14 November 2019

News Flash

…हृदय गहिवरले!

शेतकऱ्याची अवस्था.. पावसाने केली धूळदाण सारे सुनसान.. हृदय गहिवरले! अशीच झाली

सुरुवातीला परतीच्या आणि नंतर अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, द्राक्षे, भात, सोयाबीन, मूग, चवळी अशी पिके अक्षरश: भुईसपाट केली. आणि शेतकऱ्याची अवस्था.. पावसाने केली धूळदाण सारे सुनसान.. हृदय गहिवरले! अशीच झाली

नशिबी दुष्काळच, पण ओला! (मराठवाडा)

सप्टेंबर महिन्यापर्यंत मराठवाडय़ातील बहुतांश धरणांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा होता. आता पाणीटंचाईला कसे तोंड द्यायचे, असा पेच होता. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केला आणि मराठवाडय़ातील शेतशिवारात पाणी घुसले आणि हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला. मराठवाडय़ातील ४८ लाख हेक्टरापैकी ३० लाख हेक्टरवरील पीक आता सडले आहे. मक्याची कणसे शेतातच सडली. पाऊस एवढा झाली की कणसाला कोंब फुटले. सोयबीनच्या शेंगा सडल्या. कापसाची वेचणी होईल की नाही हेही सांगता येत नाही, असे चित्र शिवारामध्ये दिसत असल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. अशा वातावरणात कर्जमाफीनंतरही ज्यांचे कर्ज फिटले नाही, अशा शेतकऱ्यांना बँकांनी वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे जगण्याचा नवा संघर्ष सुरू करावा लागेल, असे चित्र आहे. दिवाळीनंतरचा परतीचा पाऊस ऐन पीक काढणीच्या काळात आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांची जिल्हा व तालुकास्तरावर कार्यालये नाहीत. त्यामुळे अडचणी सांगायच्या तरी कोणाला, हा पेच पुन्हा कायम आहे. पण या वेळी पंचनामे करताना फार अडवणूक करू नका, विमा कंपन्यांना नुकसानीची एकत्रित माहिती द्या, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. तीन वर्षांच्या कोरडय़ा दुष्काळानंतर मराठवाडय़ातील धरणांमध्ये आता जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या पाणी साठवणुकीच्या कामांमुळे रब्बी हंगाम अधिक चांगला होईल, अशी आशा आहे. पण त्यासाठी शेतातील पाणी कमी झाले तरच ते शक्य आहे. सध्या तशी स्थिती दिसून येत नाही. पण तीन वर्षांच्या दुष्काळानंतर पुन्हा पीक हातचे गेल्याने सरकारी मदतीशिवाय जगणे कठीण होणार आहे. राज्य सरकारने केलेली दहा हजार कोटी रुपयांची तरतूद त्रोटक आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एका सुरामध्ये सांगत आहेत, कारण त्यांना सरकारी यंत्रणांकडून मिळणारी माहितीही त्याच स्वरूपाची आहे.

मराठवाडय़ात बदलेल्या पीक रचनेमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत गेले. कापूस आणि सोयाबीन ही पिके गेल्याने रब्बी हंगामासाठी पीक कर्ज मिळावे, अशी मागणी जोरदारपणे होत आहे. तसेच किमान वीज कापू नका, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. येत्या काळात अतिपावसामुळे कापसावर लाल्या रोग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोंडअळीचे संकट असल्याने कापूस हाती येणार नाही. परिणामी जगणे अधिक कठीण होईल, असे चित्र आहे. नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी रक्कम जमविणे, हे आव्हान असेल. त्याच बरोबर सरकारी विमा कंपन्यांनी मदत देण्यात कुचराई करू नये, यावर सरकारला नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मराठवाडय़ातील सिल्लोडसारख्या तालुक्यातील जमीनच खरवडून गेली आहे. अनेक शेतात अजूनही पाणी आहे. त्यामुळे मदत करण्याचे निकषही बदलावे लागणार आहेत. सध्या अतिवृष्टी झाल्यास कोरडवाहू क्षेत्रातील पिकास हेक्टरी केवळ ६ हजार ८०० रुपये, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये देण्याची तरतूद करण्याचे निकष आहेत. मात्र नुकसान लक्षात घेता यात बदल करण्याची गरज आहे. हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची मदत मिळावी असे अपेक्षित असले तरी ती मदत तातडीने मिळाली नाही तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढू शकतो.

