scorecardresearch

Premium

मला घडवणारा शिक्षक: खेळातून जीवनशिक्षण – प्रवीण नेरुरकर

‘‘नेरुरकर, क्रिकेटच्या मैदानावर आलास की अभ्यासाचे विचार तुझ्या मनात आले नाही पाहिजेत आणि घरी जाऊन अभ्यासाला बसलास की मैदानाचे विचार तुझ्या मनात आले नाही पाहिजेत! हे तुला जमणार असेल तरच उद्यापासून सरावाला यायचं.

Teacher Life Education through Play Gurumantra Cricket
मला घडवणारा शिक्षक: खेळातून जीवनशिक्षण – प्रवीण नेरुरकर |

‘‘नेरुरकर, क्रिकेटच्या मैदानावर आलास की अभ्यासाचे विचार तुझ्या मनात आले नाही पाहिजेत आणि घरी जाऊन अभ्यासाला बसलास की मैदानाचे विचार तुझ्या मनात आले नाही पाहिजेत! हे तुला जमणार असेल तरच उद्यापासून सरावाला यायचं.’’ हा आयुष्यभर सर्व क्षेत्रांत पुरून उरणारा एकाग्रतेचा गुरुमंत्र देणारा अण्णा वैद्यांचा खर्जातला आवाज आजही माझ्या कानात आणि मनात घुमतो आहे. जेव्हा जेव्हा हा गुरुमंत्र मी अमलात आणू शकलो, तेव्हा तेव्हा माझ्या गळय़ात यशानं माला घातली. आणि अर्थातच जेव्हा मला ते शक्य झालं नाही, तेव्हा दारुण अपयशाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे प्रत्येक यशापयशात अण्णांची क्रिकेटची हॅट घातलेली छोटय़ा चणीची मूर्ती आणि उभं आयुष्य मैदानावर घालवल्यानं रापलेला त्यांचा चेहरा डोळय़ांसमोर उभा राहतो. अण्णांची मूर्ती छोटी असली, तरी ती मुंबईचं शिवाजी पार्क अर्धअधिक व्यापून असायची असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आमच्या पीचवर आमची बालमोहन शाळा, मिठीबाई कॉलेज, बेंगाल क्लब आणि आणखी एक अशी मिळून चार नेट्स (सरावजाळी) लागायची. सगळे मिळून पन्नास-शंभर खेळाडू. पण अण्णांचं प्रत्येक नेटमध्ये काय चाललं आहे यावर बारीक लक्ष असायचं. कोणी चांगला फटका मारला तर त्याचं कौतुक करतानाच तो अधिक चांगला कसा मारता आला असता हे सांगणं, कोणी खराब फटका मारला, तर तंत्रशुद्ध फटका काय असतो हे तिथल्या तिथं दाखवणं, हे नेहमीचंच. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांबाबतही हेच. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत ते सर्वात आग्रही होते. ‘कॅचेस विन मॅचेस’ हे त्यांचं आवडतं ब्रीदवाक्य!

