वयात येत असलेल्या मुलांना निकोप लैंगिक- भावनिक संबंधासाठी तयार करायचं असेल तर त्यांना जबाबदारीचं भान आणून देणं महत्त्वाचं आहे, ज्याला सेक्सोलॉजिस्ट डॉ.राजन भोसले ‘जबाबदार लैंगिक वर्तन’ म्हणतात तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर ‘भावनिक साक्षरता’. संमती वयाच्या कायद्यामुळे मुलांमध्ये निर्माण होऊ पहाणाऱ्या प्रश्नांकडे सर्वसमावेशकदृष्टय़ा बघण्याची गरज आहे.
लैंगिक संबंधासाठीच्या संमतीचे वय १६ असावं की १८ या वादाचं चर्वितचर्वण जोरात चालू असताना जेव्हा सेक्सोलॉजिस्ट राजन भोसले सांगतात की, गेल्या वर्षभरात म्हणजे फक्त २०१२ या एका वर्षांमध्ये त्यांच्याकडे १२ ते १४ वर्षे या वयोगटातल्या गर्भवती मुलींच्या १४ केसेस आल्या, या सगळ्याच्या सगळ्या मुलींचा एकच प्रश्न होता, ‘आम्ही गरोदर कशा राहिलो? आम्हाला कळलं कसं नाही?’ किंवा जेव्हा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर सांगतात की, त्यांच्याकडे आलेली दहावीतील एक मुलगी सेक्स्युअल अ‍ॅक्टिव्हिजकडे अधिकाधिक खोल जात राहिली, कारण तिच्या लक्षात आलं की यात खूप आनंद मिळतोय जो तिचं अभ्यासाचं टेन्शन घालवतोय.. तेव्हा तीव्रतेनं जाणवतं ते या प्रश्नाकडे खरंच खूप गंभीरतेनं आणि शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्वसमावेशक पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे.
सेक्सोलॉजिस्ट डॉ. राजन भोसले आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांना समुपदेशनाच्या काळात जे काही अनुभव आले, विशेषत: या विषयाबाबतच्या अज्ञानाबाबत, ते पाहता आपल्या मुलांकडे, त्यांच्या जगण्या-वागण्याकडे, त्यांच्या भावनिक चढ-उतारांकडे खूप बारकाईनं बघणं गरजेचं तर आहेच, पण पालक म्हणून अधिक जबाबदार होणंही गरजेचं आहे, असं तीव्रतेनं वाटत राहतं.
गेले काही दिवस लैंगिक संबंधासाठीच्या संमतीचं वय किती होतं, किती असावं, ते कोणत्या संदर्भात असावं, का असावं, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय यावर तावातावाने चर्चा होत होती, यापुढेही चालू राहील. पण मुलांच्या विश्वात डोकावल्यास काय दिसतंय? लैंगिक संबंधांबाबतीत ही मुलं प्रचंड गोंधळलेली तरी आहेत किंवा बिनधास्त तरी आहेत. ‘रिलेशनशिप’मध्ये तरी आहेत किंवा त्यासाठी धडपडत तरी आहेत आणि त्यातून आपल्याच आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत आहेत.
 ‘‘गेल्या पाच-सहा वर्षांत माझ्या एकटय़ाच्या क्लिनिकमध्ये लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या अविवाहित मुलांची संख्या चौपट झाली आहे.’’ डॉ. भोसलेंचं एक एक वाक्य आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याचा लख्ख आरसा समोर धरतो आणि त्यात एक पालक म्हणून, समाजातला एक घटक म्हणून बघणं थरकाप उडवणारं आहे. डॉ. भोसले यांच्याकडे अगदी चौदा वर्षांच्या मुलीही एकेक टय़ा किंवा बॉयफ्रेन्डबरोबर येतात. या मुली नऊ, दहा वर्षांच्या असताना कधी तरी आईबरोबर त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेल्या असतात. त्या ओळखीवर त्या येतात. कधी कावऱ्याबावऱ्या होऊन तर कधी बिनधास्त. काही मुलांच्या चेहऱ्यावर ‘सो व्हॉट’ हा भाव असतो तर काही मुलं, ‘आता पुढे काय’च्या बुचकळ्यात पडलेली.
