मला विंगेत उभी असलेली ती माझी मैत्रीण अजूनही दिसते. रडणारं पोर बाजूला सारून कुठल्याशा भूमिकेत एकाग्रतेनं शिरू पाहणारी. असं काय काय मागं टाकून विंगेत उभ्या असलेल्या त्या सर्व ‘आयांना’ मला आज सलाम करायचा आहे. त्यात माझी आई तर आहेच, नणंद आहे, अनेक मैत्रिणी आहेत, मावश्या आहेत; ज्या ‘आया’ आहेत आणि ‘नटय़ा’ आहेत.
मला अजूनही आई दाराशी उभी असलेली दिसते. डोळे घळाघळा वाहणारे. ती त्या दिवशी दारातून बाहेर जाऊच शकत नव्हती. दारापर्यंत जायची, दार उघडायची. मग अचानक अवसान गेल्यासारखी मागे वळून पाहायची. दारापासून काही फुटांवर असलेल्या बिछान्याकडे. तिथे तिचं पिल्लू होतं. माझा भाऊ, जय. त्याला जवळ जवळ एकपर्यंत ताप चढलेला होता. तो डोळे मिटून कॉटवर पडला होता. तिसरी-चौथीत असेल. आईचा त्या दिवशी रात्री एका नाटकाचा मुंबईत प्रयोग होता. प्रयोगाचं तिकीट बुकिंग दोन-तीन दिवस आधीपासून चालू झालेलं होतं. वर्तमानपत्रातली जाहिरात वगैरे मिळून निर्मात्याचे हजारो रुपये त्या प्रयोगात गुंतलेले होते. ती गेली नाही तर निर्माताच नाही, तर सहकलाकार, बॅकस्टेजचे कलाकार, तंत्रज्ञ अनेकांचं नुकसान झालं असतं. तिला जाणं भागच होतं. त्या वेळची तिची घालमेल मला विसरताच येत नाही. बाबा तिला सांगत राहिले, ‘मी आहे, तू जा.’ तरी ती घरापासून बिछान्यापर्यंत यायची, जयच्या कपाळावर हात ठेवायची, निकराने दारापर्यंत जायची, पुन्हा अडकल्यासारखी थांबायची, अखेर जसजसा उशीर व्हायला लागला तशी एका क्षणी ती दाराशी गेली. तिनं तिचे गळणारे डोळे पुसले, आणि दार उघडून ती बाहेर पडली.
त्या वेळी मला आईचं नाटकाच्या तालमींसाठी, प्रयोगासाठी मुंबईला जाणं आवडायचं नाही. मी तशी फार लहानही नव्हते तोवर खरंतर. तो काळ वेगळा होता. माझी आई राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची विद्यार्थिनी. नसीरुद्दीन शहा, ओम पुरी यांच्या बॅचची. विद्यालयात जायच्या आधीच बाबांच्या प्रेमात पडली होती. तिथून परतल्यावर तिचं आणि बाबांचं लग्न झालं. लगेच एका वर्षांत मी झाले आणि तीन वर्षांनी माझा भाऊ जय. त्यानंतर ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालय,’ नाटक, अभिनय हे सगळं बाजूला ठेवून आई फक्त आम्हा दोघांना वाढवत राहिली. थोडीथोडकी नाही तर दहा-बारा वर्षे तिनं फक्त आम्हाला दिली. बाबांच्या बदलीच्या नोकरीत ते जातील त्या गावी, आडगावी आमच्यासकटचा संसार घेऊन फिरत राहिली. ती विद्यालयात असताना तिच्या वर्गातल्या अभिनेत्यांमध्ये सर्वोत्तम असलेल्यांपैकी एक होती. तिनं लग्नाआधी तिथे ज्या नाटकांमधनं कामं केली होती, त्यातल्या तिच्या काही भूमिका इतक्या गाजल्या होत्या की मी नंतर कितीतरी वर्षांनी त्याच विद्यालयात शिकायला गेले तेव्हासुद्धा तिथे लोक त्या भूमिकांबद्दल बोलत होते. एखादी भूमिका अशी निभवायला त्या नटीच्या आत किती उसळती ऊर्जा असावी लागते. ती तिच्यातही निश्चित होती, आहे! आम्हाला वाढवतानाची दहा-बारा र्वष नाटकातला ‘न’ ही जिथे पोचला नव्हता अशा गावांमधून फिरताना तिनं तिच्यातल्या त्या अमाप ऊर्जेचं काय केलं असेल? इतकी र्वष आपल्याला भयंकर आवडणाऱ्या, आपण आतडय़ापासून प्रेम करत असलेल्या कुठल्याशा गोष्टीपासून इतकं पूर्ण तुटावं लागलं तिला, तिचं काय होत असेल? कित्येक आयांना वाटेल, ‘त्यात काय, वाढवायची मुलं!’ माझ्यातल्या ‘तिच्या मुलीला’ तिची ही ओढाताण त्या वेळी तर नाहीच समजली, पण माझ्यातली नटी जेव्हा तिच्या त्या दिवसांची आता कल्पना करू पाहते तेव्हा मला वाटतं, तिनं हे कसं जमवलं असेल? आम्ही मोठे झालो, तेव्हा तिनं पुन्हा नाटकांत कामं करायला सुरुवात केली तेव्हा तिला समजून तिच्या बाजूनं उभे राहिलेले घरात फक्त बाबा आणि काही मोजके नातेवाईकच होते. मी लहानच होते. ‘इतरांच्या आया कशा घरीच असतात, तशी तू पण घरीच राहा’ एवढंच माझं आईला सांगणं होतं. त्या वेळी तिनं मला एक पत्रं लिहिलं होतं. आम्ही पुण्यात आणि ती नाटकासाठी काही दिवस मुंबईला गेली असताना मुंबईहून पाठवलेलं पत्र. त्यात तिनं लिहिलं होतं, ‘अमृता, तू परवा म्हणालीस, पुण्यातल्या पुण्यात नाटक का नाही करत म्हणून? त्याचा विचार करत होते मी. आता तुला एक उदाहरण देऊन सांगते, मध्यंतरी तुझी नृत्याची, गाण्याची तालीम असायची शाळेत. तेव्हा तुमचा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला व्हावा म्हणून तुम्ही शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत थांबून प्रॅक्टिस करायचात. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुमचा नृत्य आणि गाणं दोन्हींत नंबर आला. सगळय़ांनी तुझ्या गाण्याचं कौतुक केलं, हो की नाही? तेव्हा सांगायचं कारण असं की आपल्या आवडीच्या आणि एखादी विशेष कौशल्याची गोष्ट करायची असते तेव्हा मनापासून प्रयत्न करायचे असतातच, शिवाय थोडाफार त्रास झेलण्याचीही तयारी असावी लागते. मिळेल ती संधी काही अडचणी आनंदानं मान्य करून पकडावी लागते. मला तुमच्याबरोबर, तुमच्याजवळ असायला आवडतं म्हणून मी घरातून बाहेरच पडले नाही तर माझ्या हातून काही होऊ शकेल का? तुला आम्ही आवडतो म्हणून तू सारखी घरातच राहिलीस तर तुझी प्रगती होईल का?.. तू लहान असलीस माझी छकुली, तरी या गोष्टीचा विचार निश्चितच करू शकशील. तुम्ही माझी बाळं आता एवढी मोठी झाला आहात की माझ्या आवडीचं काम मला करायला मिळावं म्हणून अधूनमधून मी घरी नसले तर चालेल तुम्हाला, हो ना? तिच्या या ‘हो ना?’ला मी संपूर्ण बालपण ‘नाही, नाही, नाही’ असंच उत्तर देत राहिले. कधी मोठय़ांदा, कधी मनात तिच्या दूर जाण्याचा राग करत राहिले. हे सगळं समजून घेऊन एका कुठल्या शक्तीनं ती मुंबई-पुणे-मुंबई करत राहिली असेल? एकदा कुठल्याशा प्रयोगाला वेळेत पोचायचं म्हणून धडपडत मुंबईला गेली. प्रयोग सुरू होता होताच पाऊस सुरू झाला होता. संपला तेव्हा पाणी भरायला लागलेलं. त्या पाण्यातनं ही निघाली. तोवर लोकल्स बंद पडलेल्या. दूर राहणाऱ्या माझ्या मावशीकडे गळय़ापर्यंत पाण्यातनं पाय ओढत ही कशी पोचली असेल हिलाच माहीत. नंतर एकदा एक दौरा असणार होता तिचा. मुंबईहून निघायचं होतं. अचानक मुंबईत बॉम्बस्फोट, दंगे सुरू झाले. दौरा होणार की नाही कळेना. ‘आपल्यामुळं दौरा रद्द नको.’ म्हणून ही त्या काळदिवशी मुंबईला निघाली. त्या दिवशी त्या मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आपला जीव पणाला लावलेली, काही मोजकीच माणसं होती. बाकी शुकशुकाट. दादर स्टेशनला ट्रेन पोहोचली तर घाबरलेला निर्माता प्लॅटफॉर्मवर हिला शोधून सांगत राहिला, ‘परत जा, आताच प्लाझाला स्फोट झालाय!’ ही एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर करत परतीच्या गाडीत बसून परत! एखाद्या कुठल्याशा महोत्सवात तिचा प्रयोग होता. त्यापुढच्या दिवशी त्याच महोत्सवात कुमार गंधर्वाचे गाणं होतं. आईला गाणं फार आवडतं. त्यातून गंधर्वाचं गाणं तर तिच्या जिवाचा तुकडाच! ते प्रत्यक्ष ऐकणं तिच्यासाठी पर्वणीच! पण नेमकी तेव्हाच मी खूप आजारी पडले आणि आई प्रयोग संपवून त्याच रात्री घराकडे धावली. एकदा माझी ट्रीप होती बंगलोर की कुठेतरी. मी पहिल्यांदा इतके दिवस घराबाहेर एकटी जाणार होते. आई तिचा प्रयोग मुंबईत संपवून ट्रेननं पुण्याला आली. माझ्या ट्रेनची वेळ होतच आली होती. तेव्हा दूरून जीव खाऊन पळत पळत माझा डबा शोधणारी आई. जेव्हा आताच्या मला दिसते तेव्हा गलबलून येतं.
आता हा काळ बदलला असेल, पण जद्दोजहद तीच आहे. ती फक्त आमच्या क्षेत्रात आहे असं नाही. नोकरी करून मुलं वाढवणाऱ्या प्रत्येक आईची ही तारेवरची कसरत मी आसपासही पाहते आहे. पण निदान ऑफिसला जाणारी आई विशिष्ट वेळी घरी परत येते. निदान रविवारी तिला सुट्टी असते. पण ‘नटी’ आईला तर रविवारी नक्कीच बाहेर पडावं लागतं, कारण सुट्टीचा दिवस म्हणजे नाटकांसाठी छान बुकिंगचा दिवस. परवाच माझ्या क्षेत्रातली माझी एक ‘आई’ मैत्रीण मला सांगत होती. तिनं तिच्या लहान मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘अगं, आईला कामासाठी बाहेर जावं लागतं, इतर मुलींच्या आया नेहमी घरी असतात, पण त्या कुठे टी.व्ही.वर दिसतात? आई दिसते, हो की नाही?’ यावर तिची मुलगी शांतपणे म्हणाली, ‘मग तू पण नको दिसूस. मी सांगितलंय तुला, टी.व्ही.वर दिसायला?’ मधे आम्ही कुठल्याशा नाटकाच्या दौऱ्यावर निघालो तेव्हा माझ्याबरोबर काम करणारी एक ‘आई’ आपलं ‘पिल्लू’ घरी सोडून आलेली. रिक्षातून उतरली आणि दौऱ्याच्या नाटकाच्या बसमधे चढली तेव्हा डोळय़ांच्या कडा ओल्याच होत्या. बस निघाली, मोबाइल वाजला. तिनं घेतला. आणि काहीसं बोबडं बोलून ती फोन ठेवून रडायलाच लागली. ‘काय गं’ म्हटलं तर म्हणाली, ‘तिच्या छोटय़ा मुलाचा फोन होता. तो ती घरून निघताना ‘जाऊ नको’ म्हणून रडत होता. आत्ता तिला फोन करून म्हणाला, ‘‘आई, नीत जा. तू गेल्यावल मी लल्लोच नाई. तू जा, लवकल ये.’ त्याचा तो समजूतदारपणा बघून ती बसमध्येच भडभडून रडत राहिली. शेवटी मी म्हटलं ‘अगं, तो मस्त खेळत असेल एव्हाना. रडू नको गं..’    