  क्रिकेटला पूर्ण आयुष्य अर्पण करूनही ‘क्रिकेट एके क्रिकेट’ असा त्यांचा खाक्या नव्हता. एकदा आम्हा सर्व शालेय संघातल्या मुलांना मैदानातल्या सरावातून बाहेर काढून त्यांनी बाजूला बोलावलं. ‘आम्ही अशी काय चूक केली?’ या भीतीनं आम्ही धास्तावलो. कारण कमीत कमी शिक्षा शिवाजी पार्कला दोन राऊंड पळत, ही असायची. पण त्यांनी अनपेक्षितपणे विचारलं, ‘‘काय रे, शाळेत वक्तृत्व स्पर्धासाठी नोंदणी चालू आहे म्हणे?.. मग तुम्ही कोणीच त्यात भाग कसा काय नाही घेतला?’’ एखाद्दुसरा अपवाद सोडला तर आम्ही सगळे ‘खेळ एके खेळ’ करत शाळेची वर्ष पार पाडणारे वीर होतो! त्या दिवशीचा सराव बाजूला ठेवून अण्णांनी आमचं छोटंसं बौद्धिकच घेतलं. ‘‘उद्या तुमच्यातले काही इंग्लंडला जातील.. सामना किंवा स्पर्धा जिंकल्यावर तुम्हाला इंग्रजीत भाषण करावं लागू शकेल.. त्या वेळेला काय कराल?’’ मजा अशी, की शाळेचा सामना जिंकण्यापलीकडे आमच्या विचारांची झेपच नव्हती! पण अण्णांचे शब्द तंतोतंत खरे ठरले. पाच-सहा वर्षांतच वरील प्रसंग आमच्याबरोबर अनुभवणारा आमचा संघसहकारी अमित पागनीस भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाचा कर्णधार म्हणून विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेला. अण्णांची आमच्यासाठी अशी देदीप्यमान स्वप्नं होती!  आमचे आंतरशालेय सामने (गाईल्स आणि हॅरिस चषक) तीन दिवसांचे आणि अंतिम सामना पाच दिवसांचा असायचा. अण्णा तेव्हा सांगायचे, ‘‘कसोटी सामन्यात घाईगडबड करायची नाही. खराब चेंडूची आणि योग्य वेळेची वाट बघता आली पाहिजे.’’ आम्ही आमच्या परीनं त्यांचा सल्ला अमलात आणत असू. ‘अंजुमन इस्लाम’ (वसीम जाफर), ‘शारदाश्रम मराठी’ (रमेश पवार) अशा मातब्बर प्रतिस्पध्र्यावर मात करत त्या वर्षी गाईल्स चषकाचं उपविजेतेपद खेचून आणलं. अजित आगरकर कर्णधार असलेल्या ‘शारदाश्रम इंग्लिश’कडून अंतिम सामन्यात आम्हाला मात खावी लागली. मोठेपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर महेंद्रसिंह धोनीला शेवटच्या षटक आणि चेंडूपर्यंत सामना खेचताना आणि जिंकताना वारंवार पाहिलं, तेव्हा हटकून अण्णांच्या स्मृती जाग्या व्हायच्या. काय पातळीवरचे गुरू आम्हाला लाभले होते!

cbse open book exam plan
विश्लेषण : सीबीएसईकडून प्रायोगिक तत्वावर ‘ओपन बुक परीक्षा’ घेण्याचा निर्णय, ही संकल्पना नेमकी काय? वाचा सविस्तर…
intelligence testing comprehensive test of nonverbal intelligence assessment of intelligence
कुतूहल : व्यापक बुद्धिमत्तेच्या चाचण्या
Loksatta anyatha concepts of Litefest and Sahitya Samelan Jaipur Litefest
अन्यथा: उंटावरची ‘शहाणी’!
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : बुद्धिमत्ता चाचणी तयारी

अण्णांचं आणखी एक म्हणणं असं, की ‘सामन्यात काही सत्रं चांगली खेळलो म्हणजे सामनाच जिंकलो, असं शेफारून जाऊ नका आणि काही सत्रं चांगला खेळ जमू शकला नाही, तर सामना हरल्याचं मानून खांदे पाडून चालायला लागू नका! शेवटचा चेंडू टाकेपर्यंत मॅच संपलेली नसते!’ वैयक्तिकरीत्या शालेय जीवनातही हा अनुभव मला आला. अर्ध शालेय जीवन बऱ्यापैकी चांगला विद्यार्थी म्हणून घालवल्यावर मधल्या काळात मी एक सुमार-अतिसुमार विद्यार्थी म्हणून हिणवला जाऊ लागलो. पण क्रिकेटमध्ये अण्णांनी शिकवलेली एकाग्रता, शिस्त, मेहनत आणि त्यांचा वर सांगितलेला मंत्र उपयोगी आणून दहावीत गुणवत्ता यादीत झळकलो. त्यात अण्णा, त्यांचे पुत्र अमर सर, सहकारी निमोणकर सर यांनी माझ्यात रुजवलेल्या काही गुणांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतरही आयुष्यात अनेकदा अपेक्षित उद्दिष्टं अपेक्षित वेळेत साध्य करता न आल्यानं ‘सीदंती मम गात्राणी’ अशी अवस्था व्हायची. पण तेव्हाही मी टिकून राहू शकलो. कारण ‘आशावादी राहात संधीची वाट पाहायची.. एक-दोन चांगली सत्रं पूर्ण सामना फिरवू शकतात,’ हे अण्णांचं प्रशिक्षण मला होतं. 