 पण यांचे नेमके प्रश्न कोणकोणते असतात या माझ्या प्रश्नावर डॉक्टर भोसले म्हणाले, ‘‘एक तर तिची पाळी चुकलेली असते किंवा गर्भनिरोधकांच्या गोळ्यांचा भडिमार केल्यानं साईड इफेक्ट तरी झालेले असतात. त्यातच आय पिलसारख्या गोळ्या जर तुम्ही महिन्याला सात-आठ वेळा घेतल्यात तर कसं होणार? मुलांना या गोळ्यांचं गांभीर्यच कळत नाही. ती इमर्जन्सी गोळी आहे. पण मुलं ती सर्रास वापरतात. मग त्याचे दुष्परिणाम होणारच. मुळात अगदी लहान वय शारीरिक संबंधांसाठी तयार नसतंच. मग मासिक पाळीचे प्रश्नही उद्भवतात. अनेक मुलं तर गर्भनिरोधकं  कशी वापरायची हे विचारायला येतात, मग ते कंडोम असो वा तोंडी घ्यायच्या गोळ्या. एका १६ वर्षांच्या मुलीने तर मला ‘कॉपर टी’ लावून टाकली तर काय हरकत आहे, असा थेट प्रश्नच विचारला होता..’’
डॉक्टरांचं गेल्या ‘पाच-सहा वर्षांतलं प्रमाण’ हा शब्द ट्रिगर दाबल्यासारखा अनेक गोष्टी समोर आदळवतो. गेल्या पाच-सहा वर्षांतच खऱ्या अर्थाने तांत्रिक क्रांती झाली. मोबाइल फोन्स अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचले, स्मार्ट फोन आता प्रत्येकाला हक्क वाटतो, इंटरनेट मोबाइलमध्येच आलं, सोशल नेटवर्किंग साइटस्मध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मुलं अगदी चोवीस तास एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य झालं. मोबाइल, विशेषत: एसएमएसमुळे त्यांच्यातली प्रायव्हसी, इतरांच्या सोडाच घरच्यांच्याही गावी नसते. आणि जेव्हा ही मुलं एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा ती प्रायव्हसी त्याच्यातली जवळीक वाढवायलाच नव्हे तर उत्तेजन द्यायला भाग पाडते. आणि या वयातली ही मुलं सेक्स्युअल अनुभवांसाठी तयार होतात..
डॉक्टर भोसले सांगतात, ‘‘तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या टीन एज मुलांवरचं एक सर्वेक्षण प्रसिद्ध झालं. त्यातील आकडेवारीनुसार, ८० टक्के महाविद्यालयीन मुलांची गंभीर प्रेमप्रकरणं (असं त्यांनाच वाटत असतं) असतात. आणि त्यातली ९८ टक्के प्रकरणांची परिणती लग्नात होतच नाही.’’
 ‘यात मराठी मुलींचं प्रमाण किती असतं?’ माझा ‘मराठमोळा’ प्रश्न. ‘‘किंचित कमी.. किंचितच म्हणेन मी,’’ डॉ. भोसले स्पष्ट करतात, ‘‘आजकाल एक्स्पोजर इतकं आहे की, त्यातून स्वत:ला वाचवणं अशक्य आहे. शिवाय तुम्ही एकदा बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड म्हणायला लागलात की काही मर्यादा आपोआपच ओलांडल्या जातात. नेहमीच टोकाला जाणं होत नाही परंतु शारीरिक जवळीक होतेच. नाही तर बॉयफ्रेन्डची गरज काय, असा त्यांचा सवाल असतो. शिवाय वयात आलेले मुलगे या संबंधाबद्दल जरा जास्त उत्सुक असतात. कारण त्यांची लैंगिकता ही शरीरप्रधान वा संभोगप्रधानच असते. त्यामुळे मुलग्यांकडूनच प्रामुख्याने गळ घातली जाते. मग मुलीसुद्धा आत्ता नको, इतकं नको, इथे नको म्हणत म्हणत कधी तरी बळी पडतातच. शिवाय आजकाल मुली शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा नोकरीसाठी घर सोडून राहतात. आधी पेइंग गेस्ट म्हणून नंतर नंतर फ्लॅटमध्ये राहतात. तीन-चार मैत्रिणी एकत्र. प्रत्येकीला वेगळा बेडरूम. ‘माझा बॉयफ्रेन्ड आत्ताच येऊन गेला, माझा रात्री येणार आहे’, हे बोलणं त्यांच्यामध्ये इतकं सहज होतं की त्यात काही वावगं आहे, असं कुणालाच वाटत नाही. आणि गंभीर बाब म्हणजे त्यांच्या पालकांना याची काहीच कल्पना नसते.
