कमळे चिखलातच उगवतात

‘वळणवाटा’तील त्यांच्या आयुष्याची गाथा वाचल्यावर ‘कमळे चिखलातच उगवतात’ याचा प्रत्यय आला.

कमळे चिखलातच उगवतात
‘वळणवाटा’ सदरातील ‘आयुष्य सवलत कुठे देतं?’ हा डॉ. गणेश चंदनशिवे यांचा लेख वाचला आणि डिसेंबर २०१४ मध्ये मुरबाड तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात झालेल्या भारतीय अभ्यास परिषदेचे अधिवेशन आठवले. या अधिवेशनात
डॉ. चंदनशिवे यांनी ‘पारंपरिक लोकनाटय़ आणि आधुनिक नाटक यांचा परस्पर संबंध’ हा शोधनिबंध वाचला होता. व्यासपीठावर अन्य शोधनिबंधकांसोबत बसलेले चंदनशिवे इतरांपेक्षा कमी वयाचे, नागरी देहबोलीपेक्षा वेगळे जाणवत होते.
‘वळणवाटा’तील त्यांच्या आयुष्याची गाथा वाचल्यावर ‘कमळे चिखलातच उगवतात’ याचा प्रत्यय आला. संघर्षांच्या ओल्या जखमा अंगावर झेलूनही विनम्रतेने जगाला मायबाप समजणाऱ्या या कलाकाराकडून जीवन जगावे कसे हे कळते. आयुष्याकडून किती आणि कोणत्या सवलतींची अपेक्षा करायची हेसुद्धा कळले. आयुष्याने त्यांना सवलत दिली नाही, मात्र वाचकांना डॉ. चंदनशिवे यांनी आयुष्याच्या मर्मबंधाची सवलत देऊ केलीय.
– यशवंत सुरोशे, महाज (मुरबाड)

खेडी स्मार्ट होतील पण..
डॉ. वृंदा कार्येकर यांचा ‘खेडी स्मार्ट कधी होणार’ हा लेख वाचला. समाधान वाटले, अगदी योग्य मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. काही परंपरा, रूढी, प्रथा गाव खात्यातील नियमानुसार सांभाळणे गरजेचे असते. अनेक विवंचना असतात, त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसे धन नसते, त्यामुळे तीन दगडांची चूल व धूर करणारी इंधने वापरण्याशिवाय गत्यंतर नसते. तंत्रज्ञान शहरातच वाढते, त्यामानाने खेडय़ात नाही. त्यामुळेच तर शौचालय चळवळही म्हणावी तेवढी रुजलेली नाही. सामाजिक आरोग्य पाळणे हा तिथल्या व्यक्तींचा आळस आहे. हे नमूद करावेच लागेल. म्हणूनच ‘ठेविले अनंते..’ म्हणून ही मंडळी अज्ञानात सुखी राहतात. त्यांना प्रबोधनाची नक्कीच आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीत पाणी शुद्धीकरण नसतेच. पारंपरिकतेचा पगडा, शिक्षणाची वानवा, पुरुषप्रधानतेला अवाजवी महत्त्व तेथे आहे. आजही कोणत्याही जिल्ह्य़ातील खेडय़ांत फिरलो तरी वरीलच दृश्य दिसते. त्यामुळे खेडी स्मार्ट न करणाऱ्या लोकांपेक्षा पूर्वापार असलेल्या राज्यकर्त्यांनाही याबाबत सुधारणा करावी लागेल. या पुढे तरी सुधारणा होतील हीच अपेक्षा ठेवणे एवढेच खेडय़ांतील लोकांच्या हातात आहे.
– अमोल करकरे, पनवेल

‘एकी’कडून अपेक्षा..
एकेकटय़ा स्त्रियांच्या ‘एकी’ या पाठिंबा गटाबद्दलची माहिती देणारा लेख अनेक एकटय़ा स्त्रियांना फारच दिलासा देणारा आणि इतरांसाठीही समाजभान देणारा, प्रेरक, माहितीपूर्ण आहे यात वाद नाही. ‘एक व्यक्ती कुटुंब’ ही संकल्पनाही समाज हळूहळू स्वीकारू
लागला आहे.
‘एकी’सारख्या सपोर्ट ग्रुपकडून एक अपेक्षा नक्कीच करता येईल. सहली, मौजमजा हे छानच आहे, पण आर्थिक हतबलता एकटय़ा स्त्रीला पूर्णच खचवून टाकते. एखादी एकटी महिला आर्थिकदृष्टय़ा फार कमकुवत, अस्थिर आणि गरीब असेल तर बाकीच्या आर्थिकदृष्टय़ा स्थिर असणाऱ्या मैत्रिणी तिला आर्थिक धीर देऊ शकतात. शक्य असल्यास रोजगार देऊ शकतात. त्याचप्रमाणे वृद्ध मैत्रीण असल्यास वर्गणी
काढून वृद्धाश्रमाचा अथवा तिचा मासिक खर्चही तिला देऊ शकतात.
– प्रा. माधव गवाणकर, दापोली

