वीणा गवाणकर

‘‘माझी पुस्तकांशी मैत्री गेली सात दशकं सुरूच आहे. देशा-परदेशांतील विविध ग्रंथालयांना दिलेली भेट, तिथे तासंतास बसून केलेलं वाचन, यानं माझं आत्मभान वाढवलं. संदर्भ शोधण्यासाठी वापरायची तर्कबुद्धी माझी इथेच विकसित होत गेली. ‘आपल्याला हे नाही समजलं तरी चालेल’ ही उदासीनता गेली. माझे अनेक चरित्र नायक मला ग्रंथालयातच सापडले. समजुतीचं क्षितिज अशी ग्रंथालयंच विस्तारतात..’’ असं सांगणाऱ्या चरित्र लेखिका वीणा गवाणकर आज (६मे ) वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी आणि त्यांच्या ग्रंथालयप्रेमाविषयी..
माझी पुस्तकांशी मैत्री जमली ती अगदी बालपणात. वडील पोलीस खात्यात होते. त्यांच्या ग्रामीण महाराष्ट्रात बदल्या होत. त्यांना नेहमी फिरतीवर जावं लागे. मात्र माझी ही पुस्तकांशी असलेली मैत्री, वाचनवेड त्यांच्या लक्षात आलंच. त्यांची बदली इंदापूरला झाली. मी तिथल्या जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत सातवीत दाखल झाले. इंदापूरला गेल्या गेल्या वडील मला तिथल्या एका ग्रंथालयात घेऊन गेले. ख्रिश्चन मिशननं चालवलेलं ते ग्रंथालय आज सत्तर वर्षांनंतरही मला ठळकपणे आठवतं. कारण ग्रंथ संग्रहालयाचं ते प्रथम दर्शन, तिथली पुस्तकं हाताळण्याचा पहिला अनुभव मी विसरता विसरणं शक्य नाही. माझं वाचनवेड रुजलं, वाढलं ते तिथेच.

2024 25 is the last year for textbooks of I and II
राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष… आता होणार काय?
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

पुढच्या तीनेक वर्षांत मी तिथली बरीच पुस्तकं वाचली. विशेष म्हणजे ‘खांडेकर-फडके’ वाचकप्रियतेच्या शिखरावर असण्याच्या त्या काळात मी र.वा. दिघे, ग.ल. ठोकळ, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, मामा वरेरकरांनी अनुवादित केलेल्या बंगाली कादंबऱ्या, विविध प्रवासवर्णनं, शास्त्रज्ञांची छोटी छोटी चरित्रं वाचत होते. तेव्हाच्या त्या छोटय़ाशा खेडय़ात राहूनही माझा वाचनवेग आणि विषयांचा परीघ सतत वाढत होता. माझ्या भोवतालच्या पलीकडलं जग मला त्या पुस्तकांत रमवत होतं. माझ्या शिक्षकांनाही माझ्या वाचनवेडाचं कौतुक वाटे. तेही आपल्याकडची पुस्तकं मला वाचायला देत.
पुढे शालांत परीक्षेनंतर पुण्यात ‘फग्र्युसन’ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथल्या ‘जेरबाई वाडिया’ ग्रंथालयानं माझी पुढची महाविद्यालयीन वर्ष व्यापली. त्याचा तो व्याप, आकार पाहून मी दडपूनच गेले. ती भव्य वास्तू, पुस्तकांची विषयवार मांडणी, तिथले कार्ड कॅटलॉग्स, हवं ते पुस्तक मिनिटभरात मिळण्याची व्यवस्था, यांनी मी त्या ग्रंथालयाच्या प्रेमात पडले. तिथे गेल्यावर एखाद्या जादुई नगरीत गेल्यासारखं वाटे. कला शाखेत शिकत असल्यानं सकाळी साडेदहाला तास संपत. वास्तव्य कॉलेजच्या वसतिगृहात. मग काय! पुढचा अख्खा दिवस मी ग्रंथालयात वाचत बसलेली असे. त्या ग्रंथालयात पुस्तकं शोधताना, चाळताना, हाताळताना मला विषयांचं वैविध्य समजत गेलं. कथा-कविता-कादंबरी यापलीकडचं वाचन आवडीनं होत गेलं. तिथले ग्रंथपाल बोरगावकर यांची मदत मी घेत असे. त्यांच्या लक्षात माझं वाचनवेड आलं. ‘ ‘बी.ए.’नंतर काय करणार?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांनीच उत्तर दिलं, ‘‘तू ग्रंथपालनाची पदविका घे.’’ तो सल्ला मी ऐकला. पुणे विद्यापीठात त्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलं.