हाच मुद्दा डॉक्टर मनोज भाटवडेकर वेगळ्या दिशेने नेतात. त्यांच्या मते, आजची ही टीन एज म्हणजे पौगंडावस्थेतील मुलं एकत्र येतात त्यामागे असते ती त्यांच्यातली भावनिक असुरक्षितता. या मुलांमध्ये मुळातच न्यूनगंड खूप मोठय़ा प्रमाणात आहे. स्वत:बद्दल आत्मविश्वास नाही. मी सुंदर नाही, मी अशी नाही, मी तशी नाही या विचारात गुरफटलेल्या मुलींना जेव्हा कुणी मुलगा जरा जास्त प्रेमाने बोलतो, वागवतो तेव्हा त्या मुलांकडे आकर्षित व्हायला लागतात आणि त्यांना हेच प्रेम वाटायला लागतं. आणि हळूहळू ते इतकं वाढतं की त्या मुलाला सर्वस्व द्यायलाही तयार होतात. त्यातच आजच्या मुलांमध्ये पझेसिव्हनेस वाढत चालला आहे. त्यामुळे सगळी मुलं त्यांच्या मोबाइलला अगदी चिकटूनच असतात. मोबाइलवर आलेल्या प्रत्येक मेसेजला उत्तर देणं ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी प्रायोरिटी असते. कारण जोडीदाराचे प्रश्न तयार असतात. कुठे होतीस-होतास, कुणाबरोबर होतीस-होतास, त्याच्याशी-तिच्याशी तुझी मैत्री मला अजिबात पसंत नाही. मला तू वेळच देत नाहीस. माझं ऐकतच नाहीस.. आणि यातून भांडणं, ब्लॅकमेलिंग इथपासून थेट आत्महत्येच्या धमक्या, सारं सुरू होतं. याचा साहजिकच वेगळा ताण मुलांवर पडतोच. कारण अभ्यासाचा, पुढील करिअरचा ताण त्यांच्या मनावर आधीपासून असतोच. त्यामुळे मुलं सैरभैर होतात. आज या भावनिकदृष्टय़ा कमकुवत मुलांचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. त्यातूनच मग काही वेळा ती शारीरिकसंबंधांकडेही खेचली जातात,’’ डॉ. भाटवडेकर सांगतात.
या सगळ्या गोष्टींना इंटरनेट, व्हॉटस् अप, फेसबुकसारखे सोशल नेटवर्किंग साइटबरोबर आजच्या चित्रपट आणि टीव्हीवरील उत्तान प्रदर्शन तितकंच जाबाबदार आहे हे डॉक्टर भोसले आणि डॉ. भाटवडेकर दोघंही मान्य करतात. डॉ. भोसले यांनी सांगितलं, आजचे तरुण ‘फ्रेन्ड्स’सारख्या इंग्रजी मालिका बघतात. त्यात फ्री-सेक्स, लग्नाशिवाय एकत्र राहिलेल्या मित्र-मैत्रिणींमधील संवाद, त्याचं वागणं-बोलणं हे बघतच ही मुलं मोठी झाली आहेत. त्यामुळे ‘त्यात काय’ हाच त्यांचा सवाल असतो. आम्हाला माहीत आहे काय काळजी घ्यायची, ‘मी माझ्या बॉयफ्रेन्डला कंडोम घातल्याशिवाय इंटरकोर्सची परवानगीच देत नाही,’ असं या मुली बिनधास्त सांगतात. शिवाय ज्या पद्धतीने पोर्नोग्राफीच्या साइटस् वा चित्रपट बघितले जातात त्यातून मुलं अधिकाधिक उत्तेजित होतात.’’  
