‘गेल्या आठवडय़ात बंगळूरु येथील एका शाळेतल्या मुलांच्या दप्तरात निरोध, सिगारेट, ड्रग्ज, बीअरचे कॅन आदी वस्तू सापडल्या. शालेय मुलांच्या नकळत्या वयातल्या आयुष्यात व्यसनांचं आणि सेक्सचंही आगमन झालंय, या भीतीनं पालकांची झोप उडणं स्वाभाविक आहे. खरंच आत्तापर्यंत दाराबाहेर असणाऱ्या या दोन्ही गोष्टी नको त्या वयात आयुष्यात येण्यानं मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागू शकतंय. वाटतं तितकी परिस्थिती सहज, सोपी नसून त्याचा आताच गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे..’ सांगताहेत गेली १२ वर्ष याच विषयांवर लहान मुलांमध्ये काम करणाऱ्या समुपदेशक तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ.

शाळेत काय काय झालं, ते सारं चौथी-पाचवीपर्यंत घरी पालकांना येऊन सांगणारी मुलं सातवी-आठवीत गेली, की बऱ्याच गोष्टी वगळून सांगू लागतात. घरी काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही याची गणितं मांडू लागतात. त्यामुळे त्यांच्याच भाषेत बोलायचं तर वयात आल्यानंतर त्यांची काही खास ‘सिक्रेट्स’ वा गुपितं आपल्यापर्यंत, पालकांपर्यंत येतच नाहीत. पण आता बाल वा पौंगडावस्थेतल्या मुलांचे पालक असणाऱ्यांसाठी ही ‘सिक्रेट्स’ भीतीदायक वा तणाव वाढवणारी ठरू लागली आहेत. लहान मुलांमध्ये आतापर्यंत उंबऱ्यावर असणारं ड्रग्ज आणि सेक्सचं प्रमाण घरात घुसायची भीती वाढत चालली आहे. हे सारं अधोरेखित होण्यामागचं कारण म्हणजे मागच्या आठवडय़ात वर्तमानपत्रात आलेली एक बातमी. कर्नाटकात खासगी शाळांमध्ये अचानक केलेल्या मुलांच्या दप्तरांच्या तपासणीत निरोध, सिगारेट, ड्रग्ज, बीअरचे कॅन, आदी वस्तू सापडल्या, असं त्या बातमीत म्हटलं होतं. ही घटना बंगळूरुची असली तरी आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण आपल्या आजूबाजूलाही हेच सारं ‘गुपचूप गुपचूप’ सुरू आहे. मात्र आपल्या आसपास सुरू आहे, यापेक्षा कुणीच उघडपणे या संकटावर बोलत नाही, समस्येला भिडत नाही, ही पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अधिक चिंतेची बाब आहे.

kalyan school student injured marathi news
कल्याणमध्ये दारूची बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