आता आयुष्यात दुसरं मोठं ग्रंथालय आलं- पुणे विद्यापीठाचं ‘जयकर ग्रंथालय’. तिथे पुढचं वर्ष ग्रंथपालन शिकण्यात जाणार होतं. पुस्तकप्रेमाला प्रशिक्षणाची जोड मिळणार होती. विद्यापीठाच्या वसतिगृहातच राहात असल्यामुळे ‘जयकर’ ग्रंथालयात मनमुराद वेळ घालवता आला. विविध ज्ञानशाखांचे आंतरसंबंध समजत गेले. संदर्भ आणि ‘क्रॉस रेफरन्स’ शोधण्यासाठी वापरायची तर्कबुद्धी विकसित होत गेली. ‘आपल्याला हे नाही समजलं तरी चालेल’ ही उदासीनता गेली. थोडा अंदाज- जुजबी माहिती तरी असायला हवीच, या दिशेनं पुढे गेले. पदविका अभ्यासक्रमाचा निकाल हाती येतो न येतो, तोच औरंगाबादच्या ‘मिलिंद कला महाविद्यालया’त ग्रंथपालाची नोकरी मिळाली. माझ्या घडणीत मोलाचा वाटा असणारं हे तिसरं मोठं ग्रंथालय.
डॉ. आंबेडकरांचा अमोल ग्रंथसंग्रह असलेलं, सुमारे पन्नास हजार पुस्तकं असणारं हे समृद्ध ग्रंथालय आणि पुस्तकांत अखंड रमणारी मी. तिथले विद्यार्थी अत्यंत गरीब घरातून आलेले असत. त्यांना ग्रंथालयात जाऊन पुस्तक कसं मागावं हेही समजत नसे. मी त्यांच्यासाठी पुस्तकांचा खास ‘डिस्प्ले’ करून पुस्तकांची ओळख करून देण्याचे उपक्रम राबवे. हळूहळू त्यांची भीड कमी होत गेली. ते तिथल्या डब्यात ‘डीमांड स्लिप’ टाकून पुस्तकाची मागणी नोंदवू लागले. मला धन्य धन्य वाटलं! मी तर उदंड वाचत होतेच. मी मराठी माध्यमात शिकलेली, मराठी साहित्य घेऊन ‘बी.ए.’ केलेलं. आपल्याला इंग्रजी येत नाही, हा न्यूनगंड बाळगून होते. या ग्रंथालयात उत्तम चरित्र वाङ्मय वाचलं. हे वाचन पुढे फार उपयोगी ठरलं. तिथला तो पाच वर्षांचा कालावधी केवळ अविस्मरणीय. फग्र्युसन कॉलेजात गेल्यापासून, म्हणजे १९६० पासून पुढे ग्रंथपालाची नोकरी १९६८ मध्ये सोडेपर्यंत मी या अशा मोठय़ा तीन ग्रंथालयांवर पोसले गेले.

