मी प्रवासिनी
लहानपणापासून मला वाचन, लेखन आणि प्रवास प्रिय आहे. लग्नाआधी व लग्नानंतरही बँकेचे मासिक, ‘माहेर’, ‘अनुराधा’, ‘ललना’ अशा मासिकांतून लेख, कविता प्रसिद्ध झाल्या. नंतर संसाराच्या रहाटगाडय़ात लेखन हरवले. नोकरी करीत असताना भारतदर्शन केले. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर परदेश प्रवासाचा आनंद घेतला. प्रवास करताना आपले कान, मन, डोळे उघडे ठेवले, की तिथल्या इतिहास-भूगोलाबरोबरच तिथली माणसे वाचण्याची सवय लागते.
भारतातील व परदेशातील प्रवासाचे माहितीपूर्ण लेख लिहिले. नामवंत दैनिकांत, मासिकांत लिहिले. तीस-पस्तीस लेख प्रसिद्ध झाले तरी त्याचे पुस्तक करण्याचा विचार केला नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या- शोभाच्या पाठपुराव्यामुळे तीन-चार प्रकाशकांना फोन केला. त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा ऐकून गप्पच बसले. एका सुहृदांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे माझे लेख ‘देशोदेशींचे नभांगण’ हे नाव देऊन पाठविले. एका वर्षांनंतर पुस्तक स्वीकृत होऊन ते ‘गमभन प्रकाशन’ यांनी अतिशय दर्जेदार स्वरूपात प्रसिद्ध केले. या पुस्तकाला २७ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘माननीय यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला. पुस्तक नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून पुस्तक नाही, हा चक्रव्यूह साहित्य संस्कृती मंडळामुळे भेदला गेला. ही सारी गेल्या आठ वर्षांतील ‘कमाई’ आहे. नेहमीच्या प्रपंचाच्या जोडीला हा लेखनप्रपंच आल्यामुळे आता आयुष्याच्या उत्तरार्धात वेळ कसा घालवावा, असा प्रश्न न पडता, वेळ कसा पुरवावा, असाच प्रश्न पडतो. एक मात्र आहे, माझ्या प्रत्येक लेखासाठी मी व्यवस्थित मेहनत घेते. लेख मनासारखा होईपर्यंत मी त्याचे पुनर्लेखन करते.
कधी-कधी लिहिण्याचा कंटाळा येतो किंवा ‘आपण लिहू नये’ असे वाटते. विशेषत: चांगली दर्जेदार पुस्तके वाचली, दैनिकांच्या पुरवण्या वाचल्या, की वाटतं, किती विविध विषयांवर चांगल्या प्रकारे लेखन केले जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये लोक किती चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत ते कळतं आणि ‘नको ती लेखकाची भूमिका. आपण आपले वाचनानंदात रमावे’ असे वाटू लागते; पण तेवढय़ात कुणाचा तरी अमका-तमका लेख आवडल्याचा फोन, पत्र, ई-मेल येते. नागपूर, रायपूर, इंदूर, अहमदनगर अशा ठिकाणांहूनसुद्धा पत्रं येतात. ‘तुमचे पुस्तक वाचताना, तुमच्याबरोबर आम्हीही प्रवास करीत आहोत असे वाटते, मी आता अपंग झाल्यामुळे पर्यटनाची आवड तुमच्या पुस्तकांमधून पुरी करतो,’ अशा प्रकारच्या मजकुरांची पत्रे मी जपली आहेत. ‘झोपाळ्यावर बसून आपले पुस्तक वाचताना आम्ही उभयतांनी जगप्रवास केला,’ असा एक फोन दिवेआगर इथून आला होता. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडून कौतुकाची दाद येते. एखाद्या साप्ताहिकाकडून- मासिकांकडून पर्यटनातील अमुक विषयावर लेख पाठवा असा फोन आला, की मी दिलेल्या मुदतीत चांगल्या प्रकारे लेख लिहू शकते हे स्वत:लाच कळते. ‘की राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कोणे चालोची नये’ ही श्री ज्ञानदेवांची उक्ती आठवते आणि लिहिण्याचा वसा चालू राहतो.
‘देशोदेशींचे नभांगण’मधल्या देशानंतर, कंबोडिया, व्हिएतनाम, आफ्रिका, रशिया, स्पेन, पोर्तुगाल, मोरोस्को अशा नभांगण हे व माझ्या ललित लेखांचेही पुस्तक व्हावे, या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
पुष्पा जोशी
स्त्री-कर्तृत्वाचा वेध
‘ए कशे एक कर्तृत्ववान स्त्रियां’विषयी मी पुस्तक लिहावे, अशी सूचनावजा इच्छा उत्कर्ष प्रकाशनाच्या सुधाकर जोशींनी व्यक्त केली. स्त्रियांची निवड, पुस्तकाची मांडणी, स्वरूप हे सर्व मीच ठरवायचे होते. एकशे एक कर्तृत्ववान स्त्रियांच्या जीवनकार्याचा वेध घेण्यासाठी पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र व स्वरूप निश्चित करणे आवश्यक होते.
