सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com , @joshisuhas2
कास्टिंग काउचचे अस्तित्व मान्य करायचे पण ते होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याबाबत कच खायची हा बॉलीवूडकरांचा दुटप्पीपणा आहे. एरवी कोणत्याही प्रश्नांवर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिंयावर धावणारे  बॉलिवूडकर कास्टिंग काउचमुक्त ‘स्वच्छ बॉलीवूड’ हा विषय गांभीर्याने घेतील का?

ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांनी गेल्या आठवडय़ात बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउच हे बाबाआदमच्या जमान्यापासून आहेत, अशी टिप्पणी केली आणि त्याची भलामणदेखील केली. त्यानंतर बॉलीवूडमधील कास्टिंग काउचवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. पण त्यापूर्वी सात एप्रिलला तेलगू अभिनेत्री श्रीरेड्डी हिने तेलगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयासमोर टॉपलेस होऊन तेलगू फिल्म क्षेत्रातील कास्टिंग काउचचा निषेध नोंदवला होता. तिचे म्हणणे होते की तेलगू चित्रपट क्षेत्रातील मोठे बॅनर हे राज्याबाहेरील अभिनेत्रींना, त्या त्यांच्या ‘मागण्या’ मान्य करतात म्हणून काम देतात आणि स्थानिकांना डावलले जाते. तिच्या निषेधामागे कास्टिंग काउचबरोबर अन्यदेखील अनेक कारणं होती. पण त्यानंतर तेलगू चित्रपट क्षेत्रात बराच गदारोळ माजला. तर आठ दिवसांपूर्वी बीबीसी वर्ल्ड न्यूज या वृत्तवाहिनीच्या एका माहितीपटात उषा जाधव आणि राधिका आपटे या कलाकारांनी कास्टिंग काउच हा प्रकार बॉलीवूडमध्ये घडत असल्याचा आपला अनुभव अनुभव असल्याचे सांगितले. बीबीसीने यासंदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार आणखीन दोन अभिनेत्रींनी नाव उघड न करण्याच्या अटीवर बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउच होते याला दुजोरा दिला आहे. तर रणवीर सिंग यालादेखील कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचे मांडले आहे. तसेच फरहान अख्तर याने यासंदर्भात बॉलिवूडने पावलं उचलली पाहीजेत असं मत व्यक्त केले आहे. या सर्व गदारोळानंतर एकूणच कास्टिंग काउच या प्रकाराबद्दल जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. पूर्वीच्या आरोपांची उजळणी सुरू होऊ लागली. कास्टिंग काउचबद्दलची अशी वक्तव्यं आजच झाली आहेत अशातला भाग नाही. गेल्या वीसएक वर्षांत अनेक कलाकार याबद्दल बोलले आहेत. त्यातच समाजमाध्यमांचा विस्तार होऊ लागला तसे त्याद्वारेदेखील अनेकजण व्यक्त होत गेले. सध्याच्या चर्चेच्या निमित्ताने त्यावर प्रकाश टाकायला हवा.