एका मैत्रिणीचा घटस्फोट झाला आहे. तिच्या मुलीला ती एकटी सांभाळते. पैसे कमवून वाढवते. तिच्या एका प्रयोगाच्या आधी तिची छोटी तिला सोडेचना. शेवटी भोकाड पसरलेल्या छोटीला दोन पायांमध्ये मांडीवर बसवून तिनं मेकअप केला. तिसऱ्या घंटेची वेळ झाली तशी एक खोल श्वास घेऊन ती तिच्या विश्वासू हेअरड्रेसरला म्हणाली, ‘‘आता हिला बाहेर घेऊन जा, आणि नाटक संपल्यावरच आत आण.’’
मला विंगेत उभी असलेली ती माझी मैत्रीण अजूनही दिसते. रडणारं पोर बाजूला सारून कुठल्याशा भूमिकेत एकाग्रतेनं शिरू पाहणारी. असं काय काय मागं टाकून विंगेत उभ्या असलेल्या त्या सर्व ‘आयांना’ मला आज सलाम करायचा आहे. त्यात माझी आई तर आहेच, नणंद आहे, अनेक मैत्रिणी आहेत, मावश्या आहेत; ज्या ‘आया’ आहेत आणि ‘नटय़ा’ आहेत. माझ्या लहानपणी मला माझ्या आईनं जे पत्रं लिहिलं त्या अर्थाची अनेक पत्रं त्या आया त्यांच्या मुलांना मनातल्या मनात दररोज लिहीत असतील. काहींच्या पत्रांना उत्तरं येत असतील, काहींच्या नसतील. माझ्या आईचं पत्रं अजून अनुत्तरित आहे. तिच्या पत्रातल्या ‘हो ना?’ला आज नाहीच्या ऐवजी वेगळं उत्तर द्यायचं आहे, तिला आणि त्या सगळय़ाच आयांना त्यांच्या मुलांतर्फे सांगायचं आहे. ‘‘आई, लहान असताना कळलं नाही, पण आता तुझी धडपड समजते. आता तुझ्या त्या धडपडीत मीही तुझ्या बाजूनं आहे. मुलं वाढवत स्वत:तलं काहीतरी शोधत जायला धाडस लागतं. तू ते दाखवलंस. कुठल्याही शाबासकीशिवाय स्वत:ला दोन भागांत वाटतं तू नाटक-घर-नाटक ही ओढाताण करत राहिलीस. ती ओढाताण लहानपणी नाही समजली. आता समजते. तुझ्यातल्या ज्या ‘नटी’चा लहानपणी मी राग-राग केला, त्याच ताकदवान ‘नटी’ला आज माझा त्रिवार सलाम!    ल्ल
amr.subhash@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The actress mother
First published on: 30-11-2013 at 01:01 IST