ओला दुष्काळ सरकार दरबारी नाहीच

केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष ठरलेले आहेत. पण अतिपावसाने नुकसान झाले आणि पीक हातचे गेले तर त्या संदर्भात ओल्या दुष्काळाचे निकष मात्र तसे ठरलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निधीतून राज्याला अधिक मदत मिळावी, अशी मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओल्या दुष्काळाचे निकष ठरविणे आता गरजेचे झाले आहे कारण गेल्या काही वर्षांत गारपीटीलाही सामोरे जावे लागले आहे. पण या वेळी परतीच्या पावसाने दणका दिल्यानंतर शेतीसमोर नवेच आव्हान उभे ठाकले आहे. हे शेतीबरोबरच सरकारसमोरचेही आव्हान आहे.

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

७० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान (उत्तर महाराष्ट्र)

यंदा नोव्हेंबर उजाडला तरी, पाऊस आपला मुक्काम हलविण्यास तयार नसल्याने संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने केवळ उत्तर महाराष्ट्राचा विचार करता शेतीचे किती कोटींचे नुकसान झाले, याची मोजदाद प्रशासकीय पातळीवर अजुनही सुरूच आहे. विभागातील ५२ तालुक्यांमध्ये १६ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक आणि जळगावमध्ये सर्वाधिक नुकसान आहे. अंतिमत: नुकसानीचा आकडा किती पल्ला गाठेल, हे सध्या सांगता येणे प्रशासनासाठीही अवघड आहे.

पाऊस कोसळणे न थांबल्याने एकटय़ा नाशिकमध्ये सव्वा तीन लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यातून मका, द्राक्षे, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला असे कोणतेही पीक सुटू शकलेले नाही. नाशिक जिल्ह्य़ात सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, नाशिक आदी भागास सर्वाधिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार नाशिकमध्ये १६१४ गावांमधील ४ लाख ५२ हजार ९३१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्य़ातील ७० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. विविध टप्प्यातील बागा डावणी, फुलधारणा अवस्थेत कूज, द्राक्षमण्यांना तडे जाणे किंवा घड गळून पडणे आदींना तोंड देत आहे. पावसाने बहुतांश शेती अक्षरश: धुऊन काढली. हरितगृहांचेही प्रचंड नुकसान झाले. शेतात उभ्या असलेल्या मक्याच्या पिकाला कोंब फुटले असून शेतात काढून ठेवलेला मकाही भिजला. कपाशीची बोंडे काळवंडलेली आहेत. भात आणि बाजरी भुईसपाट झाली आहे. बाजरीच्या कणसांनाही कोंब फुटले आहे. सोयाबीनचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून त्यात दिवसागणिक भर पडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी आणि शासनास सादर केला आहे. त्यात पावसामुळे १४६८ गावांमधील तब्बल ५ लाख ५ हजार ८७७ शेतकरी बाधीत झाल्याचे म्हटले आहे. अनेक भागांत शेतातील विहिरी अतिपाण्यामुळे खचून गेल्या आहेत. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव आणि चोपडा तालुक्याला बसला आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला. जिल्ह्यत पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील सुमारे चार लाख ६१ हजार १५९ हेक्टर, तसेच बागायती क्षेत्रावरील एक लाख ३६ हजार ८०४ हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यातही टंचाईग्रस्त राहणारे गाव म्हणून मनमाडची ओळख आहे. या गावातील रामगुंळणा आणि पांझण या नद्यांना परतीच्या पावसामुळे सुमारे १० वर्षांनंतर महापूर आला. नाशिक विभागातील सर्व मध्यम आणि लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम नाशिक जिल्ह्य़ाचा दौरा केल्यावर जाग आलेल्या प्रशासनाकडून पंचनाम्यांच्या कामांना वेग देण्यात आला. जळगाव आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही दौरे केले. सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी असतानाही उशिराने नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा महाजन आणि भुसे यांना ठिकठिकाणी सामना करावा लागला.