कास्टिंग काउच हा खास फिल्म इंडस्ट्रीने दिलेला शब्द. एखाद्या चित्रपटात काम मिळवण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणे असा त्याचा थेट अर्थ. अर्थातच हा प्रकार थेट महिला कलाकारांच्या बाबतीत होतो हे उघड आहे. कॉम्प्रमाइज, अडजेस्टमेन्ट अशा गोंडस शब्दातून याची मागणी होताना दिसते. चित्रपट या क्षेत्राला असलेले ग्लॅमर आणि त्यातून मिळणारी भरमसाठ प्रसिद्धी यामुळे अनेकांना त्या क्षेत्रात करिअर करायचा मोह होतो. आणि हा मोहच मग अनेकांना वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देतो. सिनेमात काम करायचे म्हणून गाव सोडून मुंबईत येणाऱ्यांचे किस्से तर येथे वारंवार ऐकायला मिळतात. आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले काही कलाकार थेट घरून पळूनच मुंबईत आले होते. पण अशांच्याच बाबतीत कास्टिंग काउच प्रकाराला बळी पडण्याची शक्यता अधिक असते. कास्टिंग काउचबद्दल पूर्वी तुलनेत चर्चादेखील कमी व्हायची. चर्चा झालेले आणि चांगलेच गाजलेले प्रकरण म्हणजे सिल्क स्मिता. तिच्या चित्रपट कारकीर्दीवर ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपटदेखील आला होता. चित्रपटाच्या नावावरूनच या प्रकाराची कल्पना येऊ शकते. आणि चित्रपटात दाखवलेल्या घटना पाहता कास्टिंग काउचचा अंदाजदेखील लावता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या अभिनेत्रींनी कास्टिंग काउचचे आरोप केले आहेत. त्यामध्ये प्रीती जैन हिने मधुर भांडारकरवर केलेली केस चांगलीच गाजली होती. चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन मधुर भांडारकर यांनी तब्बल चार वष्रे शरीरसंबंध ठेवायला लावल्याचा आरोप प्रीती जैन यांनी केला होता. न्यायालयात बराच खल झाल्यानंतर या केसचा निकाल मधुर भांडारकर यांच्या बाजूने लागला. ममता कुलकर्णी हिनेदेखील थेट सुभाष घई यांच्यावरच आरोप केले होते. ‘चायना गेट’ या चित्रपटाच्या परदेशातील चित्रीकरणादरम्यान त्यांनी ममताकडे तशी मागणी केल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले होते. ममताच्या नकारानंतर तिच्या भूमिकेला कात्री लागली आणि पुढील चित्रपटातून तिचे नाव वगळण्यात आले असा आरोप तिने केला होता. कंगना राणावत ही बोलायला एकदम फटकळ अशी अभिनेत्री. तिला असा अनुभव कधीच आला नाही असे ती म्हणते. पण ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या वेळी तिलादेखील कॉम्प्रमाइजची विचारणा झाली होती अशी चर्चा झाली होती. तिच्या नकारानंतरदेखील चित्रपटातील तिचे स्थान टिकून राहिले होते. इतकेच नाही तर या चित्रपटातील तिच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. सुरवीन चावला ही ‘हेट स्टोरी टू’मधील कलाकार, तिनेदेखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असे अनुभव आल्याचे सांगितले आहे.  ‘ताल’ चित्रपटातील भूमिका मिळवण्यासाठी ऐश्वर्या रायने काहीतरी तडजोड केली होती असा आरोप त्यावेळी शक्ती कपूरने केला होता. पण नंतर त्याने त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. तर प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी एकदा प्रियंकाच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रसंग माध्यमांसमोर सांगितला होता. एका चित्रपटाच्या चच्रेसाठी त्या प्रियंकाबरोबर एका दिग्दर्शकाकडे गेल्या असता चित्रपटाची कहाणी ऐकेपर्यंत दिग्दर्शकाने प्रियंकाच्या आईला बाहेर बसायला सांगितले. त्यावर त्यांनी तो चित्रपटच नाकारला होता.

यावरून जाणवते की सर्वसाधारपणे हे अनुभव कास्टिंग डायरेक्टर किंवा कास्टिंग एजंट यांच्या पातळीवर दिसतात. अपवादानेच थेट दिग्दर्शकाचे, निर्मात्याचे नाव घेतले जाते. ज्यांची इंडस्ट्रीमध्ये काहीच ओळख नाही अशांना येथे काम मिळण्याचे माध्यम हे कास्टिंग एजंट किंवा कास्टिंग डायरेक्टरच असतात. कोणत्याही चित्रपटाच्या प्रक्रियेत हा घटक महत्त्वाचा असतो. मुख्य कलाकारांसाठी काही चेहरे दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर असले तरी चित्रपटातील उर्वरित कलाकारांसाठी अशा कास्टिंग एजन्सी, कास्टिंग डायरेक्टर हाच आधार असतो. मग नवख्या कलाकारांना जाळ्यात ओढण्याचे काम येथे होऊ शकते. उषा जाधव आणि राधिका आपटे यांनी अशा एजंट्सचाच उल्लेख बीबीसीवरील त्यांच्या मुलाखतीत केला आहे. उषा जाधव तर कोल्हापूरहून चित्रपटात काम करण्यासाठी आली आहे. तिच्या मुलाखतीत ती सांगते, की तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरदेखील अशा प्रसंगाना तोंड द्यावे लागले. शय्यासोबत केला तरच रोल मिळेल अन्यथा नाही मिळणार अशी थेट ऑफर तिच्यासमोर ठेवली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार आणखी एका स्री कलाकाराने एका कास्टिंग काऊचला बळी पडल्याचे सांगितले आहे. एका रोलसाठी बोलवले असता कास्टिंग एजंटने तिच्या शरीराबरोबर चाळे केल्याचे ती सांगते.  तर राधिका आपटे म्हणते, तिला स्वत:ला असा थेट अनुभव आलेला नसला तरी, अनेक अभिनेत्री यावर बोलायला तयार नसतात. चित्रपट क्षेत्रातील बडय़ा हस्तींच्याबाबत तर बोलणे त्यांना शक्यच होत नाही. या महिलांच्या बाबतीतले कास्टिंग काउचचे हे अनुभव नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

