या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ जानेवारीच्या ‘(अ)स्वच्छतागृह’ या लेखात लेखिकेने सांगितल्याप्रमाणे मीही अतिशय गलिच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहाचे अनुभव वेळोवेळी प्रवासात मी घेतले आहेत. मुंबई-पुणे ट्रेनमधील फर्स्ट क्लासची टॉयलेट्ससुद्धा इतकी घाणेरडी असतात की तीन तासांच्या प्रवासात एकदा कसेबसे श्वास रोखून जाऊन यावे लागते. बेसिनलाही पाणी नसते आणि असले तरी आजूबाजूला लोकांची गर्दी एव्हढी असते की हात धुणेही अशक्यच.

पुणे-मुंबई शिवनेरी बसचा लोणावळा फूड मॉलवरचा थांबा त्याहीपेक्षा अस्वच्छ. पाणी कधीच नसते, असले तर नळ बंद होत नाही. शेवटी आपले कपडे सांभाळत कार्य उरकायचे, दरवाज्यांची अवस्था पण दयनीय. मी एकदा लोणावळ्याला फूड मॉलमधील स्वच्छतागृहात गेले. बरीच मोठी रांग होती सगळीकडे. शेवटच्या टॉयलेटसमोर गेले इतक्यात एक खेडवळ बाई आतून बाहेर आली, मी विचारले, स्वच्छ आहे का आत? तर कसनुसा चेहरा करत गेली. आत गेल्यावर कडी लावायला गेले तर लक्षात आले दरवाजा अर्धा तुटलेला होता, सगळेच आपले तसेच जात होते, शेवटी तक्रार करायला गेले तर ड्रायव्हर म्हणाला, डेपोत तक्रार करा, पण त्याचीही कोणी दखल घेतील का सांगता येत नाही.

मोठमोठे मॉल, नाटय़गृह अथवा थिएटरमध्ये क्वचितच स्वच्छ टॉयलेट्स आणि रेस्ट रूम असतात. बाकी इतर ठिकाणी वानवाच. लेखिकेने सांगितल्याप्रमाणे खरंच नगरसेवक, राजकीय नेते याची दाखल घेतील का?  खरंच आपल्या देशाभरातच या मूलभूत गरजांपासून आपण सामान्य माणूस आणि त्यातही विशेषत: स्त्रिया अजून किती दिवस वंचित राहणार, कोण जाणे ?

– स्वप्नजा पंडित, ठाणे</strong>

(अ) स्वच्छतागृह सगळीकडेच

२८ जानेवारीला प्रसिद्ध झालेला मीनल श्रीखंडे यांचे ‘(अ) स्वच्छतागृह’ हे ‘मनातले कागदावर’ हे वाचले. खरोखरच आपल्या देशातील स्वच्छतागृहांची अवस्था पाहून दु:ख होते. आमची अखिल भारतीय महिला परिषद नेहमी कुठे कुठे प्रवासाला जातच असते. त्यामुळे आम्हाला याचा बराच अनुभव आलेला आहे. एकदा आम्ही कोकणात गेलो होतो. देवगड येथे उतरलो. आमच्याबरोबर एक गर्भवती स्त्रीही उतरली होती. तिथल्या स्वच्छतागृहात गेल्यावर तिला उलटीच झाली इतकी तिथली स्थिती वाईट होती. ही आपली परिस्थिती. काय बोलणार?

तसेच एकदा दापोलीस गेलो होतो. दापोली एस. टी. स्टॅण्डच्या शौचालयात गेलो असता तिथे  पाणी गळती, बुळबुळीत लाद्या, दरुगधी. बघुनच किळस येते. थोडय़ाफार फरकाने अशीच अवस्था असणाऱ्या देवगड, कणकवली, दापोली, महाड, उरण येथील एसटी स्थानकांवर या ठिकाणी मी पत्रे पाठवली. डेपोत संपर्कही साधला. त्यांनी पाणी नाही काय करणार? असे सांगितले. त्यावर मी त्यांना उपाय सुचवला. सकाळ-दुपार-संध्याकाळ तीन पाळ्यांमध्ये माणसे ठेवायची. तिघांनी पिंप भरून ठेवायचे. प्रत्येकाकडून २/२ रुपये घ्यायचे. शिवाय तीन कुटुंबे या पाण्यावर पोसली जातील. परंतु यापैकी फक्त महाड डेपोतून मला पत्र आले. आपला विचार चांगला आहे. आम्ही लवकरच अमलात आणू. दादर-उरण एस. टी. सतत सुरू असते तिथे तर अतिशय हालाखीची परिस्थिती. बाहेरच्या लोकांची सोय नाहीच. परंतु वाहक -चालक यांची स्थितीही खूपच वाईट. त्यांच्याशी बोलले ते म्हणतात आम्ही बऱ्याच तक्रारी केल्या काहीही उपयोग नाही. मध्यंतरी एस.टी.च्या बस रिकाम्या जातात. त्यामुळे एस. टी. महामंडळास खूप नुकसान होते असे वृत्तपत्रात येत होते. खासगी वाहतूक करणारे चांगल्या हॉटेलजवळ बस थांबवतात, त्यामुळे प्रवाशांची योग्य सोय होते. याचा विचारच एस.टी.महामंडळ करीतच नाही की आमचे लोकप्रतिनिधीही करीत नाही. पण त्याचा फटका सामान्यांना बसतो त्याचं काय?

– राजश्री सावंत, मुंबई</strong>

 

वेळीच आवर घालायला हवा

‘कोवळ्या वयाची दारु(ण) अवस्था’ हा शैलजा तिवले यांचा ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला लेख फार आवडला. कोवळ्या वयात जर आपला पाल्य बिअर पिऊन येत असेल तर त्यास ओळखणे फार सोपे असते. पाल्याच्या जवळ गेल्यास बिअरचा दर्प लपू शकत नाही. बिअरमार्फत पोटात गेलेल्या इथाइल अल्कोहोलमुळे तसेच त्याच्या रासायनिक गुणधर्मामुळे लघवीला, घामाला, श्वासोच्छ्वासाला एक विशिष्ट प्रकारचा दर्प येतो. पण बहुतेक वेळा पालक ही साधी सोपी तसदी घेत नाहीत. पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. ते योग्य नाही. पाल्यांवर वेळीच आवर घालायला हवा. अन्यथा दुष्परिणाम सोसावे लागतात.

– हेमंत श्रीपाद पराडकर, मुंबई

मराठीतील सर्व वाचक प्रतिक्रिया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaturang readers comments chaturang readers opinion chaturang readers letters
First published on: 25-02-2017 at 02:24 IST