मराठीतील पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांनी सुरू केलेली स्त्री पत्रकारिता वेगवेगळ्या स्थित्यंतरातून आजही जाते आहे. समाजाच्या प्रश्नांबरोबरच त्यांनी स्त्री समस्यांनाही तोंड फोडलं. एकोणिसाव्या शतकात अनेक मासिकांनी स्त्री चळवळीला जिवंत ठेवलं. ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’च्या घोषणेनंतर स्त्री चळवळींना मुखपत्राची गरज वाटायला लागली. आणि बहुतांशी सर्वच भाषांतील स्त्रिया मासिकांच्या, वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचू-लिहू लागल्या आणि त्यातून स्त्रीवादी पत्रकारितेचा एक प्रवाह तयार झाला. तो आता डिजिटल माध्यमांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

१८७७ मध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं ‘दीनबंधु’ वृत्तपत्र हे सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र होतं. या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, ‘‘हे पत्र हार्नबी रोड, सीताराम बिल्डिंग येथे ‘दीनबंधु’ छापखान्यात तानुबाई वासुदेव बिर्जे यांनी छापून प्रसिद्ध केलं. (दीनबंधु, ६ एप्रिल १९१२)’’ असं जाहीर केलेलं आहे. इंग्रज सरकारच्या ‘कॉन्फिडेंशियल रिपोर्ट’- एप्रिल ते सप्टेंबर १९१३च्या अहवालात, ‘दीनबंधु वृत्तपत्र, संपादक तानुबाई बिर्जे, वय ३७ वर्षं’, अशी नोंद आहे.

तानुबाई बिर्जे मराठीतील पहिल्या स्त्री संपादक. त्यांचे वडील देवराम ठोसर महात्मा फुले यांच्या घराशेजारी राहात. ते फुले यांच्या कार्यात सहभागी होत असत. तानुबाईंना शिक्षणाची संधी मिळाली. पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह सत्यशोधक विचारांच्या वासुदेव बिर्जे यांच्याशी सत्यशोधक पद्धतीनं झाला. लग्नाला पंडिता रमाबाईंची विशेष उपस्थिती होती. वासुदेव बिर्जेंनी ‘दीनबंधु’च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. १९०८ मध्ये त्यांचं निधन झालं. तानुबाई संपादक झाल्या. १९०८ ते १९१३ या त्यांच्या संपादकीय काळात ‘दीनबंधु’ बहुजन समाजाचा आवाज बनलं.

संपादकीय लिखाणात तानुबाई संत तुकारामांच्या अभंगांचा उल्लेख करत. एका संपादकीयमध्ये त्यांनी म्हटलं, ‘‘मुंबई राज्यातल्या विधिमंडळात शेतकऱ्यांचा किंवा बहुजन समाजाचा कोणी वाली नाही.’’ स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या तानुबाईंनी एका लेखात, ‘‘स्त्रीने एकच पती करावा, परंतु पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रिया करून स्वत:च्या विषयासक्तीचं दर्शन करावयाचं’’, असं परखडपणे लिहिलं. कृष्णराव भालेकर, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांची संपादकीय परंपरा तानुबाईंनी पुढे नेली.

मादाम कामा यांचं ‘तलवार’, अवंतिकाबेन गोखले संपादित ‘हिंद महिला’, मार्गारेट कझिन्स संपादित ‘वुमेन्स इंडिया असोसिएशन’चं मुखपत्र ‘स्त्री धर्म’, लीलावती मुन्शी संपादित ‘गुजरात’ वृत्तपत्र अशी स्वातंत्र्य आंदोलनातल्या स्त्रियांनी पत्रकार म्हणून केलेल्या कामाची नोंद घ्यायला हवी.

एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणाच्या चळवळीला गती मिळाली. स्त्रिया लिहू-वाचू लागल्या. स्त्रियांसाठी मासिकाची गरज वाटू लागली. १९०४ मध्ये मल्याळम् भाषेत ‘शारदा’ आणि १९४८ मध्ये तमिळ भाषेत ‘कुमुदम’ ही स्त्रियांसाठीची मासिकं सुरू झाली. शंतनुराव किर्लोस्करांनी १९३०मध्ये ‘स्त्री’ मासिक सुरू केलं. शांताबाई किर्लोस्करांनी अनेक वर्षं संपादकपदी काम केलं. १९४७ मधील ‘बेगम’ मासिक दक्षिण आशियातील स्त्रियांसाठीचं पहिलं बंगाली मासिक मानलं जातं.

‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षा’च्या घोषणेनंतर स्त्री चळवळींना आपल्या मुखपत्राची गरज वाटायला लागली. हुंडाविरोधी चळवळ जोरात असताना मधू किश्वर आणि रुथ वनिता यांनी दिल्लीतून १९७८मध्ये ‘मानुषी’ सुरू केलं. मल्याळममध्ये स्त्री प्रश्नांची दखल घेणारं ‘गृहलक्ष्मी’ मासिक ‘मातृभूमी’ वृत्तसंस्थेनं १९७९ मध्ये सुरू केलं. तेलगू भाषेत १९८४ मध्ये ‘स्वाथि’ आणि १९९३मध्ये ‘भूमिका’ मासिक सुरू झालं. कन्नड भाषेत १९८३ मध्ये ‘तरंगा’, २००१ मध्ये ‘सखी’ मासिक सुरू झालं. स्त्री चळवळीच्या पुढाकारातून १९९८ मध्ये तमिळ भाषेत ‘मुत्थम’ मासिक सुरू झालं. तमिळनाडूतील ‘वुमेन्स जमात’ संघटनेच्या दाऊद शरीफा खानम यांनी २००४मध्ये तमिळ भाषेत मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी करणारं ‘विमेन्स जमात’ मासिक सुरू केलं. विविध भाषांमध्ये स्त्री प्रश्नांची मांडणी होत होती.

महाराष्ट्रात १९७७ मध्ये सौदामिनी राव यांच्या नेतृत्वात ‘बायजा’, १९८६ मध्ये ‘स्त्री मुक्ती संघटने’चं मुखपत्र ‘प्रेरक ललकारी’, १९८९ मध्ये विद्या बाळ यांच्या पुढाकारानं ‘मिळून साऱ्याजणी’ अशी मासिकं सुरू झाली. नागपूरहून १९९८ मध्ये अरुणा सबाने यांनी ‘आकांक्षा’ मासिक सुरू केलं. या मासिकांनी स्त्री चळवळीला सामर्थ्य दिलं.

३० मे २००२ला उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये ग्रामीण दलित, आदिवासी, अल्पसंख्याक स्त्रियांनी माध्यम जगात ‘खबर लहरिया’- ‘आपकी खबर आपकी भाषा’ नावाने एक धाडसी उपक्रम राबविला. ‘निर्मल पुस्तकालय समिती’आणि ‘निर्माण महिला समिती’ने मीरा जाटव आणि कविता बुंदेलखंडी यांच्या नेतृत्वात हे घडलं. बुंदेली, अवधी, भोजपुरी, अंगिका या स्थानिक भाषेत आणि हिंदीत ‘खबर लहरिया’ वर्तमानपत्र निघू लागलं. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील काही भागांतही ‘खबर लहरिया’ पोहोचलं. आपल्या गावातील घडामोडी, स्त्रियांच्या अडचणी, दलित, आदिवासी समूहांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना त्यावेळी मुख्य प्रवाहातील प्रस्थापित वर्तमानपत्रात जागा नाही हे कविता आणि मीरा यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपलं वर्तमानपत्र सुरू करायचं ठरवलं. गावोगावी फिरून पाठिंबा मिळवला. अनेक अडचणी आल्या. जातिव्यवस्थेचे चटके सहन करावे लागले. अनेकदा उपेक्षा वाट्याला आली. आर्थिक अडचणी होत्या. या कणखर स्त्रिया डगमगल्या नाहीत. निर्भयपणे आपली वाटचाल करीत राहिल्या.