डॉ. भाटवडेकरांनी एक वेगळा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘पोर्नोग्राफी बघणं ही आजच्या मुलांमध्ये आम गोष्ट झाली आहे. आज इंटरनेटवर अक्षरश: लाखो साइटस् उपलब्ध आहेत. या इतक्या मोठय़ा प्रमाणावर का आहेत आणि का बघितल्या जातात? याचं कारण त्याबद्दल मोकळीक नाही, सेक्स ही अजूनही आपल्याकडे लपून छपून बोलायची गोष्ट आहे. खरं तर सेक्स ही खूप चांगली कला आहे. त्याचा वेगळा आनंद मिळू शकतो. पण या मुलांना निरोगी सेक्स म्हणजे काय हे कळण्याआधी विकृत सेक्सला सामोरं जावं लागतं. त्यातून सेक्स जीवनातील गुंतागुंत वाढत जाते. काही वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजमध्ये वर्ग घ्यायचो. त्यात आमच्या एक ज्येष्ठ शिक्षिका होत्या. त्या नेहमी विविध कलांमध्ये सेक्सचा कसा वापर केलाय हे इतक्या उत्कृष्ट पद्धतीने समजून सांगायच्या की त्यातलं सौंदर्य मनावर ठसायचं. मला वाटतं आजच्या मुलांसमोर असे काही आदर्श असायला हवेत.’’  
आजच्या मुलांना या सगळ्या गोष्टींचं भान देणं गरजेचं आहे, हे नक्की पण नेमकं काय, कसं हाच सवाल आहे. लैंगिक शिक्षण हा त्यावरचा उपाय अनेकांनी बोलून दाखवला आहे. पण लैंगिक शिक्षणात काय काय अंतर्भूत असावं आणि ते शिक्षण देणारेही तितकेच प्रशिक्षित असणं गरजेचं आहे यावरही आपल्याकडे फक्त वादच होतात. आज जे काही थोडय़ा प्रमाणात शाळेत मुलांना शिकवलं जातं ते अपुरं असल्याचं दोन्ही डॉक्टरांनी मान्य केलं. डॉक्टर भोसल्यांच्या मते, ‘जबाबदार लैंगिक वर्तन’ महत्त्वाचं आहे, तर डॉक्टर भाटवडेकरांच्या मते ‘भावनिक साक्षरता’ आणणं गरजेचं आहे. आपल्याकडचं शिक्षण शरीरशास्त्र आणि एड्स-एचआयव्हीच्या पलीकडे जातच नाही. डॉक्टर भोसल्यांच्या मते मूल जन्माला आलं की लगेचच लैंगिक शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे. पालक म्हणून आपल्या डोक्यात इतके पूर्वग्रह असतात की मुलांना हाताळताना, स्पर्श करताना, आंघोळ घालताना आपण लैंगिक अवयवांना वेगळं वागवतो. त्याचे नकळत संस्कार मुलांवर होतात. मासिक पाळीबद्दल अनेकदा मुलींना कल्पनाच नसते. त्यामुळे प्रत्येकीवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. माझ्याकडे एक केस आली होती. तिचा प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये ती आक्रसू लागली. तिलाही कळत नव्हतं की असं काय होतंय. समुपदेशनात कळलं की अचानक सुरू झालेल्या मासिक पाळीचं भय तिच्या मनात खोलवर रुतून राहिलं होतं. म्हणूनच मी तर म्हणेन, मुलीचा नववा वाढदिवस साजरा झाला की तिला या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला हवी. आयुष्यातला तो अत्यंत महत्त्वाचा, मुलीला तरुण करणारा अनुभव आहे याची खूप चांगल्या पद्धतीने माहिती द्यायला हवी आणि अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तिच्या शाळेच्या दप्तरातच एक सॅनिटरी नॅपकीन बंद करून ठेवून दिलं की, तीही त्यासाठी तयार असेल.