आमचेही ‘मैत्रेय’
‘एकटय़ा पण एकाकी नव्हे’ हा लेख वाचून खूपच छान वाटलं. तो लेख अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. आमचीही ‘एकी’ आहे. आमच्या सोसायटीतही आम्ही वयस्क स्त्रिया कधी काळी एकटय़ा होतो. नातवंडांना खेळवण्यासाठी इमारतीच्या खाली ग्राऊंडवर बसत होतो. मुलांचे खेळ सुरू असताना आमच्या ४-५ जणींचा गप्पा सुरू असत. कालांतराने त्यात भर पडत गेली. आजमितीला आम्ही २५ ते ३० जणी गप्पा मारत बसतो. कट्टय़ावर बसणं अवघड जाऊ लागल्यानं वर्गणी गोळा करून खुच्र्या विकत आणल्या आणि आमची ‘गोलमेज परिषद’ भरू लागली. कामवाल्याबाईपासून ते राजकारणापर्यंत आमच्या चर्चा रंगतात. आमची सोसायटीत ‘भारतदर्शन’ घडते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांताच्या रेसिपींबरोबरच त्यांची संस्कृती आणि विचारांचीही देवाणघेवाण सुरू असते. एवढंच नव्हे तर कुणी आजारी पडलं, कुणाची शस्त्रक्रिया झाली तर तिला मानसिक आधार देण्यासाठी या कट्टय़ावरच्या मैत्रिणी तत्पर असतात. आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरही
आम्ही सक्रिय झालो आहोत आणि आमच्या ग्रुपचे नाव आहे ‘मैत्रेय’.
– मीनल भणगे, बोरिवली

समंजस एकी
‘असू एकटय़ा, पण एकाकी नव्हे’ हा लेख वाचल्यावर, मराठी तिसरीच्या (१९४९-५०) मोडी लिपी पाठय़पुस्तकातील एक धडा आठवला. एका नदीवरील साकव ओलांडणाऱ्या दोन कुत्र्यांची आणि बकऱ्यांची कथा. कुत्रे भांडल्याने आणि माघार न घेतल्याने पाण्यात पडतात. तर समजूतदार बकऱ्यांमध्ये मोठी बकरी खाली बसते आणि तिच्यावरून लहान बकरी साकव ओलांडते. त्यानंतर मोठी बकरी उठून साकव ओलांडते. अशा आशयाचा तो धडा. दोन (किंवा अधिक) व्यक्तींत समंजसपणा नि मदतीला तत्पर असलेला स्वभाव असेल तर प्राप्त परिस्थितीतील दु:ख सुसह्य़ करणे सहज शक्य असते. हे आपल्या ‘एकी’ ग्रुपमुळे ध्यानात आले.
– श्रीधर गांगल, ठाणे

नवदुर्गाचे अभिनंदन
या वर्षीच्या अंकातील एक महत्त्वाची पुरवणी नवदुर्गाची. आपण परिचय करून दिलेल्या नवदुर्गाचे त्या करीत असलेल्या सामाजिक सेवेबद्दल अभिनंदन. सर्व दुर्गाना आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ सातत्याने मिळणे त्यांचे कार्य सुरू राहण्यास आवश्यक आहे. दर वर्षी लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे निरनिराळ्या समाजोपयोगी संस्थांना मदत घडवून आणते. तसेच काही या नवदुर्गासाठी करता आल्यास बघावे. बचत गटांचे महत्त्वही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महिला आपल्या पायांवर उभ्या राहतात. इतकेच नव्हे तर समाजकार्यही करू शकतात. तेव्हा ही चळवळ अधिक सशक्त कशी होईल याकडे लक्ष दिले जावे.
भटक्या जमातींबद्दल ‘चतुरंग’मध्ये पल्लवी रेणके आणि माधुरी ताम्हणे यांचे लेख वाचले. त्याही मोठेच कार्य करीत अहेत. त्यांचेही अभिनंदन.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वाचक प्रतिक्रिया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reader response and comments on loksatta chaturang articles

ताज्या बातम्या