गेल्या १२ वर्षांत साधारणपणे १० ते २२ या वयोगटातल्या असंख्य मुलांचं समुपदेशन करण्याचा अनुभव वेगवेगळय़ा संस्थांमध्ये मिळाला. समुपदेशकाला मुलांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची संधी मिळते. त्यांची विचार करायची पद्धत, त्यांची गुपितं, सगळं एका सुरक्षित आणि ओळखीबाबत गोपनीयतेच्या वातावरणात समजतं. त्यातली काही गुपितं ही त्या मुलांच्या आणि समाजाच्या दृष्टीनंही धोकादायक असतात. ती जाणून घेऊन त्यांना समजून घेतलं, तर आपण मुलांना मदत करू शकतो. गेल्या १२ वर्षांच्या दरम्यान मला अनेक मुलं-मुली भेटली. वेगवेगळय़ा वयोगटांतली, वेगवेगळय़ा आर्थिक स्तरांतली; पण बहुतांशी सगळय़ांचे प्रश्न सारखेच. भौगोलिकदृष्टय़ा बंगळूरु, मुंबई, दिल्ली यांसारख्या शहरांबरोबरच पुणे, ठाणे यांसारख्या मध्यमवर्गीय चेहरामोहरा असलेल्या शहरांमध्येही अल्कोहोल आणि ड्रग्जचं सेवन प्रमाणाबाहेर वाढलेलं आहे, याचं गांभीर्य फारसं कुणाच्याही लक्षात आलेलं नाही. आर्थिक स्तराचा विचार केला, तर उच्च आणि कमी आर्थिक गटातील मुलांमध्येच नव्हे, तर ते मध्यमवर्गापर्यंत पोहोचलं आहे. मध्यमवर्गीय घरांमध्ये मुलांवर बारकाईनं लक्ष असतं, तसंच घरात प्रत्येकाला वेगळी खोली असेल इतकं स्वातंत्र्य नसल्यानं या गोष्टी गुपितच राहतील असं वातावरण नसतं. त्यामुळे खरं तर मध्यमवर्गीय मुलांना व्यसन करणं जरा अवघडच जायचं. पूर्वीच्या काळी तर मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रवासाचा खर्च सोडला तर चहा-नाश्त्याला पुरतील एवढेच पैसे मोजून दिले जायचे. त्यांचा हिशेबही मागितला जायचा. पण गेल्या २० वर्षांत मध्यमवर्गीय घरांमध्ये दुहेरी उत्पन्न सुरू झालं आणि आई-वडिलांना नोकरी- करिअरमुळे घरात फारसा वेळ मिळेनासा झाला. त्यातून मुलांना पैसा पुरवताना पालकांचा हातही थोडा सढळ झाला. त्यात एखाद्-दुसरं मूल असल्यानं पैसे देण्याचं प्रमाणही वाढलं. त्यामुळे मुलं पैसे नेमके कुठे खर्च करत आहेत, यावर पालकांचे लक्ष उरलं नाही. अर्थात मुलांना व्यसनी करणाऱ्या या ड्रग्जच्या किमती काही सरसकट हजारोंमध्ये नसतात. काही अमली पदार्थासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात, तर अगदी १२० रुपयाला १०- म्हणजेच बारा रुपयांना एक, इतक्या, वडापावपेक्षाही स्वस्त दरानंही मुलांपर्यंत हे विष पोहोचत आहे. ज्याच्या खिशाला जसं परवडतं, तसा तो खर्च केला जातो. त्यामुळे पालकांच्याही हे लक्षात लवकर येत नाही. बऱ्याचदा पालकांचा असा समज असतो, की ड्रग्ज ही सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट नाही. पण वास्तव तसं नाही. विविध नावांनी किंवा इतर नावानं आता तर ऑनलाइनवरही सहजपण ते मिळू लागलं आहे. शिवाय ड्रग्जविक्री करणाऱ्यांची साखळी इतकी मोठी आहे, की ती मुलांपर्यंत पोहोचणं काहीच अवघड नाही. मध्यंतरी किशोरवयीन मुलं व्हाइटनरचा तसेच विशिष्ट कफ सिरपचा उपयोग नशेसाठी करत होती हे जेव्हा बाहेर आलं, तेव्हा ते प्रकरण बरंच गाजलं होतं; पण हे फक्त हिमनगाचं टोक आहे.

या मुलांशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्यांच्यापैकी अनेकांची ड्रग्ज घेण्याची सुरुवात ही समवयीन मुलांच्या दबावामुळे झाली होती. सुमित हा असाच एक १६ वर्षांचा मुलगा त्याच्या आईवडिलांसह समुपदेशनासाठी आला. त्याचे आईवडील दोघंही चांगल्या सरकारी नोकरीत होते आणि दोघं सकाळी कामावर जायचे ते थेट रात्री ७ च्या आसपास यायचे. त्यामुळे घरी दिवसा कुणीही नसायचं. अशा परिस्थितीत सुमित कॉलेजमध्ये नवीन मित्र मिळवण्याच्या नादात नको त्या संगतीत अडकला. त्या मुलांनी आग्रह केला, नव्हे एक प्रकारे आव्हानच दिलं. त्यामुळे आपण जर नाही म्हणालो, तर आपल्याला घाबरट (त्यांच्या भाषेत फट्टू) समजलं जाईल, असं वातावरण तयार झालं. त्यातून सुमितनं मित्रांच्या आग्रहास्तव नशेला सुरुवात केली. गंमत म्हणून सुरुवात झाली, पण नंतर पॉकेटमनी कमी पडू लागला. घरातून गुपचूप पैसे उचलणं सुरू झालं. आपल्याच खोलीत पडून राहणं सुरू झालं. सुमितसारख्या बऱ्याच मुलांना हे काही तरी चुकीचं आहे आणि यातून आपण अडचणीत येऊ शकतो हे जाणवत असतं; पण आपण हे फक्त एकदाच करून पाहत आहोत किंवा कधी तरी गंमत म्हणून घेऊ, अशी स्वत:चीच समजूत मुलं काढतात. पण नंतर सारं आवाक्याबाहेर जातं. निसरडय़ा वाटेवरूनच चालणार असू, तर घसरून कुठे पडणार हे आपल्या हाती नसतं. दुसऱ्या परिस्थितीमध्ये मुलांना हे माहीतच नसतं, की आपल्या हातात आहे ती ड्रग्ज आहेत. तशी त्यांना कल्पना दिली जात नाही. माझ्याकडे आलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाला, ‘ही गोळी खा त्यामुळे ताकद येते,’ असं सांगून ड्रग्ज देण्यात आले होते. याआधी या मुलाला शाळेत सारखं टिंग्या, कच्चा लिंबू असं चिडवलं जायचं. त्यामुळे या गोळय़ांनी ताकद आली की ते रॅगिंग थांबेल असं त्याला वाटलं. अर्थातच घरच्यांना याची काहीच कल्पना नव्हती. पुढे कधी तरी ही गोष्ट समोर आली आणि मुलाचं-आईवडिलांचं समुपदेशन करून डॉक्टरांच्या मदतीनं या सगळय़ांतून मुलाला बाहेर काढलं गेलं.

लहान वयाची मुलं जेव्हा स्वत:पेक्षा जास्त वयाच्या मुलांबरोबर खेळतात, तेव्हा अर्धवट काही तरी त्यांच्या कानावर पडत असतं. ती मोठय़ांचं अनुकरण करायला जातात. यातूनही नशेचं प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ‘ओटीटी’वरील वेब सीरिजमधल्या सारख्या सारख्या पाहिल्या जाणाऱ्या दारू-ड्रग्ज आदी गोष्टींमुळे त्याबाबतची धोक्याची संवेदना संपून जात ती गोष्ट सर्वसामान्य वाटायला लागली आहे, असा माझा या मुलांशी बोलतानाचा अनुभव आहे. त्यातच त्यांना तरुण वयात सगळे प्रयोग करून बघायचे असतात. पूर्वी हे फार तर सिगारेट ओढणं, बीअर पिणं, अश्लील इंग्रजी चित्रपट पाहाणं यापुरतं मर्यादित होतं. आता त्यांची जागा भरपूर दारू पिणं, ड्रग्ज घेणं यांनी घेतली आहे.