लग्न होऊन १९६८ च्या अखेरीस वसईला आले. तिथे वाचनालय, ग्रंथालय होतं, पण माझी भूक आणि कक्षा वाढलेली होती. वाचनाची उपासमार जाणवत होती. अशात मुलांसाठी ‘काव्र्हर’चं (डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर) चरित्र लिहायला घेतलं. वसईत समृद्ध सार्वजनिक ग्रंथालय नव्हतं; आजही नाहीच. त्या वेळी माझी संदर्भग्रंथांची गरज प्राचार्य पु.द. कोडोलीकर सरांनी मुंबई विद्यापीठ ग्रंथालयातून ती पुस्तकं मिळवून देऊन भागवली. काव्र्हरचरित्र ‘माणूस’ दिवाळी अंकात प्रकाशित झालं. दुर्गाबाईंच्या (भागवत) वाचनात ते आलं. त्याच सुमारास त्यांनी लिहिलेल्या काव्र्हरचरित्राचं हस्तलिखित अ.ह. भावे (वरद प्रकाशन) यांच्याकडे पोहोचलं होतं. प्रकाशक श्री. ग. माजगावकरांना भेटायला प्रथमच पुण्यात ‘राजहंस’ कार्यालयात गेले होते. तिथे आम्ही बोलत असतानाच भावेंचा फोन माजगावकरांना आला. ‘दुर्गाबाईंनी आपलं पुस्तक छापू नका, असं कळवलंय. त्यांना तुमच्या ‘माणूस’मध्ये आलेलं ‘एक होता काव्र्हर’ आवडलंय..’ असं त्यांनी सांगितलं. प्रकरण तिथेच थांबलं नाही. पुढे दोन वर्षांनी दुर्गाबाई वसईत साहित्य जत्रेच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. मी त्यांना भेटायला गेले. ‘‘आता काय वाचतेस? लिहितेस?’’ या त्यांच्या प्रश्नावर मी माझी पुस्तकांबाबतची उपासमार बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, ‘‘एशियाटिक ग्रंथालय समृद्ध आहे. तुला भरपूर वाचायला मिळेल. तिथे ये. मी रेकमेंड करते.’’ त्या काळात ‘एशियाटिक सोसायटी’च्या ग्रंथालयाचं सदस्यत्व मिळवण्याच्या अर्जावर तिथल्याच दोन सदस्यांच्या सह्या लागत. दुर्गाबाईनी स्वत: सही केली आणि दुसरी सही अशोक शहाणेंना करायला सांगितली. मग माझ्या वसई-चर्चगेट लोकल ट्रेन फेऱ्या सुरू झाल्या. लवकरच ‘मुंबई विद्यापीठ ग्रंथालय’ (राजाबाई टॉवर), ‘अमेरिकन इन्फॉर्मशन सेंटर’ (युसिस), ‘पेटिट लायब्ररी’ अशा माझ्या भेटी वाढत गेल्या. ‘युसिस’च्या एका भेटीत त्या ग्रंथालयाला नको असलेली पुस्तकं तिथल्या पायऱ्यांवर मांडलेली दिसली. ती चाळता चाळता मला (भारतीय ग्रामीण भागात, विशेषत: स्त्रियांसाठी विशेष कार्य करणाऱ्या डॉक्टर मिशनरी) आयडा स्कडरवरची कादंबरी दिसली. ती वाचल्यावर मी तिच्यात गुंतत गेले. पुढे वर्षभर शोध घेऊन डॉ. आयडा स्कडर यांचं चरित्र लिहिलं. त्या ग्रंथालयात काम करणारे वसंत सावे चांगल्या परिचयाचे झाले होते. ते मला मदत, मार्गदर्शन करत. मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल अरिवद टिकेकर यांच्याशीही चांगला परिचय झाला होता. १९८३-८४ च्या सुमारास मी ‘जोन ऑफ आर्क’वर (फ्रान्सची युद्धनायिका) माहिती जमवत होते. त्यावेळी त्यांनी मला महत्त्वाची आणि दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध करून दिली. मी किशोर वाचकांसाठी लिहिलेलं ‘रेमण्ड डिटमर्स’ (सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ज्ञ व लेखक) हे चरित्र त्याच ग्रंथालयात जन्मलं.
१९८६-८७ वर्ष चालू होतं. डॉ सालिम अलींचं आत्मचरित्र The Fall of a Sparrow नुकतंच प्रकाशित झालं होतं. त्याचा मराठी अनुवाद मी करावा असं प्रकाशक दि. ग. माजगावकर यांनी सुचवलं. ते पुस्तक मी वाचलं. डॉ. सालिम साहेबांची भेट घेऊन अनुवादासाठी त्यांची रीतसर अनुमती घ्यायची असं योजलं, पण दरम्यान त्यांचं निधन झालं. न राहवून मी ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’त गेले. तिथल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, मुलाखती घेतल्या. तिथले ग्रंथपाल आयझॉक किहिमकर यांनी माझं कुतूहल पाहून मदतीचा हात पुढे केला. त्या ग्रंथालयात डॉक्टरसाहेबांची पुस्तकं होतीच. त्यांच्या प्रस्तावना वाचल्या. आत्मचरित्रात नसलेली, माझ्यासाठी नवी असलेली वेगळीच माहिती मिळत गेली. मी आणखी मिळवत गेले. त्याच सुमारास डॉ. सालिम अलींचा एक लाकडी पेटारा ग्रंथालयात आला. ते पक्षी निरीक्षणाला जाताना अनेक कप्पे असणाऱ्या एका लाकडी पेटाऱ्यात आपल्या आवश्यक वस्तू नेत. त्यांचे सहकारी आणि मित्र लोक वान थो यांची एक डायरी त्या पेटाऱ्यात हाती लागली. खूपच वेगळा मजकूर वाचायला मिळाला. या आधारे मी ‘महाराष्ट्र टाइम्स’साठी एक दीर्घ लेख लिहिला. संपादक अरुण टिकेकर यांनी तो संपूर्ण छापला. याचा परिणाम असा झाला, की डॉ. सालिम अलींचे स्वीय सहाय्यक जे.एस. सेराव यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. ते डॉक्टरसाहेबांचा सर्व पत्रव्यवहार सांभाळत असत. डॉक्टरसाहेबांच्या भाषणांच्या, सर्व लिखाणाच्या कार्बन प्रती त्यांनी जपून ठेवल्या होत्या. हा सगळा ठेवा त्यांनी अंधेरीला त्यांच्या राहत्या घरी सुरक्षित ठेवला होता. ‘‘त्यातला एकही कागद तुला घरी नेता येणार नाही. तिथे माझ्यासमोर बसून तुला वाचावं लागेल,’’ ही त्यांची अट मान्य करून मी आठ दिवस त्यांच्या घरी जात राहिले. याचं फलित म्हणजे डॉक्टरसाहेबांच्या आत्मचरित्राचा प्रस्तावित अनुवाद बाजूला राहिला आणि मी त्यांचं स्वतंत्र चरित्र लिहिलं. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या ग्रंथालयामुळे हे शक्य झालं.