   आयुष्य हे अनेक सत्रांच्या कसोटी सामन्यासारखं असतं आणि चिकाटी दाखवता आली, तर सामन्याला कुठल्याही क्षणी कलाटणी मिळू शकतेच, ही आयुष्यभर पाठराखण करणारी शिकवण देणाऱ्या अण्णांच्या प्रेरणादायी स्मृतीला नमन!

वास्तववादाची शिकवण!  – प्रज्ञा कुलकर्णी 

माझे गुरू म्हणजे बार्शी इथल्या ‘श्री शिवाजी महाविद्यालया’तील मराठीचे प्राध्यापक डॉ. आर. व्ही. डांगरे सर. साधारण ४० वर्षांपूर्वीचा काळ तो. सर शिकवताना लेखक किंवा कवीच्या भावनांशी एकरूप होत असत. एकदा त्यांच्या व्याख्यानाचा खळाळता प्रवाह सुरू झाला की अनेक शब्दरत्नं बाहेर पडत. काव्य, ललित, नाटक असो वा कादंबरी. सर लेखक-कवींच्या भावनेशी तद्रूप होऊन वातावरणनिर्मिती करीत. सर्व वर्ग अगदी तल्लीन होऊन ऐकत असे. पुढे जेव्हा मी लेक्चररशिप करू लागले, तेव्हा सरांच्या शिकवण्याचा आदर्श माझ्यासमोर होता. त्यांना मनोभावे वंदन करूनच मी तास सुरू करत असे.

 सर नेहमी गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात, त्यांना पुस्तके देण्यात आघाडीवर. आजच्या क्लासेसच्या काळात वर्गात नीट न शिकवता क्लासेसमध्ये प्रचंड फी घेऊन शिकवणारे शिक्षकही पाहायला मिळतात. तेव्हा सरांच्या निरपेक्ष वृत्तीची आठवण येते. त्यांच्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता. त्याचा लाभ माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतलाय. जीवनात पुस्तकांचं मोल अमोल आहे हे सरांनी मनावर िबबवलं. वाढदिवस किंवा इतर कुठल्याही निमित्तानं पुस्तकं खरेदी करत जा, असं सर नेहमीच सांगत. मीसुद्धा माझी मुलं जेव्हा कुठलंही यश मिळवतात, तेव्हा त्यांना सर्वोत्तम पुस्तकंच भेट देत आले. मी शाळेत असल्यापासून कविता लिहीत होते. डांगरे सरांच्या मराठी शिकवण्यामुळे माझी मराठी भाषा समृद्ध होऊ लागली आणि शब्दांवर प्रभुत्व येऊ लागलं. सरांकडून मी कविता तपासून घेत असे. ‘कवितेत शब्द अगदी जपून वापरावेत. त्यातला एकही शब्द काढला तरी अर्थ बदलला पाहिजे,’ ही शिकवण सरांची.  महाविद्यालयाच्या प्रथम वर्षांला असतानाच पुणे आकाशवाणीवर आमच्या कॉलेजचा काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार होता. ती नोटीस वाचूनही मनात न्यूनगंड असल्यामुळे मी नाव दिलं नाही. मुदत संपून गेली. सरांनी एके दिवशी मला बोलावून सांगितलं, ‘‘मी तुमचं नाव दिलं आहे. आकाशवाणी कार्यक्रमासाठी कविता घेऊन या, आपण निवडू.’’ मला खूप आनंद झाला. कारण मनात इच्छा होती, पण भीती होती, आत्मविश्वास नव्हता. पुढे यथावकाश पुणे आणि सांगली आकाशवाणीवर माझा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला, लेखनासंबंधी आत्मविश्वास आला. उत्साहानं काव्यलेखन करू लागले. कॉलेजच्या नियतकालिकांसह विविध वृत्तपत्रं, दिवाळी अंकांतही माझं नाव दिसू लागलं. बार्शीला जेव्हा ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झालं, तेव्हा निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या अध्यक्षतेखाली मला काव्यवाचन करता आलं. अनेक साहित्यिकांकडून प्रशंसा झाली. या सगळय़ाचं श्रेय माझ्या लेखणीला योग्य वळण लावणाऱ्या डांगरे सरांना.  आमचं ‘एम.ए.’चं कॉलेज संध्याकाळी असे. तो विजेच्या भारनियमनाचा काळ होता. वीज गेली की शिपाई येऊन प्रत्येकाच्या बाकावर एकेक मेणबत्ती लावून जात असे. पण सरांच्या शिकवण्याची लिंक कधीच तुटत नसे. बा. सी. मर्ढेकर शिकवावेत तर सरांनीच! पुढे मी ‘बी.एड.’चा प्रकल्पही मर्ढेकरांवरच केला. एम.ए.ला एका विषयासाठी सरांनी मला ६५ संदर्भग्रंथ सांगितले होते आणि त्यातले बरेचसे उपलब्धही करून दिले. आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळावं म्हणून ते नेहमी प्रयत्न करत. ‘एम.ए.’चा निकाल आधी सरांना समजत असे. ते माझा दोन्ही वर्षांचा निकाल सांगण्यासाठी स्वत: घरी आले होते. दोन्ही वर्षी ‘तू सर्व विषयांत प्रथम आहेस,’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. पुढे ‘लेक्चरर इन गव्हर्न्मेंट कॉलेज’ या पदासाठी मी अर्ज केला आणि मुलाखतीसाठी निवड झाली. पण घरातून मला नकार आला. तो आजच्यासारखा पालकांशी वाद घालण्याचा काळ नव्हता! तेव्हा सरांनी घरी येऊन सांगितलं, ‘‘तिला मुलाखतीचा अनुभव तरी घेऊ द्या.. नोकरी लागली तर नका पाठवू बाहेरगावी!’’ मग घरचे तयार झाले आणि मी एकटी मुंबईला जाऊन मुलाखत देऊन आले. निवड झाली नाही, पण आत्मविश्वास खूप आला. आपण एकटीनं, हिमतीनं काही करू शकतो ही जाणीव निर्माण झाली आणि ती मला पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडली. याच्या पाठीशी सरच उभे आहेत. कॉलेज सोडताना मी सरांना पुढील आयुष्यासाठी संदेश मागितला होता. त्यांनी लिहिलं, ‘सौंदर्यवाद नाही, वास्तववाद!’. आजही मनावर कोरला गेला आहे तो. खूप वेळेस तो दीपस्तंभासारखा उपयोगी पडला. माझ्या लग्नाला सर आम्हा दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. मी जेव्हा माहेरी बार्शीला येत असे तेव्हा सरांची भेट घेत असे आणि एरवी कुणालाही लगेच नमस्कार न करणारे माझे पतीही सरांच्या पायावर डोकं ठेवत!