आपल्याला ड्रग्ज म्हटलं, की चित्रपटात पाहिल्याप्रमाणे कसली तरी पावडर डोळय़ांसमोर येते. पण ड्रग्ज म्हणजे गोळय़ा वा बाटलीबंद सिरप या स्वरूपातही असू शकतं. ‘उडता पंजाब’ सिनेमा ज्यांनी पाहिला त्यांना जाता-येता मुलं कशी सहजपणे ५० रुपयांना एक छोटीशी बाटली विकत घेतात हे समजलं, पण अनेक जण आजही याबाबतीत अनभिज्ञ आहेत. अवैध असलेल्या ड्रग्जबरोबरच वैद्यकीय कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या काही पेन किलर आदी औषधांचाही वापर ड्रग्ज म्हणून केला जातो. आपलं मूल जर ड्रग्ज घेत असेल तर ते ओळखायचं कसं, हा एक प्रश्न पालकांना असतो. थोडीशी माहिती घेऊन सतर्कता दाखवली तर आपल्याला अंदाज येऊ शकतो. शारीरिक बाबतीत म्हणायचं, तर अशा मुलांचे डोळे लालसर दिसतात, त्वचा वेगळीच दिसायला लागते. काही ड्रग्जच्या वापरानंतर त्या व्यक्तीच्या शरीराला विशिष्ट प्रकारचा विचित्र वास येतो. त्यांचं राहणीमान-वैयक्तिक स्वच्छता यांवर परिणाम होतो. वर्तनात बदल होतो. मुलं पूर्णपणे शिथिल होऊन तासन्तास झोपून राहतात किंवा अतिउत्तेजितव आक्रमक होतात. मुलं एका जागी स्थिर बसत नाहीत. त्यांना खूप गोड खायची इच्छा होते.

अभ्यासाला कंटाळा करते आणि खोटं बोलते या वर्तनविषयक समस्यांबाबतच्या समुपदेशनासाठी एका ११ वर्षांच्या मुलीला तिचे आईवडील घेऊन आले. बाकी सगळय़ा विषयांबरोबरच ती प्रत्येक भेटीत ‘मला गोड खायला देत जा, हे तुम्ही आईला सांगा,’ असं मला सुचवत असे. सुरुवातीला मला ते वेगळं वाटलं नाही; पण बोलता बोलता तिच्याकडून उघड झालेली काही गुपितं आणि तिची लक्षणं यांची सांगड घातल्यावर या लहानगीला तिच्या मैत्रिणीनं काही गोळय़ा खायला दिल्या होत्या आणि तिला त्या आता नेहमी खाव्याशा वाटतात हे समोर आलं. त्यातून गोड खाण्याविषयीची तिची ओढ ही त्या गोळय़ांमधल्या ड्रग्जमुळे होती याचा उलगडा झाला. आपणही आपल्या पाल्याकडे नीट लक्ष दिलं, त्यांच्याशी जरा संवाद ठेवला, तर अशा गोष्टी प्रारंभिक अवस्थेतच उघड होऊ शकतात व त्यावर उपाययोजनाही सोपी होते. अशा मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडालेलं असतंच, जेवणाखाण्याचं आणि झोपेचं गणित बिघडतं. इतकंच नाही, तर बऱ्याच वेळा ही मुलं खोटं बोलताना सापडतात.

अनेकदा आपल्याला असं वाटत असतं, की कसल्या तरी गुन्ह्यांमध्ये अडकलेली मुलं ही सर्वसामान्य घरातील नसतात; पण वास्तव तसं उरलेलं नाही. अशा रीतीचे गुन्हे आणि ड्रग्ज-दारू आदी व्यसनांचा खूप जवळचा संबंध आहे. एकदा नशेची चटक लागली, की पॉकेटमनी पुरत नाही. मग इतर मार्ग शोधावे लागतात. घरातून चोरी पकडली गेली की मग सामान्य कुटुंबातली मुलंही लोकांच्या पर्स किंवा साखळी चोरणं अशा गोष्टींकडे वळतात हेही अनेकदा समोर आलं आहे. कित्येकदा नशेसाठी पैसा मिळवायच्या नादात त्यांच्याकडून प्राणघातक हल्ले किंवा चुकून हत्याही होतात. एकदा आपली मुलं-मुली या चक्रात अडकली आहेत हे लक्षात आलं तरी घाबरून धीर सोडू नका. सर्वप्रथम मुलाला विश्वासात घेऊन या सगळय़ाची सुरुवात कुठून झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्याशी नीट बोलत नसेल तर समुपदेशकांची मदत घ्या किंवा थेट मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा. दुर्दैवानं ही समस्या ज्या गतीनं तीव्र होत आहे, त्या प्रमाणात चांगली व्यसनमुक्ती केंद्रं उपलब्ध नाहीत. जी चांगली आहेत ती मोजकी आहेत.

