प्रा .संजयकुमार कांबळे
शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि स्त्री-सशक्तीकरणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शांताबाई दाणी. त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान मोलाचे होते. तुरुंगातल्या स्त्रियांना शिकवणे असो की, आर्थिकदृष्ट्या शक्य नसतानाही मुलींच्या शिक्षणासाठी आपले दागिने देणे, शांताबाईंनी मुला-मुलींसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. निधीच्या अभावातही वसतिगृहे आणि शाळा सुरू केल्या आणि शैक्षणिक भेदभावाविरोधात लढा दिला. दलित स्त्रीवादाला एक दिशा देणाऱ्या त्यांच्या कार्याचा हा आढावा…
१९ ७०च्या दशकापासून भारतातील स्त्रीवादी चळवळींमध्ये दलित स्त्रिया सक्रिय झाल्या. आंबेडकरी विचार, बौद्धविचारांची चळवळ, शिक्षण, साहित्य आणि मौखिक इतिहास यांच्या माध्यमातून पुढे दलित स्त्रीवाद विकसित झाला. या प्रवाहाने मुख्य प्रवाहातील स्त्रीवादावर प्रश्न उपस्थित करत दलित स्त्रियांच्या अनुभवांवर आधारित एक स्वतंत्र विचारसरणी उभारली.
राधा कुमार यांच्या ‘History of Doing’ या पुस्तकात स्त्री चळवळीच्या उदयावर प्रकाश टाकला आहे. वसाहत काळापासून ते १९९० पर्यंत झालेले विविध प्रयत्न त्यांनी त्यात मांडले आहेत. मात्र या पुस्तकात दलित स्त्रियांच्या योगदानाला पुरेसं स्थान न मिळाल्यामुळे उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून यांचं ‘आम्हीही इतिहास घडवला’ हे पुस्तक आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला समोर आणतं. आंबेडकरी चळवळीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनीही सहभाग घेतलेला आहे. भारतातील दलित चळवळ ही जातीविरोधी संघर्षाचा प्रमुख आधार राहिली आहे, परंतु या चळवळीतील दलित स्त्रियांचं योगदान अनेकदा दुर्लक्षित राहातं. ‘रूढ कल्पनांनुसार दलित स्त्रियांकडे नेतृत्वाचा अभाव आहे आणि त्या समाजातील प्रथांविरुद्ध सक्रिय नसतात,’ या विचारांना आंबेडकरवादी स्त्रीवाद्यांनी आपल्या कृतीतून जोरदार आव्हान दिलं आहे. शांताबाईंचं कार्य (१९१९-२००१) या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
शांताबाईंचा जन्म नाशिकजवळील खडकली भागातील झोपडपट्टीत झाला. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मागास होतं. त्यांच्या घरात आधीपासूनच सावत्र भावंडं होती. त्यांच्या जन्माच्या वेळी अपेक्षित मुलगा न झाल्यामुळे वडील निराश झाले म्हणून त्यांचं नाव ‘शांता’ ठेवलं गेलं. शांताबाईंच्या आयुष्यावर त्यांच्या बहिणींच्या बालविवाहातून झालेल्या छळाचा आणि त्यांच्या कुटुंबातील नंतरच्या काळातल्या आर्थिक अडचणींचा खोल परिणाम झाला. सुरुवातीच्या काळात शांताबाईंच्या वडिलांकडे बारा म्हशी होत्या आणि ते तेथील युरोपीय अधिकाऱ्यांना दूध पुरवायचे. त्यामुळे कुटुंबीयांची उपजीविकेची सोय काही प्रमाणात होत होती. शिक्षणाचे महत्व माहीत असलेल्या शांताबाईंच्या आईवडिलांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांना मिशनरी शाळेत घातले. जिथे शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्येही शिकवली जात होती. मात्र त्यांच्या भावाच्या, शंकर याच्या अचानक झालेल्या मृत्यूने सारीच परिस्थिती बदलली. त्यांचं शांत आणि आनंदी जीवन ढवळलं गेलं. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे परिस्थिती अधिकच ढासळली आणि आईने उदरनिर्वाहासाठी मेहनतीची कामे सुरू केली. जातीय भेदभावाचा अपमानास्पद अनुभव त्यांना लहानपणीच आला होता. त्यातच आईच्या अचानक मृत्यूचा धक्का शांताबाईंना सहन करावा लागला. मात्र या सर्व संघर्षांनी त्यांना आत्मविश्वासू आणि लढाऊ बनवलं. अनुभव हा त्यांचा गुरू होता. शांताबाईंना वाटायचं, ‘जितका जास्त संघर्ष करावा लागत होता, तितकीच लढण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ होत होती; आणि आतली आग तितकीच प्रखर होत होती.’