अविनाश पाटील, नाशिक

गंज्या भिजल्या, बोंडे सडली (विदर्भ)

सुरुवातीला पावसाची दडी, मध्यंतरीच्या काळात झालेला संततधार पाऊस आणि प्रतिकूल वातावरणातून वाचलेली विदर्भातील कापूस, सोयाबीन, धानासह इतर पिके परतीच्या पावसाने संपूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळे कपाशीची बोंडे सडली आहेत. कापूस वेचणी आणि सोयाबीन मळणीचा हंगाम सुरू असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर टाकली. सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड झाली, त्यात सोयाबीन पिकाखाली १३ लाख २९ हजार हेक्टर तर कपाशीचे क्षेत्र ११ लाख २६ हजार हेक्टर आहे. प्राथमिक अंदाजानुसार अमरावती विभागातील ५६ तालुक्यांमधील १२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे.

नागपूर विभागातील लागवडीखालील १८ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी सर्वाधिक ७ लाख ३५ हजार हेक्टरमधील लागवड धानाची, ६ लाख ६८ हजार हेक्टरमध्ये कापूस तर २ लाख ३९ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. संपूर्ण विदर्भात सोयाबीन, धान आणि कापूस या तीनही प्रमुख पिकांचे पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. प्रशासनाच्या लेखी नागपूर विभागातील ४८ तालुक्यांमध्ये नुकसान हे केवळ ४० हजार हेक्टरमधील असले, तरी त्याहून कितीतरी अधिक हानी झाली आहे. अनेक भागात हलक्या धानाची कापणी शेतकऱ्यांनी करून ठेवली होती. धान भिजून मातीमोल झाला.

परतीच्या पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी साचले. बुलढाणा जिल्ह्यात तर अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनच्या गंज्या वाहून जात असल्याचे विदारक चित्र दिसले. या पावसाने कापूस, सोयाबीन, धान, संत्राबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी मूग, उडीद यांसारख्या पिकांची लागवड करू शकले नाहीत. या पिकांच्या पेरणीचा कालावधी उलटून गेला. विदर्भात मान्सूनचे आगमन उशिरा झाले. गतवर्षी शेतकरी दुष्काळामध्ये होरपळून गेला होता. यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आशेवरच त्यांनी शेतीचे नियोजन केले होते. उशिरा पेरलेले सोयाबीन, धान कसेबसे तग धरून होते. मात्र पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, ज्या ठिकाणी कापणी झाली आहे त्या शेतांमध्ये नुकसानीचे पंचनामे कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान  झाले, अशा ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार कापणी केलेल्या, कापणीस आलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगण्यात आले आहे.

मोहन अटाळकर, नागपूर.

कोकण : भातशेतीला फटका (कोकण)

अलिबाग

परतीचा पावसामुळे रायगड जिल्ह्यत भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यतील २७ टक्के भातपीक नष्ट झाले. जिल्ह्यत सरासरी १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. यंदा ९५ हजार हेक्टरवर ही लागवड झाली होती. ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीत त्यापकी सुमारे १६ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीत वाचलेले पीक चांगले होते. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसात तेसुद्धा हातचे गेले. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यत अंदाजे १० हजार हेक्टर क्षेत्रावर कापलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही नसíगक फटक्यांमुळे मिळून रायगड जिल्ह्यातील सुमारे २७ टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. भात पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे.

