सद्गुरूची प्राप्ती झाली, असं गुरूमार्गी साधक म्हणतात आणि मानतात! प्रत्यक्षात नुसती भेट होणं, त्यांच्याकडे जाता येणं, त्यांच्याशी बोलता येणं, त्यांचं ऐकता येणं; याला प्राप्ती म्हणावं का? तुकाराम महाराज यांचाच एक अभंग आहे.. ‘‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया। भाग गेला शीण गेला अवघा उरलासे आनंद।।’’ जेव्हा हे सद्गुरो, तुझे चरण प्राप्त झाले, तुझ्या चरणांपाशी आश्रय प्राप्त झाला तर आता मनाची धावपळ कशाला? सर्व दु:खांचा भाग, वाटा आता संपून गेला. सगळा शीण संपला. आता केवळ आनंदच उरला आहे. अशी स्थिती झाली असेल, तर सद्गुरूंची खरी प्राप्ती झाली आहे. एखाद्याला काही लाख रुपयांची प्राप्ती झाली आहे आणि काही हजारांचं कर्ज फेडण्याइतपतही पैसे त्याच्याकडे नाहीत, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत का? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात की, त्या एका परम प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याऐवजी जे जे काही दुसरं कराल तो सगळा शीणच ठरेल! ज्याला खरी सद्गुरू प्राप्ती होते त्याला कशी निश्चिंती येते, याचं एक चकवणारं उदाहरण आठवतं. भाऊसाहेब उमदीकर महाराज कुठेही निघाले की पुंडाप्पा नावाचा त्यांचा एक सरळ मनाचा भक्त हातात सोटा घेऊन सावलीसारखा त्यांच्यासोबत असे.  श्रीनिंबर्गी महाराजांच्या समाधीलगतच्या खोलीत महाराज नेमासाठी म्हणजेच जपासाठी बसत. नेमाला जाताना बाहेरच्या खोलीत थांबलेल्या पुंडप्पाला ते म्हणाले, ‘‘पुंडप्पा मी खोलीत नेमाला बसतो. तू इथंच नेम करीत बस.’’ पुंडप्पानं होकार भरला आणि तिथं बसला. मात्र थोडय़ाच वेळात  तो घोरूदेखील लागला. महाराज काही वेळात बाहेर आले आणि त्यांनी सोटा उचलून पुंडप्पाला मारला. त्यानं विचारलं, ‘काय झालं महाराज?’ महाराज म्हणाले, ‘‘पुंडय़ा तुला नेमाला बस असं सांगितलं असताना तू चक्क घोरत पडलायंस?’’ त्यावर पुंडप्पा नम्रपणे म्हणाला, ‘‘महाराज तुमचा नेम तुम्ही पाहून घ्या. माझं एकच काम म्हणजे तुमचा देह सांभाळणं! माझा हाच नेम आहे!!’’ पुंडप्पाचं उत्तर ऐकून महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलं आणि ते म्हणाले, ‘‘बरोबर आहे तुझं म्हणणं. तुझ्यासाठी मीच नेम करतो. तुझा भार माझ्यावर आहे.’’ पुंडप्पाच्या उत्तराबद्दल मनात विकल्प आला असेल, तर ओळखा की, ‘मी’ नेम करतो, या कर्तेपणाच्या भ्रमात आपण अडकलो आहोत! मनाच्या सर्व ओढी जगाकडे, अपेक्षा-आसक्ती यात लेशमात्र बदल नाही; अशी आपली अखंड स्थिती.. असे आपण रोज काही माळा ओढणार आणि तशा माळा न ओढणारा, पण महाराजांशिवाय ज्याच्या आंतरिक भावनेला दुसऱ्या कशाचा स्पर्शही नाही अशा भक्तातलं उणं काढणार! ज्यांना सद्गुरूचं सहज विस्मरण आहे त्यांना उपासना कशी पार पडेल, ही चिंता सतत वाहावी लागते आणि ज्यांना सद्गुरूलयीत जगाचं सहज विस्मरण आहे त्यांची सर्व चिंता सद्गुरूलाच असते!  पुंडप्पासारखी अनन्य स्थिती लाभली, तर शीण कुठला?  उमदीकर महाराज घोडय़ावरून बराच प्रवास करीत. शेटय़प्पा म्हणून दुसरा एक सेवक त्यांचे घोडे राखत असे. महाराज त्याला एकदा म्हणाले की, ‘शेटय़प्पा तू माझे घोडे राखतोस आणि मी तुझे मनरूपी घोडे राखतो!’ खरंच जे जगाच्या आसक्तीपासून विभक्त नाहीत त्यांनाच मनरूपी घोडय़ांना काबूत ठेवण्याचे शीण आहेत. जे अनन्य आहेत त्यांना कसला शीण? त्या अनन्यतेशिवाय जे जे काही अन्य आहे तोच शीण आहे.