दलित स्त्री ही जातीचे वर्चस्व आणि जगण्याच्या गरजा या अवकाशात जगत असते. त्यामुळे तिच्या दमनाची तुलना इतर कोणत्याही सुखासीन कथनाशी, जगण्याशी करता येत नाही. शांताबाई पुढे एक प्रभावी कार्यकर्त्या बनल्या त्यासाठी त्यांना मदत मिळाली ती राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड यांची. त्यांनी शांताबाई यांना ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ (एससीएफ) साठी काम करण्यास तयार केले. त्यांनीच त्यांना लोकांसमोर भाषण करण्याची संधी दिली आणि विचार स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शनही केलं. शांताबाई सांगतात की, ‘एससीएफच्या आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठा व लक्षणीय होता, त्यांना राजकीय कार्यात समावेश मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार, दलित स्त्रियाच सर्वात अधिक वंचित होत्या आणि त्यांच्या प्रगतिशील दृष्टिकोनामुळेच त्या नाशिक जिल्हा एससीएफच्या अध्यक्षा होऊ शकल्या.’
शांताबाईंचं आयुष्य हे सामाजिक कार्य, स्त्रियांचा सहभाग आणि आंबेडकरी विचारसरणीच्या प्रचाराला समर्पित होतं. फाळणीनंतर त्यांनी सागर शहरातल्या विस्थापितांची अवस्था स्वत: पाहिली. त्यांना मदत केली. १९४८ मध्ये दादासाहेब गायकवाड ‘एससीएफ’चे अध्यक्ष झाल्यावर शांताबाई प्रांतिक सचिव म्हणून अधिक सक्रिय झाल्या. त्यांचं काम बैठका घेणं, पत्रव्यवहार, लोकांवरील अत्याचाराची नोंद आणि जनजागृती हेे होतं. अडचणी आणि साधनांची टंचाई असूनही त्या रचनात्मक कार्यात त्या नेहमी सक्रिय राहिल्या. त्यातून त्यांच्यातली स्त्री कार्यकर्ती घडत गेली.
शांताबाई बी.ए.ची परीक्षा देणार होत्या, पण त्यांनी ते सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या पुणे कराराच्या सत्याग्रहात भाग घेतला. या कृतीतून त्यांच्या ठाम विचारसरणीचा आणि सामाजिक चळवळीतील समर्पणाचा प्रत्यय येतो. यावेळी सत्याग्रहात शांताबाई, सीताबाई गायकवाड आणि इतर स्त्रिया सहभागी झाल्या. त्यांनी काळे झेंडे दाखवून सत्याग्रहात सक्रियता दाखवली, त्यामुळे त्यांना अटक झाली आणि येरवडा तुरुंगात ठेवले गेले. तिथे त्यांना राजकीय कैद्यांसारखा दर्जा मिळाला. तुरुंगात असताना शांताबाईंनी तेथील अशिक्षित स्त्रियांना डॉ.आंबेडकरांचे विचार सांगितले आणि त्यांचे अधिकार समजावले. ‘एससीएफ’ चळवळीत पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेदभाव नव्हता, ही एक चांगली बाब होती. शांताबाईंच्या ‘रात्रंदिन आम्हा’ या आत्मकथनातून त्यांच्या सामाजिक कार्याची व्यापकता, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी केलेले प्रयत्न आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकजागृतीचं प्रभावी कार्य स्पष्टपणे समोर येतं.
दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दलित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण चळवळ सुरू झाली. त्यातून ‘रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह’ सुरू झालं. आर्थिक अडचणी असतानाही सीताबाई गायकवाड आणि शांताबाईंनी यासाठी आपले दागिने देऊन मदत केली. शांताबाईंनी नेतृत्वगुण असलेल्या मुलींना ओळखून त्यांच्या शिकवण्यावर भर दिला. त्यांनी मुला-मुलींसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. निधीच्या अभावातही वसतिगृहे आणि शाळा सुरू केल्या आणि शैक्षणिक भेदभावाविरोधात लढा दिला. शाळा सुरू करण्यासाठी कामगार, कार्यकर्ते आणि नाट्यप्रयोगांचा आधार घेतला आणि तेथील शेडमध्ये शिक्षण चालवलं.