रत्नागिरी

क्यार वादळाच्या प्रभावामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यतील गरवी, निमगरवी भातशेतीचे नुकसान झाले आहे. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे सुरू आहेत. प्रत्यक्ष शेतीचे क्षेत्र आणि अपुरे संख्याबळ यामुळे शासकीय आदेशानुसार अपेक्षित उद्यापर्यंत (शनिवार) पंचनामे पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यतील एकूण ३ हजार ६०० हेक्टरवरील बाधित शेतीचे पंचनामे करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यत ७९ हजार हेक्टरवर भातशेती लागवड झाली. त्यातील हळवी बियाणे (सुमारे ९० दिवस) १५ हजार हेक्टर निमगरवी (सुमारे १२० दिवस) आणि उर्वरित गरवी बियाण्यांचे (सुमारे १५० दिवस) क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पडलेल्या पावसाने गरवी आणि निमगरवी या दोन्ही प्रकारच्या पिकांची वाताहात केली आहे. सर्वाधिक फटका नदी किंवा खाडी किनारी भागात बसला. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतांचे जास्त नुकसान झाले आहे. या पावसामुळे बाधित सर्वाधिक क्षेत्र संगमेश्वर, राजापूर आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये आहे. तसेच मंडणगड आणि दापोलीतही शेतीचे बऱ्यापकी नुकसान झाले आहे.

जिल्ह्यतील पहिल्या दोन दिवसांत पंचनामे झालेल्या क्षेत्रात रत्नागिरी १२५० हेक्टर , लांजा-१७५, राजापूर-२७५, चिपळूण-२३०, गुहागर-५४५, संगमेश्वर-२४५, दापोली- ३४६, खेड-४७६ आणि मंडणगड-१३९ हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी कापून सुरक्षित ठिकाणी हलवलेल्या भाताचा नियमानुसार पंचनाम्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ही या नुकसानभरपाई प्रक्रियेतील मोठी त्रुटी राहणार असून त्याबाबत शासनाला विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.  अन्यथा, अनेक शेतकरी नुकसान होऊनही लाभापासून वंचित राहणार आहेत.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यत पावसामुळे भात पीक धोक्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने नोंदविला आहे. जिल्ह्यत अतिवृष्टी आणि चक्री वादळामुळे ६७८ गावातील भातशेती बाधित झाली आहे. या गावातील २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले असून ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने नोंदवला आहे.
सतिश कामत, रत्नागिरी.

ठाणे

कोकण किनारपट्टीतील महत्त्वाच्या अशा ठाणे जिल्ह्य़ाला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे जिल्ह्य़ातील भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्य़ात ऑक्टोबर महिन्यात १४१.९७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून पावसामुळे २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. तसेच वरई, नाचणी, सोयाबीन आणि कारळे या पिकांचेही नुकसान झाल्याचे ठाणे जिल्ह्य़ाच्या कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये भातशेतीचे मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतले जाते. दरवर्षी चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पन्न हे ठाणे जिल्ह्य़ातील भातशेतीतून घेतले जाते. वाडा कोलम, गुजरात ११ आणि झिनीत यांसारख्या महत्त्वाच्या भाताच्या वाणांचे पीक ठाणे जिल्ह्य़ातील भातशेतीत घेतले जाते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर ठिकाणच्या मोठय़ा मॉलमध्ये ठाणे जिल्ह्य़ातील भातशेतीत होणाऱ्या उच्च प्रतीच्या तांदळाला चांगली मागणी असते. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे मॉल्स तसेच बाजारपेठांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या तांदळात कपात होणार असल्याचे दिसून येत आहे. भातासोबतच वरई, नाचणी, सोयाबीन आणि कारळे या पिकांचेही ठाणे जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते. मात्र जोरदार वारा आणि परतीच्या पावसाने या पिकांनादेखील भुईसपाट केले. ठाणे जिल्ह्य़ात ऑक्टोबर महिन्यात सरासरी १४१.९७ मिमी इतका परतीचा पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. ऐन भातपीक काढण्याच्या वेळेस ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्य़ाला अक्षरश झोडपून काढले. मात्र याचा अधिक फटका हा जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाला बसला. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात घेतले जाणारे शेती लागवडीखालील क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले. ऐन भातपीक काढण्याच्या दिवसातच परतीच्या पावसामुळे भातीशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्य़ात भात लागवडीखालील क्षेत्रफळ ५४ हजार हेक्टर इतके असून यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे यापैकी २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत १५ हजार १३८ हेक्टर शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस होऊन जिल्ह्य़ात पाच तालुक्यांमध्ये मिळून ६ हजार ३६१ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसामुळे जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान हे शहापूर आणि भिवंडी तालुक्यांमधील भातशेतीचे झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यात        ७ हजार ९०० हेक्टर तर भिवंडी तालुक्यात     ७ हजार ३५० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान केल्यामुळे आर्थिक उत्पन्नासाठी केवळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