पत्रकारितेचं कोणतंही शिक्षण नसलेल्या गावपातळीवरील स्त्रिया एकमेकींच्या साहाय्याने बातमी कशी द्यायची, इथपासून ते आपलं वर्तमानपत्र लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे शिकल्या. या स्त्रीवादी पत्रकारांनी गावातील सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार शोधले. पोलीस ठाण्यामध्ये दलित, आदिवासी समूहांच्या तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष, स्त्री अत्याचारांच्या घटना, कुपोषण, घरगुती हिंसाचार, रेशन व्यवस्था, गावचे रस्ते, वीज, शिक्षण असे अनेक प्रश्न ‘खबर लहरिया’मध्ये छापून येऊ लागले. यंत्रणांना दखल घ्यावी लागली. स्थानिक प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम या स्त्रियांनी केलं. लोकांच्या भाषेत लोकांचं जीवन विविध माध्यमांपर्यंत पोहोचलं. छापील वर्तमानपत्रापासून सुरू झालेला प्रवास ‘डिजिटल’ माध्यमांपर्यंत पोहोचला.

स्त्रिया कॅमेरा वापरायला, व्हिडीओ चित्रण करायला शिकल्या. गाव केंद्रित काम करणारं हे देशातील एकमेव ‘डिजिटल ग्रामीण मीडिया संघटन’ असावं. लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्याची माध्यमांवर असलेली जबाबदारी ‘खबर लहरिया’ची टीम समर्थपणे पेलते आहे. ‘खबर लहरिया’ सध्या ‘चंबल मीडिया’ या नेटवर्क डिजिटल व्यासपीठामार्फत काम करतं. कविता बुंदेलखंडी प्रमुख संपादक आहेत. त्यांच्या सोबत २५ स्त्री पत्रकार आहेत. त्यांचे पाच लाख चाळीस हजार वर्गणीदार आहेत. ‘खबर लहरिया’ला स्त्री पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘चमेलीदेवी जैन पुरस्कार’, लिंग संवेदनशीलतेसाठी दिला जाणारा ‘लाडली मीडिया पुरस्कार’, ‘कैफी आझमी करेज इन जर्नालिझम’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ही दाद पत्रकार स्त्रियांची हिंमत वाढवणारी ठरली.

सुष्मित घोष आणि रितू थॉमस या तरुण दिग्दर्शकांना ‘खबर लहरिया’ने आकर्षित केलं. दोघे या स्त्री पत्रकारांना भेटले. पाच वर्षं त्यांच्या कामाचा अभ्यास केला, त्याचं चित्रण केलं. मेहनतीने आणि संवेदनशीलतेने ‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट तयार केला. त्याला २०२२ मध्ये ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या ‘बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर’ श्रेणीत ‘ऑस्कर’ नामांकन मिळालं. ‘खबर लहरिया’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. २०२१मध्ये ‘सुदान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘ऑडियन्स अवॉर्ड’ आणि ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ तसेच २०२२ मध्ये ‘पिबॉय अवॉर्ड’ हे प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

