12 August 2020

News Flash

लग्न आणि पर्यटनही!

‘डेस्टिनेशन वेडिंग’ सध्या चांगलंच लोकप्रिय होत चाललंय

दारात घातलेला मंडप, दारात येणारी वरात, दारात वाजणारे सनई-चौघडे हे लग्नाचं चित्र दुर्मीळ म्हणावं इतका बदल होत लग्नं कार्यालयांमध्ये, बॅन्क्विट हॉलमध्ये व्हायला लागली. आता तर हे सगळं बाजूला पडून गोवा, राजस्थान, थायलंड अशा पर्यटनाच्या ठिकाणी लग्न करण्याचा म्हणजेच डेस्टिनेशन वेिडगचा ट्रेण्ड आहे.

दारात मांडव घातला की लग्नघराचा फील येऊ लागतो. लग्नाची लगबग जोमाने सुरू होते आणि मांडवात सनईचे सूर घुमतात, मंगलाष्टकं ऐकू येतात हे सारं जणू काही स्वप्नवत असावं अशा पद्धतीने आताचा विवाह सोहळा बदलला आहे. पण एकेकाळी लग्न लागायची ती अशा मांडवात. घरापुढे जागा नसेल तर मग गावातल्या मंदिरात, तर कधी सार्वजनिक सभागृहात नाहीतर अगदी शाळेतदेखील. उत्तरेकडील काही समाजात एखादी पूर्वजांची हवेली वगैरे यासाठी लोकप्रिय असायची. घर लहान होत गेली, शहरात जागा कमी पडू लागली तसा लग्नासाठीचे हॉल आणि मंगल कार्यालयांचा बोलबाला वाढत गेला. दोन्ही घरचे पैपाहुणे आणि स्नेहीजनांच्या सोयीची जागा निवडली जायची. अर्थातच हे ठिकाण दोघांपैकी एकाच्या गावाच्या जवळचे किंवा त्याच गावातले असायचे. मंगल कार्यालयाची उपलब्धता, वैशिष्टय़, दर्जा वगैरे गोष्टींचा त्यात सहभाग असायचा. शहर कोणते हा भाग तसा फारसा महत्त्वाचा नसायचा. कार्यालयाची गुणवत्ता प्रथम पाहिली जायची. एखाद-दीड दिवसात ज्या शहरात लग्न आहे ते शहर पाहिले जाण्याची शक्यता तर नसायचीच.
15lp-marriage

नव्या जमान्यातल्या लग्नांनी, मग शहरातील मंगल कार्यालय अथवा बँक्वेट हॉल हा मुद्दा बाजूला ठेवला आणि एका नव्या संकल्पनेला व्यावसायिक रूप दिले आहे. दोन्ही घरांचा कसलाही संबंध नसलेले पण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले आणि विवाह सोहळा करण्याच्या सर्व सुविधा असलेल्या ठिकाणी जाऊन लग्न करण्याचा हा फंडा मूळ धरत आहे. लग्न तर होतेच, पण लगेहात पर्यटनदेखील घडवणारं हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ सध्या चांगलंच लोकप्रिय होत चाललंय.

एके काळी केवळ उच्चभ्रूंच्या पुरता मर्यादित असणारा हा प्रकार गेल्या काही वर्षांत अगदी उच्च मध्यमवर्गीयांमध्ये देखील रुजत चालला आहे. साऱ्या सुविधांनी युक्त असं लग्न लावून देणारी पर्यटनस्थळं आता विकसित होताना दिसत आहेत. लग्नातल्या नारायणाची जागा जशी वेडिंग प्लॅनर नामक व्यावसायिकाने घेतली तशी डेस्टिेनेशन वेडिंगला बऱ्यापैकी चालना मिळू लागली. कारण नवख्या ठिकाणी जायचं तर तिथे सारं काही सुरळीत पार पाडणारा कोणीतरी हवाच. प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर तर लग्नं होऊ लागलीच, त्याचबरोबर कमी प्रसिद्ध पण जवळच्या पर्यटनस्थळांची मागणीदेखील वाढू लागली.