ऋषिकेश मुळे, ठाणे.

परतीच्या पावसाचा कोप (पश्चिम महाराष्ट्र)

कोल्हापूर

ऊस, भुईमुग, भात, भाजीपाला, सोयाबीन, नागली, ज्वारी अशी पिके हाती लागण्याची वेळ आलेली असताना परतीच्या पावसाच्या माऱ्याने ती जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यत २५ ते ३० टक्क्यांनी कृषी उत्पादनाला तडाखा बसला आहे. ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संघटनांनी भरीव आíथक मदत मिळण्यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यातील महापुराने आधीच कोल्हापुरचे कंबरडे मोडले होते. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरलेसुरले अस्तित्वच पुसले जात आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या १५-२० दिवसांत तुरळक पाऊस होतो. तो रब्बीसाठी पोषक असतो; पण यंदा पावसाचा काही वेगळाच नूर पाहावयास मिळत आहे. महापुराने नदीकाठासह इतर पिके कुजून गेली. कष्टाने पिकविलेली पिके आता काढणीस आली असताना परतीच्या पावसाने रपाटा लावला आहे. रोज ढगफुटीसारखा पाऊस पडत असल्याने काढणी थांबली आहे. हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. भात, भुईमुगाला कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. भाताच्या लोंब्यांतून दाणे तुटून खाली पडत आहेत; तर ज्वारीची कणसे काळी पडू लागली आहेत. दाणे पोकळ पडण्याची भीती आहे. भात झाडल्यानंतर राहणारे िपजर कुजल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न भेडसावणार आहे. सोयाबीन, भुईमुग, ज्वारीचे किमान ३०टक्के उत्पादन कमी होणार आहे.

कोल्हापूरचा पश्चिम भाग भात पिकाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. महाप्रलयंकारी महापुराने शिराळा पश्चिम भागातील नदीकाठ परिसरातील भात, ऊस, मका, सोयाबीन आदी पिके पूर्णत: वाया गेल्याने गेल्या पंधरा-सोळा वर्षांत पहिल्यांदाच थमान घातलेल्या पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. ५० टक्के भात शेती सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने कुजून गेली आहे. पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ भातशेतीत पाणी असल्याने ती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. काही अंशी बचावलेल्या खरीप हंगामातील आगाऊ पेरणी झालेल्या भात, सोयाबीन, भुईमुग, मूग, चवळी या पिकांच्या काढणीला वेग आला असतानाच पुन्हा पावसाने जोर धरल्याने हातातोंडाशी आलेले उर्वरित पीकही खराब होऊ लागले आहे. भुईमुग काढणीयोग्य झाला आहे. मात्र, रोजच्या पावसाने या पिकांनाही जबर फटका बसत आहे. भुईमुगाला मोड येऊ लागल्याने ते धोक्यात आले आहेच, शिवाय नाचणीही काळी पडण्याची शक्यता आहे. नदीकाठावर शेती गेलीच, आता डोंगराचेही पीक हातचे गेल्यास शेतकऱ्यांनी खायचे काय, हा प्रश्न आ वासून उभा राहील. अतिवृष्टी भात नुकसान अंदाजे २५ हजार हेक्टर तर सोयाबीनचे २० हजार हेक्टर नुकसान झाले आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका साखर, गुऱ्हाळ उद्योगाला बसत आहे. सध्या साखर कारखाने आणि गुऱ्हाळ मालक गुऱ्हाळे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. पण एक दिवसही पाऊस थांबत नसल्याने जळण भिजून त्याचे नुकसान होत आहे. यामुळे कारखाने, गुऱ्हाळे सुरू होण्यास आणखी १५ दिवस लागतील असे दिसत आहे.