आजही ‘पत्रकारिता’ पुरुषांचं क्षेत्र मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून अनेक तरुणी या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. निर्भीडपणे सत्य मांडणाऱ्या तरुण मुली आजच्या स्त्री चळवळीची आशा आहेत. सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचार, शेतकरी आंदोलन, मंत्र्यांच्या कुटुंबीयांना मिळणारे फायदे याविषयी वास्तव वृत्तांकन करणारी रोहिणी सिंग, एन. आर. सी.विरोधातील आंदोलन, विविध ठिकाणच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या बातम्या देणाऱ्या अरफा खानुम शेरवानी, शेतकरी आंदोलनाच्या वेळी झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नवरीत सिंग या तरुणांच्या आजोबांना भेटून वृत्तांकन तसेच ‘हाथरस’ बलात्कार प्रकरणाचे संवेदनशील रिपोर्टिंग करणारी इस्मत आरा, वर्तमान राजकारणाचा वेध घेत लिंगभाव आणि सामाजिक न्याय विषयावर बोलणारी नेहा दीक्षित, ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या संपादक म्हणून काम केलेल्या पामेला फिलीपोज, ‘इलेक्ट्रोल बाँड’ प्रकरण धसाला लावत राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या निधीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुढे आणणाऱ्या ‘द रिपोर्टर्स कलेक्टीव्ह’च्या नीलिमा पांडे, पूजा मेहरा, पूनम अग्रवाल, याशिवाय जान्हवी सेन, सुमेधा पॉल अशी किती तरी नावं घेता येतील. या विचारी, अभ्यासू, पत्रकार स्त्रियांना अनेकदा ट्रोल केलं जातं. अनेक जणींना न्यायालयीन खटल्यांना सामोरं जावं लागत आहे. प्रत्येकीलाच त्यांच्या कामाबद्दल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

स्त्रियांच्या समस्यांबद्दल बोलत असतानाच या मैत्रिणी भारतातील लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. हे लिहिताना गौरी लंकेश यांची तीव्रतेनं आठवण झाली. २००५ मध्ये त्यांनी ‘गौरी लंकेश पत्रिका’ सुरू केली. त्या बसवण्णा,डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या समर्थक होत्या. निर्भय आणि सत्य मांडणारी पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. लिखाणातून त्या भारतातील मिश्र संस्कृती, सहिष्णुता पुढे नेत होत्या. ‘‘पत्रकारिता अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठी, लोकशाही टिकण्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं आहे.’’, असं त्या परखडपणे मांडत. उजव्या विचाराच्या, द्वेष पसरवणाऱ्या हिंदुत्ववादामुळे निर्माण झालेल्या सांप्रदायिक ध्रुवीकरणाविषयी गौरी यांना चिंता वाटत होती. लिखाणाबद्दल त्यांना न्यायालयीन खटल्यांचा सामना करावा लागला. त्या डगमगल्या नाहीत. निष्ठेने आपलं कर्तव्य बजावत राहिल्या. ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळूरुमधील त्यांच्या घरासमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा पत्रकारिता, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा हल्ला होता. देशभर संतापाची लाट उसळली. आरोपी पकडले गेले. जामिनावर सुटका झाल्यानंतर विजयवाडा येथे हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष करत आरोपींचं स्वागत केलं.

या वर्षी ‘कान फेस्टिव्हल’मध्ये ‘Put Your Soul on Your Hand and Walk’ हा सेपीदेह फारसी (Sepideh farsi) यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट बघताना प्रेक्षकांचं हृदय भरून आलं. दिग्दर्शिका गाझा पट्टीत जाऊ शकली नाही. तिचा आणि छायाचित्रकार पत्रकार फातिमा हुसेना यांचा वर्षभर व्हिडीओ कॉलवरून संवाद सुरू होता. त्या व्हिडीओवरून फ्रान्स, पॅलेस्टाइन आणि इराणच्या संयुक्त निर्मितीतून हा माहितीपट तयार झाला. १६ एप्रिल २०२५ रोजी फातिमा आणि तिचे कुटुंबीय इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. फारसी आणि फातिमाचा संवाद थांबला. फातिमाने साहसाने, इस्रायल विरुद्ध केलेला संघर्ष, पॅलेस्टाइनच्या वेदना या माहितीपटामुळे जगभर पोहोचल्या.

या पत्रकार स्त्रियांनी स्त्रीमुक्ती चळवळीला सामर्थ्य दिलं. मानवतेच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावली. आजच्या काळात दुनियेतील विचारी, मानवतावादी पत्रकार स्त्रियांना पितृसत्ताकतेशी सामना करत असतानाच अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणाच्या जबाबदारीचं मोठं आव्हान पेलावं लागत आहे. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची अशा पत्रकार मैत्रिणींना साथ आहे.

advnishashiurkar@gmail.com