व्यसनमुक्तीवर तिथे मानसशास्त्रीय उपाय व इतर उपचारांसह काम केलं जातं. साधारणपणे महिन्याला चार-पाच हजारांपासून ते अधिक रक्कम आकारणारी व्यसनमुक्ती केंद्रं उपलब्ध आहेत. निम्न आर्थिक स्तरातील लोकांसाठी पूर्णपणे मोफत असं केंद्र एखाद्दुसरं आहे; पण हे झालं पुढचं.
एकदा एक सहा फुटांचा धिप्पाड माणूस त्याच्या अठरा वर्षांच्या मुलाला घेऊन समुपदेशनासाठी आला होता. वडील बोलत होते आणि मुलगा एकटक एका जागी नजर लावून बसला होता. वडिलांनी सांगितलं, की ते पूर्वी राहायचे त्या भागात चांगली संगत नव्हती, त्यामुळे या मुलाला नशा करण्याची सवय लागली. ती सवय आणि संगत सुटावी म्हणून त्यांनी राहण्याची जागा बदलली आणि एका चांगल्या परिसरात, मोठय़ा इमारतीत भाडय़ानं घर घेऊन ते राहू लागले; पण याचं व्यसन सुरूच राहिलं. तो व्हाइटनर मुठीत घेऊन त्याचा वास घेत राहायचा. त्यामुळे लिफ्टमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा. लोक वडिलांकडे मुलाची तक्रार करायचे, हे सांगताना तो पहाडासारखा दिसणारा माणूस आतून कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. ‘‘कोणत्या बापाला आपल्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रात टाकून द्यावं असं वाटत असेल! पण मी सगळे उपाय करून थकलो. आता या नव्या परिसरातही माझी काहीच प्रतिष्ठा राहिलेली नाही. सगळे माझ्याकडे ‘याचा मुलगा नशेडी आहे’ अशाच नजरेनं बघतात किंवा ते तसंच बघत आहेत असं मला वाटून लाज वाटत राहाते. आता मीही लोकांमध्ये मिसळणं बंद केलं आहे..’’ अशी त्या हताश पित्याची व्यथा होती.

साधारण अकरावीला असलेली निशा तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती. निशाची आई इंजिनीयर होती. तिनं आपल्या मुलीच्या अभ्यासासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ते ज्या इमारतीत राहायचे त्या इमारतीच्या गच्चीवर निशा आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन पार्टी करायची. मैत्रिणी क्वचित असायच्या आणि मित्रच जास्त असायचे. सुरुवातीला आईनं याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर जेव्हा आईनं अचानक एके दिवशी जाऊन बघितलं, तेव्हा तिला तिथे दारूच्या बाटल्या आणि ड्रग्जची पाकिटं आदी साहित्य पडलेलं आढळलं. त्यामुळे तिनं मित्रांना हाकलून दिलं; पण ‘माझ्या मित्रांना का हाकलून दिलं?’ म्हणून निशानं गोंधळ घातला आणि संपूर्ण इमारतीमधले लोक गोळा झाले. या सर्व प्रकारानंतर निशाच्या आईनं तिला समुपदेशनासाठी आणलं. निशा खूप जोरात ओरडून सांगत होती, ‘‘तुम्ही चांगला श्रीमंत नवरा बघून माझं लग्न लावून द्या. मी खूप सुंदर दिसते. त्यामुळे मला सहज श्रीमंत मुलगा पसंत करेल; पण मला शिकायचं नाही.’’ तिला अकरावीचं शिक्षणही या व्यसनामुळे जड वाटायला लागलं होतं. समुपदेशनाच्या अनेक सत्रांनंतर हळूहळू निशामध्ये बदल झाले. आईनं दिलेल्या आधारानंतर आणि समुपदेशनाच्या मदतीनं निशा या सगळय़ातून बाहेर पडू शकली आणि तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. आज ती तिच्या क्षेत्रात चांगलं काम करत आहे.