लैंगिक शिक्षणाचं अतिमहत्त्व सांगताना डॉ. भोसले यांनी सांगितलं, की लैंगिक संबंध आणि गरोदरपण यांच्यात संबंध असतो हेच कित्येक मुलींना माहीत नसतं. म्हणूनच आम्ही गरोदर कशा राहिलो, हा त्यांचा सवाल असतो. कुणी तरी काका, मामा, शेजारचा, चुलत भाऊ, शिक्षक या मुलींचा गैरफायदा घेतात. माझ्याकडे १३ वर्षांची मुलगी आली होती, जी गरोदर होती. तिला विश्वासात घेऊन विचारलं तर म्हणाली, अंकलने केलं. या मुलीला आई नव्हती आणि वडिलांनाही कर्करोग झाला होता. त्यांची मनापासून सेवा तिने केली होती. त्यांच्या शरीराचे हाल तिनं पाहिले होते. तिचा हा जो अंकल होता त्याने म्हणे तिला सांगितलं की, तुझ्या वडिलांना हा जो काही वेगळा कर्करोग झाला त्याला कारण तुझी आई लवकर वारली. त्यामुळे वडिलांची ‘उपासमार’ झाली. मलाही बायको नाही म्हणजे मलाही हा रोग होणार. मला तो होऊ नये असं तुला वाटत असेल तर मला तुझ्याशी संबंध ठेवू दे. वडिलांचे झालेले प्रचंड हाल काकांच्या वाटय़ाला येऊ नयेत म्हणून तिने हो म्हटलं आणि त्यातून तिला दिवस गेले. मुलींना जर या सगळ्याची कल्पना दिली तर मुली स्वत:ला सांभाळू शकतील. तर आपल्या लैंगिकतेचे शमन करण्यासाठी मुलांना हस्तमैथुनासारख्या गोष्टींची माहिती कुणीच करून देत नाही. त्यासाठी ना वेश्येकडे जावं लागत, ना कुणा स्त्रीवर अत्याचार करावे लागत. उलट आपल्या लैंगिक भावना एकांतात शमवता येतात. पण आपल्याकडे हस्तमैथुन हे पाप, वाईट मानलं जातं. वीर्याचा एक थेंब म्हणजे रक्ताचे वीस थेंब असल्याने ते वाया घालवू नयेत, वीर्यपतन म्हणजे शक्तिनाश, ते केल्याने नपुंसकत्व येतं, असे गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे शमन न झालेल्या पुरुषांकडून अघोरी कृत्ये व्हायची शक्यता असते. म्हणूनच ‘जबाबदार लैंगिक वर्तन’ म्हणजे काय याचं शिक्षण देणं गरजेचं आहे. तुमचं जर लैंगिक वर्तन बेजबाबदार असेल तर एड्स-एचआयव्हीपलीकडेही काही रोग होऊ शकतातच. तरुणांमध्ये सध्या क्लामिडीयासारखं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जगभरात सर्वात जास्त आहे. हा रोग सहज बरा करता येतो, पण त्याचे साइड इफेक्टस् जास्त असतात. मुली कायमच्या मातृत्वापासून वंचित राहू शकता किंवा त्यांना नंतर होणारं मूल अंध होऊ शकतं. अशा अंध मुलांचं प्रमाणही सध्या झपाटय़ाने वाढत आहे. ज्यावर सध्या तरी डॉक्टरांकडे उपचार नाही. म्हणजे आपण आयुष्यात केवढी मोठी रिस्क घेतो आहोत हे मुलांना सांगायला नको का?’’
डॉक्टर भाटवडेकर या शिक्षणाला भावनिक रूप देऊ पाहतात. ते म्हणतात, ‘‘आधी या मुलांमधली भावनिक गुंतागुंत कमी करायला हवी. त्यांच्यातला न्यूनगंड काढायला हवा. भावना म्हणजे काय, त्या कशा व्यक्त करायच्या याचं शिक्षण द्यायला हवं. आपल्याकडे ना राग कसा व्यक्त करायचा हे सांगितलं जात, ना प्रेम कसं करायचं हे सांगितलं जात. ते गृहीत धरलं जातं. शिवाय प्रेम आणि आकर्षण यातलं अंतरही अनेकांना माहीत नसतं. माझ्याकडे एक केस आली होती. ज्यात ही मुलगी अशा एका मुलाच्या प्रेमात पडली होती जो मुलगा त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा, शैक्षणिकदृष्टय़ाही कमी होता. आई वडिलांनी समजून सांगितलं पण काही उपयोग होत नव्हता. तिला त्याची आपुलकी महत्त्वाची वाटत होती. एके दिवशी तिनं सरळ जाहीर करून टाकलं की मी त्याच्याशी लग्न करणारच. झालं, आई-वडिलांनी धमकवायला सुरुवात केली. तिच्या-त्याच्यातलं आर्थिक, शैक्षणिक अंतर दाखवायला सुरुवात केली. तिची यावरची सगळी उत्तरं तोंडपाठ होती. शेवटी तिनं हाताची शीर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिच्या मानसिक तपासणीनंतर लक्षात आलं की, तीही न्यूनगंडाचीच शिकार होती. त्यातूनच त्याच्याविषयीचं आकर्षण वाढत गेलं. जेव्हा तिच्या हे लक्षात आणून दिलं तेव्हा तिलाही जाणवलं की तिच्या व त्याच्यात काहीच साम्य नाही. उलट ती सगळ्याच बाबतीत त्याच्यापेक्षा उजवी आहे. तेव्हा कुठे तिला वास्तवाचं भान आलं. आई-वडिलांनी जर नेमकेपणाने समजून घेतलं नाही समजवून दिलं नाही तर त्यांचा मुलांशी संवादच होणार नाही. फक्त आई-वडीलच नव्हेत तर ही जबाबदारी आज समाजातल्या सगळ्याच घटकांची आहे. मग ते शिक्षक असोत वा इतर ज्येष्ठ व्यक्ती.’’