कास्टिंग काउचबद्दलची चर्चा सुरू झाली की चित्रपट क्षेत्राकडून त्यावर एक नेहमीची मल्लिनाथी केली जाते ती म्हणजे हे सगळे प्रकार होतात, पण ते बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांच्या बाबतीत. ‘ए’ ग्रेड चित्रपटांच्या संदर्भात असे काही घडत नाही. नवख्या कलाकाराचा संघर्षांचा काळ असतो तेव्हा तो मी फक्त अमुकच सिनेमामध्ये काम करणार आणि तमुकमध्ये करणार नाही, अशी भूमिका घेऊच शकत नाही. त्याच्यासाठी काम मिळवणे हे महत्त्वाचे असते. आणि मुख्य कलाकार सोडून असंख्य छोटय़ा-मोठय़ा भूमिकांसाठी अनेकांची गरज असतेच. त्यातून मग सर्वाचेच फावते. पण चित्रपटसृष्टीची ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. कारण ‘बी’ आणि सी ग्रेड चित्रपटांच्या बाबतीत कास्टिंग काउच होणे मान्य करायचे आणि आपण वेगळे आहोत असा शहाजोगपणा करत समूहवादाला खतपाणी घालायचे हेच यातून दिसून येते.

दुसरीकडे अनेक वेळा कास्टिंग काउचबद्दल खूप काळ सरल्यानंतर बोलले जाते. एखादी घटना घडल्यानंतर लगेचच त्यावर फारसे बोलणे होत नाही. श्रीरेड्डीने यापूर्वी काही तेलगू चित्रपटांत काम केले होते. त्यानंतर एका चित्रपटासाठी तिला नकार मिळाला. मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सभासदत्व नाकारल्यानंतर तिने तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी टॉपलेस निषेध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिने वेगवेगळ्या मोठय़ा लोकांबरोबरचे संवाद, फोटो माध्यमांना द्यायला सुरुवात केली.

एखाद्या अभिनेत्रीने स्वखुशीने का असेना शरीरसंबंधांना संमती दिली असली तरी कास्टिंग काउच हे कोणत्याही परिस्थितीत वाईटच. पण समोरच्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर अशा प्रसंगांची वाच्यता केली जाते तेव्हा त्याला दुटप्पीपणा म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजेच संबंधित अभिनेत्रीला काम मिळाले असते तर हा विषय कोणाला कळलाच नसता असा त्याचा अर्थ होतो. पण एखादी अभिनेत्री अशा ऑफर धुडकावते तेव्हादेखील ती लगेच त्यावर बोलत नाही. कारण ती नवखी असते. तिला काम मिळण्याची अपेक्षा असते अशा वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुढे काम मिळायला अडचणी येतील की काय अशी तिला भीती वाटू शकते आणि ती सार्थच असते. उषा जाधवने सुरुवातीच्या काळातील अशा साऱ्या ऑफर्स धुडकावल्या असं ती त्या मुलाखतीत सांगते. अर्थातच तिच्यातील कलाकाराला वाव मिळून नंतर तिने राष्ट्रीय पारितोषिकदेखील पटकावले.

अर्थात एक मात्र नक्कीच आहे की चित्रपट क्षेत्रात तुम्हाला तुमचा ठसा उमटवायचा असेल तर त्यासाठी तुमचे कामच महत्त्वाचे आहे, शरीर नाही. कंगना राणावतने तिच्या एका मुलाखतीत कास्टिंग काउचवर अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. ती म्हणते की एखाद्या मुलीला असे वाटत असेल की तिने एखाद्याची शय्यासोबत केल्यावर तिला काम मिळणार आहे, तर ती मुलगी मुर्ख आहे असे म्हणावे लागेल. स्वत:बाबत बोलताना ती म्हणते की मला तर या क्षेत्रात कोणीच ओळखत नव्हते. पण मी ही भाबडी आशा अजिबात बाळगली नाही. कंगनाच्या या वक्तव्यात कलेचे महत्त्व दिसून येते आणि ते खरेदेखील आहे. एखाद्या अभिनेत्रीने एखाद्याची शय्यासोबत मान्य करून काम मिळवले असेल, पण तिला अभिनयच येत नसेल, ती संवादच नीट बोलू शकत नसेल तर तिला केवळ दिखाऊ म्हणूनच भूमिका मिळतील, यापलीकडे चित्रपट क्षेत्रात तिने काही भरीव काम केल्याची नोंद राहणार नाही हे निश्चित. याचाच अर्थ चित्रपटसृष्टीतील कामाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता हेदेखील येथे महत्वाचे ठरते.