या सगळ्यांत सर्वात प्रथम पालकांनाच आपल्या मुलांना आधार द्यायचा आहे. व्यसनमुक्ती केंद्रात गेल्यावर तिथे तज्ज्ञ मदत करतीलच; पण तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तर पालकांनाच करावं लागेल. या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमांना ‘डीटॉक्स प्रोग्राम’ म्हणतात. शरीरातली विषारी द्रव्यं तर काही दिवसांत निघतील; पण मानसिकरीत्या ‘डीटॉक्स’ होण्यासाठी मुलांना स्वीकारा, आधार द्या. तरच ते या सगळय़ांतून बाहेर पडतील.शारीरिक संबंधातून उद्भवणाऱ्या समस्या केवळ ड्रग्ज हेच एक आव्हान नाही, तर नको त्या वयात शारीरिक संबंध व त्यातूनउद्भवणाऱ्या समस्या हेही आजच्या पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. १७ वर्षांची मीरा आईला नजर देण्याचं टाळत होती. क्लासमधून घरी आली की दमले, असं सांगून लगेच आपल्या खोलीत जाऊन झोपायची. एरवी आईला कामातून वेळ काढून गप्पा मारायला लावणारी मीरा एवढी टाळायला का लागली ते कळत नव्हतं. एकदा ती आंघोळीला गेल्यावर आईनं तिची बॅग तपासली, तर त्यात प्रेग्नन्सी किट होतं आणि एक निगेटिव्ह टेस्ट होती. आईला धक्काच बसला. तितक्यात मीरा बाहेर आली आणि ते सर्व पाहून आईला गच्च मिठी मारून खूप रडली. आकांडतांडव न करता मीराला विश्वासात घेऊन आईनं सगळा प्रकार समजून घेतला. मीराला तिच्या वर्गातला सोहम प्रचंड आवडत होता. तिनं सोहमला प्रपोज केले. काही दिवसांनी सोहमनं तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. प्रेम आणि विश्वास असेल तर हो म्हणशील, अशी बतावणी करत तिच्यावर भावनिक दबाव आणला. तिनंही प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याची मागणी मान्य केली. आता तिला या सगळय़ाचा खूप पश्चात्ताप होत होता. पालक म्हणतील, पश्चातबुद्धी काय कामाची? पण अठरा वर्षांनंतरच जेव्हा मेंदूचा ‘फ्रंट लोब’ विकसित होतो तेव्हाच त्यांना परिणामांची आणि बऱ्यावाईटाची थोडी जाण येते. तोपर्यंत त्यांना सगळय़ाच गोष्टींचं थ्रिल वाटत असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

अनेक प्रकरणांत विवाहपूर्व किंवा अल्पवयातले शरीरसंबंध हे कॉलेज नाही तर शाळेपासून सुरू होतात हे दिसलं आहे. होय, शाळेपासून. ‘पॉक्सो’ कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अल्पवयीन मुलींनी संमती दिल्यानंतर येणारे शरीरसंबंधही बलात्कार आणि बालकांवर केलं जाणारं लैंगिक शोषण या प्रकारातच मोडतात. कारण ती मुलगी संमती द्यायला सज्ञान नाही. तरुणाईवरचा चित्रपटांचा प्रभाव हा नवीन विषय नाही. आता या चित्रपटांची जागा वेब सीरिजनं घेतली आहे. खरं तर वेब सीरिजमधून कित्येक उत्तम विषयही हाताळले जातात, पण खूपशा वेब सीरिजची गाडी अश्लील संवाद-शिव्या, काही इंटिमिट दृश्यं, अंगावर येणारी हिंसा दाखवल्याशिवाय पुढे जात नाही.