सध्या देशात राजस्थान आणि गोवा ही दोन राज्यं डेस्टिनेशन वेिडगमध्ये आघाडीवर आहेत. तर देशाबाहेर थायलंड हेदेखील हॉट डेस्टिनेशन होत आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे ज्या ठिकाणी मुळात पर्यटन रुजलंय त्याच ठिकाणी डेस्टिनेशन वेिडगला चालना मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे दळणवळणाच्या सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि मुळातच पर्यटन हा व्यवसाय म्हणून जोपासण्याची स्थानिकांची, प्रशासनाची आणि हॉटेल व्यावसायिकांची वृत्ती. हे सारं जेथे जुळून येतं तेथेच डेस्टिनेशन वेडिंगला वेग मिळू शकतो. त्याचबरोबर डेस्टिनेशन वेिडगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो प्रवासखर्चाचा. त्यामुळे राजस्थान जरी लोकप्रिय असले तरी त्यातदेखील उदयपूर, बिकानेर, जोधपूरपेक्षा जयपूरला मागणी अधिक असल्याचे वेिडग्ज डॉट इनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप लोढा सांगतात. देशभरातून तेथे असणारी प्रवासाची सोयीस्कर सुविधा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तोच भेद अंतराबाबतदेखील होत असतो. उत्तरेतून गोव्यात येण्यापेक्षा राजस्थानात जाण्याला अधिक पसंती मिळत असल्याचे ते नमूद करतात. राजस्थानच्या बाबतीतला दुसरा मुद्दा आहे तो तेथील जुन्या राजवाडय़ांचे आकर्षण. त्यातूनच पॅलेस वेिडगची संकल्पना जन्माला आली असे म्हणावे लागेल. शाही वाडय़ांमध्ये होणाऱ्या लग्नांचा भव्य भरजरीपणा अनेकांना आकर्षित करतो.

तर गोव्याच्या बाबतीत बीच वेिडगचा फायदा मिळत असल्याचे जॉय स्मिथच्या सत्यश्री पानसे सांगतात. सीझननुसार ठिकाणांमध्ये बदल होत असल्याचे त्या नमूद करतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच्या  दुसऱ्या एका मुद्दय़ाकडे त्या लक्ष वेधतात तो म्हणजे त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणारं मार्केट. जयपूर आणि गोवा या दोन्ही ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा कोणताही इव्हेंट करू शकता. कारण त्यासाठी लागणारी सारी यंत्रणा तेथे सज्ज असते. सिमलासारख्या ठिकाणी दळणवळण व मनुष्यबळाच्या बाबतीत हे सारं जमवणं तसं कठीणच असल्यामुळे सिमल्याला मागणी कमी असल्याचे त्या सांगतात.

16lp-marriage   डेस्टिनेशन वेिडग म्हणजे फक्त वऱ्हाडी मंडळी घेऊन दोन दिवस कोठेतरी जायचे असे नसून त्यात वऱ्हाडी मंडळीचे पर्यटनदेखील अपेक्षित असते. डेस्टिनेशन वेिडगला मागणी ही मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांतील लोकांकडून येण्याचे प्रमाण अधिक आहे. लोणावळा, महाबळेश्वरसारखी हिल स्टेशन्सना जरी हळूहळू मागणी येत असली तरी त्या लग्नामध्ये प्रवासाची मज्जा, नवीन ठिकाणाचा अनुभव मिळत नाही. त्यामुळेच राज्याबाहेरील गोवा तसेच जयपूरच्या मागणीत वाढ होताना दिसते, असे संदीप लोढा नमूद करतात. केवळ लग्नासाठी प्रवास त्यामध्ये अपेक्षित नसतो, तर त्यातून पर्यटनाचीदेखील भावना असल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. अर्थात यामध्ये असणारा प्रवासखर्चाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे लोणावळा-महाबळेश्वरलादेखील मागणी येत असल्याचे सत्यश्री पानसे नमूद करतात. साखरपुडय़ाचा कार्यक्रम महाबळेश्वरला करणारेदेखील असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर हैद्राबाद येथील रामोजीराव फिल्मसिटी, लवासा, अ‍ॅम्बी व्हॅली अशा काही थीम बेस्ड अशा हिल स्टेशन्स व पर्यटनस्थळांनादेखील चांगलीच मागणी मिळत आहे.