कास्टिंग काउचबद्दलचे असे छोटे-मोठे किस्से चित्रपट क्षेत्रात चवीने रंगवले जातात. चमचमीत बातम्या देणाऱ्या वेब पोर्टलवरून आणखीन पसरवले जातात. पण त्यातून मूळ मुद्दय़ांवर फारसे भाष्य होत नाही. किंबहुना ते व्हावे अशी कोणाची इच्छा असते की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. आणि तशी इच्छा नसावीच असे वाटणारे वातावरण येथे असते.

सरोज खान यांच्या वक्तव्याची सुरुवात कास्टिंग काउचचे अस्तित्व मान्य करणारी असली तरी त्या वक्तव्याचा शेवट हा मात्र फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ते आमचे मायबाप आहेत असा होता. त्या म्हणतात, तुमच्याजवळ कला असेल तर तुम्ही शरीर विकायला कशाला जाता? त्यांचे हे म्हणणे कदाचित मान्य होऊ शकेल, पण त्या पुढे म्हणतात की, किमान ही इंडस्ट्री त्या महिलांना काम तरी देते. बलात्कार करून सोडून तर देत नाही. त्यांच्या या विधानाबद्दल त्यांनी नंतर एका वृत्तवाहिनीकडे दिलगिरी व्यक्त केली. पण एकूणच त्यांनी ही व्यवस्था मान्य केल्याचे दिसून येते.

इतकेच नाही तर आणखीन एक मुद्दा चित्रपट क्षेत्रातील सर्वाकडून कायम चच्रेत येतो, तो म्हणजे हे प्रकार काय फक्त आमच्याच क्षेत्रात चालतात का?  हे तर सर्वच ठिकाणी होताना दिसते. सरोज खान यांनीदेखील हाच मुद्दा मांडला होता. याचा अर्थ एवढाच होतो केवळ आम्ही दोषी नाही तर आणखीही अनेकजण दोषी आहेत, मग आम्हालाच का धारेवर धरता? आणि असाच अर्थ एकंदर चित्रपटसृष्टीला अपेक्षित दिसतो. एरवी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माध्यमांमध्ये झळकत असताना अशा प्रश्नांवर मात्र या इंडस्ट्रीतले लोक बोलायला फारसे उत्सुक नसतात. ना त्यावर काही उपाय शोधायला कोणते पाऊल उचलतात. गेल्याच आठवडय़ात माजी खासदार रेणुका चौधरी यांनी तर राजकारणातदेखील असेच कास्टिंग काउच चालते अशी टीका केली होती. राजकारणात असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्याला दुजोरा दिला होता. पण यावर उपाय काही सुचवला नव्हता.

जगातील अनेक प्रश्नांवर, घटनांवर चित्रपटांमधून भाष्य केले जाते. किंबहुना त्यापकी एखाद्या मुद्दय़ावर जर काही आक्षेप आलेच तर त्यासाठी सगळी इंडस्ट्री अभिव्यक्तीच्या नावाखाली विरोध करते. कलेच्या अभिव्यक्तीसाठी हे योग्यच आहे. पण जगातील प्रश्नांकडे बोट दाखवताना स्वत:च्या क्षेत्रातील प्रश्नांवर कधी बोलायचे, की बोलायचेच नाही? आपल्याकडे या विषयावरील चित्रपटदेखील अगदीच मर्यादित असे आहेत. सिल्क स्मिताच्या कारकीर्दीवरील चित्रपटातून यावर बरेच भाष्य झाले आहे. पण सिल्क स्मितावर अन्याय होत असताना तिच्यामागे कितीजण होते हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहतो.

हाच प्रकार गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांचा विस्तार वाढल्यानंतर दिसून येत आहे. जगात जरा कुठे खुट्टं झाले की काही कलाकार त्यावर आपले मत व्यक्त करतात, झाल्या प्रकाराचा निषेध करतात. काहीजण त्यावरील निदर्शनामध्ये सहभागी होतात. पण श्रीरेड्डीचा टॉपलेस निषेध, सरोज खान, उषा जाधव आणि राधिका आपटे यांचे वक्तव्य पाहता त्यावर चित्रपटसृष्टीला अजून तरी कंठ फुटलेला नाही. कदाचित सारेचजण सोयीस्कर भूमिका कशी घेता येईल याचा विचार करत असावेत. महिनाभरापूर्वी जम्मूतील कथुआ येथील लहान मुलीवर अमानुष बलात्कार आणि खुनाच्या प्रकारानंतरदेखील चित्रपटसृष्टीतील अनेकांनी निषेध नोंदवला. आगामी ‘वीरे दा वेडिंग’ चित्रपटातील स्वरा भास्कर, सोनम कपूर, करिना कपूर यांनीदेखील त्यावर समाजमाध्यमांवर जोरदार निषेध केला होता. पण या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान कास्टिंग काउचसंदर्भात प्रश्न आला तेव्हा त्यावर येथे बोलणे अपेक्षित नाही म्हणत बगल दिली गेली.