वेब सीरिजच्या माध्यमातून मुलांपर्यंत या साऱ्या गोष्टी तपशीलवार जात आहेत. त्यात दाखवतात हे ‘रील लाइफ’ इतका वेळ दिसतं, की मुलांना तेच ‘रिअल लाइफ ’ म्हणजेच असंच आयुष्यात असतं असं वाटू लागतं किंवा त्यांची मूल्यव्यवस्था-समज-धारणा बनण्यात या माध्यमांचा प्रभाव पडतो. पण आपल्या खऱ्या आयुष्यात परिस्थिती अजूनही प्राधान्यानं कुटुंबप्रधानच आहे आणि ते कुटुंब लग्नसंस्थेवरच आधारित आहे. त्यामुळे पाश्चात्त्य किंवा पडद्यावरच्या जीवनशैलीचं अनुकरण करण्याच्या नादात मित्रांशी ठेवलेले शरीरसंबंध उघड झाल्यावर भारतात आजही लग्नामध्ये अडथळा येऊ शकतो. कारण बाहेर आधुनिकतेच्या नावाखाली स्वैरपणे वागणारे अनेक जण घरात मात्र भारतीय कौटुंबिक वातावरण हवं या मानसिकतेत जगतात. त्यामुळे तरुणाईला किंवा तरुण होत असलेल्यांना या सर्व गोष्टींची कल्पना देण्यासाठी व नको त्या वयात ते अडचणीत येऊ नयेत यासाठी योग्य संवाद पालकांना ठेवावा लागेल.

समाज म्हणून विचार करता मुलांवर येणारी ही संकटं कशी टाळता येतील याची अधिक जबाबदारी ही मुलांपेक्षा प्रौढांची आहे. त्यात केवळ पालकच येतात असं नव्हे, तर शिक्षक व शेजारीपाजारीही आपली भूमिका पार पाडू शकतात. आपल्यासोबत वावरणारं मूल परक्याचं असलं तरी शिक्षक म्हणून किंवा शेजारी म्हणून आपलंही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवायला हवी. मुलांच्या वर्तनात काही गैर आढळलं तर ते पालकांच्या नजरेस आणून देण्यानंही अनेक प्रश्न वेळीच सुटू शकतात.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतात आले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांशी झालेल्या एका संवादात ओबामा यांनी भारतातली तरुण पिढी आणि तिच्या हुशारीवर भाष्य केलं होतं. भारताची ही तरुणाई आपल्या गुणवत्तेच्या जोरावर काही दशकांत देशाला जगात महासत्ता बनवू शकते असा ओबामा यांचा सूर होता. भारताची अशी ही हुशार, होतकरू तरुणाई ड्रग्ज, दारूचं व्यसन असो, की व्हिडीओ गेम्स व इतर इलेक्ट्रॉनिक खेळांचं व्यसन किंवा नकळत्या वयातल्या संबंधांमुळे आलेलं कायदेशीर संकट, यात अडकली तर त्याचा परिणाम देशाच्या भविष्यावर निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे हा धोका ओळखून हे संकट ओळखण्याचं आणि त्याला थेट भिडण्याचं भान दाखवावं लागेल.सरकारी पातळीवरही या गोष्टीची दखल घेऊन एके काळी तरुणाईला ‘एचआयव्ही-एड्स’ पासून वाचवण्यासाठी जनजागृती केली गेली, तशीच नव्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी मोहीम राबवावी लागेल. त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्रांची गरज ओळखून त्या आघाडीवरही काम करण्याची गरज आहे.
मुलांचं हे ‘दप्तरातील गुपित’ वेळीच लक्षात घेऊन त्यावर सर्व स्तरातून प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे.
trupti.kulshreshtha@gmail.com