कृषीतज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजेंचा शोध घेताना तर मला ग्रंथालययात्राच काढावी लागली. मुंबई पुरातत्त्व संग्रहालयात हाती काही न लागल्यानं ‘एशियाटिक लायब्ररी’, ‘मुंबई विद्यापीठ ग्रंथालय’, ‘नेहरू स्मारक संग्रहालय’ (दिल्ली), ‘राष्ट्रीय ग्रंथालय’ (कोलकाता), ‘केसरी सूची कार्यालय’ (पुणे), ‘जयकर ग्रंथालय’, ‘जेरबाई वाडिया ग्रंथालय’ असा मोठा दौरा करावा लागला. या सर्व ग्रंथालयांनी आपले नेहमीचे नियम बाजूला ठेवून मला हवे असलेले संदर्भ मला प्राप्त करून दिले. त्या सर्व संदर्भाच्या आधारे मी खानखोजे यांचं चरित्र लिहू शकले.

मी प्रथमच अमेरिकेला गेले ती २००१ मध्ये. तिथे माझ्या मुलीच्या राहत्या घराच्या जवळ मागे आणि पुढे सार्वजनिक ग्रंथालयं होती. त्या ग्रंथालययात्रेत पालो ऑल्टोच्या सार्वजनिक ग्रंथालयात अणूशास्त्रज्ञ लिझ माइटनरच्या चरित्रानं मला झपाटलं. त्याचे संदर्भ मिळाले आणि ‘एक होता काव्र्हर’ची डीलक्स आवृत्ती काढताना हवी असणारी छायाचित्रंही त्या ग्रंथालयानं सहज उपलब्ध करून दिली. अमेरिकेच्या पुढच्या वारीत सांता बार्बराच्या सार्वजनिक ग्रंथालयात रसायनशास्त्रज्ञ आणि डीएनए स्ट्रक्चर संशोधक रोझिलड फ्रँकलीन यांच्या चरित्राचा जन्म झाला. नंतर २००७ मध्ये जोहान्सबर्गला तीन महिन्यांच्या वास्तव्यात तिथल्या भव्य सँटोन ग्रंथालयाचा लाभ घेता आला. तिथे नदीन गोर्डिमर या दक्षिण आफ्रिकेच्या नोबेल पुरस्कारविजेत्या लेखिकेचं साहित्य वाचायला मिळालं. त्यांच्या साहित्यावर आधारित एक लेख ‘कदंब’ या दिवाळी अंकासाठी लिहिला.