ऑक्टोबर २०१७ मध्ये हॉलीवूडमध्ये ‘मी टू’ (टीळ) या हॅशटॅगमुळे बराच गदारोळ उठला होता. अलस्या मिलानो हिने हार्वे वेइन्स्टिन यांच्या कािस्टग काउचबद्दल जे ट्विट केले होते त्यामधून हा हॅशटॅग समाजमाध्यमांवर पसरला. हार्वेवर कास्टिंग काउचचे आरोप झाले होते. त्याला निषेध म्हणून ज्या महिलांना इतर कोठेही अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले असेल, त्यांनी समाजमाध्यमांवर ‘मी टू’ (टीळ) हे स्टेट्स ठेवावे असे आवाहन त्यात होते. जगभरातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम नेमका काय आणि कसा झाला याबद्दल वेगळी चर्चा करता येईल. पण त्यातून निदान एक संदेश तर पोहोचला. आता बॉलीवूडमधील कलाकारांनाही ‘मी टू’ (टीळ) असे वाटत असेल तर येथील कलाकारांनादेखील कास्टिंग काउचवर आवाज उठवावा लागेल. एकीकडे कास्टिंग काउचचे अस्तित्व मान्य करायचे आणि दुसरीकडे जगातील घाणीकडे बोट दाखवायचे आणि स्वत:चे घर आधी स्वच्छ करावे हा विचारदेखील येऊ द्यायचा नाही हा भोंदूपणा झाला. जळात राहून माशांशी वैर घ्यायचे नसते वगरे टाइपची वाक्यं ऐकायला बरी वाटत असली तरी कधीतरी हे वैर घ्यावेच लागेल, अन्यथा हे तसलेच आहेत, यांच्याकडे सगळे असेच असते ही चित्रपटक्षेत्राबद्दलची सर्वसामान्यांची टिप्पणी कधीच दूर होणार नाही हे बॉलीवूडला समजून घ्यावे लागेल.

कायदेशीर संरक्षणाचे काय?

श्रीरेड्डीच्या निषेधाच्या घटनेनंतर तीनच दिवसांत राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाने (नॅशनल ह्य़ूमन राइट्स कमिशनने) आपणहून केस दाखल करून घेऊन (सुओमोटो) आंध्र प्रदेश सरकारला आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस देऊन यासंदर्भात काही प्रश्न विचारले. कामाच्या जागी महिलांचे लैंगिक शोषण होत असेल तर त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन निराकरण करणारी यंत्रणा या क्षेत्रात आहे का अशी विचारणा आयोगाने केली होती. एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक त्रासाविरुद्धची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तशा प्रकारचा कायदादेखील २०१३ साली अस्तित्वात आला आहे. आंध्र प्रदेश सरकारने या नोटिशीनंतर चेंबरचे सभासद असणाऱ्या चित्रपट निर्मितीगृहामध्ये लैंगिक शोषणाचे निराकरण करणारी समिती नेमण्याचे ठरवले आहे. तसेच आर्टिस्ट असोसिएशनने श्रीरेड्डीवरील बंदीदेखील दूर केला आहे.

याच अनुषंगाने बॉलीवूडमधील परिस्थिती काय आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या बॉलीवूडमध्ये अशी समिती अस्तित्वात नाही. इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनचे (इम्पा) सचिव अनिल जागरत या संदर्भात सांगतात, ‘‘अशा प्रकारची समिती करण्याच्या सूचनेचे आम्ही स्वागतच करत आहोत. आम्ही आमच्या सभासदांना या संदर्भात सूचना केल्या असून, महिलांच्या तक्रारीचे निवारण करणारी यंत्रणा तयार करण्यात येईल.’’ तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले सांगतात, ‘‘अशी समिती नसली तरी आम्ही महिनाभरापूर्वी अशा घटनांची तड लागावी म्हणून महिला ब्रिगेड सुरू केली आहे.’’ या दोन्ही प्रतिक्रिया पाहता एकंदरीत याबाबतीत चित्रपटसृष्टी कायदेशीर बाबींबाबत अजूनही पुरेशी सजग नाही असेच जाणवते.