अंजली भावे

मला घडवणारे शिक्षक’ या सदरातले लेख वाचताना मला तीव्रतेनं आठवण झाली ती आमच्या मंदाकिनी राणे बाईंची. ही पन्नासच्या दशकातली गोष्ट. आम्हाला इंग्रजी पहिल्या यत्तेपासून गणित व इंग्लिश शिकवणाऱ्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या राणे बाई.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

अहमदनगरमधील ‘गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल’मध्ये इंग्रजी पहिल्या यत्तेत (म्हणजे मराठी पाचवीत) मी प्रवेश घेतला होता. पहिलाच दिवस आणि पहिलाच तास. राणे बाईंनी वर्गशिक्षिका म्हणून वर्गात प्रवेश केला. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि चेहऱ्यावर आश्वासक स्मितहास्य. त्याच क्षणी त्यांनी आम्हा सगळय़ांना आपलंसं केलं होतं.

बाई वर्गावर आल्या की अतिशय खेळकर वातावरणात शिकवायला सुरुवात करत. फळय़ावरचं अक्षर सुवाच्य आणि सुरेख. पाहता पाहता पूर्ण वर्ग त्यात तल्लीन होऊन जात असे. इंग्रजी आणि गणित हे विषय त्या उत्तम रीतीनं शिकवतच, पण अभ्यासक्रमापलीकडे आमची सर्वागीण प्रगती कशी होईल याकडेही जीव ओतून लक्ष देत.  प्रत्येक विद्यार्थिनीच्या आकलन क्षमतेबरोबरच तिची साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीही त्या जाणून घेत. आमचा वर्ग अखेपर्यंत- म्हणजे अकरावीपर्यंत आपल्या अखत्यारीत असावा यासाठी त्यांनी मुख्याध्यापिका बाईंकडून खास परवानगी मिळवली होती. ‘विद्यार्थी समुपदेशक’ ही संकल्पना त्या काळी प्रचारात नव्हती, मात्र राणे बाईंसारखी समुपदेशक मी अजून पाहिलेली नाही.

परीक्षेत एखाद्या विषयातली उत्तरपत्रिका छान लिहिली, तर त्या खुशीत येऊन आपल्या वळणदार आणि लफ्फेदार अक्षरात  ‘Very Good’ किंवा ‘Excellent’ असा शेरा देत . तो पाहूनच आम्हाला अधिक चांगला अभ्यास करायला उत्तेजन मिळे. याउलट एखादीनं काही चुकीचं लिहिलं, गुण कमी मिळाले, तर तिला जवळ बोलावून कळकळीनं अशा प्रकारे समजावत, की त्या विद्यार्थिनीलाच वाटे की राणे बाईंसाठी तरी चांगला अभ्यास करायला हवा!

गणित विषयात त्यांनी आमच्यावर विशेष मेहनत घेतली होती. त्यांनी वर्गाचे ढोबळमानानं दोन गट केले. त्यातला एक गट अशा मुलींचा, की ज्यांची तयारी चांगली असायची, पण गुण अपेक्षेइतके मिळायचे नाहीत. मग बाई सांगत, ‘‘घाई-गडबड, धांदल करू नका. प्रश्नपत्रिका नीट वाचा. काय विचारलं आहे ते समजून घ्या आणि नंतरच प्रश्न सोडवायला घ्या. इतकं केल्यावर गणितं बिनचूक येणारच’’ दुसरा गट गणित विषयाची नावड असणाऱ्यांचा. ज्यांना गणिताची भीती होती, त्यांना बाई गणितातल्या मूळ संकल्पना नीट समजावून सांगत, पुन:पुन्हा चिकाटीनं घोटून घेत. आजच्या जमान्यात खोटं वाटेल, पण ही सगळी मेहनत विनामोबदला होती! केवळ विद्यादान करण्याच्या कळकळीपोटी.

अभ्यासेतर उपक्रमांतही त्यांना तितकाच रस होता. एखाद्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की त्यांचं नियोजन आणि वेळापत्रक अगदी चोख असे. एके वर्षी आंतरशालेय स्पर्धेत आमच्या शाळेची टीम हुतुतू, खोखो आणि धावणे या स्पर्धात अंतिम सामना जिंकून आली. त्या वेळी राणे बाईंनी पूर्ण टीमला त्यांच्या घरी फराळाला बोलावलं. शाळेत कौतुक झालं, त्यात विशेष नवल नाही, पण बाईंनी आपुलकीनं विद्यार्थिनींना घरी बोलावलंय याचं सगळय़ा मुलींना फार अप्रूप वाटलं.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी त्या आमची समूहगीतं किंवा नृत्य उत्तम बसवून घेत. वेळ पडली तर स्वत: गाऊन किंवा नाचाच्या स्टेप्ससुद्धा करून दाखवत. जे काही करायचं ते उत्तमच, हा धडा त्यांनी आमच्याकडून घटवून घेतला होता आणि तोही फार लहान वयात. पुढच्या आयुष्याची भक्कम पायाभरणी त्या आमच्याकडून नकळत करून घेत होत्या. एकदा शाळेची वार्षिक सहल होती आणि आमच्या वर्गातल्या एकीला सहलीची वर्गणी परवडत नाही म्हणून सहलीला येता येणार नव्हतं. बाईंनी स्वत: तिचे पैसे भरलेच, पण तिच्या पालकांना ओशाळं वाटू नये म्हणून सांगितलं, की ‘‘मी माझी मदतनीस म्हणून तिला नेते आहे.’’ एखाद्याचा स्वाभिमान न दुखवता त्याला मदत कशी करावी, याचा आम्हाला घालून दिलेला वस्तुपाठ होता तो.

याच बाई आमच्या वर्गाला अकरावीपर्यंत मिळणार म्हणून आम्ही खुशीत होतो. आम्ही नववीत असताना नुकतंच बाईंचं लग्न झालं होतं आणि त्याही छान आनंदात असायच्या. पण बहुधा नियतीला हे मंजूर नव्हतं. १९५५ मध्ये २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा समारंभ आठवडय़ावर येऊन ठेपला असताना आणि शाळेत सर्वजण त्याच्या तयारीत असताना अचानक बाईंना घटसर्प या दुर्धर रोगानं ग्रासल्याची बातमी आली.  २४ जानेवारीला त्यातच त्यांचं निधन झालं. सर्वाना चटका लावून वयाच्या अवघ्या तिशी-पस्तिशीत बाई गेल्या. इतकी वर्ष होऊन गेली, पण आजपर्यंत एकही २४ जानेवारी असा गेला नाही, ज्या दिवशी बाईंच्या आठवणींनी डोळे पाणावले नाहीत. आज या सगळय़ाला जवळपास ६५ वर्ष उलटून गेली. तेव्हाच्या काही मैत्रिणी आजही एकमेकींच्या संपर्कात आहोत. पण राणे बाईंचा विषय निघतो आणि त्यांच्या असंख्य मर्मस्पर्शी आठवणींनी मन कातर होऊन जातं.