विदेशातल्या या तीन ग्रंथालयांतील वैशिष्टय़ांविषयीही आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यांच्या भरपूर सूर्यप्रकाश आत येऊ देणाऱ्या इमारती, वाचण्या-लिहिण्यासाठी बसण्याची उत्तम, आरामदायी सोय, हव्या त्या पुस्तकांतील मजकूर लागलीच झेरॉक्स करून घेता येण्याची सुविधा, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची तत्परता, यामुळे ते पर्यटन आनंदयात्राच ठरे. बालवाचकांसाठी तिथे विशेष कक्ष असे. तीन ते आठ, आठ ते पंधरा, प्रौढ अशा वयोगटांसाठी वेगवेगळी दालनं असत. बालगटासाठीच्या दालनात पुस्तकांच्या मांडण्या जेमतेम चार फूट उंचीच्या असत. तिथेच खाली जाजमावर वेगवेगळी ‘पझल्स’ ठेवलेली असत. पालकांसमवेत मुलं वाचत बसत. ठरावीक दिवशी जादूचे प्रयोग, संगीत, नृत्य, कथाकथन असे कार्यक्रमही असत. ग्रंथालय हे असं पर्यटनस्थळ म्हणून बालपणापासून अनुभवता येतं याचा मला हेवा वाटला.

कॅलिफोर्नियातल्या माझ्या अनुभवातल्या सार्वजनिक ग्रंथालयांचं वैशिष्टय़ म्हणजे तिथे प्रवेशद्वाराशीच एक कोपरा राखीव असे. तिथल्या मांडण्यांवर पाव डॉलर, अर्धा डॉलर, एक डॉलर, अशा किमती चिकटवलेल्या असत. ती बहुतेक पुस्तकं नवीच असायची. लहान मुलांसाठीची पुस्तकंही जमिनीवर खोक्यांत नीट लावून ठेवलेली असत. हवं ते पुस्तक निवडावं, मांडणीवर लावलेल्या किमतीएवढी रक्कम तिथे ठेवलेल्या डब्यात टाकावी. मी अशी काही पुस्तकं घेतलीही. घरी आणून वाचून झाल्यावर नको असलेली पुन्हा नेऊन त्या मांडणीवर होती तिथे ठेवली. पुस्तकांचं हे चलनवलन, अभिसरण मला फार भावलं. ग्रंथालय महिन्यातून एक रविवार जुन्या पुस्तकांच्या विक्रीसाठी आवारात मांडामांड करे. हा ‘हाफ प्राईस बुक सेल’ असे. सकाळी दहाला फाटक उघडे. मी अकराच्या सुमारास तिथे पोहोचले, तोवर तिथली बहुतांश पुस्तकं विकली गेलेली होती. पुढच्या खेपी मी दहाच्या ठोक्याला गेले, तर तिथला पार्किंग लॉट गाडय़ांनी भरून गेला होता! दूर ठिकाणी गाडी पार्क करून मुलाबाळांसह लोक येत होते. पुस्तकं भराभरा उचलून, पैसे मोजून आपापल्या गाडीच्या ट्रंकमध्ये पुस्तकं ठेवून निघून जात होते. तासाभरात ९० टक्के पुस्तकं विकली गेली. तिथल्या व्यवस्थापिकेनं माहिती पुरवली, की नेलेली पुस्तकं नको असली की लोक ती परत ग्रंथालयाच्या त्या राखीव कोपऱ्यात ठेवतात. हा उपक्रम कोणत्याही ग्रंथालयाला राबवता येण्यासारखा वाटला. असं झालं, तर पुस्तकं रद्दीत जाणार नाहीत आणि ग्रंथालयालाही आर्थिक मदत होऊ शकेल.

अमेरिकेतली ‘हाफ प्राईस बुक स्टोअर्स’सुद्धा ग्रंथालयाच्या तोडीस तोड. तिथल्या पुस्तकांची मांडणी एखाद्या ग्रंथालयासारखीच वर्गीकरण केलेली. तिथेही वाचण्यासाठी बसण्याची आरामदायी सोय. कुणी येऊन हटकणार नाही. उलट काही मदत हवी का, म्हणून सौजन्यपूर्वक विचारणार!
देश विदेशातील अशा ग्रंथालयांच्या भेटी ही माझ्यासाठी नुसती भेट नसते. माझ्या समजुतीचं क्षितिज वाढवणारी, आयुष्य समृद्ध करणारी एक सुसंधीचं असते. मी कोण आहे याचं आत्मभान तिथे मला येत जातं. तिथला वावर माझे पाय जमिनीवर ठेवतं. म्हणून मी माझं हे पर्यटन अविरत चालूच ठेवते..
veena.gavankar@gmail.com