शांताबाई दाणी या एक धाडसी, बुद्धिमान आणि प्रेमळ स्त्री होत्या, ज्यांनी शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि स्त्री-सशक्तीकरणासाठी आयुष्य वाहिलं. त्यांचा शिक्षणावरील विश्वास, शाळा, संस्था स्थापनेसाठीचे प्रयत्न, आणि विद्यार्थी घडवण्याचं कार्य हे त्यांना केवळ शिक्षिका नव्हे तर एक क्रांतिकारक सामाजिक नेतृत्व देतं. त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमधून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्कार मिळाले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशाचा प्रचार केला. त्यांनी शाळा व वसतिगृहांची उभारणी केली. ‘शाळा ही समाजक्रांतीचं साधन आणि स्त्रीशक्तीच्या विकासाचं स्थान असावं. शिक्षणाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्हावा’, यावर त्यांचा भर होता.
शांताबाईंनी राज्यपालांच्या नामनिर्देशनाने विधान परिषदेत प्रवेश केला. तिथं जातीवर आधारित विहिरीच्या पाण्याच्या वाटपाचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रभर दौरे केले तसेच अनेक ‘जागतिक बौद्ध परिषदां’मध्ये सहभाग घेतला. तिथं त्यांची जपानी स्त्रियांच्या संघटनांशी ओळख झाली आणि वेगळ्या सामाजिक चळवळींचा अनुभव मिळाला.
शांताबाईंच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख करताना विशेषत: दलित हक्क, जमिनीसाठीच्या चळवळी आणि स्त्रियांच्या प्रश्नांतील सहभागाची नोंद घ्यावी लागेल. आपल्या एका भाषणात त्यांनी शेतकरी, कामगार व आदिवासी यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देण्याच्या गरजेकडे लक्ष वेधलं. १९७५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षा’च्या एका समारंभात शांताबाईंनी नमूद केलं की, ‘यात मागासवर्गीय स्त्रियांचा कोणताही विचार केला गेला नाही. बहुतेक कार्यक्रमांमध्ये, प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू स्त्रियांनी भाग घेतला होता. त्यानंतरच्या काळात अनेक शिबिरं झाली. ज्यात ‘रिपब्लिकन पक्षा’ने युवक आणि राज्य आधारित स्त्रियांच्या शाखांच्या गरजेवर चर्चा केली. अर्थात स्त्रीवाद हाशब्द नंतरच्या टप्प्यावर आला असला तरी शांताबाईंनी सुरुवातीपासूनच स्त्रियांसाठी काम करणं सुरू केलं होतं.
वयाच्या ७२व्या वर्षी त्या सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्या. तरीही मनमाड आणि नाशिक येथील ‘शैक्षणिक संस्थां’च्या विकासासाठी पूर्णपणे समर्पित होत्या. त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना १९८७ मध्ये ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला. मात्र ‘दलित मित्र’ पुरस्कार नाकारून त्यांनी तो निधी थेट दलित वस्त्यांसाठी वापरण्याची भूमिका घेतली. १९४०च्या दशकापासून मृत्यूपर्यंत, शांताबाई दाणी यांचं कार्य समाजासाठी समर्पित होतं. थोडक्यात, शांताबाई दाणी यांच्या कार्यावर आधारित अभ्यास हा दलित स्त्रीवाद, आंबेडकरवादी दृष्टिकोन आणि पितृसत्ताक संरचनांविरोधातील संघर्षांचं चिंतनात्मक स्वरूप समोर आणतो. त्यांच्या लेखनात आत्मशोध, नाकारलेपण आणि विद्रोहाचं बीज आढळतं, जे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या व्यापक आशयाशी जोडलेलं आहे. ‘रात्रंदिन आम्हा’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि त्यांनी झेललेल्या सामाजिक अडचणींचा प्रत्यक्ष दस्तावेज आहे. हे केवळ एक स्वकथन नसून, पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध लढ्याचं सशक्त प्रतीक आहे. शांताबाईंच्या विचारांतून आणि कृतींतून स्त्री सक्षमीकरण, दलित समाजाची जागृती आणि शिक्षणाचं मोल हे मुद्दे ठळकपणे उभे राहतात. आंबेडकरोत्तर सामाजिक चळवळीतील त्याची अपरिहार्यता, परिणामकारकता आणि ऐतिहासिकता आजही जाणवते.
त्यांचं कार्य दलित स्त्रीवादाला एक स्पष्ट दिशा देतं आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाला आशयपूर्ण ठरवतं. ज्यामुळे पुढील पिढ्यांना प्रेरणा आणि चळवळीचं दिशादर्शन मिळतं.
(लेखक सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे ‘स्त्री आणि लिंगभाव अभ्यास’ विभागात प्राध्यापक आहेत.)