पालक-बालकांत चर्चा व्हायला हवी हे अगदी मान्य, पण मुळात आजचे पालकही तितकेच गोंधळलेले असावेत असं चित्र आहे. एका बाजूला पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आणि दुसरीकडे आपल्या संस्कृतीचं दडपण यात पालकांची पिढी संभ्रमित झाली आहे. नेमकं किती सैल सोडायचं आणि कुठे नाही याचं भान त्यांना तरी आहे का? पालक लैंगिकदृष्टय़ा किती साक्षर आहेत? यावर डॉक्टर भाटवडेकर म्हणाले, ‘‘आमच्याकडे ‘अ‍ॅडल्ट सेक्स्युअल प्रॉब्लेम्स’ हा तर खूपच गंभीर प्रश्न आहे. रोजच्या रोज त्याच्या केसेस येतातच. पण मुलांचा भावनिकदृष्टय़ा विचार करता प्रत्येक मुलाची विचार करायची पद्धत वेगळी, प्रत्येकाचा भावनांक वेगळा असतो त्यामुळे आपल्या मुलाच्या स्वभावानुसार त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूल्य वा नीतिमत्तेचे जे निकष लावले जातात तेही पडताळून पाहणं गरजेचं आहे. नैतिक आणि अनैतिक यामध्येसुद्धा काही तरी आहे हे लक्षात घ्यायला हवं. आज मुलं जेव्हा एकमेकांना ‘हग’ करतात. गालावर गाल घासतात त्यात काही लगेच मूल्य शोधू नयेत. एकदा माझ्याकडे एक आई आली. म्हणाली, ‘काय करू हो या मुलीचं. कट्टय़ावर राजरोसपणे गप्पा मारत बसलीय.’ मी म्हटलं, ‘अहो, राजरोसपणेच मारते आहे ना. तुम्ही अटकाव केला तर लपून छपून करेल.’’ डॉक्टराचं हे म्हणणं प्रत्येकानं आपल्याबाबतीत तपासून पाहण्याची गरज आहे.
म्हणूनच गरज आहे ती आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या माणसांमध्ये असण्याची. रॅटरेसमध्ये न अडकता मुलांना आपण त्यांच्यासाठी आहेत हे दाखवण्याची. स्त्री असो वा पुरुष एकमेकांचा आदर शिकवण्याची. स्त्रीच्या जगण्याचं भान, तिच्या भावना, तिला होणारे त्रास याविषयी मुलग्यांमध्ये जाणीवपूर्वक संस्कार करण्याची. अन्यथा आपण आपल्याच मुलांना धोक्याच्या क्षेत्रात ढकलतो आहोत, हा धोका आहे, सव्‍‌र्हायकल कॅन्सरचा. गर्भाशयाच्या मुखाचा हा कर्करोग आज जगभरात ल्या स्त्रियांमध्ये वेगाने पसरतो आहे. हा भलेही चाळिशीनंतर होत असला तरी त्याचं मुख्य कारण आहे लैंगिक संबंधाचं अल्प वय. जेवढय़ा लवकर मुली या संबंधात येतील तेवढं त्या या रोगाला बळी पडण्याची शक्यता वाढते. आणि यातलं गांभीर्य म्हणजे त्याचं निदान लवकर झालं तरी त्यातून वाचण्याची शक्यता कमी असते.
 संमती वय म्हणजे लैंगिक संबंधासाठीचं कायदेशीर वय १८ असेल आणि निदान शहरी मुलांचं लग्नाचं वय  २२-२३ नंतरचं असेल तर गरज आहे ती आपल्या मुलांना यासाठी जबाबदार करण्याची आणि त्यासाठी स्वत: जबाबदार होण्याची !