पर्यटनाधारित ठिकाणांचा समावेश डेस्टिनेशन वेिडगमध्ये असला तरी दक्षिणेतील केरळात वगैरे ठिकाणी जाऊन लग्न करण्याकडे आपला कल कमीच असल्याचे दिसून येते. भाषा आणि जेवण ह्य़ा दोन गोष्टींची अडचण त्यात येण्याची शक्यता त्यामध्ये अधिक आहे. मात्र देशाबाहेर थायलंड हे सर्वात हॉट डेस्टिनेशन होत आहे. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे एखाद्या विविक्षित सीझनमध्ये गोव्यात अथवा जयपूरला जो खर्च येईल, त्यापेक्षा थोडय़ा अधिक खर्चात कमी लोकांमध्ये थायलंडवारी करणं कधीही सोयीस्कर असल्याचे सत्यश्री पानसे सांगतात. मारवाडी आणि पंजाबी समाजाचा कल त्याकडे अधिक असल्याचे त्या नमूद करतात.

अर्थात हे सारं करणारे, करवून देणारे आणि ज्यांच्याकडे जाऊन लग्न करायचंय हे सर्व घटक वेगवेगळे असले तरी या सर्वाना एकत्रित गुंफायचा प्रयत्न करणारा एक घटक असतो तो म्हणजे त्या त्या राज्याचे अथवा देशाचे पर्यटन मंडळ. कारण या निमित्ताने त्यांच्या पर्यटकांमध्ये एका नव्या घटकांची भर पडत असते आणि दिवसेंदिवस वाढणारी असते. त्या त्या ठिकाणच्या शासनाच्या धोरणांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असतो. गोवा, राजस्थान आणि थायलंड या तिन्ही ठिकाणांच्या शासकीय धोरणांचा फायदा झाल्याचे दिसून येते.
14lp-marriage

थायलंडचेच उदाहरण द्यायचे तर २०१४ मध्ये येथे ११० भारतीय विवाह सोहळे संपन्न झाले आहेत. थायलंडमध्ये वर्षांला साधारण एक दशलक्ष पर्यटक येतात. त्यापैकी डेस्टिनेशन वेिडगसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या साधारण ५ टक्के इतकी आहे. यात वर्षांला साधारण दहा टक्क्यांनी वाढ होत असल्यामुळे २०१५च्या अखेरीस १५०च्या आसपास तरी विवाह सोहळे झाले असण्याची शक्यता थायलंड टुरिझम ऑथॅरिटीकडून व्यक्त केली जात आहे. तर गोव्यात २०१३-१४ मध्ये भव्यदिव्य असे ७२० विवाह सोहळे झाले होते. २०१५ च्या अखेरीस १२०० चा आकडा ओलांडल्याची शक्यता आहे. छोटेमोठे सोहळे तर अनेक होतच असतात.

आनंद साजरा करण्यासाठी, आयुष्यातील महत्त्वाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी म्हणून जरी डेस्टिनेशन वेिडगचा बोलबाला वाढत असला तरी एकूणच वरील आकडेवारी पाहता त्यातून पर्यटनाच्या अर्थकारणातदेखील चांगलीच भर पडताना दिसत आहे. बहुतांश खर्च हा त्या राज्यातच होत असल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तेथील धोरण धुरीणांना त्याची जाणीव असल्यामुळेच त्याला चालना कशी देता येईल हे त्यांच्याकडून अगदी व्यावसायिक पद्धतीने पाहिले जाते. अर्थातच येणाऱ्या काळात पर्यटनाधारित लग्नांची संख्या आणखीनच वाढणार यात काहीच शंका नाही.
13lp-marriage