२००९-१० मध्ये महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला. मी विचार केला, या निमित्ताने महाराष्ट्रातील स्त्रियांच्या कर्तृत्वाचे, कार्याचे एकत्रित रूपच एका पुस्तकातून साभार करता येईल. त्यातून स्त्रियांच्या कर्तृत्वाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्ट करता येईल. या दिशेने कर्तृत्ववान स्त्रियांचे विचार करायला लागल्यावर काळाबरोबर विकसित होणारा एक पटच माझ्यासमोर उभा राहिला. प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या कर्तृत्वाचे स्वरूप बदलत आहे, होते. मी कालानुक्रमे मांडणी करायचे ठरविले.
पहिला टप्पा संत कवयित्रींचा. मराठीतील पहिली कवयित्री महदाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, समर्थ रामदास स्वामींची शिष्या वेणाताई वा संत कवयित्रींनी मध्ययुगीन काळाच्या पडद्यावर केलेले कार्य, अध्यात्माच्या क्षेत्रात मिळवलेली मुक्ती या दृष्टीने मी त्यांचे कर्तृत्व मांडले. त्यानंतर ऐतिहासिक स्त्रियांच्या कार्याचा टप्पा येतो. राजकारणाशी संबंधित असणाऱ्या या स्त्रियांनी स्वत:चा आत्मसन्मान राखीत केलेले कार्य त्यांच्या खंबीरपणाचे, निग्रहाचे द्योतक होते. जिजाबाई, ताराबाई, उमाताई दाभाडे, अहिल्याबाई होळकर आणि १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामाची नायिका झाशीची राणी या पाच स्त्रियांचे कर्तृत्व म्हणजे इतिहासातील मैलाचे दगडच आहेत.
एकोणिसाव्या शतकापाशी आल्यावर स्त्री-कर्तृत्वाचा वेगळाच आविष्कार दिसू लागतो. नवीन जाणिवेतून, नवीन ऊर्जेतून, नवसंवेदनेतून स्त्रीच्या कर्तृत्वाची पहाटच होत होती. एकोणिसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधन, सामाजिक सुधारणा, शिक्षण प्रसार यांच्या एकत्रीकरणातून स्त्री-जागृतीचे पर्व आकाराला येताना स्त्रिया आंतरिक प्रेरणेतून पुढे येत होत्या. होणाऱ्या विरोधाला तोंड देण्याची त्यांची मानसिक तयारी होती. सावित्रीबाई फुले, पं. रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे या प्रसिद्ध स्त्रिया तर होत्याच. परंतु वाचकांना फारशा माहीत नसणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांची निवड मी जाणीवपूर्वक केली. सावित्रीबाई फुल्यांची सहकारी फातिमा शेख पहिली पदवीधर कोल्हापूरच्या ट्रेनिंग कॉलेजच्या सुपरिंटेंडंट रखमाबाई केळकर, डॉ. रखमाबाई राऊत, अमेरिकन मिशनच्या प्रसूतीविद्येचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईत प्रसूतिगृह सुरू करणाऱ्या रिसेका सिमियन इत्यादी. या प्रत्येक स्त्रीने संघर्षांतूनच स्वकर्तृत्वाची कमान उभारली होती.
एकोणिसाव्या शतकातील कर्तृत्वातूनच पुढे विसाव्या शतकात स्त्रीकर्तृत्वाचा चौफेर विस्तार झाला. स्त्रीच्या कर्तृत्वाचे क्षेत्र व्यापक व विस्तृत झाले. बाह्य़ वातावरणही बदलले होते. स्वत:च्या अनुभूती ओळखून त्याप्रमाणे कार्यक्षेत्र निवडण्याची दृष्टी स्त्रियांना हळूहळू येत होती. स्त्रियांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊन कार्य करण्यास मोकळीक व अवसर द्यावा. हे भानसुद्धा समाजात व पालकांच्यात निर्माण होत होते. त्यामुळेच शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, कल्पक्षेत्र, राजकारण इत्यादींपर्यंत त्यांच्यापुढे स्त्रियांचे कर्तृत्व उभे राहिले.
स्त्रीकर्तृत्वाच्या विकास आणि विस्ताराच्या या तिसऱ्या टप्प्यावर कार्यक्षेत्रानुसार वर्गवारी करून प्रत्येक क्षेत्रातील नामवंत स्त्रियांच्या कर्तृत्वाचा मी काळानुक्रमे वेध घेतला. आपल्या वैधव्याचा दिवस आपला वाढदिवस म्हणून साजरा करणाऱ्या कमलाबाई होस्पेट यांच्यापासून आजच्या सिंधुताई सपकाळांपर्यंत, तसेच दुर्गाबाई भागवतांपासून डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील क्रमविकासच बघता येतो. या विभागासाठी निवड करणे ही तारेवरची कसरत होती. प्रारंभी १०१ हा मोठा वाटणारा आकडा आता मर्यादित लहान वाटत होता. इच्छा असूनही काही नावे वगळावी लागली. त्याची हुरहुर वाटत होती. महाराष्ट्रीय कर्तृत्ववान स्त्रियांच्या जोडीला ज्ञानपीठ सन्मान मिळवणाऱ्या लेखिका, भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा, एव्हरेस्ट प्रथम सर करणारी महिला बचेंद्रीपाल, आजची उगवती फुलराणी सायना नेहवाल यांची जोड मी समजूनच दिली.
