्या काळात पुन्हा एकदा शरदचे पाहुणे म्हणूनच आम्ही शरदच्या घरी गेलो. सुखदेवला जाणीवपूर्वक गप्पांचे निमित्त करून तिथे बोलावले. अंधश्रद्धेबाबत चर्चा केली. आम्ही त्यात कामही करतो असं सांगितलं. करणी-चेटूक-भूत-प्रेत-आत्मे असं काही नसतं असं सुखदेवच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्याच्या शेतात आलेले महाराज, त्यांनी नारळाच्या माध्यमातून जाळलेली प्रेतात्म्याची छाया आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबात आलेली सुखशांती यामुळे पूर्णपणे समाधानी होता. तो भूत-प्रेत काही नसतं, असं मानायला मुळी तयार नव्हता.
काळ पुढे सरकत होता. सुखदेवचा, वस्तीतील आजूबाजूच्या लोकांचा त्याच्या आईविषयी असलेला गैरसमज दूर झाला होता. परंतु महाराजांबाबतचा भ्रम नष्ट करणं गरजेचं होतं. शरदच्या व काही ग्रामस्थांच्या मदतीने गावात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवला. सुखदेव आणि त्याच्या पत्नीला कार्यक्रमाला घेऊन येण्याची जबाबदारी शरदवर सोपवली. ठरल्याप्रमाणे आम्ही सायंकाळी सहा वाजता गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रमात चमत्कार, सादरीकरण व त्यासोबत जनमानसात बसलेल्या अंधश्रद्धा व त्यामागची कारणं, उपाय यावर बोलत होतो. अशा प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असतं किंवा ती हातचलाखी असते असं प्रेक्षकांना सांगून ‘चमत्कार’ करणारा बदमाश असतो, त्यावर विश्वास ठेवणारा भ्याड असतो, तर त्याची शहानिशा न करणारा मूर्ख असतो’, असे वाक्य मी उच्चारताच कार्यक्रमात एक मोठी गर्जना करत महाराज अवतरले. त्यांनी ‘मी चमत्कार करतो.’ या लोकांवर विश्वास ठेवू नका, असे म्हणत एकामागून एक चमत्कार दाखवायला सुरुवात केली. नारळावर पाणी टाकून पाण्याने आग लावली, मंत्राने अग्नी पेटवला, पाण्याचा प्रसाद केला. पाण्याने दिवे पेटवले. समोरचा जनसमुदाय अवाक होऊन सर्व पाहात होता. त्यांच्या चेहऱ्यावरून महाराजांबद्दल भक्तिभाव ओसंडून वाहत होता.
इकडे सुखदेव व अन्य काही लोक थोडे विचलित झाले होते. महाराजांनी चमत्कार म्हणून सादर केलेला प्रत्येक प्रयोग मी पुन्हा करून दाखवला. त्यामागे विज्ञान व हातचलाखीचे स्पष्टीकरण समोरच्या जनसमुदायाला दिले. आमची बराच वेळ जुगलबंदी सुरू होती. आमच्या दोन कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन महाराजांच्या अंगावरील भगवी वस्त्रं उतरवली. महाराजांची खरी ओळख लोकांना करून दिली. महाराज दुसरे-तिसरे कुणी नसून ते ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्यकर्ते आहेत. हे सुखदेवसह सर्वांना समजलं. सुखदेवच्या डोक्यातील सावत्र आईबद्दलचा भ्रम-गैरसमज काढण्यासाठी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र वाघ महाराजांचे रूप घेऊन सुखदेवच्या घरी गेले होते. तेव्हापासून सुखदेवला आराम पडला होता.
हे सर्व पाहून गावकरी व सुखदेव खूप अचंबित झाले. त्यांना अनेक उदाहरणं देऊन करणी, भानामती, प्रेतात्मा या सर्व बाबी काल्पनिक भ्रामक कशा आहेत. मांत्रिकांच्या चुकीच्या सल्ल्यावरून अनेक कुटुंबं कशी उद्ध्वस्त झाली आहेत. कोणतेही आजार शारीरिक आणि मानसिक दोन प्रकारचे असतात. त्यासाठी उपचाराची गरज असते. हे लोकांना पटवून दिलं.
सुखदेवचं आजारपण शारीरिक होतं. मांत्रिकाच्या चुकीच्या सांगण्यामुळे तो मनोरुग्णही बनला होता. या सर्व प्रकरणात शरदचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. ग्रामस्थांची मदतही मोलाची ठरली. शरदच्या कुटुंबीयांचे सहकार्यही खूप उपयोगी पडले. शरद व सुखदेव दोघे आजही माझ्या संपर्कात आहेत. ‘अंनिस’चे हितचिंतक म्हणून वेळोवेळी मदत करतात. आता गावकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण झाली असून ते गावात व परिसरात येणाऱ्या अंधश्रद्धा वाढवणाऱ्या भगताला थारा देत नाहीत.
(सदर लेखातील नावे बदललेली आहेत.)