दयानंद लिपारे, कोल्हापूर.

सोलापूर

एकीकडे दुष्काळाचा पाठलाग आणि दुसरीकडे देशात सर्वाधिक साखर कारखाने असे विसंगत चित्र दर्शविणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात सलग दोन वर्षे कोरडय़ा दुष्काळाशी संघर्ष झाल्यानंतर आता अनपेक्षितपणे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. रब्बी हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात मंगळवेढय़ाची ज्वारी देशात प्रसिद्ध आहे. ऊस उत्पादनाशिवाय द्राक्ष व डाळिंबासाठीही सोलापूरची स्वतंत्र ओळख होऊ लागली आहे. परंतु आता ओल्या दुष्काळामुळे या साऱ्या पिकांवर खरोखर पाणी फेरले आहे. ७० टक्के पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्याचा कणा मोडला आहे. सध्या मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी त्यातून बळीराजाला कसा आधार मिळणार, याचे उत्तर येणारा काळच देईल.

पावसाळा संपत असताना सप्टेंबरअखेर जिल्ह्य़ात निम्म्यापेक्षा कमीच म्हणजे जेमतेम ४७ टक्के एवढाच पाऊस पडला होता. मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या आणि तहानलेल्या भागासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरूच होते. सुदैवाने पुणे जिल्ह्य़ात भीमा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूरचे महाकाय उजनी धरण भरल्यामुळे तेवढाच काय तो दिलासा मिळालेला. इकडे, थोडय़ाशा पावसाने आशावादी शेतकऱ्यांनी सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरण्या केल्या होत्या. परंतु पाऊसच नसल्यामुळे ही पिके हातची जाण्याची भीती वर्तविली जात असतानाच अखेर ऑक्टोबरमध्ये पाऊस बरसू लागला. सुरुवातीला शेतकरी सुखावला. या पावसामुळे मुक्या जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न सुटला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली लागला. शेतशिवारात विहिरी तुडुंब भरल्या. नदी-नाले, ओढय़ांनाही पाणी आले. उशिरा का होईना, खरीप पिकांनाही आधार मिळाला. इथपर्यंत पावसाची साथ लाभदायक होती. परंतु पाऊस न थांबता सातत्याने कोसळतच राहिला. एकूण पावसाळ्याच्या तब्बल ३७ टक्के पाऊस ऑक्टोबरमध्ये पडला. सर्वदूर आणि सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचे पाणी शेतशिवारात घुसले. यात कांदा, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, तूर आदी ७० टक्के पिकांची प्रचंड नासाडी झाली. रब्बी हंगामात पिकांच्या पेरण्यांसाठी तयारी केली तर शेतात पाण्याचे तळेच साचल्यामुळे वाफसा तयार होण्याची आशाच शेतकऱ्यांनी सोडून दिलेली. असे चित्र जिल्ह्य़ात सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येते. कोरडवाहू क्षेत्रातील मंगळवेढा हे ‘ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. येथील ज्वारीला जीआय मानांकन मिळाले आहे. येथे ऑगस्टमध्ये ज्वारीच्या पेरण्यांचा हंगाम सुरू होतो. हस्त नक्षत्राच्या पावसाचा त्यासाठी लाभ होतो. परंतु गौरी-गणपतीनंतर पावसाने सातत्याने जोर धरल्यामुळे मंगळवेढय़ात शेतकऱ्यांना पेरणीच करता आली नाही.