पुस्तकाचे लेखन करताना स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या दर्शनाने मी भारावून गेले, परंतु एक महत्त्वाची जाणीव झाली. समर्पित वृत्ती, कणखरपणा, निष्ठेने काम करण्याची वृत्ती वा स्त्रीच्या आदिम प्रवृत्ती काळाबरोबर धारदार झाल्या.
वाचकांना प्रत्येक स्त्रीचे कर्तृत्व स्वतंत्रपणे समजलेच, परंतु त्याबरोबर विविधतेतील एकतेच्या स्त्रीच्या आत्मशक्तीचाही प्रत्यय येईल. असा विश्वास वाटतो.
डॉ. स्वाती कर्वे
शिवकालीन स्त्रियांचे अधिकार
‘म हाराष्ट्रातील राजकीय बदल आणि त्यांचे मराठी स्त्रीच्या कर्तृत्वक्षेत्रावर झालेले परिणाम’ असा, काहीसा महत्त्वाकांक्षी स्वरूपाचा एक अभ्यास करण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. शिवकाल, पेशवाई आणि अव्वल इंग्रजी काळ असे हे तीन राजकीय कालखंड होते. त्या त्या कालखंडामध्ये आपल्या कर्तृत्वाने उठून दिसलेल्या स्त्रियांच्या कार्याची नोंद घेणे, त्यांच्या कर्तृत्वाचे क्षेत्र, कर्तृत्वांचे स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा यांची नोंद घेणे आणि त्यातून मराठी स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी काही चित्र उमटते का ते पाहावे, असा या अभ्यासाचा उद्देश होता. प्रत्येक कालखंडाच्या अभ्यासासाठी एकेका वर्षांचा कालावधी उपलब्ध होता. मात्र हा अभ्यास उलटसुलट दिशेने पुढे गेला.
या अभ्यासात ज्या स्त्रियांचे उल्लेख सापडले त्या स्त्रिया मुख्यत्वे ब्राह्मण आणि मराठा या दोन जातींमधल्या होत्या. त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़ेही वेगवेगळी होती. हा संदर्भ समोर आल्यावर उत्सुकता निर्माण झाली की मराठा स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे धागेदोरे आधीच्या शिवकालात कुठे सापडतात का ते पाहावे. त्यातून शिवकालातील संदर्भसाधने पाहायला सुरुवात झाली. या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाची एका वर्षांची अभ्यासवृत्ती मिळाली. या अभ्यासातून जी माहिती होती आणि त्यात दिसले की, या काळात मराठा स्त्रियांच्या बरोबरीने मुसलमानी स्त्रियांची नावे होती. त्यांची कार्यक्षेत्रे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े सारखीच होती. ब्राह्मण स्त्रियांची नावे फक्त रामदास संप्रदायांच्या संदर्भातही होती. या अभ्यासाचा वृत्तान्तही पॉप्युलर प्रकाशनने प्रसिद्ध केला ‘शिवकालीन स्त्रियांच्या अधिकार कक्षा’ या नावाने.
ऐतिहासिक संपर्कसाधनांचे वाचन वेगवेगळय़ा विषयांना केंद्रस्थानी ठेवून केले जाऊ शकते, पण त्या विषयाची माहिती त्या साधनांमध्ये किती प्रमाणात मिळेल, ते सांगता येत नाही. त्याचे कारण संपर्क शोधून त्यांचे संकलन, संपादन करताना संशोधकांचाही काही विशिष्ट हेतू असू शकतो. त्या हेतूला अनुसरून संपर्कसाधनांची निवड केली जाण्याची शक्यता असते. मराठय़ांच्या इतिहासाची साधने शोधण्यामागचा मुख्य हेतू मराठय़ांचा राजकीय इतिहास समजून घेणे, हा होता. त्यामुळे त्या काळाच्या समाजजीवनाची, स्त्रीजीवनाची किंवा महत्त्वाच्या स्त्रियांचीदेखील तपशीलवार किंवा विस्तृत माहिती त्यात क्वचितच सापडते. आज उपलब्ध असलेल्या साधनांमधून उमटणारे चित्र आजपर्यंत तरी खरेच असते. तसेच चित्र या अनुक्रमे तीन कालखंडांच्या अभ्यासातून उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शिवकालीन स्त्रियांच्या अधिकार कक्षा’ हा यातला पहिला कालखंड आहे.
नीलिमा भावे