अचानक माझ्या पतीचं निधन झालं, तेव्हा दोन्ही मुलं अगदी लहान होती. माझं शिक्षण होतं, पण नोकरी नव्हती. समोर अंधार दिसत होता. तेव्हाही सरांचा संदेश समोर आला- ‘वास्तववाद’! तो स्वीकारून पुढे वाटचाल सुरू केली. एका कॉलेजमध्ये तासिकेवर नोकरी मिळाली. सरांचा आदर्श ठेवून मन लावून शिकवू लागले. शिकवणं मुलांना आवडू लागलं. सोबतीला माझी लेखणी होती. अधूनमधून सरांचा चौकशीसाठी फोन येत असे. त्यांची तब्येत बिघडू लागली होती. बऱ्याच वेळेस ‘पुण्यात येऊन भेट घे,’ असं सांगत. पण काही कारणानं मला जमत नव्हतं. एकदा सर म्हणाले, ‘‘या जन्मात तुझी भेट होते की नाही असं वाटतं!’’ मी ‘नक्की येईन’ सांगितलं, पण पुन्हा रोजचा रामरगाडा सुरू झाला. एकदा रात्री सर स्वप्नात आले होते. मग मात्र ठरवलं, की आता पुण्याला नक्की जायचं त्यांच्याकडे. पंधराच दिवसांनी सरांच्या पत्नीचा फोन आला, की सर गेले! तोंडून शब्दच फुटेना. अश्रू वाहू लागले. जणू सरच माझ्या स्वप्नात येऊन मला भेटून गेले होते!  सरांच्या मी कायम ऋणात राहीन..

 pravincnerurkar@gmail. com

pradnyakulkarni709 @gmail.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teacher life education through play gurumantra cricket amy

First published on: 02-12-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×