परतीच्या पावसाचा पारंपरिक पिकांसह डाळींब, द्राक्ष बागांनाही बसला आहे. सततच्या पावसामुळे डाळिंबाची फुलगळ आणि फळकूज झाली आहे. बागांमध्ये घुसलेले पावसाचे पाणी बाहेर काढावे तर पुन्हा पाऊस पडतो. त्यामुळे यंदा डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांमध्येही पावसाच्या पाण्यामुळे शेतकरी हादरला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये द्राक्षांची छाटणी होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही छाटणी झाली नाही. नवोदित बागायतदारांनी द्राक्ष बागा तोडल्या आहेत. ऊस उत्पादनावर परतीच्या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. एकंदरीत, ग्रामीण भागातील अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लावला आहे.

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर.

पुणे

यंदाच्या हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्य़ात झाली. परतीच्या पावसानेही पुण्यात हाहाकार माजवला. यंदा जिल्ह्य़ात सरासरी १५८.५ टक्के पाऊस झाला आहे.  अतिवृष्टीने पुणे जिल्ह्य़ातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ाचे खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार हेक्टर इतके असताना सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्याचे झाले आहे. या ठिकाणी १५ हजार ३६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत, तर पिकनिहाय स्थिती पाहता भाजीपाला आणि सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे सुमारे ४० हजार ७४५ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

पुणे जिल्ह्य़ात काढणीच्या अवस्थेतील पिके जोराचा पाऊस आणि वाऱ्यामुळे भुईसपाट झालेली आहेत. प्रामुख्याने हळवे भात, सोयाबीन, बाजरी, खरीप ज्वारीसह मका आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. द्राक्षे मणी आणि डाळिंब फळांची गळ झाली आहे. भाताचे पीक भुईसपाट झाली. कांद्याची मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर ढगफुटीसदृश पावसामुळे शेताचे बांधबंदिस्ती आणि तालीही पडल्या आहेत. द्राक्षांवर औषध फवारणी करायची झाल्यास शेतात छोटे ट्रॅक्टर चिखलामुळे जाऊ शकत नाहीत. तसेच फवारणी केली तरीसुद्धा सततच्या पावसामुळे त्याचा उपयोग शून्य असल्याचे चित्र आहे. यंदा परतीच्या लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत. सततच्या पावसामुळे जुन्नरमधील द्राक्षबागा अडचणीत आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबरला द्राक्षबागांची छाटणी केली आहे त्या बागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन द्राक्षांचे घड सुकण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे द्राक्षघडांवर पाणी राहून मणीगळ सुरू झालेली आहे.

तालुकानिहाय बाधित

पिके हेक्टरमध्ये

जुन्नर : १५ हजार ३६, बारामती एक हजार ८२१, मावळ एक हजार ५०५, खेड एक हजार ४३८, पुरंदर ८०६, इंदापूर ५४५, शिरूर ५२९, आंबेगाव २५७, हवेली १७५, मुळशी १४, दौंड ९७, भोर ३२, वेल्हा १९ हेक्टरवरील खरीप पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्य़ात खरीप पिके बाधित क्षेत्रात प्रमुख पिकांसह डाळिंब, केळी, मका, फुलपिके, बटाटा, बाजरी, ऊस, गळीत धान्य आदी पिकांचाही समावेश आहे. हा प्राथमिक अंदाज असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

जिल्ह्य़ातील पीकनिहाय बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये

भाजीपाला : सात हजार २५१, सोयाबीन : चार हजार ६८६, भात : तीन हजार ३०९, भुईमूग : दोन हजार ४३४, द्राक्षे : एक हजार २६४, कांदा : एक हजार ३१ आणि तृणधान्ये ८१६

प्रथमेश गोडबोले, पुणे
response.lokprabha@expressindia.com

First Published on November 8, 2019 1:05 am

Web Title: maharashtra heavy rain farmers issue