गोव्याचा सन्मान

गोवा हे मुळातच पर्यटनावर जगणारं राज्य. त्यांची पर्यटनाकडे पाहण्याची एक चांगली व्यावसायिक वृत्ती त्यातूनच जोपासली गेली आहे. आपल्याकडे जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मेहनत घेतात. २०१५ साली आपलं राज्य हे सवरेत्कृष्ट वेडिंग डेस्टिनेशन आहे हे सांगण्यासाठी त्यांनी केलेल्या जनसंपर्क अभियानातून हे स्पष्टपणे जाणवते. केवळ लग्नासाठीच्या डेस्टिनेशनसाठी गोवा पर्यटन महामंडळाने डेस्टिनेशनवन ही वेबसाइटदेखील तयार केली. अभयारण्य, घाटवाटा, धबधबे, पुरातन चर्च, मंदिरे, किल्ले, बॅकवॉटर क्रूझ, रिव्हर क्रूझ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समुद्रकिनारा अशी गोव्यातील वैविध्यता हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पैलू ठरला आहे. अर्थातच गोवा राज्यासाठी अ‍ॅडफॅक्टर या जनसंपर्क एजन्सीने केलेल्या या जनसंपर्क कॅम्पेनला एक्स्चेंज फॉर मीडियाच्या गौरव सोहळ्यात सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे. तर गोवा राज्याला २०१५ मधील सवरेत्कृष्ट वेडिंग आणि हनीमून डेस्टिनेशन म्हणून आयटीबी बर्लिन मध्ये पॅसिफिक एरिआ ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनच्या अ‍ॅवार्डने गौरविण्यात आलं आहे.

३० लाख ते कितीही..

हौसेला मोल नसते. त्यातही लग्नासारखा प्रसंग अविस्मरणीय करण्यासाठी भरपूर खर्च करणारे म्हणून आपणा भारतीयांची ओळख असल्यामुळे नवनवीन संकल्पनांना जन्म मिळत असतो. साधारण २०० लोकांसाठी दोन दिवसांचा हा सारा सोहळा करावयाचा झाला तर सध्या गोवा अथवा जयपूर येथे २५-३० लाखांपर्यत खर्च येतो. अर्थात हा खर्च सर्वसाधारण आहे, पण उदय भवनसारख्या एखाद्या विवक्षित राजवाडय़ातच करायचे असेल तर अगदी एक-दीड कोटींपर्यंत खर्च करणारेदेखील आहेत. कारण तेथील खोलीचं भाडंच तीस-चाळीस हजार रुपये असते.

थायलंडचा पुढाकार

17lp-marriageआपल्या देशात येऊन लोकांनी लग्न करावे म्हणून थायलंडने गेल्या वर्षांपासून कंबरच कसली आहे. लग्नासाठी अनेक सोयीसुविधा तर त्यांच्याकडून मिळतातच, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक नियमांची बंधन सैल केली आहेत. आपल्या सोहळ्यात अगदी अत्यावश्यक झालेली फटाक्यांची आतषबाजी, लग्नाची वरात, रात्री उशिरापर्यंत चालणारा किंवा भल्या पहाटे सुरू होणारा सोहळा अशा गोष्टींना तेथे विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. अनेक हॉटेल्सना प्रोत्साहित केलं जातंय. इतकेच नाही तर लग्नाच्या वरातीसाठी म्हणून घोडा अथवा हत्ती ठरावीक तासांसाठी मोफत पुरवला जातो. तसेच स्थानिक थाई नृत्य संगीत सुविधादेखील ठरावीक वेळेसाठी मोफत दिली जाते. प्रेक्षणीय स्थळांना भेटी, व्हिसासाठी मदत अशा अनेक गोष्टी थाई पर्यटन मंडळ पुढाकाराने घेत असल्याचे थाई पर्यटन मंडळाच्या सोराया होमचेऊन सांगतात. त्यांच्या मते भारतीय लग्नं ही थाई लोकांसाठी आता नवीन राहिले नाही. स्थानिकांना आणि हॉटेल्सना आता भारतीय लग्न सोहळा साजरा करण्याची पुरेशी माहिती असल्यामुळे थायलंडमध्ये येऊन लग्न करण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढत आहे.
सुहास जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 1:23 am

Web Title: wedding special marriage and travel
टॅग Honeymoon,Marriage
Next Stories
1 होणार ती नवरी…
2 बॉलीवूडचे बॅण्ड, बाजा आणि वराती…
3 संगीत सोहळ्याचे बदलते वारे
Just Now!
X